शिंतोडे गैरसमजाचे

© वर्षा पाचारणे



"आई, मला आमच्या शाळेतील गायकवाड बाई खूप आवडतात".. "अगं, तू जसं प्रेमानं समजावून सांगतेस ना, अगदी तसंच त्याही शिकवतात... त्यांच्यासमोर कुठल्याच गोष्टीचं दडपण येत नाही.

आठवीत गेलेली स्मिता आईला गायकवाड बाईंबद्दल सांगताना अगदी भरभरून बोलत होती. पाचवीत असल्यापासून ती गायकवाड बाईंना ओळखत होती. त्यांचा गोड स्वभाव, समजून सांगण्याची पद्धत चेहर्‍यावरचे स्मितहास्य स्मिताला फार आवडायचे. 

कधीही कुठल्या गोष्टीत कसली शंका असेल, तरीही सगळ्यात आधी स्मिता गायकवाड बाईंकडे हक्काने धाव घ्यायची... अभ्यासात जेमतेम असलेल्या स्मिताला बाईंमुळे अभ्यासाची गोडी लागली होती. 

केवळ परीक्षेपुरता अभ्यास न करता आता ती दररोज स्वतःच्या मनाने नवनवीन गोष्टी शिकण्याचा, अभ्यासात प्रगती करण्याचा प्रयत्न करत होती.

 'ही माझी गुणी विद्यार्थिनी', असं म्हणत स्मिताचं कायमच गायकवाड बाईंकडून तोंड भरुन कौतुक व्हायचं... 'आपल्या आवडत्या शिक्षिकेकडून पाठीवर अशी कौतुकाची थाप मिळाल्यावर आणखी काय हवं', असं स्मिताला मनोमन वाटायचं...

स्मिता यंदा नववीत गेली होती... नववी दहावीचं वर्ष शालेय शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याने कुठेतरी शिकवणी लावावी, असे विचार आईच्या मनात घोळू लागले होते.

आईने एका शिकवणीमध्ये स्मिताचे नाव नोंदवले. नवीन वर्ष सुरू होताच स्मिता दररोज संध्याकाळी शिकवणीला जाऊ लागली... स्मिता ज्या शिकवणीत जायची त्या शिक्षिका देखील स्मिताच्या शाळेमध्ये दहावीच्या वर्गाला शिकवत होत्या.

शिकवणीमध्ये त्या आदल्या वर्षीच मुलांची तयारी उत्तम रीतीने करून घ्यायच्या, जेणेकरून दहावीच्या वर्षात मुलांना अभ्यासाचा ताण जाणवणार नाही.

स्मिताने शिंदे बाईंकडे शिकवणी लावली असल्याने आता तिला अभ्यासाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची समस्या वाटली तरीही ती बाईंकडून लगेच सोडवली जायची.

नेमकी त्याच वर्षी गायकवाड बाईंच्या मुलीने याच शाळेत ऍडमिशन घेतल्याने स्मिता आणि बाईंची मुलगी श्रद्धा एकाच वर्गात शिकू लागल्या.

आधी स्मिताचे होणारे कौतुक आता इतरांच्याच वाट्याला जाते अशी भावना नकळतपणे स्मिताच्या मनात घर करू लागली.

मग बाईंचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी स्मिता सतत उत्तर सांगण्यासाठी हात वर करायची, परंतु इतर मुलांनाही संधी मिळावी, या दृष्टीने गायकवाड बाई तिच्याकडे थोडेफार दुर्लक्ष करत होत्या..

बाईंचे आपल्याकडे होणारे दुर्लक्ष, हे त्यांच्या मुलीमुळेच होते आहे, अशी भावना बळावत गेल्यामुळे आता स्मिताने श्रद्धा बरोबर असलेली मैत्री जेवढ्यास तेवढीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आज-काल ती घरी देखील अगदीच शांत शांत असायची... शाळेतून घरी आल्यावर आधीसारखी आता ती गप्पागोष्टी करणं टाळायची.

'अभ्यासाचे दडपण येत असेल', या विचाराने आईने देखील तिला थोडा वेळ द्यायचे ठरवले.. पण दिवसेंदिवस तिचा एकलकोंडेपणा वाढू लागल्याने मग मात्र आईने तिच्या बरोबर बोलायचे ठरवले.

"स्मिता, काय झालं?... आज काल तू खूप शांत शांत असतेस.. एकटीच कुठेतरी तंद्री लावून बसलेली असते. या वयात स्वतःला समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं.. या वयात अभ्यास आणि कलागुण जोपासत स्वतःला समृद्ध करायचं असतं.

तू हुशार मुलगी आहेस.. पण आजकाल एवढी शांत का असतेस?.. कोणी काही बोललं का तुला बाळा?... असं म्हणत आईने स्मिताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.

"आणि आज-काल गायकवाड बाई तुम्हाला शिकवत नाहीत का?... की रजेवर आहेत सध्या.. कारण तू बरेच दिवसात त्यांच्याबद्दल काहीच बोलली नाहीस"... आईने असं विचारताच स्मिता मात्र गाल फुगवून बसली आणि म्हणाली ,"त्यांची लाडकी लेक आली आहे ना आता आमच्या शाळेत... मग त्या मला का विचारतील... कशाला माझं कौतुक करतील? आज काल तर मी उत्तर सांगायला हात वर केला तरीही त्या माझ्याकडे दुर्लक्ष करतात"

स्मिताचे इतके दिवस अबोल राहण्याचे कारण आईला कळून चुकले... स्मिताने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत आईला देखील गायकवाड बाईंची चूक असल्यासारखे वाटून गेले.

त्यात भरीस भर म्हणून स्मिताच्या एका मैत्रिणीने तिला सांगितले की ,' तू शिंदे बाईंकडे क्लास लावल्यामुळे गायकवाड बाई तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत... तू त्यांच्याकडेच शिकवणी लावावी अशी त्यांची इच्छा होती"... पण आपल्या मुलीला शिक्षकांकडून दुय्यम वागणूक मिळते या विचाराने आईने देखील तोच हेतू डोक्यात ठेवून पालक सभेत गायकवाड बाईंबद्दल तक्रार करायला सुरुवात केली.

'आज काल शिक्षक केवळ स्वतःच्या मुलांना किंवा स्वतःकडे शिकवणीला येणाऱ्या मुलांनाच उत्तर सांगण्याची संधी देतात, परीक्षेच्या आधीच परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांचा सराव करून घेतात, त्यांच्याकडे शिकवणीला न जाणाऱ्या मुलांना कमी मार्क देतात', असे नाही नाही ते आरोप करत स्मिताच्या आईने पालक सभेत आपले मुद्दे मांडले.

त्यावर गायकवाड बाई मात्र स्मित हास्य करत नि:शब्दपणे उभ्या होत्या... हाडाच्या शिक्षिका असलेल्या गायकवाड बाईंनी कुठल्याही प्रकारचा वाद किंवा चर्चा करणे टाळले, कारण आत्ता स्मिताच्या आईमुळे सारेजण त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याप्रमाणे पाहत होते.

दहावीचे वर्ष सुरू झाले... खरं पाहता गायकवाड बाई कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नव्हत्याच.. हे सारे स्मिताच्या मनाचे खेळ होते... 'आपली आवडती शिक्षिका आपल्याकडे दुर्लक्ष करते', असं तिने स्वतः ठरवून टाकलं होतं.

आज दहावीचा सराव पेपर सुरू असताना एका मुलाने कॉपी करून तो कागदाचा बोळा स्मिताच्या बाकाखाली भिरकावला... तितक्यात मुख्याध्यापिका बाई आल्याने स्मितानेच कॉपी केली की काय, या विचाराने त्यांनी तिचा पेपर हिसकावून घेतला.

कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता असं शिक्षा देणं योग्य नाही, हे समजून वर्गावर परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या गायकवाड बाईंनी मात्र स्मिताची बाजू घेतली. 

उत्तर पत्रिकेवरचं अक्षर आणि त्या कागदाच्या बोळ्यावरचं अक्षर वेगवेगळं असल्याने आणि लहानपणापासून स्मिताची अभ्यासातील प्रगती वाखाणण्यासारखी असल्याने ती कॉपीसारखा गैरप्रकार करूच शकत नाही, अशी शाश्वती देत त्यांनी मुख्याध्यापिका बाईंकडे विनंती करत स्मिताचा पेपर पुन्हा घेतला.

आज गायकवाड बाईंमुळेच स्मिताचा परीक्षा अर्धवट सोडून जाण्यापासून बचाव झाला होता... जीव तोडून अभ्यास केलेला असताना जर आज पेपर देताच आला नसता तर ती किती मोठ्या निराशेच्या गर्तेत ढकलली गेली असती याची तिच्या आईला देखिल जाणीव झाली.

स्मिताच्या आईने संध्याकाळी घरी जाऊन गायकवाड बाईंचे आभार मानले.. आणि मागील वर्षी केलेल्या आरोपांबद्दल क्षमाही मागितली.

'खरंतर मी मागच्या वर्षी पालकसभेत जे काही बोलले ते कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, केवळ आपल्या मुलीला दुय्यम वागणूक मिळते, या भावनेपोटी बोलले होते.

मला वाटलं स्मिता म्हणते तसं तुमच्याकडे शिकवणीला न गेल्यामुळे किंवा आता तुमची मुलगी देखील त्याच वर्गात शिकत असल्यामुळे कदाचित तुमच्या मनात 'आपला तो बाब्या आणि लोकाचं ते कार्टं', हा विचार आला असेल आणि त्याच हेतूने तुम्ही हिच्याकडे दुर्लक्ष केलं असेल'.

'परंतु प्रत्येक विद्यार्थ्याचे हित हे त्याच्या शिक्षका शिवाय आणखी कोणाला जास्त कळणार'... असं म्हणत स्मिताच्या आईने बाईंसमोर हात जोडले... स्मिताला देखील आपली चूक कळल्याने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

दाराआडून गायकवाड बाईंची मुलगी श्रद्धा सारं काही पाहत होती... आपल्या मैत्रिणीच्या डोळ्यातून आलेलं पाणी तिला बघवलं नाही.

तिने पटकन बाहेर येऊन स्मिताचे डोळे पुसले आणि म्हणाली ,"अगं, उलट आई मला घरी येऊन रोज तुझं उदाहरण द्यायची... तुझी दिवसेंदिवस होणारी अभ्यासातली प्रगती आईला सुखावत होती.

तसे ती मला रोज येऊन बोलूनही दाखवायची... कदाचित अति कौतुकाने आपण भारावून जातो म्हणून आणि इतरांनाही संधी मिळावी या उद्देशाने तिने कळत नकळत तुझ्याकडे दुर्लक्ष केले असेलही... परंतु तिच्या मनात भेदभाव मात्र कधीही नव्हता"...

आता मात्र इतका वेळ मुळूमुळू रडणारी स्मिता मनात इतके दिवस होत असलेल्या घुसमटीला रोखू शकत नव्हती... ती हमसून हमसून रडू लागली.

गायकवाड बाईंनी तिला प्रेमाने जवळ घेतले आणि सांगितले ,"तू कुठल्याही शिकवणीला गेलीस म्हणून मी का तुझ्यावर रागवेल?.. माझ्या विद्यार्थीनीची प्रगतीच तर मला अपेक्षित आहे ना?... आणि यंदा दहावीच वर्ष असल्याने भलतेसलते विचार डोक्यात न आणता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे.

मला तुला मेरीटमध्ये आलेलं पाहायचं आहे... पाचवी ते दहावीचा तुझा चढता आलेख मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे... कुठल्या विद्यार्थ्यांची पात्रता किती आहे, हे शिक्षकांना अगदी अचूक माहित असतं आणि म्हणूनच तुला सांगते, आज पासून अभ्यास हेच ध्येय ठेव... खूप मोठ हो.. खूप शिक"... असं म्हणत बाईंनी नेहमीसारखंच स्मित हास्य करत स्मिताला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

'आपण किती बालिशपणे विचार करून एका आदर्श शिक्षिकेला दूषणं लावली', या विचाराने आई देखील मनातल्या मनात खजील झाली होती...

'वाचकहो, कधीकधी परिस्थिती अशी असते की त्यात गैरसमज होणे स्वाभाविक असते, परंतु समोरच्या व्यक्तीवरचा विश्वास ठाम असला तर गुंतागुंतीचा प्रसंगही सहजरित्या सोडवता येतो... आदर्श शिक्षक मिळणे यासारखे दुसरे भाग्य नाही.

शिक्षकांचे कौतुक करण्याच्या वेळेस अनेक पालक मागे असतात.. परंतु एखादी गोष्ट त्यांच्याकडून चुकीचे होते असे जाणवले तर पाल्याची चूक लक्षात न घेता, शिक्षक कसे चुकीचे आहेत, हे ठरवण्याकडे अनेकदा कल असतो.

शिक्षक हा संपूर्ण समाज घडवण्याचं काम करत असतो.. त्यामुळे अगदी बोटावर मोजावेत असे लोक सोडले तर शिक्षकी पेशा हा अतिशय निर्मळ आणि समाज समृद्ध करणारा असतो हे एक सत्य...

© वर्षा पाचारणे.

सदर कथा लेखिका वर्षा पाचारणे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी


फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने