माझा बाप्पा

©अनुराधा पुष्कर 



"मधू ,आवर  बाई लवकर गणपतीचा सण आहे ..आता  आरतीची वेळ होईल ...आज तरी कर गं आरती .."-आई

"हे बघ आई ,तुला आवडतं ना मग तू कर ,मी बघते ...." - मधू

"मधू अग असं बोलू नये ,तुम्हा आज कालच्या मुलांचं न मला काही कळत नाही ....काहीच  करायचं  नाही म्हणता ...सगळीकडे लॉजिक लावता .."-आई

"ये आई तू बोर नको करुस प्लिज ..आमचे लॉजिक बरोबरच असतात.ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत." - मधू

"मधू ,हळू बोल जरा आज्जी आजोबा ऐकतील  तर काय म्हणतील ..."-आई

"काय म्हणतील ? शिकून अति शहाणी झाली म्हणतील बाकी काय ....तसंही आपल्याकडे असंच चालत आलंय ना ...काही विचारायला गेलं आणि त्याच उत्तर नसेल तर, 'आली  मोठी शहाणी' म्हणून गप्प बसवता ..पण उत्तर काही देत नाही .."-मधू

"अग आवर  घाल तोंडाला मधू ..किती बोलशील ? सणासुदीचे दिवस आहेत ..जरा तरी नीट बोल .."-आई

"बघ आई, बघ, तू पण तेच म्हणते ,मला गप्प बसवते ...पण त्यापेक्षा उत्तरं द्या ना माझ्या प्रश्नांची ..."-मधू

"कशाचे उत्तर हवे आहे मधू बाई ...तुम्हाला ?"-आजोबा

"काही नाही तुम्ही पण हेच बोलाल.....जाऊ द्या ना .."-मधू

"अग विचार तरी ..बघूया उत्तर देता येतंय  का ? शंका मनात ठेवू नये "-आजोबा

'ठीक आहे ,बघा हा ,मी विषय काढला नाही ....तुम्हीच म्हणता म्हणून विचारते .."-मधू

"बर बाई ,ठीक आहे ..विचार आता .."-आजोबा

"तुम्ही ह्या मूर्ती ची पूजा का करता ? त्याची पूजा करून तर काहीच मिळत नाही कारण शेवटी एक दगड आपल्याला काय देणार आहे? जे काही आपण मिळवतो ते तर आपली मेहनतीनेच ना ..जर हे असे मिळत असते तर सगळेच घरी बसले असते नाही का ?"-मधू

"मूर्ती हि दगड -माती  पासूनच बनते ..बरोबर आहे ..पण जेव्हा त्या मूर्तीवर संस्कार केले जातात तेव्हा ती पूजनीय होते.

एक बाळ जेव्हा जन्म घेते तेव्हा तो एक मातीचा गोळा असतो त्याला आकार द्यावा लागतो  ,संस्काराने  त्याला घडवावं लागत ....मगच तो मोठा होतो ...तसच ह्या मूर्तीचंही आहे.

जेव्हा त्यावर संस्कार होतात ,त्याची प्रतिष्ठापना होते तेव्ह ती पूजनीय होते दगड राहत नाही ...त्या मूर्तीची स्थापना करून  आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि हा विश्वास आपल्याला त्याच्यासमोर नतमस्तक होण्यास भाग पडतो .  हि मूर्ती एक प्रतीक असते आपल्या देवतांचं.

हि मूर्ती आपल्याला काहीच देत नाही असं नाही ..आपण जे मिळवतो ते आपल्या मेहनतीवर असते हे बरोबर आहे पण त्या मेहनती मागे आपला स्वतःवरचा विश्वास असतो आणि  तेव्हाच आपण आपलं ध्येय गाठू शकतो.

एखाद्या मूर्ती समोर किंवा देवासमोर उभे राहिल्यावर आपल्याला  सकारात्मक ऊर्जा मिळते जी कि आपल्याला आपण करत  असलेल्या कार्याला पूर्ण करण्यास मदत करते ."-आजोबा .

"ठीक आहे , पण आजकाल ह्या मूर्तीवर किंवा देवावर जो अभिषेक  करता ,जे  प्रसाद चढवता ते तर काही तो खात नाही ..ते सगळं वायाच  जातं, त्यापेक्षा जर एखाद्या गरजूला ते दिलं तर त्याचा सदुपयोग नाही का होणार? का म्हणून गुप्त दानात पैसे टाकायचे ? आणि मंदिर भरायचे ..देवाला  ह्याची काय गरज ? मूर्तीला जर दुधाचा अभिषेक नाही घातला तर काय ती रुसणार आहे ?"-मधू

"ती आपली आपली श्रद्धा आहे ...ज्याच्या त्याच्या मानण्यावर  आहे ..एखाद्याला जर वाटत असेल कि, आपण दूध अभिषेक करावा आणि त्यातून जर त्याला मानसिक  शांती मिळत असेल तर त्याला  आडवायचा अधिकार आपल्याला नाही. 

तुझं  म्हणणं एका अर्थाने  बरोबर आहे कि एखाद्या गरजूला जर ते दूध दिल तर नक्कीच त्याच्या पोटात जाईल पण असाही विचार करून बघ कि जर फुकटात रोजच असं मिळत राहील तर कोणीच काम करणार नाही.

सगळे गरजू बनून तिथेच line  लावतील.

दुसरा मुद्दा मंदिराची दानपेटी का भरावी ? तर ती ह्या साठी असते कि त्या निमित्ताने माणसाला आपल्या कमाईतील थोडा हिस्सा समाजाला  देण्याची भावना निर्माण व्हावी , त्याला सवय व्हावी ह्यासाठी दान केलं जातं. 

देवांना  पैसे लागतच नाहीत त्याला लागतो फक्त भक्ती-भाव ,विश्वास ! ह्या दान पेट्या खरतर समाज  कार्यासाठी असतात ,जेव्हा समाजाला  त्याची गरज असते तेव्हा ते वापरू शकता.

गरीबांना फुकट जेवू घालणं , अनाथांना शिक्षण देणं,आजरी माणसाचं औषध पाणी देणं , हे सगळं ह्यातून होऊ शकत आणि व्हावं यासाठी ते असतं ....माणसाला देण्याची सवय लागावी ,त्याने दुसऱ्याची मदत करावी ,ह्यासाठी ती प्रथा आहे .दान केल्याने लोभ कमी होतो. "-आजोबा .

"काय मग ,मधू ताई झालं का विचारून सगळं ..नाही म्हंटल झालं असेल तर बाप्पा ची आरती  करू"- आज्जी

"नाही अजून नाही झालं ...अजून एक प्रश्न ,तुम्ही म्हणता ना कि देव सगळं  ठीक  करतो .मग आता हा corona इतका दिवस झाले इथेच आहे ..त्याच काही करत नाही देव ? 

बाप्पा आहे ह्या जगात बरोबर ना ...मग हा बाप्पा लोकांना  असं मरू का देतो ? का नाही सगळं ठीक करत? आता तो काही चमत्कार का नाही करत ...आणि जर तो हे करू शकत नसेल तर का म्हणून त्याला देव म्हणायचं ? का म्हणायचं कि तो आपल्या पाठीशी आहे ?" तो तर दिसत पण नाही .."-मधू

" हे बघ ,बेटा सृष्टीचे काही नियम आहेत ...जगणं आणि मरणं कोणी थांबवू शकत नाही ..जो आला आहे त्याला जावेच लागेल ...हा सृष्टीचा नियम आहे. corona  सारखे आजार देवाने पसरवले नाहीत ..ते आपल्या  माणसांच्या वागणुकीमुळे आणि चुकांमुळे उद्भवले आहेत. 

गजानन  दिसत नाही हे बरोबर आहे पण तो आपल्या पाठीशी उभा असतो नेहमी ,कोणत्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो कारण आपल्याला विश्वास असतो कि सगळं ठीक होईल .

आपण लढू आणि जिंकू हा आत्म विश्वास आपल्याला प्रेरणा देत असतो जगण्यासाठी ! संकट काळी  घरात कोणी मोठी व्यक्ती असली कि आपलं मनोधैर्य  वाढतं.  

तसंच देवावर श्रद्धा हि आपण आपले मनोबल वाढवण्यासाठीच ठेवतो .काही गोष्टीना लॉजिक नसते तर त्यावर फक्त विश्वास ठेवावा लागतो. 

आज इतके डॉक्टर लोकांचे प्राण वाचवत आहेत ,इतके पोलीस आपली सुरक्षेसाठी झटत आहे ,देव हा त्यांच्यातच आहे ...आपण डॉक्टरांना देवच मानतो  .तो जरी दिसत नसला तरी वेगवेगळ्या रूपात आपल्या सोबत असतो .... गरज आहे ती फक्त विश्वास ठेवण्याची "-आजी   .

"काय मग मधू बाई पटलं का? चला आता "-आई 

बर्‍याच गोष्टीमध्ये आपण म्हणतो देव  आहे जेव्हा आपल्याला आनंद होतो , यश मिळते, सुख पायाशी लोळण घालत असते तेव्हा देवाची आठवण कमी होते. 

पण तेच जेव्हा संकटं येतात ,दुःखाचे वारे वाहू लागतात तेव्हा आपण देवालाच साकडं घालतो. आपल्या मनासारखं झालं तर देव आहे ,आणि नाही झालं तर तर तो नाही ...?

त्याच अस्तित्व कशावर अवलंबून आहे ? तुम्ही सांगू शकता का ?

मला वाटतं सगळ्या गोष्टी ह्या आपल्या विश्वासावर अवलंबून असतात ..दरवर्षी बाप्पाची स्थापना आपण ह्याच विश्वासाने करतो कि ,बाप्पा येतील आणि आपल्या घरात सुख शांती नांदेल ,समृद्धी बरसेल.

आपला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून जगण्यात मज्जा आहे .

तुमच्या आयुष्यात कधी असं झाली का कि देवावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे केलेत?  तुमच्या घरात जेव्हा मुलं असे प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही काय उत्तर देता ? जरूर सांगा. मी आपल्या प्रतिक्रियेची वाट बघेन.

©अनुराधा पुष्कर 

सदर कथा लेखिका अनुराधा पुष्कर  यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने