बाबांचे हसू


© वर्षा पाचारणे




"आई, मी लग्न करेल तर याच मुलीसोबत... माझं खूप प्रेम आहे तिच्यावर.. कॉलेजात असल्यापासून एकत्र आहोत आम्ही... 

त्यानंतर नोकरी एकत्रंच केली.. पुढच्या शिक्षणासाठी परदेशात एकत्रच गेलो... एवढेच काय तिथे आम्ही एकत्रच राहत होतो"... लग्नाच्या वयात आलेल्या मुलाचं असं बोलणं ऐकून वसुधा मावशींचा पारा चढला.. 

आपल्या एकुलत्या एक उच्चशिक्षित मुलासाठी त्यांनी वधू संशोधन सुरू केलं होतं. 

खूप शिकलेल्या, सुंदर, सुशील मुलींची स्थळं अमितसाठी सांगून येत होती... 

पण त्याने आज वसुधा मावशींसमोर त्याच्या प्रेमाचा असा काही बॉम्ब फेकला की त्यांची इतके वर्षांची सारीच स्वप्न त्या स्फोटात जळून खाक झाली.


नुकत्याच परदेशातून आलेल्या आणि भारतात चांगल्या नावाजलेल्या कंपनीत लाखो रुपये पगार घेणाऱ्या मुलाची आई असलेली वसुधा सुनेबद्दलच्या असलेल्या कल्पनांना कुरवाळत बसली होती. 

सून आली की, 'मी तिला लेकीसारखं वागवेल', असा विचार करत, तिने नातेवाइकांमध्ये, मित्र परिवारामध्ये अमितसाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती.

एकुलता एक, देखणा, चांगल्या कंपनीत कामाला आणि शिवाय घरची मंडळी अतिशय प्रेमळ असलेल्या अमितला कोणीही नकार देण्याचं काही कारणच नव्हतं.

पण आता मात्र वसुधा मावशींना वधू संशोधन थांबवावं लागणार होतं, कारण अमितने त्याची लाईफ पार्टनर निवडली होती.

 चार एक दिवस धुसफूस करून झाल्यानंतर शेवटी वसुधा मावशीने त्याला पुन्हा एकदा समोर बसवून विचारलं," अमित, तुझा निर्णय अगदी पक्का झाला आहे का?"

 त्यावर ठामपणे 'हो' म्हणत अमितने होकार दर्शवला..


मुलाच्या इच्छेखातर आई-वडिलांनी त्याच्या लग्नाला होकार दिला. 

मोहिनी अगदीच दिसायला जेमतेम होती. 

तब्येतीने म्हणावं त्यापेक्षा जरा जास्तच सुदृढ, कमी उंची, बसकं नाक, रंगही अगदीच सावळा, अशी होती. 

पण रूपापेक्षा गुण जास्त महत्त्वाचे, असा विचार करून वसुधा ताईंनी चाफेकळी नाक, सुंदर गोरा वर्ण, उंचपुरी, मध्यम बांधा अशी सुनेची जी मनात एक छबी निर्माण केली होती, तिला मनाच्या कप्प्यात बंद करून टाकले.

लग्नमंडपातही जोडा अगदीच विजोड दिसत होता. 

सारेजण अमितचं कौतुक करत होते... आणि मोहिनीकडे पाहून 'ठीक आहे नाही नवरी', असं म्हणून आपापसात कुजबुजत होते. 

पण रूप हे कोणाच्या हातात नसतं, माणसाचं वागणं महत्त्वाचं असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं.

लग्न होऊन मोहिनी सासरी आली. 

नवी नवरी असली की तिच्याकडून सासरच्यांच्या बऱ्याच अपेक्षा असतात.. खरंतर सुनेच्याही सासरकडून खूप अपेक्षा असतात, पण त्या सगळ्याच पूर्ण होतात, न होतात, हा भाग वेगळा.... 

पण म्हणतात 'ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन', तसंच काहीसं मोहिनीचं वाईट इंप्रेशन पडलं.

मोहिनीला कामाची मुळातच आवड नव्हती. छानपैकी शॉपिंग, सतत बाहेरचं खाणं, फिरणं हे तिचं आवडतं काम.

लग्न झालं तरी तिने घरातल्या कुठल्याही कामाची जबाबदारी घेतली नव्हती. 

सकाळी उशीरा उठून फक्त स्वतःचं आवरून, नवऱ्यापुरता चहा- नाष्टा करायचा, एवढंच काय ते तिचं काम.

कारण तिच्या उशिरा उठण्याने नाश्त्याची वेळ चुकून जायची.


वसुधाताई आणि मोहनरावांना डायबिटीसच्या गोळ्या घ्यायच्या असल्याने, त्यांना सकाळी वेळेत नाष्टा करणं भाग असायचं.

त्यामुळे वसुधामावशी सकाळी सकाळी सगळ्यांसाठी पोहे, उपीट, इडली असा काहीतरी नाश्ता बनवायच्या. 

पण नाष्टा केलेला असतानाही मोहिनी मुद्दाम मला आज 'हे नकोय' म्हणत कधी ब्रेड, तर कधी वडापाव खायचा हट्ट करायची.

सुरुवातीला वसुधा मावशींना वाटलं ,'नवीन मुलगी आहे, नवीन घरात रुळायला तिला वेळ लागेल', म्हणून त्या तिला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नव्हत्या.

पण त्यामुळे मोहिनीने मात्र मनमानी करायला सुरुवात केली. 

थोड्या दिवसात ती आई होणार असल्याची चाहूल लागली. 

मग तर काय! मोहिनीने पूर्ण दिवस आराम करण्याचा कार्यक्रम आखला.

वसुधा मावशी तिचं सारं काही प्रेमाने करत होत्या, पण मग एक दिवस अचानक त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि मग विश्रांतीसाठी त्या गावी निघून गेल्या. 

इकडे मोहिनीसुद्धा बाळंतपणासाठी तिच्या माहेरी गेली. 

तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण तरीसुद्धा त्या बाळाला ती फक्त दूध पाजायला जवळ घ्यायची. 

इतर वेळेला तिची आई आणि बहीण त्या बाळाला सांभाळत होत्या.

बाळाचं नाव 'शुभ्रा' असं ठेवलं... कारण ती दिसायला पांढऱ्या शुभ्र कापसाच्या गोळ्याप्रमाणे आणि छान गोंडस गुबगुबीत होती. 

तीन महिन्यानंतर मोहिनी शुभ्राला घेऊन घरी परतली.

आता घरात फक्त मोहिनी, अमित आणि शुभ्रा राहायचे. 

कामाच्या नावाखाली मोहिनी शुभ्राकडे दुर्लक्ष करत होती.

 शुभ्रा रात्रीची रडू लागली तर मोहिनी अमितला तिचे डायपर बदलायला सांगायची. अमितही काहीही कुरकुर न करता सारे काही करत होता.

अंगावरचे दूध पाजायला लागू नये आणि सतत उठायला लागू नये म्हणून मोहिनीने तिला तीन महिन्याची असतानाच वरच्या दुधाची सवय लावली. 

मग रात्री कितीही वेळा शुभ्रा उठली, तरीही अमित तिला बाटलीने दूध पाजत असे. 

रडू लागली तर तिच्यासाठी गाणी म्हणत असे, नाचत असे, तिला ताप आला तर रात्र रात्र 'बाबा'च तिच्यासाठी जागत असे. 

हळूहळू शुभ्रा मोठी होऊ लागली. आता ती एक वर्षाची झाली होती. मोहिनीच्या विचित्र स्वभावामुळे सासू-सासरे ही तिच्याकडे येणे टाळत होते.

शुभ्राचा पहिला वाढदिवस थाटामाटात एका हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आला.

वाढदिवसाच्या वेळी शुभ्रा पुर्णवेळ अमितला चिकटून होती. 

तिला तिच्या जवळ 'मम्मा' नको होती आणि मोहिनी पण फक्त फोटो काढून घेण्यासाठी शुभ्राजवळ थांबायची. 

इतर वेळेला ती तिच्या मैत्रिणींबरोबर एन्जॉय करत होती.

वाढदिवस होऊन घरी आल्यावर दाराचे लाॅक उघडता उघडता मोहिनी अमितला म्हणाली," मी फार थकले आता तू तिचे कपडे चेंज कर आणि तिला थोडं बॉटलने दूध पाज तोपर्यंत मी जरा पडते.

 तसेही उद्या मला कामाला जायचंय तिने अशा काही अविर्भावात सांगितलं जणू काही आम्ही ऑफिसला जातच नाही.

 खरं पहाता मोहिनीच्या आधी त्याला ऑफिससाठी निघावे लागायचं त्यातही शुभ्राची सारी तयारी करून मग ऑफिसला जाता जाता तो तिला पाळणाघरात सोडायचा. 

पण तो शुभ्राचा बाबा होता ना! त्याचा जीव त्याच्या लेकीसाठी तीळतीळ तुटायचा मोहिनीचा कितीही राग आला तरीही त्याने तिच्यावर मनापासून प्रेम केलं होतं आणि ते म्हणल्यावर नाही स्वीकारावाच लागतो, हे तो जाणून होता. 

कदाचित लग्नाच्या आधी आपण फक्त पाहिले आणि दोषांकडे डोळेझाक केली हे त्याला आताशा जाणवू लागलं होतं. 

पण त्याच्या लेकीसाठी तो एक सुपर बाबा होता काहीही कमी पडू द्यायचं नव्हतं तिच्या आयुष्यात त्याला कुठलाही त्रास नको होता.

अशातच कोरोनासारखी महामारी आली दररोज ऑफिसला जाण्याची धावपळ शुभ्राला पाळणाघरात सोडण्याची दगदग एका क्षणात थांबली होती. 

कारण आता वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन मिळाला होता. 

घरून ऑफिसचं काम करता करता हा बाबा आता सुद्धा शुभ्रासाठी जमेल तितकं करत होता झोपेला तर जणू त्याने सुट्टीच दिली होती.

कारण मोहिनी काम करत असली तरी ती घरात राहून कुठलंही काम करत नव्हती. 

तिचे दिवसभर ऑफिसचे फोन चालू असायचे संध्याकाळी जरा निवांत झाली की ती झोपून जायची आणि म्हणून फक्त वरण-भात करायची. 

त्यात दिवसभर ऑफिसच काम आणि नंतर छान झोप घेतल्यानंतर तिला रात्री लवकर झोप येत नसेल त्याच्यामुळे तीन रात्री एक मस्त मूवी बघत बसायची तोपर्यंत शुभ्रा बाबाबरोबर खेळून शेवटी निवांतपणे बाबांच्या खांद्यावर विसावायची.

लॉक डाऊन मधील मोहिनीला घरात बसून बसून कंटाळा येऊ लागला. 

सतत शॉपिंग आणि फिरण्याची सवय असलेल्या मोहिनीला हे असं जगणं नकोसं झालं होतं. 

बाहेर कोरोना मुळे किती संकट वाढले याची पर्वा न करता रोज संध्याकाळी फिरायला बाहेर पडायची. 

जरी मास्क लावला तरीही धोका कमी नव्हतं पण हे मोहिनीला कोण समजावे.

अमितने तिला बाहेर जायला मनाई केली तर ती लगेच वाद घालायच्या तयारीत असायची आणि या साऱ्या प्रकारामुळे जे व्हायचे ते झालेच. आठवडाभराने मोहिनीला अतिशय ताप आला.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळपासून श्वास लागल्यासारखं व्हायला लागलं, त्यामुळे तिची तातडीने कोरोना चाचणी करून घेण्यात आली.

 रिपोर्ट आल्यानंतर त्यात मोहिनी कोरोना पॉझिटिव असल्याचं निष्पन्न झालं होतं. 

आता मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्याचे पाणी काही केल्या थांबत नव्हतं. 

तिची अशी अवस्था पाहून अमितचा जीव तीळतीळ तुटत होता. 

शेवटी मोहिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. 

ज्या लेकीकडे ती इतके दिवस दुर्लक्ष करत होती आज तिच्याकडे पाहून तिला जवळ घ्यायची मोहिनीला खूप इच्छा झाली. पण कोरोनामुळे ती हतबल झाली होती.

मोहिनी तर ॲडमिट झाली पण अमितला सर्वात मोठी काळजी म्हणजे शुभ्राची होती. 

जर मला कोरोना झाला तर माझ्या या या या इवल्याशा परीच काय व्हायचं कोण सांभाळेल आई-बाबा गावी आहेत. 

या विचाराने अमित धास्तावला होता. त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली पण ती निगेटिव्ह आली. 

रिपोर्ट पाहून अमितच्या जीवात जीव आला त्याने या चार-पाच दिवसात शुभ्राला जीवापाड जपलं. 

तिच्यासाठी रात्रीचा दिवस करून हा बाबा सतत तिला ताप तर आला नाही ना तिला बरं वाटतंय ना हे तपासत होता रोज सकाळी उठल्यावर करून आंघोळ घालून, तिचा नाष्टा जेवण शी शू सारं काही व्यवस्थितपणे सांभाळत होता.

आठवड्याभराने मात्र अमितला खूप थकवा जाणवू लागला आपली तब्येत बिघडत आहे असं त्याला जाणवलं त्याच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. 

बोलताना धाप लागत होती श्वास अडकत होता खोकला खूप वाढला होता. 

त्याने तातडीने आई बाबांना फोन करून शुभ्राला घेऊन जायला सांगितलं.

अमितचे बाबा पहाटे लवकरच्या गाडीने अमितकडे पोहोचले. अमितने शुभ्राला दारातच बाबांकडे सोपवले. तिच्या पूर्ण कपड्यांवर सॅनिटायझर मारून अंगावरच्या कपड्यानिशी बाबांकडे सुपूर्त केले.

आपल्या पोटचा गोळा आपल्याच जन्मदात्याकडे सोपवताना देखील अमितचा जीव तीळ तीळ तुटत होता. 

तो हमसून हमसून रडत होता अमितच्या बाबांच्याही डोळ्याचं पाणी काही केल्या थांबत नव्हतं पण अशा परिस्थितीत तिथे जास्त वेळ थांबणं योग्य नव्हतं... ते शुभ्राला घेऊन निघाले..


तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत अमितचा धीर सुटला.. झाले की शिवाय तो मिनिट भरही लांब राहू शकत नव्हता तिला आज कुशीतच काय पण अगदी समोर उभा राहून जवळून पाहूही शकणार नव्हता. 

आपल्या रडणाऱ्या बाबाकडे पाहणारी शुभ्रा आजोबांच्या कडेवरून खाली उतरण्यासाठी जोर जोरात होती मला बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे असा तिचा जीव हेलावून टाकणारा आक्रोश मन सुन्न करत होता.

अमित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. 

डोळ्यातून पाणी काही केल्या थांबत नव्हते डॉक्टर त्याला समजावत होते तुम्ही मनाने खंबीर रहा कोरोना लवकर बरा होतो कोरोनाला घाबरू नका.. असं म्हणून डॉक्टर त्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत होते, पण लेकीच्या विरहाने आतून तुटलेला बाबा त्यांना दिसणार नव्हता.

लग्नानंतरच्या स्वप्नाळू दुनियेतून मोहिनीच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्या आयुष्याला जी मरगळ आली होती, त्याच दुनियेत शुभ्राच्या येण्याने एक नवीन आशा जन्माला आली होती.... 'आपल्या जगण्याचे ध्येय म्हणजे शुभ्राचे भविष्य' हेच समजणारा 'बाबा' आज असा ऑक्सिजन मास्क लावून आय.सि.यु मध्ये पडला होता. 

आय.सि.यु मधून चार दिवसांनी बाहेर पडल्यानंतर त्याला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आला मोबाईलवर दिवसभर शुभ्राचे फोटो बघून तो मनाची समजूत काढत होता..

चौदा दिवसांचा कोरोनाकाळ संपल्यानंतर तो पुन्हा घरी आला घरात यावेळी मोहिनी त्याची आतुरतेने वाट पाहत होती. 

इतके दिवस आपण किती चुकीचं वागलो याची जाणीव तिला या कोरोनाने करून दिली होती. 

तिने घरची सगळी जबाबदारी स्वतःहून स्वीकारायचं ठरवलं होतं जर अमित आणि शुभ्रा आपल्या आयुष्यात नसतील तर जगण्याला काही अर्थ राहणार नाही हे तिने आता ओळखलं.

महिनाभर आजी-आजोबांकडे राहून देखील सतत शुभ्रा एकच विचारणा करत होती माझा बाबा कुठे आहे मला माझा बाबा पाहिजे मला माझा बाबा पाहिजे.

अमित चा फोटो दाखवून आजी आजोबा समजावत होते. की अगं बाबाला ऑफिसमध्ये खूप काम आहे तो लवकरच घरी येणार.

एवढ्याशा लेकराला कुठे समजणार होतं की बाबा इतका दूर का गेला आहे?...

महिन्याभरानंतर आजोबा शुभ्राला घेऊन अमितकडे आले, यावेळी आजी आजोबा दोघेही काही दिवस इकडे लेकाकडेच राहणार होते.. 

आजोबांनी दारावरची बेल वाजवली. आपल्याच घराला इतक्या दिवसांनी पाहिल्यानंतर ती चिमुरडी थोडीफार बावरली होती. 

दारात तिलासमोर मोहिनी दिसली. तिला पाहताच दोन्ही हात पसरून मोहिनी म्हणाली," अगं माझं बबडं ते! किती दिवश गेलं होतं मला शोडून"... मम्माला किती आठवण आली तुझी!....


पण आजोबांच्या कडेवरून टुणकन उडी मारून शुभ्रा बाबाकडे धावत गेली आणि त्याच्या कुशीत शिरत म्हणाली," येsss मला माझा बाबा भेटला...... मला माझा बाबा भेटला"... तिचे ते प्रेमाचे लडीवाळ बोल ऐकून अमितच्या चेहऱ्यावर एक गोड स्मितहास्य उमटलं. 

आज महिन्याभराच्या विरहानंतर त्याची गोड परी त्याच्या कुशीत विसावली होती. त्याचा जीव कोरोनाने नाही, तर लेकीच्या विरहाने नकोसा झाला होता. 

त्या बाप-लेकीचं असं एकमेकांच्या गळ्यात पडून बिलगण्याने मोहिनी आणि आजी-आजोबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बरसत होते. 

आज एका 'बाबाच्या' चेहऱ्यावर त्याच्या लेकीमुळे आनंदाची उधळण होत होती आणि त्याच प्रमाणे 'आपला लेक' आणि 'त्याची लेक' यांच्यातलं प्रेम पाहून आजोबांच्याही चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. 

शेवटी बाबा हा प्रत्येक मुलीसाठी तिचा सुपर हिरो असतो.


मोहिनीसारखी स्त्री क्वचितच एखाद्या घरात सापडते, पण अमितसारखा 'बाबा' मात्र प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असतो. 

अशाच 'लेकींना जिवापाड जपणाऱ्या बाबांसाठी', आजचा लेख समर्पित.... धन्यवाद.


© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने