© सौ.मीनाक्षी वैद्य.
आनंदीला वाईट आणि भयंकर प्रसंगाची तशी सवय होती. कारण ती एक चांगली, कार्यक्षम सोशल वर्कर होती. पण, हा प्रसंग खूपच अनपेक्षित आणि धक्कादायक होता.
आनंदी पार कोसळल्यासारखी झाली होती. नाईलाजाने तिला डॉ. शेवड्यांची दोन-तीन सिटींग्ज घेऊन काऊन्सिलींग करून घ्यावे लागले. तेव्हा कुठे आज आनंदी जरा बरी वाटत होती.
तिच्या मनावरचे दडपण, काही तरी हरविण्याची खंत हळूहळू कमी होत होती. पंकज तिचा नवरा तिच्या भावनांना शेअर करीत होता. तो तिला समजून घेत होता. पण "आनंदी सावरायला जरा वेळ लागेल" हे डॉ. शेवड्यांचे म्हणणं लक्षात ठेवून पंकज फारसा टेन्शन घेत नव्हता.
आनंदी आताही त्याच गोष्टीचा विचार करीत बसली होती. गेले दोनतीन दिवस ती ऑफिसलापण गेली नव्हती. तिच्या असिस्टंटचा, कल्पनाचा आताच फोन आला होता. तीही आनंदीसारखीच अस्वस्थ होती. पण ही केस आनंदीकडे असल्यामुळे आनंदीचा प्रत्यक्ष संबंध येत होता. म्हणून आनंदीला जरा जास्त धक्का बसला होता.
आनंदीला तो दिवस आठवला. ज्या दिवशी रुपम तिच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा आली होती.
आनंदी तिच्या कामात मग्न होती. तेवढ्यात "आत येऊ का ? असा आवाज तिच्या कानावर आला. काम करता करता आनंदी नी समोर बघीतलं आणि ती घाबरली.समोर असलेली व्यक्ती जीवंत आहे की हाॅरर सिनेमातल्या हाडांचा सापळा?
ती याचाच विचार करत असताना समोरची व्यक्ती म्हणाली
" मी रूपम बारटक्के.सगळेच मला पहील्यांदाच बघीतल्यावर घाबरतात."
"साॅरी बसान" आनंदीने तिला खुर्चीकडे बोट दाखवून म्हटले. "बोला मी काय मदत करू तुमची?"
" मला माझ्या नव-यापासून घटस्फोट हवा आहे."
"आमची संस्था अशी कामे करत नाही.तुम्हाला एखादा वकील बघावा लागेल"
" मला माहीत आहे पण तुम्ही माझी कहाणी आधी ऐकावी असं मला वाटतं.
" का? वेगळ काही कारण आहे?"
"हो. मॅडम मला साझा नवरा छळतो आज ही माझी अवस्था त्याच्यामुळेच झाली आहे.
"किती वर्षे झालीत लग्नाला?" आनंदीने विचारलं.
"दोन वर्ष झाली फक्त." रूपम उत्तरली.
"तुमच्या घरचे काय म्हणतात? म्हणजे माहेरचे?" माझ्या माहेरच्या माणसासमोर माझा नवरा आदर्श नवरा असतो. माझ्या सासूच्यासमोरसुद्धा. माझी सासूच फक्त नवऱ्याच्या बाजूने आहे. घोळ सगळा इथेच आहे "
"तुम्ही कधी तुमच्या सासऱ्यांना याबद्दल बोललात ?" आनंदीनी विचारलं.
"नाही. कारण, माझे सासरे खूप साधे भोळे आहेत. या मायलेकांचे छक्केपजे पचनी न पहण्याइतके साधे आहेत. वारकरी आहेत. सदैव पाडुरंगाच्या चिंतनात असतात. इतक्या साध्या, सज्जन व्यक्तीला सगळं सांगून त्रास द्यावा असे मला वाटत नाही."
"नेमका काय त्रास देतो तो तुम्हाला? मारतो, शिव्या देतो, काय करतो?"
"शारीरिक आणि मानसिक छळ दोन्हीही करतो."
"का? हुंड्यासाठी?" आनंदी नी विचारलं.
"नाही नाही माझी नोकरी मिळविण्यासाठी." रूपम म्हणाली.
"तुमची नोकरी मिळविण्यासाठी? ते कसे शक्य आहे ?" आनंदीला आश्चर्यच वाटलं.
"माझ्या मृत्यूनंतर शक्य आहे नं! त्यासाठी च सगळं चालू आहे.मी मरण्याची तो वाट बघतोय." रूपमची हे बोलणं ऐकून तर आनंदीचं डोकं गरगरायला लागलं.
"मारहाण करून झाली, पैसे दिले नाहीत तर बेदम मारतो.आता माझ्या गादीवर लिंबू मिरची ठेवायला लागला आहे."
"तो जादूटोणा करतो?"
" हो तसंच म्हणून मला घटस्फोट हवाय."
" तुमच्या नव-याला माहीत आहे तुम्ही इथे आलात हे?"
"नाही. कारण, मी दोन आठवड्यापूर्वी ते घर सोडलं. दिल्लीत मी एक छोटा फ्लॅट घेतलाय भाड्यानी. मी आई व माझा मोठा भाऊ राहतो. माझे ती व धाकटा भाऊ गावी राहतात. दोन चार दिवसांपूर्वी मी इथे तुमच्याकडे येण्याचा निर्णय घेतला "
"तो कुठे राहतो?
"तिथेच जुन्या घरात." रुपया म्हणाली
"घर कसे चालतं? तो काम करतो का?" आनंदीनं विचारलं.
"मी त्याच्यासाठी एक नोकरी शोधली होती. स्टोअर किपरची पगार महिना अडीच हजार होता. पण साहेबांना एवढ्या कमी पगारावर नोकरी करणे कमीपणाचे वाटते म्हणून सोडून दिली."
"छान! मग आता काय करतो?"
यावर रूपम उत्तरली "माझी नोकरी माझा पैसा आहेच ऐश करायला. दिवसाला २००, ३०० रुपये उडवायचे आणि उरलेल्या वेळात मला त्रास द्यायचा हीच दिनचर्या होती त्याची. आता दर आठवड्याला येतो पठाणासारखा पैसे घ्यायला."
"आता काय करतो?"
"काहीच नाही."
"रूपम, तू सुशिक्षित आहेस. तुला खरच जादूटोण्याची भीती वाटते. तो कदाचित तुला घाबरवण्यासाठी हे सगळे नाटक करीत असेल" आनंदी म्हणाली.यावर रूपम जे म्हणाली तेही लक्षात घेण्यासारखं आहे.
"असेलही तसं. पण मॅडम, तो खरच जादूटोणा करतो की नाही याचा शोध घेण्यात मला अर्थ वाटत नाही. पती-पत्नीच्या नाजुक, भावुक नात्याची तो फसवणूक करतोय. अघोरी उपाय करून विश्वासघात करतोय. या सगळ्यातून मला सुटायचय. मी अतिशय संवेदनशील मुलगी आहे. मला हे सहन होत नाही माझ मानसिक धैर्य आता कमी होत चाललंय. मला घटस्फोट मिळणार नाही तोपर्यंत मी राहीन.त्याला माझी नोकरी मिळू देणार नाही. मायलेकाच फोनवरच बोलणं मी ऐकलय."
"रुपम काही होणार नाही आहे तुला तू शांत रहा मी चांगला वकील शोधते तुझ्या नव-याला नोटीस पाठवते. तो आला तर त्याला समजावून सांगीन. तो राजी झाला तर ठीक. आता तू पुन्हा एक महिन्यांनी ये १२ नोव्हेंबरला तोवर मी वकील कोण मिळेल हे बघते."
"होमॅडम तुमच्याशी बोलल्याने मला खूप धीर आला. मी निघते" रूपम शांतपणे केबीन बाहेर पडली.
रूपम गेली आणि आनंदी सुत्र झाली. हातातल काम कसंतरी पूर्ण करून टेबल आवरून तिने अँड शेंडेना फोन लावला.
"हॅलो. "
"हलो, मी आनंदी सरनोबत बोलतेय नमस्कार"
"नमस्कार आज काय काम काढलत?"
"शेंडे साहेब, तुम्हाला आता अर्ध्यातासाने म्हणजे पाच वाजता वेळ आहे का?"
"अं एक मिनिट सांगतो.. हो आहे."
"मला भेटायला यायचं होत. एका केसबद्दल बोलायच होत येऊ का?"
"हो या न मी वाट बघतो."
"ठीक आहे मग. मी पोचते." आनंदीने फोन ठेवला असिस्टंट कल्पनाला तिच्या केससंबंधी विचारणा करून आनंदी बाहेर पडली.
रुपमची केस अॅड. शेंडेसमोर कशी मांडायची याचा विचार करीत तिने गाडी स्टार्ट केली.
त्यादिवशी ऑफीसमध्ये अचानक रूपमचे सासरे आले तेव्हा कल्पना आणि आनंदी दोघी रुपमच्या केससंबंधीच बोलत होत्या, आनंदनी भेटायला यावे म्हणून त्यांनी तशी एक नोटीस तयार केली होती.
मराठमोळ्या वेषातील म्हातारा बघून आनंदीने नरमाईने विचारलं
"कोण आपण? कोण पाहिजे तुम्हाला?"
"आनंदी मॅडमना भेटायचय मी रूपमचा सासरा."
आनंदी कल्पनाने एकमेकीकडे बघितले. "बसा न काका" आनंदी म्हणाली.
"नमस्कार मॅडम" रुपमचे सासरे खुर्चीवर बसले. कशीतरी शब्दाची जुळवाजुळव करीत बोलले, "मँडम माझ्या सुनेची काहीच चूक नाही. आमचंच नाणं खोटं निघालं. माझा मुलगा इतक्या खालच्या पातळीवर ऊतरला त्याच्याबरोबर त्याची मायसुद्धा उतरली. मॅडम मी दुदैवी हो एवढी गुणाची बायको मिळूनही पोरगा मात्र करंटा निघाला. माऊली किती सोसायला लावणार आहे कुणास ठाऊक?"
सासरे रडू लागले. त्यांच्या मनातील सगळी मळमळ बाहेर पडली होती. आनंदीला समजेना त्यांना कसे शांत करावे पण तरीही ती बोलली
"काका शांत व्हा. धीर सोडू नका सगळं ठीक होईल"
"रुपमला घटस्फोट मिळाला तरच मॅडम सगळं ठीक होईल. ही पोरगी इतकी गुणाची आहे की एवढं सगळ होऊनही मला त्रास होईल म्हणून ती मला बोलली नाही. मॅडम, मी हात जोडतो तुमच्यापुढे पण माझ्या पोरीला न्याय मिळवून द्या."
आनंदी गोधळली, "काका मी प्रयत्न करतेय. तुम्ही निर्धास्त रहा.".
"येतो मॅडम." रुपमचे सासरे गेले त्या दिशेला आनंदी आणि कल्पना बघतच राहिल्या. बऱ्याच वेळाने आनंदी भानावर आली.
"कल्पना, रुपमकडून तिच्या आईवडिलांप्रमाणेच तिचे सासरे आणि तिचे बॉसपण तिच्याकडून आहेत. "
"रुपमचे बॉस?" कल्पनाने विचारले.
"हो. परवा येऊन भेटून गेले. रुपमच्या कामाची तारीफ करीत होते. इतक्या गुणी मुलीच्या नशिबी इतके हाल यावेत याचे त्यांना वाईट वाटत होते. "
ते हेही म्हणाले, "मॅडम, पैसा किती लागेल याची काळजी करू नका. आमची कंपनी देईल. आता सहा महिने ती भयंकर आजारी होती आमच्या कंपनीतील प्रत्येकाने तिच्यासाठी दवाखान्यात दिवस वाटून घेतला खर्चही वाटून घेतला. ती तिच्या स्वभावामुळे आमच्या कंपनीत लोकप्रिय आहे. मॅडम सगळ्यांची इच्छा मी बोलून दाखवतोय, रूपमला लवकर घटस्फोट मिळवून द्या."
"मॅडम खरच कुणासाठी आजकाल एवढं कुणी करीत नाही. ही रूपम केवढी भाग्यवान."
"कल्पना, बाहेरच्यांना जे कळलं ते तिच्या नवऱ्याला व सासूला कळले नाही केवढं दुर्दैव तिचं."
"मॅडम आपण आपली सगळी शक्ती पणाला लावू आणि तिला या संकटातून सोडवू."
"नक्कीच कल्पना, ही नोटीस आजच आनंदला पाठव. एका नोटीसीने तो भेटायला येईल असं वाटत नाही "
"अॅड. शेंडे काय म्हणालेत?" कल्पनांनी आनंदीबाई विचारलं.
"तेही खूप विचारात आहेत त्यांच्या दृष्टीने ही केस त्यांना आव्हान आहे म्हणून सध्या ते दुसरी कुठलीच केस स्वीकारीत नाहीत. अँड. शेंडे आपल्या बाजूने असल्यामुळे तशी आपल्याला काळजी नाही. ते कसा केस स्टडी करताहेत ते तुला काम असतील तर तुकारामला पाठव पोस्टात ही नोटीस टाकायला. त्यानंतर डायरीत लिहायला विसरू नकोस मी निघते."
"ओ. के. मॅडम, तुकाराम." कल्पनाने आवाज दिला. हातात नोटीस असलेलं पाकीट घेऊन ती आनंदीच्या केबीनबाहेर पडली.
पाहता-पाहता रुपमच्या केसवर काम करायला लागून आता जवळपास दोन महिने उलटत आले होते. आनंदला दोन नोटीस पाठवून झाल्या होत्या. जवळपास एका महिन्याच्या अंतराने पाठविलेल्या या नोटिसांना त्याने उत्तर दिले नाही किंवा तो स्वतः ही आला नाही. आज आनंदीने तिसरी नोटीस पाठवली होती त्यात मुद्दाम नमूद केले होते, जर नोटीसीत दिलेल्या तारखेला कार्यालयात हजर झाला नाहीत तर पोलिसांची मदत घ्यावी लागेल.'
"मॅडम या नोटीसीने सुद्धा तो आला नाही तर त्या हरामखोराला पकडायला केव्हा जायचे ते सांगा दोन तगडे कॉन्स्टेबल देतो तुमच्याबरोबर ते भल्या भल्यांना जमिनीवर आणतात." इन्स्पेक्टर कपाळे चिडून आनंदीला म्हणाले.
"बघू या. अजून १५ दिवस वाट बघू या. नाहीतर त्याला उचलून आणावेच लागेल." आनंदी म्हणाली.
आनंदने अशी वेळ आनंदी व इन्स्पेक्टर कपाळेवर आणली नाही. नोटीस पाठविल्यापासून चार-पाच दिवसातच तो आला तेव्हा आनंदीने नुकतेच अॅड. शेंडेशी फोनवर बोलणे आटोपले होते.
"आत येऊ का?"
"या कोण आपण?" आनंदीने विचारले.
"मी आनंद बारटक्के." हे ऐकताच आनंदी आणि कल्पना दोघी सावध झाल्या. रूपमला मारणारा, तिच्यावर जादूटोणा करणारा भयंकर माणूस तो हाच आनंद बारटक्के का असा आनंदीच्या मनात संशय निर्माण झाला. कारण, आनंद अतिशय सभ्य दिसत होता. वडिलांसारखं वारकरी रूप घेऊन मन मात्र शैतानाच घेतलं होतं.
"कशासाठी बोलावलत मॅडम मला ?"
"आनंद बारटक्के, तुमच्या विरुद्ध आमच्या संस्थेत फिर्याद नोंदवली गेलेली आहे. हे आम्ही त्या नोटीसीत लिहिलं होतच. फिर्यादी कोण तेही लिहिल होतं. केसवर कारवाई करत असताना आमच पहिलं पाऊल असतं ते ज्याच्याविरुद्ध फिर्याद आहे त्याला भेटीला बोलावणं. म्हणून तुम्हाला येथे येण्यासंबंधी नोटीस पाठविली होती
"पण माझा गुन्हा काय?" आनंदने विचारले.
"तुमच्या बायकोला तुम्ही शारीरिक व मानसिक त्रास देता अशी तुमच्या बायकोनी रूपम बारटक्के यांनी तक्रार केली आहे." आनंदी म्हणाली.
"मी अस कशाला करीन? मी खूप प्रेम करतो तिच्यावर म्हणून तर तिच्यापेक्षा सुंदर मुली सांगून येत असूनसुद्धा मी रुपमशी लम्र केलं."
"तुमच तिच्यावर प्रेम होतं म्हणून नव्हे, तिच्या नोकरीवर तुमचं लक्ष होतं म्हणून तुम्ही रूपमशी लग्नं केलत."
त्याच्या दांभिक चेहऱ्याचा आनंदीला भयंकर राग आला. तिच्या रागाकडे आनंदने मुळीच लक्ष दिलं नाही.
"मॅडम तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिलीय रूपमला तर मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. "
"अस्स! म्हणून तिच्या हातावर भाजल्याचे डाग आहेत वाटत?"
"ते डाग म्हणजे स्वयंपाक करताना झालेला अपघात होता " आनंद म्हणाला.यावर आनंदी नी लगेच प्रश्न केला.
"हो का! मग पाठीवरचे सिगरेटचे चटके? ते काय सिगरेट पिण्याची रुपम सवय करत असताना पडले का? सांगा न?" आनंदीचा आवाज टिपेला पोहोचला होता.
तिचा आवाज ऐकून बाजूच्या केबिनमध्ये असलेले इन्स्पेक्टर कपाळे काम सोडून तिथे आले.
आनंदीचा अवतार पाहून म्हणाले,
"मॅडम, काय झालं? काय रे कोण तू त्यांनी आनंदची कॉलर पकडून जरबेच्या स्वरात विचारले." आनंद मनातून जरा घाबरलाच. आनंदी म्हणाली, "इन्स्पेक्टरसाहेब हाच तो आपला हिरो आनंद बारटक्के, "
"असे का! काय राव दोन नोटीसा तुम्हाला पोचल्या नाही की त्यातली मराठी भाषा कळली नाही."
"तस काही नाही पण आता आलोय नं." आनंद घाबरतच बोलला. "आलास तर नीट बोल. मॅडमचा आवाज का चढला होता? इथे हिरोगिरी दाखवायची नाही कळलं." कपाळेंनी दम दिला.
"आनंद तू सहजपणे रुपमला घटस्फोट द्यावास हे चांगले"
"मॅडम मी तिच्याशिवाय राहू शकत नाही."
"माहिती आहे मला.रुपम नाही म्हणजे पैशाची चैन नाही. फुकट सगळ घ्यायची सवय असलेल्या तुझ्यासारख्या फुकट्या नामर्द माणसाचे रुपमशिवाय कसे होईल.
तरीही तू बऱ्या बोलाने घटस्फोट द्यावास.. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास तू देतोस या पार्श्वभूमीवर तुला शिक्षा होईल आणि रपमला घटस्फोट मिळेल. तुरुंगात जाण्यापेक्षा मला वाटत तूच घटस्फोट द्यावास हे बर.
आजकाल कायदा हा स्त्रीच्या बाजूने जास्त निकाल देतो. विचार कर. घटस्फोट देणार नसलास तर आयुष्याची सहा-सात वर्षे तू नक्कीच तुरुंगात जाशील मग काय म्हणणे आहे तुझ?"
आनंदच्या पोटात गोळा आला. कायद्याबद्दल त्याला फारशी माहिती नव्हती वकील करावा त्याला काही विचारावे त्यासाठी आनंदकडे तेवढा पैसा नव्हता आणि रूपम इथपर्यंत पाऊल उचलेल असं त्याला वाटलं नव्हतं.
त्याच्या विमनस्क मनस्थितीचा फायदा आनंदीने पुरेपूर घेतला शेवटी आनंद घटस्फोट द्यायला तयार झाला. त्याने तसे लिहूनही दिले.
"आता रुपमकडून घटस्फोटाची रीतसर नोटीस पेईल ती तुम्ही स्वीकारा कोर्टाच्या नोटीसीचा अपमान करू नका दिलेल्या तारखेला कोर्टात हजर रहा आणि आढेवेढेन घेता रूपमला घटस्फोट या समजल" आनंदीने सांगितले.
"हो मॅडम..." आनंदचा आवाज पार उतरला होता.
आनंदी मात्र मनातून आनंदली होती. अशक्य वाटलेले काम सहजशक्य झाले होते. आनंद गेला तो जड पावलाने. येताना त्याचा बदमाश चेहरा जाताना कोमेजला होता.
आनंदी, कल्पना आणि इन्स्पेक्टर कपाळेंना मात्र आनंद झाला होता. कालपर्यंत रुपमच्या केसमध्ये काहीच प्रगती वाटत नव्हती. आज अचानक आशेचा किरण त्यांना दिसला होता.
अॅड. शेंडेंनी केस व्यवस्थित तयार केली होती.
रुपमच्या बाजूने तिचे आई-वडील, तिचे सासरे, तिथे साहेब, तिची ऑफीसमधली मैत्रिण कैवल्या यांनी साक्षी दिल्या. शेवटी अँड शेंडे यांचे निवेदन असे काही जमून आले की न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर त्यांच्या मनातले विचार स्पष्ट दिसत होते. शेवटी तो क्षण उगवला ज्याची सगळे आतुरतेने वाट बघत होते,
शांतपणे न्यायाधीशानी निकाल वाचून दाखविला.
"सगळ्या साक्षी पुराव्यांना आधार ठेवून मी हा निकाल देतोय. सौ. रुपम आनंद बारटक्के हिला तिचा पती आनंद कमलेश्वर बारटक्के शारीरिक व मानसिक त्रासाबरोबर जादूटोणा करूनही छळत होता. त्याचा रुपमच्या प्रकृतीवर झालेला वाईट परिणाम तसेच मनावर झालेला वाईट परिणाम उत्तम मनोरुग्ण अनंत घाटपांडे यांच्या अधिकृत रिपोर्टवरून लक्षात येतो.
तो रिपोर्ट लक्षात घेऊन, तसेच एक पती पत्नीच्या नाजूक संवेदनशील नात्याला आनंद स्वार्थी वृत्तीने धोका पोहेचवू पहात होता हे निश्चितच योग्य नाही. पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आजचा निर्णय सौ. रुपम बारटक्केला आनंद कमलेश्वर बारटक्के पासून घटस्फोट मिळण्यास मदत करणारा ठरला पाहिजे.
म्हणून मी न्यायाधीश या नात्याने या केसमध्ये सौ रूपम आनंद बारटक्केला आनंद कमलेश्वर बारटक्केपासून घटस्फोट मिळाला आहे असे जाहीर करतो. लग्नामध्ये रुपमला मिळालेले तिचे स्त्रीधन तिला परत देण्यात यावे. तसेच तिच्या मालकीचे घर आनंद बारटक्के याने या निकालापासून आठ दिवसात खाली करावे, कोर्टाने दिलेल्या या सूचनांची अंमलबजावणी करावी.यात काही हयगय झाली तर कोर्टाचा अपमान केला म्हणून वेगळी शिक्षा आनंद बारटक्के यांना भोगावी लागेल."
एवढं बोलुन न्याधिशांनी पेनची नीफ निकाल सांगून तोडली.
सगळे जण आनंदात होते. आनंदीही आनंदात होती. पुढचे दोन दिवस वर्तमानपत्रात याचं केसची चर्चा होती.आनंदीचं एक सोशल वर्कर म्हणून कौतुक होत होतं.
रूपमच्या केसचा निकाल लागून पंधरा दिवस झाले असतील आनंदीला त्या केसनंतर जास्तीत जास्त आव्हानात्मक केसेस घ्यायला आवडू लागलं.
एक दिवस ती अशाच एका गुतागुंतीच्या केसचा अभ्यास करीत होती.तेव्हा रूपमचा भाऊ व आई अतिशय दुःखी चेहऱ्याने ऑफीसमध्ये शिरली. "मॅडम आत येऊ न?"
आनंदीने वर पाहिले ती आनंदून म्हणाली, "अरे या या बसा काय घेणार?"
आनंदीने विचारले. त्यावर "काहीच नको" असं रुपमचा भाऊ म्हणाला.आनंदीला रुपमचा भाऊ आणि त्याची आई यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून काही कळल नाही.
अतिशय दुःखपूर्ण आवाजात तिचा भाऊ म्हणाला "मॅडम..... आठ दिवसांपूर्वी रुपमने या जगाचा निरोप घेतला."
"काय?...." आनंदीचा घसा कोरडा पडला.
ती बातमीच इतकी भयंकर होती. रुपमला न्याय मिळवून दिला. याचा आनंद मानावा की तिच्या जाण्याचे दुःख मानावे, हेच आनंदीला कळेना. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती त्या बधीर अवस्थेत कितीतरी वेळ बसून होती.
"मॅडम " रुपमच्या भावाच्या हाकेने ती शुद्धीवर आली. "सॉरी, मला...." आनंदी पुढे बोलूच शकली नाही.
'देवाची इच्छा तशी होती मॅडम, तुम्हीतरी काय करणार!| पण एका गोष्टीचं समाधान हाय. रुपमची शेवटची इच्छा तुमच्यामुळे पूर्ण झाली. जातो आम्ही देव तुमचं भलं करो." स्वतःची पोर गमावलेली माऊली आनंदीला जाता-जाता आशीर्वाद देऊन गेली.
आनंदीच्या डोळ्याला मात्र धारा लागल्या होत्या त्या थांबवायचं तिला भान उरलं नाही.
समाप्त
(सत्यघटनेवर आधारीत)
© सौ.मीनाक्षी वैद्य.