नव्या पिढीला दोष नको

© वर्षा पाचारणे.



'गावाकडचं दोन खोल्यांचे छोटसं घर सोडून माई दादांनी आपल्या घरी राहायला यावं' हा विशालचा हट्ट होता.

त्याने शहराच्या वातावरणापासून थोडं दूर निसर्गरम्य ठिकाणी, कामाला येण्या-जाण्यासाठी सोईस्कर इतक्या अंतरावर एक टुमदार बंगला घेतला होता.. अशा बंगल्यांच एक मोठं नगरंच त्याठिकाणी वसलेलं होतं. 

आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, हिरवीगार झाडी आणि जवळच खळाळणारी नदी असं प्रफुल्लित करणारं वातावरण होतं.. शिक्षणाच्या निमित्ताने लहानपणापासूनच होस्टेलमध्ये वाढलेला विशाल नंतर कॉलेज, नोकरी या साऱ्यामुळेच घरापासून दूर होता.. आई-वडिलांबद्दल प्रचंड आदर असलेल्या विशालची पावलं सुट्टी मिळताच गावाकडे वळायची.

माईंच्या पसंतीच्या मुलीशी विशालने लग्न देखील केलं. बोल बोल म्हणता लग्नाला तीन वर्षे झाली.. विशाल आणि आणि स्वातीचा मुलगा आता वर्षभराचा झाला होता.

सुरुवातीचे तीन महिने स्वाती बाळाला घेऊन सासरीच राहिली होती परंतु नंतर विशालच्या खाण्यापिण्याची फारच आबाळ व्हायला लागल्याने ती पुन्हा शहरातल्या घरी आली.

येताना तिने माई दादांना खूप विनवणी केली, "माई, चला ना माझ्याबरोबर.. अहो असे इथे दोघंच राहण्यापेक्षा तिथे आमच्याबरोबर, नातवंडा बरोबर दिवस मजेत जाईल... बाळालाही तुमचा लळा लागेल"... आणि शिवाय गावच्या सारखाच तर हिरवगार परिसर आहे तिकडे"

पण माई आणि दादा काही केल्या ऐकायला तयार होईनात. "अगं तिकडे तुमचे बंगले कितीही मोठे असले, तरी गावच्या सारखं कोणी दारात येऊन गप्पा मारत नाही ना"

कधी अडीअडचणीला वेळ पडलीच तर कोणाला बोलवायचं तिथं?...तुम्ही दोघं असे कामाला निघून जाणार मग पुन्हा आम्ही म्हातारा म्हातारी घरात कोंडून राहणार. 

ना कुणी ओळखीपाळखीचं भेटणार, ना घराबाहेर पडता येणार... सगळंच कस अनोळखी".. असं म्हणत माई कायमच विशाल आणि स्वातीच्या आग्रहाला मोडता घालायचा.

शेवटी स्वातीची रजा संपली. तिने काळजावर दगड ठेवून नाईलाजाने शेजारच्या बंगल्यातल्या आज्जींकडे वरदला ठेवायला सुरुवात केली.. गेली तीन-चार वर्ष त्या आजी पाळणाघर चालवत होत्या. कामाला जाणाऱ्या आई बाबांच्या लेकरांना अगदी जीवापाड जपत होत्या.

काही दिवसांनी दिवाळी अगदी तोंडावर आल्याने आता मात्र विशाल हट्टाला पेटला. 

"यंदा आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही, यावेळेस तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल", असं म्हणून त्याने माई दादांची बॅग भरून घराला टाळा लावून त्यांना जबरदस्ती गाडीत बसवले. माई आणि दादा अगदी अंगातलं अवसान गेल्याप्रमाणे निमूटपणे बसून राहिले.

गाडीत बसल्यानंतर गावचा मागे पडलेला रस्ता पाहून माईंना हुंदका अनावर झाला.... "अरे , आयुष्य गेलं माझं या गावात.... दोन खोल्यांचा का होईना, पण प्रेमाचा संसार फुलवताना कधी कसला त्रास वाटला नाही.. अडीनडीला शेजारी अगदी देवासारखे धावून यायचे. कोणीही कशाची लाज न बाळगता हक्काने आपलं दुःख दुसऱ्याबरोबर वाटून घ्यायचं"...असं म्हणत मनात दाटलेला सगळा राग आणि दुःख माई भडाभडा बोलून मोकळ्या झाल्या.

"अगं, ठीक आहे... दिवाळी झाली आणि तुला नाहीच करमलं, तर मी पुन्हा तुला गावाला नेऊन सोडेल... पण आता मात्र तू आनंदात रहा", असं म्हणत विशालने आईला समजावलं. 

माई, दादा आणि विशाल घरी पोहोचताच स्वातीने आणि वरदने त्यांचं छान हसून स्वागत केलं. 

वरद तर आजी-आजोबांना पटकन बिलगला. स्वातीने देखील दिवाळीचा सारा फराळ तयार केला होता. घर अगदी स्वच्छ नीटनेटकं ठेवलं होतं. कामाला जाऊनही स्वाती एवढे सारे करते', हे पाहून माईंचा उर भरून आला.

दोन-चार दिवसात माईंचा वरद बरोबर चांगला वेळ जाऊ लागला.. आता त्यांना या शहरातल्या घरात देखील कंटाळा येत नव्हता.. स्वातीने देखील दिवाळीच्या दिवसांमध्ये ऑफिसला सुट्टी घेतली होती.. मग सासू-सुनांच्या छान गप्पा रंगायच्या.

स्वाती रोज संध्याकाळी माई आणि दादांना जवळच्या नाना-नानी पार्क मध्ये घेऊन जायची. येताना मस्तपैकी सुकी भेळ, कच्छी दाबेली असा आवडीचा खाऊ खायचे. 

वरद रोज तिकडे पार्क बाहेरच्या खेळण्याचे दुकानाकडे हात दाखवून घट्ट धरायचा. पण उगाच वायफळ गोष्टीचा हट्ट मुलांनी केल्यानंतर लगेच ती गोष्ट दिल्याने मुलं आणखी हट्टी होतात, याची स्वातीला चांगलीच जाणीव होती. 

त्यामुळे तिने वरदला एक दिवस थोडे समजावून सांगितले आणि त्याला देखील ते पटले. 

कधीकधी माईंना वाटायचं,' ही मुलं एव्हढे पैसे कमावतात, पण स्वत:च्या लेकरासाठी वस्तू घेताना मात्र दहा वेळा विचार करतात'... कदाचित म्हातारपणात आपल्यालाही काही हवे असेल, तर असेच दहा वेळा विचार करून मग ती गोष्ट घेऊन देतील'

स्वातीचा सकाळचा पूर्ण दिवस कामात जायचा आणि संध्याकाळी देखील वरदचं खेळणं आणि अभ्यास सुरू असल्याने माई आणि दादांना पुन्हा घरात काय करायचं, हा प्रश्न पडायचा.

माईंची पुन्हा भुणभुण सुरू झाली,"स्वाती आता दिवाळीचे हे चार दिवस संपले की आम्ही आपले पुन्हा गावी जातो"... 'इथे सगळ्यांची दारं बंद... साधी हसण्यासाठी तोंडदेखील उघडत नाहीत माणसं'... या त्यांच्या वाक्यावर स्वातीला खूप हसू यायचं.

एक दिवस ऑफिस वरून आल्यानंतर, रात्री जेवण झाल्यावर स्वाती आणि विशाल वरदला आजी-आजोबांकडे सोपवून घाईघाईत बाहेर पडले.. माई आणि दादांना वाटलं, जेवणानंतर असेच बाहेर चक्कर मारायला गेले असतील.

परंतु रात्रीचे दोन वाजले तरीही स्वाती आणि विशालचा घरी यायचा पत्ता नाही.. फोन लावून काहीच उपयोग होत नव्हता. कारण स्वाती फोन घरीच विसरली होती आणि विशालचा फोन स्विच ऑफ झाला होता.

आता माईंना खूप काळजी वाटू लागली.. वरद केव्हाच झोपी गेला होता.. माई सोफ्यावर बसून देवाचा धावा करत होत्या.. तितक्यात दारावरची बेल वाजली. 

स्वाती आणि विशाल दोघांनाही दारात पाहून माईंच्या जीवात जीव आला.. "अरे कुठे गेला होतात?... जाताना सांगून जायचा काही पत्ता नाही. तुम्हाला काडीची शिस्त नाही.. आज आम्ही घरात नसतो, तर त्या लेकराला कुठे ठेवलं असतं?.. तुमच्या विचाराने काळजात धस्स होऊन, इथे मरायची वेळ आली होती. 

त्यांचं असं बोलण ऐकून स्वाती माईंजवळ गेली.. माईंचा हात हातात घेऊन म्हणाली," माई, खरंच चुकलं, पण एकदा ऐकून घ्या"

माईंचं सगळं बोलणं ऐकून विशाल माईंना म्हणाला ,"अगं दोन मिनिट ऐकून घेशील का आता?"

"त्या कोपर्‍यावरच्या फुलवाल्या आजी जवळपास सत्तर वर्षांच्या आहेत.. आम्ही ऑफिस वरून रोज संध्याकाळी येताना त्यांच्या कडून देवासाठी फुलं आणतो.. त्या आजींचा नवरा एका पायाने अधू होता.. पूर्वी ट्रेनमध्ये पाकीट, रुमाल विकणारे ते आजोबा एक दिवस ट्रेनमधून उतरताना गर्दीमुळे जोरदार प्लॅटफॉर्मवर फेकले गेले.. ट्रेनमध्ये चढण्याची घाई असलेल्या काही लोकांनी त्यांना तुडवूनच ट्रेनमध्ये जागा मिळवली.

जवळपास दोन वर्षे आजोबा असेच अधू अवस्थेत फुलांच्या दुकानाबाहेर रस्त्यावर बसून असायचे.. वय जास्त असल्याने आता कुठे जाऊन उद्योग धंदा करणं शक्य नव्हतं. 

काल संध्याकाळी मी आणि स्वाती ऑफिसवरून येत असताना आज्जी हंबरडा फोडून रडताना दिसला. 

रस्त्याला तुफान गर्दी झाली होती.. लोक नुसती बघ्याची भूमिका घेत होते.. स्वातीने जवळ जाऊन आजींना ,'काय झालं?', म्हणून विचारलं.. तेव्हा त्या आजी म्हणाल्या," आत्ता पर्यंत आजोबा कोपऱ्यात बसून छातीत दुखत आहे म्हणत होते", पण... पण आता असं निपचित पडून आहेत.. एक पण रिक्षा इथं मध्येआध्ये थांबायला तयार नाय...येणाऱ्या-जाणाऱ्याला लई विनंती केली, पण कुणीही माणूस उपयोगी पडलं नाय आणि आता यांच्या तोंडातून काहीच आवाज येईना झालाय... मला खूप भीती वाटतेय".. असं म्हणत परत रडू लागल्या.

स्वातीने आणि मी पटकन त्यांना आपल्या गाडीत बसवले आणि दवाखान्यात नेलं... एवढं मोठं हॉस्पिटल बघून आजी गांगरल्या... 

त्या मटकन हॉस्पिटलच्या दारात बसल्या. स्वातीने आणि मी आजोबांना ऍडमिट करून प्रोसिजर पूर्ण केली.. आजोबांवर उपचार सुरू झाले.. मग स्वाती आणि मी घरी आलो.

आपली जेवण झाल्यावर तुम्हाला हे सगळं सांगणार होतो, तितक्यात हॉस्पिटल मधून डॉक्टरांचा फोन आला..

आधीच नवऱ्याला असं हॉस्पिटल मध्ये दाखल केलेलं बघून गांगरलेली आज्जी, खर्चाच्या विचाराने पुरती गळून गेली होती. दिवसभर काही न खाल्ल्याने आज्जीला चक्कर आली होती.. मग स्वातीने पटकन पर्समध्ये त्यांच्यासाठी डबा भरून घेतला आणि आम्ही त्या विचारातच घराबाहेर पडलो.आता कुठे आजोबांची तब्येत थोडी स्थिर आहे आणि आमच्यामुळे त्या आजीला देखील खूप धीर आला आहे..

विशालचं असं बोलणं ऐकून माईंना आणि दादांना खूप भरून आलं... 'गाव असो वा शहर, माणुसकी ही माणसाच्या वागण्यावर अवलंबून असते', हे त्यांना लेकाच्या वागणुकीवरून समजलं होतं.

शहरात बंद दाराआड देखील दुसऱ्याचा विचार केला जातो, हे पाहून माईंचे डोळे आज अभिमानाने पाणावले होते.

पाच-सहा दिवसांनी विशाल आणि स्वाती ऑफिसला जाण्याच्या वेळेला तर निघाले, परंतु तासाभरातच त्यांच्या गाडीचा आवाज आल्याने माईंनी दार उघडून पाहिले.

एका व्‍हीलचेअरवर तेच वृद्ध आजोबा बसले होते.. विशाल त्या व्हीलचेअरला ढकलत आतमध्ये घेऊन आला... स्वातीही त्या आजींना हाताला धरून घरात शिरली.

"आजी आजोबा, बसा हा"... असं म्हणत स्वाती पाणी आणायला आतमध्ये गेली... इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. 

कॉलनीतल्या स्वातीच्या वयाच्या मुली उभ्या होत्या.या साऱ्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी मिळून दोन वर्षापूर्वी सुरू केलेल्या समाज सेवा कार्यासाठी जमा केलेला निधी आज पासून पुढचा महिनाभर ते या आजी-आजोबांसाठी वापरणार होते.

दोन वेळचं पोटभर जेवणंही न मिळणाऱ्या 'त्या' आजी-आजोबांना, आता रोजच्या रोज या साऱ्याजणी पौष्टिक ताजे पदार्थ डब्यात घालून आणत होत्या. चार दिवस विशाल आणि स्वातीकडे राहुन झाल्यानंतर ते आजी आजोबा पुन्हा घरी जाण्यासाठी हट्ट करू लागले.

 तेव्हा जमलेल्या त्या कॉलनीतल्या लेकींचे डोळे पाणावले... 'आजी-आजोबा फक्त आजचा दिवस स्वाती आणि विशालकडे रहा, मग उद्या आपण बोलू', असं म्हणत साऱ्याजणी निघून गेल्या..

दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने सगळ्याजणी लवकर जमल्या होत्या.. कॉलनीमध्ये नवीन राहायला आले असताना मंदिर आणि सोसायटीच्या सामानासाठी बांधलेल्या खोलीत आजी-आजोबांची कायमची व्यवस्था करण्यात आली.

आजी आजोबांच्या खाण्यापिण्याची, औषध पाण्याची देखील अशीच त्यांनी जबाबदारी वाटून घेतली होती..

पोटी मुलं नसल्याने आयुष्यभर झुरणार ते जोडपं, आज या सुखाच्या ओझ्याने जणू काही वाकलं होतं.

नुकतेच हॉस्पिटलमधून मृत्यूला चुकवून आलेले आजोबा आज लेकिंचं प्रेम पाहून भारावून गेले होते.. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.

त्यांनी साऱ्यांकडे पहात हात जोडलेले बघताच, माई आणि दादा त्या जोडप्याजवळ गेले आणि म्हणाले," शहरातल्या बंद दाराआडच्या माणसातलं देवपण आज तुमच्यामुळे आम्हीदेखील अनुभवलं"... "आजकालच्या पिढीला नावं ठेवताना आमचा काळ किती सुखाचा होता, याचे गोडवे गाताना, या मुलांना अगदीच कमी लेखलं जातं".. 

"पण वेळ प्रसंगी आपल्या पिढीलाही लाजवेल, अशी धडाडी आणि रात्री-अपरात्री एखाद्याच्या मदतीला धावून जाण्याची तयारी मात्र या मुलांकडून खरंच शिकण्यासारखी आहे"... एवढं बोलताना माईंचा कंठ दाटून आला होता.


वाचकहो, आजकालच्या पिढीला अनेकदा नाव ठेवताना त्यांच्यातले चांगले गुण देखील बघण्यासारखे असतात. या कोरोनाच्या काळात तरुणाईनेच अनेक जणांचे जीव वाचण्यासाठी, कधी भुकेल्यांना अन्न देण्यासाठी, कधी गरजूंना पैसे देण्यासाठी जिवाचं रान केलं.

शहरात माणुसकी जिवंत नाही असं मुळीच नाही... उलट आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य आणि पटकन वापर करून गरजूंना लवकरात लवकर मदत कशी पोहोचवता येईल, हे नक्कीच पाहिलं जातं अन् मग दिवसभरात त्या गजबजलेल्या शहरात देखील माणसातल्या देवाचे दर्शन होतं.

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने