चाकोरीबाहेरचं जगणं



©वर्षा पाचारणे.




"आक्के, रडू नको गं,.... आम्ही काय बी कमी पडू द्यायचो नाय तुझ्या लेकराला... येळ पडली तर स्वतःला विकू पण तुझ्या लेकराला जीवापाड जपू बघ".. तारुण्यात वैधव्य आलेल्या बहिणीचं सांत्वन करताना सुदामा आणि नरहरीला काय करावं हेच सुचत नव्हतं.

 घरची परिस्थिती अत्यंत बेताची.

त्यात कसंबसं बहिणीचं लग्न लावून दिलेलं... डोक्यावर आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरवल्यानंतर या भावांनी आक्केचं ओळखीतल्या एका माणसाबरोबर लग्न लावून दिलं. 

आक्कीचा नवरा अगदी भला माणूस... 'कष्ट करून मिळेल त्या भाकरीत सुखासमाधानाने राहायचं', हे त्याचं पक्क मत. 

'मेहुण्यांकडून काडीचीही अपेक्षा न ठेवता उलट जमेल तेव्हा त्यांनाच आपण उपयोगी पडावं', अशा विचारांचा तिचा नवरा होता.


परंतु एक दिवस कामावर जात असताना त्याचा अपघात झाला. 

दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी 'त्याच्या जीवाची शाश्वती नाही', असं सांगितलं... 'हवा तेवढा पैसा खर्च करा, पण आमच्या आक्कीच्या नवऱ्याला वाचवा', असं म्हणून नरहरी आणि सुदामा हमसून हमसून रडत होते.

तिला नुकताच आठवा महिना लागला होता. त्यात हा मोठा आघात झाला होता. 'आज जर काही आपल्या नवऱ्याचा बरं वाईट झालं, तर आपण आणि पोटातलं बाळ कसं जगायचं?', हा मोठा यक्ष प्रश्न समोर उभा होता. 

त्यात सासर माहेरची परिस्थिती अगदी हालाखीची असल्याने, नवऱ्याला उपचारासाठी इतका पैसा कुठून आणायचा?, याचा तर विचार करून तिचा जीव घुसमटत होता.

भावांनी आईने ठेवलेली एक मोहनमाळ आणि दोन सोन्याच्या बांगड्या विकून कसाबसा पैसा उभा केला. आईची आठवण म्हणावी अशा त्या दोन शेवटच्या वस्तू त्यांच्याकडे शिल्लक होत्या. 

पण 'आठवणी जपत बसण्यापेक्षा माणसाचं जगणं महत्त्वाचं', हे जाणून त्या भावांनी तात्काळ सोनं मोडण्याचा विचार केला. 'तातडीने उपचार करा', म्हणत सगळी रक्कम दवाखान्यात जमा केली. 

अन दुसऱ्या दिवशी मृत्यूशी सुरू असलेला लढा संपला. 

आक्कीचा नवरा तिला कायमचा सोडून गेला. घरादारावर मोठं संकट कोसळलं. 

'एकतर स्वतः हलाखीत जगत असताना बहीण आणि तिच्या पोटातल्या लेकराला आपण कसं सावरणार?', या विचाराने दोन्ही भाऊ सुन्न झाले होते. 

'नवरा गमावल्याचे दुःख का पोटात त्याच नवऱ्याच्या प्रेमाची निशाणी आहे याचा आनंद मानावा?', अशी अवघड अवस्था आक्कीची झाली होती. महिन्याभरात तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

बाळ बाळंतीण घरी आले. माहेरचा उंबरा ओलांडून पुन्हा एकदा आत येताना तिची अवस्था अगदीच दयनीय झाली होती. 

लग्न करून ज्या घरातून तिची पाठवणी केली गेली होती, त्याच घरात पुन्हा एकदा कायमचं आश्रितासारखं रहावं लागेल, असं तिला कधीही वाटलं नव्हतं. 

हक्काने जिच्या जवळ धाय मोकलून रडावं, अशी माय तर लहानपणीच सोडून गेली होती... आता जो काही आहे तो भावांचाच आधार म्हणत, इथेच कसेबसे दिवस कंठायचे, हा विचार करून ती दिवस दिवस सुन्न अवस्थेत बसून राहिलेली असायची.

बाळ कितीही रडत असलं, तरी तिचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नसायचं... तिची ही अवस्था बघून भाऊ मात्र आतल्या आत तिळतिळ तुटत होते. 

'काहीही करून आपण या बाळाला शिकवून मोठं करू आणि बहिणींचं आयुष्य सावरू', या विचाराने त्यांनी जमेल ते काम करायला सुरुवात केली. 

कधी रिक्षा चालवून, कधी मोलमजुरी करून, तर कधी अक्षरशः फुलं विकण्याचा धंदा सुरू करून पाहिला... मात्र कुठल्याच धंद्यात हवं तसं यश मिळत नव्हतं. 

आक्कीची लेक सिद्धी दिवसागणिक मोठी होत होती. मामांनी तिला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातलं. आई बापाचे गुण घेत सिद्धी स्वतःला सिद्ध करत होती. दरवर्षी शाळेत पहिला नंबर काढत होती. 

पण मुळातच परिस्थितीची जाण असावी अशी ही सिद्धी कधीही आपल्या आईकडे किंवा मामांकडे कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करत नव्हती.

पण लहान लेकरू ते!.... कधीतरी बाहेरच्या जगाला भुलणारंच की...

एक दिवस असंच सिद्धीने शाळेतल्या मैत्रिणीकडे मोठी बाहुली बघितली. घरी येऊन जमिनीवर गडाबडा लोळत ती आईकडे हट्ट करू लागली. "आई, मला बाहुली आणून दे, नाहीतर मी उद्यापासून शाळेत जाणार नाही". 

आईने तिला खूप समजावलं, परंतु सिद्धी काही केल्या ऐकायला तयार नव्हती. शेवटी आईने दोन फटके दिले, तेवढ्यात सुदामा मामा घरी आला. 

'आपल्या भाचीची एवढीशी इच्छा देखील आपण पूर्ण करू शकत नाही', या विचाराने तो मनातल्या मनात झुरत होता. त्याने पटकन सिद्धीला बाहेर नेले आणि एक चॉकलेट घेऊन दिले. 

परंतु हट्टाला पेटलेले सिद्धी मात्र ते चॉकलेट काही केल्या हातात घेईना... "द्यायचे असेल तर मला बाहुली दे, नाहीतर मला चॉकलेट नको", असं म्हणत तिने रस्त्यात गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांच्या मागोमाग गेलेली आक्की हा सगळा प्रकार इतका वेळ दुरून बघत होती.

शेवटी तिने जवळ जात सिद्धीला दोन-तीन मुस्काटात मारत, घरी खेचत आणले आणि म्हणाली ,"आपण आधीच त्यांच्या जीवावर जगतोय आणि तू त्यांनाच त्रास देतेस. अगं, आज हे मामा नसते, तर आपण दोघीही कधीच उपाशीतापाशी मेलो असतो. त्यामुळे आजपासून नसते हट्ट करू नकोस. नसेल शाळेत जायचं तर घरी धुणीभांडी कर, पण पुन्हा गोंधळ घातलेला मला चालणार नाही". आता मात्र सिद्धीचा हट्ट कुठल्या कुठे पळाला. 

जेमतेम चौथीत असलेली ती पोर, अचानक समजूतदार झाली... त्यानंतर तिने कधीही मामांकडेच काय, परंतु आईकडेही कसलाही हट्ट केला नाही. 

आईचं बोलणं तिच्या मनावर खोलवर रुजलं होतं. 'इतकी वर्ष मामांनी आपल्यासाठी किती काय काय केले, हे ऐकतच ती लहानाची मोठी झाली. जशी मोठी होत होती तशी तिला जाणीव झाली की, 'खरंच वडील नसलेल्या मुलांना सांभाळताना एकट्या आईची किती तारांबळ होते. परंतु मामांनी मात्र वडिलांची कमी कधीच जाणवू दिली नाही.


दहावीचे शिक्षण होऊन सिद्धी बोर्डात पाचवी आली. घरी आनंदाला उधाण आलं होतं. आज पहिल्यांदाच घरी पेढ्यांचा बॉक्स आला होता. 

सिद्धीच्या पुढच्या शिक्षणासाठी खर्च येईल या विचाराने सुदामा मामाने भुर्जीपावची गाडी टाकली. 

दररोज सकाळी लवकर उठून मामा गाडीवर जाऊन भुर्जीपाव विकायचा.. त्या छोट्याशा हात गाडीला त्याने 'स्वयंसिद्धा भुर्जीपाव', हे नाव दिलं.


सिद्धी अतिशय मेहनतीने आणि चिकाटीने अभ्यास करत होती. बारावीच्या परीक्षेत तिने ९० टक्के मार्क मिळवले. पुढे तिला इंजिनिअर व्हायची इच्छा होती, परंतु घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अॅडमिशनचा खर्च झेपणारा नव्हता. 

'चांगल्या कंपनीत कामाला लागून घरची परिस्थिती झटक्यात बदलता येईल', या विचाराने इंजिनिअर होण्याची जिद्द बाळगून इतके वर्ष अभ्यासावर खूप मेहनत घेतली होती.

एक दिवस ती मामाबरोबर भुर्जीपावच्या गाडीवर गेलेली असताना, तिथे एक सद्गृहस्थ आले. अशाच गप्पा गप्पांमध्ये सिद्धीने त्यांना 'मला इंजिनिअर व्हायचे आहे, परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने, माझे हे स्वप्नं स्वप्नंच राहिल', असे म्हणताच त्यांनी तिला त्यांचे कार्ड दिले.

 'इतकी चांगली गुणवत्ता असून तुझे स्वप्न अर्धवट व्हायला नको', असं म्हणत त्यांनी स्वतःच्या ओळखीने चांगल्या कॉलेजमध्ये सिद्धीला अॅडमिशन मिळवून दिली. 

आता कष्टाची जाण ठेवत सिद्धी दिवसभर कॉलेजचा अभ्यास आणि संध्याकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत मामाला भुर्जीपावच्या गाडीवर मदत करत होती. त्याच्याकडून कांदा अगदी बारीक कापण्यापासून ते खमंग व चविष्ट अशी भुर्जी कशी बनवायची, इथपर्यंत तिला मस्त ट्रेनिंग मिळालं. 

गिऱ्हाईक नसताना मध्येमध्ये ती अभ्यासाची पुस्तके उघडून बसायची.

एक दिवस सहज मामाच्या छातीत दुखू लागल्याने, त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. त्याला सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. 

आज मात्र आक्कीचा जीव गलबलून गेला. 'ज्या भावांनी आपल्यासाठी जिवाचं रान केलं, त्याच भावाला असा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलेला पाहून', तिचं मन आक्रंदत होतं. 

या संकटाच्या काळात सिद्धीने मात्र स्वतःचा अभ्यास थोडे दिवस बाजूला सारून भुर्जी पावची गाडी जोमाने चालवली. ती रात्री दोन वाजेपर्यंत स्वतः सगळं काम व्यवस्थितपणे पूर्ण करत होती. 

एक मुलगी भुर्जीपावची गाडी इतक्या रात्री पर्यंत चालवते, म्हणताना अनेक लोक नाक डोळे मोडत होते. काहीजण तर तिला प्रत्यक्ष विचारायचे की ,'तुला रात्री दोन दोन वाजेपर्यंत गाडी वर बसायला भीती नाही वाटत का?', त्यावर तिचे एकंच ठरलेले उत्तर असायचे," परिस्थिती माणसाला सारं काही करायला भाग पाडते आणि त्यात मी कुठलेही वाईट काम करत नाही मग मला भीती कशाची?".

सिद्धीने इंजीनियरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्या दरम्यान तिने मामांना पूर्णपणे विश्रांती दिली. 'आपल्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या मामांचं म्हातारपण आपण सुखात घालवू', या विचाराने तिने इंजिनीयर होऊनही भुर्जीपावची गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. 

स्वयंसिद्धा आता इतकं प्रसिद्ध झालं होतं की, लांबून लांबून लोक तिच्या हातची भुर्जी पाव खाण्यासाठी आवडीने येत.. त्यामध्ये अनेक मोठे ऑफिसर्स, कॉलेज तरुण तरुणी, अगदी वयोवृद्ध मंडळीचाही समावेश असे.

तिच्या हातचा भुर्जी पाव खाऊन आणि तिचे शिक्षण पाहून अनेक जण अवाक् होत. एवढी शिकलेली असूनही नम्रपणे सारी कामं करताना पाहून अनेक वयोवृद्ध मंडळी तिला तोंड भरून आशीर्वाद देत असत. 

काही उच्च पदस्थ अधिकारी तिथे भुर्जीपाव खाण्यासाठी आले, तरी तिला नोकरीची ऑफर देत असत... तुझे मॅनेजमेंट स्किल्स अतिशय उत्तम आहेत असं म्हणून तिचे कौतुक करत असत. 

परंतु 'माझ्या मामांनी माझ्यासाठी स्वतः जीवन पणाला लावलं, तिथे मी माझ्या शिक्षणाचा गर्व मानत परिस्थिती कशी विसरु', असं म्हणत तिने तोच भुर्जीपावचा धंदा पुढे चालू ठेवायचे ठरवले. 'एखाद्या कंपनीत कामगार बनून राहण्यापेक्षा एखाद्या व्यवसायाची मालकीण बनण्यात एक वेगळं समाधान आहे', हे तिचं वाक्य साऱ्यांनाच विचार करायला लावायचं.

तिने त्या गाडीच्या जोरावर एक टुमदार दोन मजली बंगला बांधला होता.

तिच्या व्यवसायाची चर्चा आता दूरवर पसरली होती. तिला अनेक चांगल्या स्थळांची मागणी येत होती. स्वतःसाठी कधीच न जगलेली सिद्धी आज पहिल्यांदा पाहुणे पाहायला येणार म्हणून अगदीच खुशीत होती. 

रोज जीन्स आणि टी-शर्ट घालणारी सिद्धी, छान साडी नेसून, केसात गजरा माळून तयार झाली होती. तिचे रूप अगदी वाखाणण्यासारखं होतं..


एका छोट्याशा भुर्जीपावच्या गाडीची मालकीण असलेल्या सिद्धीने आता दोन गाळे घेऊन त्यात आपला व्यवसाय वाढवला होता. 

बघायला आलेल्या त्या मुलाला सिद्धीपेक्षा तिच्या व्यवसायात जास्त रस आहे, हे कळताच सिद्धीने त्याला सरळ नकार दिला. 

इतके वर्ष मन मारत जगणारी सिद्धी आज पहिल्यांदा मामा आणि आईसाठी खरेदी करतानाच स्वतःसाठी देखील पहिल्यांदाच लिपस्टीक, पावडर अशा गोष्टी घेऊन आली.


आजपासून कुठल्याही स्थळासाठी म्हणून न सजता आपण स्वतःसाठीही कधीतरी छान राहून बघावं', ही एक सकारात्मक बाब तिला जाणवली. दररोज टी-शर्ट घालून वावरताना बिनधास्तपणा नक्कीच येतो, पण कधीतरी असं छान नटून थटून स्वतःला आरशात न्याहाळताना जे समाधान आणि आनंद मिळतो तो विरळाच.

स्वयंसिद्धा भुर्जी पावच्या आता शाखा तयार झाल्या होत्या. परंतु इतके यश मिळवूनही सिद्धी मात्र तिचे पाय जमिनीवर घट्ट रोवून उभी होती, ते तिच्यात असलेल्या आत्मविश्वासाने आणि मामांनी दिलेल्या पंखातल्या बळाने...


स्वतःची अभ्यासाची आवड जगताना, अनेक गोष्टी मागे सुटल्या होत्या, परंतु आपल्या सारख्याच अनेक चिमुरड्यांना शिकण्याची आस असूनही परिस्थिती मात्र जगू देत नाही, अशा चिमुरड्यांसाठी तिने मोफत भुर्जीपाव सेवा देत त्यांना जमेल तशी शिक्षणाची मदत करत एक आनंदयात्री प्रवास सुरू केला होता.


'स्वतःकडे पुस्तकांचा भरपूर मोठा संग्रह असावा' अशी इच्छा असलेल्या सिद्धीने सार्वजनिक वाचनालय सुरु केले. नटण्या थटण्यात मुरडण्यात मुळातच रस नसलेल्या सिद्धीचा स्वत:च्या आनंदातून अनेक आयुष्य फुलवीत, हा त्यामागचा निर्मळ हेतू होता.

एक स्त्री एखादा व्यवसाय चालू करते, तेव्हा तिच्या मार्गावर काटे पसरवण्यासाठी, तिचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी अनेक विरोधक तयारच असतात... परंतु त्या काट्यांना झुगारत, जेव्हा अशी स्वयंसिद्धा तयार होते, तेव्हा ती स्वतःबरोबरच इतरांनाही कसे आपल्या सोबत घेऊन जाता येईल, याचा कसोशीने प्रयत्न करते.

एका ठराविक चाकोरीत न जगता चाकोरीबाहेर जगण्याचा आनंद देणारा हे एक उत्तम उदाहरण.


©वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने