नोकरी करणारी सून

 © धनश्री दाबके 


मोहनराव आणि मीराताईंच्या माधवचा प्रोबेशन period संपला. माधव कंपनीत परमनंट झाला आणि मीराताईंना त्याच्या लग्नाचे वेध लागले. 


त्याचे कुठे काही जुळलेले तर नाहीये ना ह्याची खातरजमा केली आणि मीराताईंनी वधू संशोधन सुरु केले. 

शिक्षण, नोकरी, उंची, तब्येत, कॅरॅक्टर, चांगले घर ह्या लग्नाळू मुलासाठी गरजेच्या असणाऱ्या सगळ्या बाबी माधवच्या बाबतीत अगदी जशा हव्यात तशा होत्या. 

त्यात एकुलता एक मुलगा असल्याने नणंदा, दीर असा गोतावळाही असणार नव्हता. आई , वडील आणि मुलगा असे तिघचं. इतर कसल्या जबाबदारीचे ओझेही नव्हते त्यामुळे माधव अगदी शोधूनही सापडणार नाही टाईप जावई होता. 

त्यामुळे मीराताईंनी सूतोवाच करताच माधवचे शनिवार, रविवार कांदेपोहे खाण्यात बिझी होऊ लागले. 

माधवला स्मार्ट, स्वतःचे विचार असणारी मॉडर्न बायको हवी होती आणि मीराताईंना नोकरी करणारी सून जी माधवला आर्थिक दृष्ट्याही समर्थपणे साथ देऊ शकेल. 

मीराताई म्हणायच्या मी आहे ना घरात खंबीर सगळं बघायला. तेव्हा येणाऱ्या सूनेने नोकरी केलेली चांगलीच म्हणजे तिला बाहेरच्या जगात तिची हुशारी, कर्तुत्व सिद्ध करता येईल. आणि तिला व मला दोघींनाही मनासारखं जगण्याची मोकळीक सुद्धा मिळेल.  

शेवटी सात आठ मुलींना भेटल्यानंतर त्यातल्या एका भेटीचे लग्नाच्या गाठीत रुपांतर झाले आणि माधवची सहचरणी बनून मधुरा घरात आली. 

मधुरा आणि माधव दोघेही एकमेकांना अनुरुप होते. लग्नानंतरही नोकरी सुरुच ठेवण्याची मधुराची अट आणि आईवडिलांना सोडून कधीही वेगळे न होण्याची माधवची अट ह्या दोन्हीही अटी मान्य करुन दोघांचे लग्न झाले आणि सुखी संसार सुरु झाला. 

सकाळी ऑफिसची घाई असल्याने सकाळचा नाश्ता, तिघांचे डबे आणि स्वतःसाठीचा दुपारचा स्वैपाक  सगळं मीराताईच करायच्या. 

संध्याकाळी मात्र मधुरा मीराताईंना विचारून विचारुन सगळं करायची आणि त्यांना आराम द्यायची. मधुरा लाघवी, समंजस आणि हुशार होती. 

तिने पटकन मीराताईशी आणि घरातल्या पध्दती, आवडीनिवडी , सवयी ह्या सगळ्यांशी जमवून घेतले आणि ती घरात छान रुळली. सासू सूने मध्ये चांगले सुत जुळले. 

काही बाबतीत मतभेद होते पण ते कितीपत ताणायचे ह्याचे सामंजस्य दोघींकडेही होते. त्यामुळे घरात कधी वादावादी,  भांडणे  हे प्रकार झाले नाहीत. 

एकमेकींचा राग यायचा तेव्हा दोघीही तेवढ्यापुरत्या शांत रहायच्या. जसा व्हायरल ताप  तीन दिवसात बरा होतोच तसा ह्यांचा मनस्तापही ठराविक वेळ शांततेत गेला की आपोआप नॉर्मलवर यायचा. 

मधुरा सुरवातीपासूनच करीअर माईंडेड होती. मीराताईंनी स्वतः कधी नोकरी केली नव्हती पण तरीही त्या नोकरी करुन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांची चॅलेंजेस जाणून होत्या. 

त्यामुळे त्या मधुराला खुप सपोर्ट करत. कधी कधी तिला ऑफिस मधून घरी यायला खूप उशीर होत असे पण मीराताई घरची आघाडी कसलीही कटकट न करता सांभाळत. 

घरातून भक्कम आधार मिळाला की महत्वाकांक्षी स्त्रीला पूर्णपणे स्वतःला सिध्द करता येते. त्यामुळेच मधुराच्या करीअरचा आलेख सतत उंचावतच गेला. 

तिने तिच्या योग्यतेच्या बळावर अजुन मोठी कंपनी जॉईन केली. तिचा पगार वाढला आणि जबाबदाऱ्याही. 

माधवही खूप खुश होता आपल्या बायकोच्या प्रागतीवर कारण त्याला फक्त तिच्या नोकरीचा फायदा अनुभवायला मिळत होता. 

आईच्या भक्कम आधारामुळे त्याच्या कुठल्याही सुखसोयींमधे बायकोच्या नोकरीमुळे व्यत्यय येत नव्हता. 

त्याला जसे लग्नाआधी सगळे हातात मिळत होते ते आताही तसेच अबाधीत होते. घरातले रुटीन अगदी सुरळीत सुरु होते.

बघता बघता लग्नाला दोन वर्षे होत आली आणि मीराताईंना गुडघे दुखी सुरु झाली. 

सुरवातीला जास्त चालल्यावर किंवा खूप वेळ उभे राहिल्यावरच दुखणारे गुडघे नंतर नियमितपणे त्रास द्यायला लागले. आधी गुडघे , मग हाता पायांची बोटे, असे करत करत संधीवाताचा आजार जडला आणि मीराताईंच्या हालचालींवर बंधने आली. 

त्यांना घरातली कामं करणे तर शक्य नव्हतेच पण स्वतःच्या कामांसाठीही मदत लागायला लागली. मधुराने मग घरातल्या कामांची जबाबदारी घेतली आणि मोहनरावांनी ऑफिसमधून लॉंग लीव्ह घेतली. 

मीराताईंचे डॉक्टर,  औषध पाणी, व्यायाम सगळे ते बघू लागले. मधुराने घरात स्वैपाकाला व इतर कामाला दिवसभरासाठी बाई ठेवली. 

पण त्या स्वैपाकाच्या बाईंनी केलेल्या स्वैपाकाला घरची सर येणं शक्य नव्हतं. तसेच त्यांनी न सांगता घेतलेल्या सुट्टीच्या दिवशी मधुराला रजा घ्यावी लागायची. 

कारण मोहनराव आणि माधव ह्यांना अजिबात घरातल्या  कुठल्याही कामाची सवय नव्हती. चहा तर लांबच पाणीही दोघांना हातात लागायचे. 

मधुराच्या ऑफिसच्या जबाबदाऱ्या आता खूप वाढल्या होत्या त्यात प्रत्येक वेळी रजा घेणे तिला शक्य व्हायचे नाही. तसेच मोहनरावांनाही मधे मधे ऑफिसला जायला लागायचे. 

कधी थोड्या थोड्या दिवसांसाठी मीराताईंची बहीण तर कधी मधुराची आई मदतीला यायच्या पण त्यांनाही त्यांच्या घरचे व्याप होतेच. आईच्या आजारपणामुळे माधवची मात्र गैरसोय होत होती. 

कारण मधुरा दिवसभर ऑफिस, घर सगळे सांभाळताना त्याला स्वतःची कामं स्वतः करायला सांगायची. 

भाजी आणणे , कपडे इस्त्रीला देणे, झाडांना पाणी घालणे, चहा करणे , सगळी बिलं online च भरायची असली तरी  लक्षात ठेवून वेळेवर भरणे. ह्या आणि अशा कुठल्याच कामाची माधवला सवय नव्हती. 

मधुराची नोकरीची अट लग्नाआधी मान्य केल्याने तो तिला नोकरी सोड असेही म्हणू शकत नव्हता. मुळातच कामाची अजिबात सवय नसल्याने माधवला अंगावर पडलेल्या कामांचा कंटाळा यायचा आणि त्याची सतत चिडचिड व्हायची. 

सुरवातीला समजून घ्यायचा प्रयत्न करणारा माधव आता मात्र मधुराने काही काम सांगितले की चिडायचा. 

मधुरा शांत राहून त्याला सांभाळून घ्यायची पण सारखाच त्याचा चिडका सुर असला की तिचाही तोल जायचा. मग अगदी साध्या साध्या गोष्टीसाठीही त्यांची कडाक्याची भांडणे व्हायची. घरातले वातावरण गढूळ व्हायचे. 

आपली सून सारखी मुलाशी भांडते म्हणून मीराताईही नाराज व्हायच्या. त्या दोघांनाही समजवायच्या. मग चार दिवस शांत गेले कि परत तेच सुरु व्हायचे. 

माधवच्या ह्या सारख्या नाराजीमुळे मधुरा अपसेट व्हायची आणि कितीही प्रयत्न केला तरी तिच्या कामावर ह्या सगळ्याचा परिणाम व्हायचाच. 

ऑफिस मधेही तिचा मूड खराबच असायचा. आधीची एक  हसरी, आनंदी, कर्तृत्ववान आणि सक्षम स्त्री आता नाराजी व असमाधानात दिवस काढत होती. 

पैसा खर्च करुन घरात कामासाठी मदत,  हॉटेल मधले जेवण किंवा इतर सगळ्या सुखसोयी विकत आणता येतात पण घरातल्या माणसांचा स्वभाव आणि सवयी बदलता येत नाहीत.

घरातले समाधान टिकवण्यासाठी कुटूंबातील प्रत्येकाची आलेल्या परिस्थिती नुसार स्वत: मधे बदल करण्याची तयारी असावी लागते.

सततच्या भांडणांनी मधुरापुढे करीअर की  घर असा प्रश्न उभा राहिला. खरंतर आता लग्नाला तीन वर्ष होऊन गेली होती आणि तिला मातृत्वाची ओढही लागली होती. 

पण सध्याच्या तणावामुळे तिला तो ही निर्णय लांबणीवर टाकावा असे वाटत होते. 

शेवटी विचार करुन करुन मधुराने नोकरी सोडायचा निर्णय घेतला. एकदा का आपला पगार बंद झाला की कदाचित माधवला आपल्या नोकरीचे महत्व पटेल आणि तो बदलेल तेव्हा  पुढे जसे जमेल तसे परत नोकरी सुरु करता येईलही ह्या आशेवर तिने हा निर्णय घेतला.  

सध्याचा परिस्थितीत आपला संसार सावरण्यासाठी नोकरी सोडणेच तिला योग्य वाटले. 

ज्या मीराताईंनी तिला समजून घेत नोकरीसाठी आधार दिला होता त्यांच्यापेक्षा आणि घरातल्या शांतते पेक्षा नोकरी निश्चितच महत्वाची नव्हती तिच्यासाठी. 

एका सक्षम , हुशार आणि कर्तृत्ववान स्रीच्या करीअरला ब्रेक लागला. 

अर्थात स्त्रीसुलभ स्वभावानुसार हा ब्रेक सकारात्मकतेने स्विकारून मधुराने नाती जपणे पसंत केले आणि तिचे घर सावरले. 

पण मीराताईंना मात्र मनापासून वाईट वाटले. 

त्यांनी एक हुशार सून घरात आणली. तिला तिच्या करीअरसाठी मनापासून आधार दिला. पण स्वतःच्या मॉडर्न बायको हवी असलेल्या मुलाला मात्र जराही कामाची सवय लावली नाही.

आपल्या कर्तृत्ववान बायकोला समर्थपणे साथ देण्यासाठी आवश्यक असणारी मानसिकता माधवमध्ये रुजवण्यात त्यानां यश आले नाही आणि मधुराच्या स्वप्नांत तिच्याच जोडीदारामुळे अडथळा आला.

********* समाप्त

वाचकहो, आजच्या ह्या  women empowerment आणि equal opportunities च्या जगात समाजात खूप सकारात्मक बदल होत आहेत. पालक मुलींना स्वतंत्र व निर्भय बनवत आहेत. तिला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सक्षम करत आहेत. 

पण त्याच वेळी आपल्या मुलानांही एका  empowered स्त्री बरोबर समर्थपणे आयुष्य जगायला  शिकवणं ही जबाबदारीही पालकांवरच आहे.  कारण पुरुषांसाठी प्रत्येक बाबतीत स्वतः इतकी किंवा काकणभर जास्तच योग्यता असलेल्या स्त्रीला स्विकारणे आणि त्यानुसार तिला समान वागणूक देत नाते जपणे ही नक्कीच सहजसाध्य गोष्ट नाही. तर ती एक जाणीवपूर्वक आत्मसात केलेली जीवनशैली आहे. 

सगळेच पुरुष सरसकट माधवसारखे असतात असं मला अजिबात म्हणायचं नाही. हल्लीच्या पीढीतली बरीच मुलं घरातली कामं करतात आणि आई व बायकोला मदत करतात. पण माधव सारखे बायकोच्या नोकरीला समजून घेऊ न शकणारे अनेक पुरुष आजही आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यातल्याच एका माधवची ही एक काल्पनिक कथा. यात कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.


© धनश्री दाबके

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने