आई एक जादूगार

आई एक जादूगार 
लेखिका- सोनाली शिंदे

परेरेरेरेड .........सावधान, असा एक मोठा खणखणीत आवाज पूर्ण ग्राउंड वर पसरला, कवायत प्रकार सुरू झाले, ग्राउंड च्या मध्यावर मध्यम उंची असलेली, तरतरीत व्यक्तिमत्वाची प्राची सगळ्यांना गाईड करत होती. सगळे तिचं अनुकरण करत होते. 



तासाभराच्या कालावधीने ग्राउंड वरचा आवाज क्षीण होत गेला कवायत प्रॅक्टिस संपली होती. आता शिक्षक उद्याची  १५ ऑगस्ट साठीची, शाळेची वेळ आणि नियोजन मुलांना सांगत होते, गणवेश अगदी स्वच्छ आणि इस्त्री केलेला असायला हवा असं ठणकावत होते, अखेर सगळ्या सूचनांना विराम द्यायला शाळेची घंटा झाली. मुलांनी ग्राउंड वरून वरहांड्यात उड्या घेतल्या आणि आपापली दप्तरे घेऊन त्यांनी धूम ठोकली.


सगळ्यात शेवट प्राची आणि तिची मैत्रीण रिया यांनी कवायतीच साहित्य गोळा केलं आणि त्या ही निघाल्या.



जाता जाता रिया प्राची ला बोलली, " काय बुवा उद्या काय एका मुलीची मज्जा आहे, कवायत हेड म्हटल्यावर नवीन शाळेचा गणवेश असणार तुला.”


प्राची अगदी हलकेच हसत बोलली, " नाही ग जुनाच आहे तो आई ने धुतला असेल आज, आज गणवेशाला सुट्टी होती ना".


 "अग काय बोलते प्राची तुझे रंगीत ड्रेस च इतके छान छान असतात, मग तुझे बाबा तुला गणवेश पण नवीनच आणतील". रिया बोलली.





 "अग खरंच रिया, बाबा आम्हा भावंडाना फक्त दीवाळीलाच नवीन कपडे घेतात आणि शाळेचे कपडे ते पूर्ण खराब झाल्यावरच नवीन शिवून आणतात आणि असंही अजून माझा शाळेचा गणवेश छान आहे, आणि माझे रंगीत ड्रेस हे जुनेच आहेत फक्त माझी आई त्यांना छान सांभाळून ठेवते, स्वच्छ करते".




 
रिया बोलली, “अरे वा प्राची आजपर्यंत मला वाटत होत तुला घरातले वरचेवर कपडे घेतात, तुझ्या कपड्यांवरून कधीच जाणवलं नाही की ते इतके जुने आहेत, तुझी आई खरंच जादूगार आहे".
    



प्राची हसली पण क्षणात एक विचार तिच्या डोक्यातून फिरून गेला, खरंच आपली आई नक्की काय जादू करते आपल्या कपड्यांवर.
   
प्राची घरी आली, आई ने शाळेचा गणवेश दोरीवर वाळत घातला होता. तो रोजच्यापेक्षा आज खूपच स्वच्छ दिसत होता. पण थोडा चुरगळला होता. 
प्राचीने ठरवलं होत आज आपण लक्षच ठेवायचं आई काय काय करते ते.
    

  आई ने संध्याकाळी सगळे कपडे दोरीवरून काढून आणले, एक एक कपडे घडी घालू लागली, प्राची चा गणवेश  सगळ्यात खाली होता, प्राची च लक्ष  फक्त  कपडे आणि त्यांची घडी तिकडेच होत. आई बोलली, " प्राची काय बघतेय गं इतकं एकटक माझ्याकडे?”
    

प्राची लाडिक पणे बोलली "आई सगळ्यात आधी माझ्या गणवेशाची घडी घाल ना ग " आई ने एेकल आणि तिचाच गणवेश हातात घेतला, आणि त्याची घडी घातली, ती घडी अशी घातली होती जशी काय तो गणवेश थेट दुकानातूनच आणला आहे.
    

रात्र झाली, जेवण उरकलं आणि आई ने प्राचीला झोपायला सांगितलं कारण उद्या शाळा सकाळची होती. पण प्राचीचं लक्ष आईकडे आणि आईने घडी घातलेल्या गणवेशा कडेच होत, प्राची शेजारीच कॉट वर झोपायला गेली, तोंडावर पांघरूण ओढून घेतलं आणि हळूच पांघरूनाच्या फटीतून आई अजून काय काय करते ते पाहत राहिली. 
        
आई ने झाक पाक केली, कचरा काढला, भांडी विसळली, ती व्यवस्थित सुकायला ठेवून दिली. सगळं आवरून झाल्यावर आई घडी केलेल्या कपड्यांकडे वळली आणि प्राची चा गणवेश तिने हातात घेतला. तेवढ्यात प्राचीने पांघरूण थोड मागे सरकवल आणि पाहिलं तर आई ने तो गणवेश घेतला आणि त्याच्या घड्या बसण्यासाठी धान्याचा एक जड डबा होता त्याच्या खाली पेपर मध्ये लपेटून सरकवून दिला आणि ती झोपून गेली.
     

एवढे वर्ष आपण जे कपडे मोठ्या दिमाखात घालून शाळेत मिरवत होतो त्याच्या मागे आई ची केवढी मेहनत आणि किती मोठी तत्परता होती. ती कमी शिकली असली तरी चार चौघात आपल्या मुलांना कोणी कमी लेखू नये हाच तिचा प्रयास होता. हे प्राची ला आज कळलं होत.
    
सकाळी उठून प्राचीने शाळेचा गणवेश घातला आणि एक प्रकारची वेगळीच चमक तिच्या डोळ्यात तरळली. आई कडे बघत तिने जोरदार आरोळी दिली.

परेरेरेरेरेरेड..........सावधान. आणि एक सलामी त्या आई मधल्या जादूगाराला............

©® सोनाली शिंदे

सदर लेख लेखिका सोनाली शिंदे यांचा आहे. त्याचे कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी तो स्वेच्छेने सदर लेख ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेला आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो :गुगल 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने