उर्मी (भाग १)




उर्मी - भाग १
लेखिका  -सोनाली शिंदे


कॉलेजला जाण्यासाठी एकमेव बस होती 11.00 वाजताची, आम्ही साऱ्या मैत्रिणी वेळेतच स्टॉप वर पोहचत होतो, अपवाद एकच, आमच्या ग्रुप मधली बिनधास्त कन्या ' ऊर्मी ' . नावाप्रमाणेच तिच्या रोजच्या जगण्यात ही ऊर्मी होतीच, पूर्ण चैतन्य, फक्त वर्तमानात जगणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त स्वतःसाठी आणि स्वतः वरच प्रेम करत जगणे.



       कायम बस वळणावरून स्टॉप वर यायची वेळ आणि या मॅडमची ती बस धावत धावत पकडायची वेळ दोन्ही सारख्याच आम्हाला ते पाठच झालं होत.


ऊर्मी आज पण अगदी धापा टाकत पळत येत होती, एकीकडे बस अन् दुसरीकडे ही डोळ्यावर गॉगल, जीन्स त्यावर शोभणारा सुंदर स्लिव लेस टॉप, खांद्यावर अडकवलेल्या पर्स मध्ये एकच वही, ऊर्मी बरोबर ती पर्स ही वाऱ्याच्या दिशेनी हेलकावे खात होती, ऊर्मी च हे वेगवगळे रूप रोजच होत,आणि नेहमी बसस्टॉप वर येण्याचं कारण ही, पायातल्या उंच हिल्स चप्पल वर या तिच्या पळण्याचा काहीच फरक पडत नसे.

      अखेर बस आणि या मॅडम दोघी सारख्याच वेळेवर स्टॉप वर आल्या, मी मनात अगदी हुश्श केलं, आणि तसंही बस कंडक्टर काही बोलला असता तर त्याची काय की तो ऊर्मी ला बोलण्यात हरवेल.

     आम्ही बस मधे चढलो, ऊर्मी आणि मी नेहमी एका सीटवर च बसायचो, शेजारी नेहमीप्रमाणे तिला जागा दिली, आणि ऊर्मी ने स्वतः च्या शरीराला मोठा हिसका दिला आणि ती एकदम दणकण सीटवर बसली. गॉगल डोक्यावर सरकवला आणि आपल्या सॅक मधून एक लिपस्टिक ची शेड काढली, पर्स च्या आरशात बघून ती लावू लागली, एकदाच आरश्यात मनसोक्त न्याहाळून पाहिलं  मग मॅडम बोलत्या झाल्या , एवढा वेळ मी शांत तिला निरीक्षण करत होते. आणि मग नेहमीचा माझा प्रश्न " ऊर्मी आज तुला उशीर का झाला" मग हीच सुरू.  

   " अग स्यामि आज झालं सांगू" ( ऊर्मी ने माझ्या समीक्षा नावाचा शॉर्टकट केला होता )" मी जो आज ड्रेस घालायचा ठरवलं होत त्याच्यावरचे मॅचिंग इअर रिंग्ज सापडल्या नाहीत, आयत्या वेळी माझ प्लॅनिंग बदललं म्हणून आज उशीर.बघ ना निघताना लिपस्टिक पण लावता आली नाही, म्हणून पर्स मधे टाकून आले, कशिय ग शेड?. 

      " छान आहे" मी बोलले . ऊर्मी मला thanks म्हणाली . बोलता बोलता आमचा कॉलेजचा स्टॉप जवळ आला. बसमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. उठताना माझी ओढणी गाडीच्या सिट मध्ये अडकली. आम्ही लवकर उतरेना म्हणून कंडक्टर नी आम्हाला ओरडायला सुरुवात केली, त्यावर ऊर्मी  कंडक्टरवर चिडली. " काय हो दिसत नाही ओढणी अडकले ती आम्हाला काय हौस आलीय इथ थांबायची, त्यावर मी ऊर्मी ला शांत केलं आणि कंडक्टर ला विनंती केली " काका जरा थांबा ओढणी निघतच आलीय , अखेर ओढणी निघाली आणि आम्ही घाईने खाली उतरलो.

    आम्ही खाली आलो आणि ऊर्मी ने मला ओरडायला सुरुवात केली " किती वेळा सांगितलं असले भल्या मोठ्या ओढण्यांचे ड्रेस घालू नको म्हणून, जीन्स टॉप, लेगींस असे कपडे वापरायची सवय लाव म्हणून पण म्हणे मला आवडत नाही, बघ बर कस एकूण घ्यावं लागतं ते. त्यावर मी बोलले.

      "अग ऊर्मी मला अश्या कपड्यात च स्वस्थ वाटत 

आणि तुझ्या सारखे कपडे मी कधी ट्राय पण केले नाहीत मला चुडीदार,  स्कर्ट टॉप च आवडतात, तू जस तुझ्या पोशाखात स्वस्त असतेस तस मी माझ्या , बर चल कॉलेज आल आपलं तेवढ्यात ऊर्मी ने खिशातला मोबाईल काढला आणि पटापट सेल्फी घ्याला सुरुवात केली, " अग स्यामि काय आहे ना येताना मी आजच्या लूक चे स्टेटस अपडेट नाही केलं ना, थांब थोडावेळ " आणि ऊर्मी सेल्फी चे एक एक अंगल्स घ्यायला लागली. मी तिला न्याहाळत शेजारीच उभी होते, ऊर्मी रोज च अपडेट असायची, अन् तशीही ती दिसायला एक सुंदर मॉडेल पिस च होती, अगदी जाहिराती मधल्या मॉडेल्स सारखी.

         केसांना रोज वेगवेगळी वळणं देणं, कटिंग करणं, चेहरा पार्लर मधून अपडेट करून घेणं, हाता पायांच्या नखाचे नेलपेंट अगदी काळजी न स्वच्छ करणं, मॅचींग करणं, हे सगळं महिना , दिवस , आणि आठवडा यामध्ये तीन ठरवून ठेवलं होत. त्याचबरोबर स्वतःचा डायट सांभाळन , व्यायाम अगदी काटेकोर पने करणं हे सगळं ती ठरल्याप्रमाणे करायची, ऊर्मी चे बाबा उत्तम नोकरी मध्ये असल्या कारणानं तिला ' तडजोड हा प्रकारच माहित न्हवता, फक्त स्वतःसाठी,जगणे आणि स्वतः वर प्रेम करून जगणे, याच दोन समिकरणांवर तिचं आयुष्य तिने आखल होत, 

     दर दोन दिवसांनी आमचं ठरलं होत, कॉलेज सुटल्यावर जाताना एक पाणीपुरी चा ठेला होता, तिथं जायचं आणि मनसोक्त पाणीपुरी च्या प्लेट्स फस्त करायच्या . आज आमचं ठरलं होत, कॉलेज सुटल्यावर आम्ही तिथे गेलो, ऊर्मी त्या पाणी पुरी वाला माणसाला बोलली, " भैया दो पाणीपुरी बना के  दोना, एक मिडीयम औंर एक तिखी". नेहमप्रमाणेच मिडीयम मला आणि तिखट तिला, माझी आवड तिला माहित होती, पाणीपुरी खाता खाता मला कॉलेजात ला एक प्रसंग आठवला, आणि मी ऊर्मी ला विचारलं, 

        " काय ग तुला आपल्या मराठीच्या मॅडम बाजूला घेऊन काय समजावत होत्या, आणि तू का त्यांच्यावर एवढी वैतागली होतीस."

       " तुम्हाला ऐकू येत होत का" ऊर्मी ने विचारलं.

       " नाही अग मला तू लांबून थोडी वैताग ल्या सारखी दिसत होतीस म्हणून विचारतेय."

      " अग काही नाही ती मला माझ्या कपड्यांवरून बोलत होती" मी ऊर्मी ला ओरडले.

" अग अशी एकेरी का बोलवतेस मॅडम आहेत त्या आपल्या ."

   " असू दे मॅडम असल्या तर " त्यांनी थेट माझ्या घरच्यांना कशाला बोलायचं मग" .........

मराठीच्या मॅडम म्हणाल्या " तुझ्या घरच्या लोकांचं तुझ्याकडे लक्ष नसते का, तू अशा अवतारात कॉलेजला रोज येतेस". काय संबंध आहे का माझ्या घरच्यांना अस बोलण्याचा.

" हे बघ स्यामी प्रत्येकाचा comfort zone वेगवेगळा असतो. तुला सलवार कुडती मध्ये सोयीस्कर वाटत, तर मला जीन्स मध्ये म्हणून काय कोणी कोणासाठी बदलायची गरज नसते. तुला सकाळी बस मध्ये बोलले याचा अर्थ असा नव्हता की मी तुला लगेच पूर्णच बदल बोलतेय.पण काही गर्दीच्या ठिकाणी काही पोशाख सोयीचे पडतात एवढंच सागण्याचा माझा प्रयत्न होता".

   पाणीपुरी चा ठरलेला प्लेट्स कोटा पूर्ण करून पैसे दिले आणि आम्ही निघालो. चालता चालता ऊर्मी ने मला विचारलं, " तुला फॅशन बद्दल काय वाटतं," मी म्हणाले, " माझ्या मते फॅशन म्हणजे पूर्ण अंगभर कपडे, ड्रेस मी शिवून घेते पण टेलर ला पण पॅटर्न पाठच  झालाय, पण सणासुदीचे दिवशी मला पण लाईट मेकप मध्ये राहायला आवडतं".

    ऊर्मी बोलू लागली, " हे बघ जस तुला अंगभर कपड्यात राहायला आवडत  तसं मला प्रयोगशील राहायला आवडत, म्हणजे एखादा ड्रेस पिस घेतला तर याला काय वेगळा पॅटर्न करता येईल का? असा मी विचार करते. अंगप्रदर्शन पण झालं नाही पाहिजे अन् आपल्याला बिनधास्त पण वावरता आल पाहिजे.

      शेजारच्या काकू मला आपल्या मराठी च्या मॅडम बद्दल सांगत होत्या, " या तुझ्या मॅडम कॉलेजात जात असतील अगदी साडीत वैगेरे पण त्यांना आमच्या किटी पार्टी मध्ये ये बघायला, कशा असतात अगदी ते.

तोकडा तोकडा one piece घालून, डार्क लिपस्टिक लावून मिरवत असतात पूर्ण पार्टी भर. मॅडम आहेत म्हणून, नाहीतर त्यांना मघाशी चांगलच सुनावलं असतं.

  " निदान मी साधेपणाच ढोंग तरी नाही करत. तुला माहित आहे, कॉलेजमध्ये साधे पणाने वावरणाऱ्या कित्येक मुली, घरातले बाहेर गेल्यावर शॉर्ट्स, छोटे skirts,. ट्राय करून पाहतात, one piece घालून गुपचूप फोटो काढून आपल्या सोशल नेटवर्किंग साईट ला पोस्ट करतात.  

   पण मी माझी फॅशन ची आवड केवळ आरश्या समोर न ठेवता, बाहेर बिनधास्त घालून मिरवायची ताकद ठेवते, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी बेभान आहे. 

     फॅशन ही एकदा समोरच्या व्यक्तीच्या मना ला पटली की ती बरेच दिवस स्थिर राहते, म्हणजे एखादा वेडावाकडा कापलेला कपडा म्हणजे लतकर आणि आकारात कापली की ती फॅशन. म्हणजे उदाहरणच देयच झालं तर बघ ह एखादा टॉप्स खांद्यावर फाटला तर ते ओंगळवान दिसतं, तेच जर त्याला योग्य आकारात कापलं तर ती फॅशन झाली, तसच एखादा लाँग स्कर्ट आहे चालता चालता कुठे अडकला आणि समोरून त्याची लक्तर लोंबु लागली की समजायचं आज एखादा कुत्रा मागे लागणार, पण त्याला कात्री ने कापून छान शेप दिला एखादी लेस लावली की त्याचं स्कर्ट ला आपण ' थ्री कट्स' म्हणून घालतो.

    म्हणजे आपल्याला हवे तसे आकार देऊन कपड्याला दिलेलं नावीन्य आणि त्यातून मिळवलेले समाधान म्हणजे फॅशन". त्यात मला काहीच वावगं वाटत नाही." बोलता बोलता आमचा बसस्टॉप जवळ आला. तेवढ्यात बस आलीच आम्ही बस मध्ये चढलो, एवढ्या गर्दीत ही मी माझ्या विचारात राहिले, " ऊर्मी ला या रूपात कधीच पाहिलं न्हवत, माझा अंदाज होताच, जरी ही मॉडर्न राहत असली , तरी आतून विचारांची प्रगल्भता तिच्याकडे असणारच. 

  ऊर्मी अगदी पाणीपुरी सारखीच होती, थोडी खट्टी, मिठी, तर कधी तिखट, आणि त्यातल्या पुरी सारखी आतून पूर्ण रिकामी...

क्रमशः

भाग २ 👇🏻
https://www.mazilekhani.com/2020/08/blog-post_6.html



©️ सोनाली गुलाब शिंदे

 सदर लेख लेखिका सोनाली शिंदे यांचा आहे. त्याचे कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी तो स्वेच्छेने सदर लेख ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेला आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी

फोटो गुगल साभार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने