© नेहा बोरकर देशपांडे.
'आई, मी आत्ता लग्न करणार नाहीये.... माझ्या ऑफिसमध्ये एका प्रोजेक्टसाठी मी आणि अजून एक मैत्रीण यामध्ये चुरस आहे, पुढचे पाच- सहा महिने महत्वाचे आहेत, त्यामुळे मला सध्या कुठल्याही इतर गोष्टीत काहीही स्वारस्य नाहीये, हा प्रोजेक्ट जर मिळला तर मला परदेशी जायची संधी मिळेल आणि ती काहीही करून मला मिळवायचीच आहे... त्यामुळे मला कोणत्याही मुलाचा फोटो, इतर माहीती वगैरे दाखवण्याच्या फंदात पडू नकोस, ईशाने जरा चढ्या आवाजातच जेवणाच्या टेबलावर हे सगळं सांगितलं.
सुहास काही बोलणार एवढ्यातच कुमुद म्हणाली, 'बरं , तेवढं झालं कि मग मात्र मी काही ऐकणार नाही हं, नंतर लग्नाचं बघणार हं,'
'हो गं आईडे, मी सांगेन तुला कधी बघ ते, डॉन्ट वरी माय डिअर मॉम..एवढं बोलून ईशा तिथून ताट घेऊनच निघून गेली.
सुहास आणि कुमुद म्हणजे ईशाचे आईवडील.
सुहास म्हणाला, 'मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, इथे बसून जेवायला काय हरकत आहे तिला?' आपण सगळे एकत्र जेवतोय ना..आणि लग्नाच्या बाबतीत हिचे असे विचार ?
'जाऊ द्या हो, कुठे जेवताना कचकच करू तिला आणि मला पण ... हल्ली तुम्ही घरी असता....
पुढचं बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन सुहास गप्प बसला.
रात्री उशिरा कधीतरी दरवाज्याचा आवाज आला. सुहास उठून बाहेरच्या खोलीत आला तर समर आला होता, डोक्यावर एक बाजू रंगवलेले केस, कानात विविध डुल, अतरंगी शर्ट, अर्धवट फाटलेली जीन्स, कानाला मोठाले हेडफोन्स, उग्र वासाचे परफ्यूम, मळकट रंगाची पाठीवर सॅक. सुहासने हॉल मधला लाईट लावला, घड्याळात बघितले तर पहाटेचे तीन वाजले होते. 'समर, अरे काय हे किती वाजलेत ? हि काय वेळ आहे का यायची?
'कमॉन डॅड, फ्रायडे नाईट आहे. आजच्या नाईटचे पाच हजार जास्त मिळतात, मॉमला चालतं हो, ती काही म्हणत नाही....
'अरे , तुला मिळालेली चांगली नोकरी टिकवली असतीस तर, हे काम करावं लागलं नसतं..अजूनही वेळ गेली नाहीये, आपण शोधू चांगली नोकरी, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आणि आईला कधी विचारले रे , कि चालतंय कि नाही ते?
'ओ बाबा, नोकरी करून पैसेच मिळवायचेत ना, मग मी मिळवतोय की ते... मला हे काम पण आवडतंच... मी कामावर फॉर्ममध्ये आहे... "डिजे सॅम", हातातली सॅक, हेडफोन्स इकडे तिकडे टाकून तो त्याच्या खोलीत निघून गेला.
सुहास परत झोपायला गेला पण झोपेने असहकार पुकारला... उगीच मग या कुशीवरून त्या कुशीवर होताना डोळ्यांसमोर समरचा पहिला वाढदिवस दिसू लागला. ईशा अडीच वर्षाची तर समर एक वर्षाचा.
त्यादिवशी सुहासने सुट्टी घेतली होती. सरकारी औषध कंपनीत तो चांगल्या हुद्द्यावर कामाला होता. तो गैरहजर असताना त्याच्या अनुपस्थितीत ऑफिसमध्ये इतर सहकाऱ्यांनी उलटसुलट व्यवहारात त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला.
दुस-या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले.
सुरवातीला त्याला काहीच कळेना, पण मग हळूहळू काही गोष्टी कळू लागल्या.... चौकशीअंती तो निर्दोष असल्याचे कळले पण तोपर्यंत त्याची बदली कन्याकुमारीच्या जवळच्या एका ऑफिसमध्ये केली होती.
त्यावेळेस नोकरी न जाता बदली तरी मिळतेय या एकाच धाग्यावर सुहास आणि कुमुदने धीर ठेवला होता. नाहक उठलेला हा धुरळा बसायला दोन अडीच वर्ष गेली, सरकारीच काम ते..ख-याची बाजू सिद्ध करायलाच वेळ लागला.
सुहास कन्याकुमारीहून तीन चार महिन्यांनी यायचा. ट्रेनने जवळपास छत्तीस तास प्रवास करून मुंबईत गोरेगावला रहायचे तिथे.
कुमुदही शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये होती नोकरीला. तिचं ऑफिस व्हि.टीला होतं. मुलं लहान ,त्याच्या शाळा, रोजचा ट्रेनचा प्रवास त्यातून सुहास इथे नाही, कुमुदने अतिशय ताकदीने हा त्यांच्या संसाराचा गाडा ओढला होता.
सुहासने परत मुंबईत बदलीसाठी प्रयत्न केले पण त्याची डाळ इथे शिजू दिली नाही.
काळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात, मुलं मोठी होत होती. त्याच्या शाळा, स्नेहसंमेलन, सहली, यासंदर्भात फक्त आणि फक्त कुमुदच्या पत्रातूनच सुहासला कळायचे.
सणावाराला आल्यावर तेवढ्यापुरतंच मुलांचे लाड करणं, त्यांचे हट्ट पुरवणे, फिरायला नेणे याच गोष्टी घडायच्या. मुलांच्या प्रत्येक निर्णय घेण्याच्या वेळेस सुहास तिथे नसायचाच, कुमुद आणि मुलंच काय तो निर्णय घ्यायचे.
कितीही नाही म्हटलं तरी मुलांना रोजच्या आयुष्यात वडीलांनी निर्णय घेऊन तो ऐकण्याची सवयच राहीली नव्हती. आई सोबत रहाताना कळत न कळत स्वतंत्र विचार करून त्याची अंमलबजावणी सहज करू शकत असल्याने आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत सुहासच म्हणणं ऐकून त्यावर कृती करेपर्यंतचा वेळच नसायचा. सुहासनेही कुमुदच्या निर्णयावर कधी आक्षेप घेतला नाही, ती एकटी सगळंच बघतेय तर मुलांच्याबाबतीतले तिचे निर्णय अंतिम असंच धोरण ठेवले.
त्यामुळे बाबा फक्त मौजमजेसाठी असा समज रूजत गेला मुलांमध्ये.
जवळपास बावीस वर्ष सुहास घराबाहेर होता. कन्याकुमारीला असताना ऑफिस व्यतिरिक्त सुहास विवेकानंद केंद्रचे काम करायचा. तिथल्या अनेक उपक्रमात सहभाग घेऊन आपला वेळ सत्कारणी लावायचा.
रिटायरमेंटला तीन एक वर्ष बाकी असताना, कंपनीतर्फे गोल्डन शेकहँडची संधी चालून आली. अतिशय उत्साहात सुहासने ही बातमी कुमुदला सांगितली व थोड्याच दिवसांत मुंबईत घरी कायमचा आला देखिल.
कुमुदचे ऑफिस चालूच होते. तिच्या रिटायरमेंटला अजून चार वर्ष तरी बाकी होती. सुहासने मनापासून तिला साथ द्यायला सुरवात केली होती. घराबाहेर राहिल्यामुळे त्याला ब-यापैकी स्वयंपाक येऊ लागला होता. त्यामुळे कुकर लावणे, भाजी आणून स्वच्छता करणे, संध्याकाळी जेवणात नवनवीन पदार्थ करून मुलांना खाऊ घालणे ,असं सगळं चालू झालं होतं.
पण नव्याची नवलाई या उक्तीनुसार मुलांना घरात बाबांची हळूहळू लुडबुड वाटायला लागली. सतत काय, कधी यांची उत्तरे देणे नकोसे होत होते.
कुमुदला मदत होत होतीच पण मुलं सारखी तिच्याकडे म्हणायची , इतके दिवस आपण सगळं बघत होतोच ना... पण बाबा का सारखं लक्ष ठेवतात?
कुमुद समजूत घालायची पण मध्येच कधीतरी कुमुदला आपलं पण स्वातंत्र्य जातयं कि काय वाटायचे. तिला मदत हवी होतीही आणि नकोही होती.
कुठेतरी सुहासलाही हे जाणवत होते. त्याला हे पचवणे जड जात होते कि आपली अडचण होतेय आपल्याच घरात....
ईशा व समर मुलंच ती.... ती त्यांची वाट धरणारच... त्यामुळे मुलांचे खूप वाईट वाटत नव्हते. पण कुमुदच्या वागण्यातून, बोलण्यातून हे जाणवायचे त्याचा खूप त्रास व्हायचा सुहासला.
एकदा घरच्या कुठल्याशा समारंभात सगळे गेले असताना, कोणीतरी म्हणालं, आता काय कुमुदला खूपच बरयं, घरी आल्यावर आयतं ताटावर बसायचं, ती वेळ हसत मारून नेली तिने पण घरी आल्यावर मात्र त्या ठिणगीचा सहजासहजी वणवा होऊ लागला, तिचं म्हणणं होतं, इतकी वर्ष माझी काहीही चूक नसताना मी हे सगळं सहन करून ,मुलांना वाढवून, माझी नोकरी केली तेव्हा आठवलं नाही, आताच बरं दिसतयं आयतं ताट, सुहास म्हणायचा ,अगं लोकंच ती दोन्ही बाजूने बोलणारच, आपलं आपल्याला माहितीये कि नाही!
पण तिला ते जमत नसे, मग अजूनच तिची चिडचिड व्हायची. कधीतरी मुलं बोलून जायची, बाबा आजचा बेत मस्तच जमलाय , त्याचाही तिला राग यायचा.
खरं तर तिला खूप आधार वाटत होता सुहासचा पण ते मान्य करायला तिचं मन तयार नव्हतं, तो नसताना मी करतच होतेच ना, मग आताच काय एवढं.
दिवसेंदिवस हि तेढ वाढत जाणार हे सुहासच्या लक्षात येऊ लागले. घराबाहेर असलेला तो घरातल्यांच्या मनाबाहेर कधी आणि कसा गेला, हे त्याचे त्यालाही कळले नाही .
आपले घराबाहेर असणे इतके घरातल्यांना सुखावणारे असेल, तर आपण घराबाहेर असलेले काय वाईट, असा विचार करून सुहासने विवेकानंद केंद्रांत संपर्क साधला व विचारले कि तिथे कामासाठी आलो तर चालेल का?
त्यांनी अवश्य या असं सांगितलं आणि हे घरात सांगितल्यावर तर घरातल्यांचे चेहरे आनंदले.
शेवटी काय घरातले सगळे खूष रहाण्यासाठीचं तर माझी धडपड आहे, तुला ,मुलांना जेव्हा कधी माझी गरज असेल त्यावेळेस मी आवर्जून तुमच्यासाठी हजर असेन.
मी घराबाहेर राहून तुम्हाला आनंद मिळत असेल तर ते करण्यात मला आनंदच आहे.
'कुमुद, उद्या मी निघतोय घराबाहेर.....
©® नेहा बोरकर देशपांडे.
सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार