निर्णय

©अस्मिता(स्वामिनी)चौगुले




आज खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यातले लॉक डाऊन संपले होते. आज कोर्टाने तिच्या बाजूने निकाल देऊन तिला न्याय दिला होता. 

आज खऱ्या अर्थाने तिचे लग्न संपले होते आणि तिचा संसार मोडला होता. 

पण संसार मोडल्याच दुःख आणि लग्न संपल्याचा क्लेश तिच्या चेहऱ्यावर लेश मात्र ही दिसत नव्हता. उलट तिच्या चेहऱ्यावर विलसत होते समाधान आणि डोळ्यात दिसत होती पुढच्या आयुष्याची स्वप्ने! 

कारण तिने ज्या दिवशी घटस्फोटाचा निर्णय घेतला तेंव्हाच तिने दुसरं लग्न करण्याचा ही निर्णय घेतला होता.

रावी कारमध्ये तिच्या आई व भावाबरोबर बसली आणि भावाने गाडी सुरू केली.

 गाडीची चाके फिरत होती तशी रावीच्या डोक्यात ही विचारांची चक्रे फिरत होती. 

ती नकळतच तीन वर्षे मागे तिच्या भूतकाळात गेली आणि एखाद्या चित्रपटासारखा तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळू लागला.


रावी सरदेसाई गोरी गोमटी, मृगनयनी , गालावर खळी, तरतरीत नाक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेली एक उच्च शिक्षित तरुणी! 

स्वभावाने मन मिळावू असली तरी तिच्या व्यक्तीमत्वाचा लोकांना एक प्रकारचा दरारा वाटायचा त्यामुळे तिच्याशी मैत्री करायला कोणी जास्त धजावत नसे पण जे लोक तिच्या जवळ जात त्यांना रावी कळली की मात्र ते तिच्याशी आयुष्य भरासाठी जोडले जात. त्यामुळे मोजकेच मित्र-मैत्रीण असलेली ती!

रावीच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती.

वडील उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होते. तिच्या आई-वडिलांनी तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नव्हती.

तिच्या दिलखुलास हसण्यावर अनेक तरुण फिदा पण तिचा स्वभाव वेगळा होता. तिचा प्रेम विवाहावर विश्वास नव्हता. म्हणून ती या सगळ्या गोष्टींपासून दूरच राहायची. तिचे महाविद्यालीन शिक्षण पूर्ण झाले आणि ती नोकरीचा शोध घेऊ लागली पण मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून ती थांबली. घरी तिच्या लग्नाचा विषय निघू लागला आणि स्थळे पाहायला सुरवात झाली.


रावी आता प्रत्येक मुली प्रमाणे लग्न आणि भावी जोडीदारा विषयी अनेक स्वप्ने पाहू लागली. 

तिची स्वप्ने इतकी मोठी नव्हतीच कधी! ना भावी जोडीदारा विषयी अवाजवी अपेक्षा!!!

 तिला फक्त एक सामान्य सुखी वैवाहिक आयुष्य हवं होतं पण नियतीचे मात्र तिच्याशी आणि तिच्या स्वप्नांशी वैरच होते जणू!


रावीच्या आई-बाबांनी तिचं नांव बऱ्याच मॅरेज ब्युरोमध्ये नोंदवले होते. त्यातीलच एका मॅरेज ब्युरो मधून तिला अभयेंद्र देशमुखचे स्थळ आले. 

अभयेंद्र देशमुख अगदी किरकोळ अंग काठीचा पाहता क्षणी कोणाला ही न आवडणारे व्यक्तिमत्त्व होते. 

तो चांगल्या ठिकाणी नोकरीला होता. राहत्या शहरात स्वतःचे घर आणि घरात फक्त वडील त्याची आई बरेच वर्षे आधी गेली होती. एक मोठा भाऊ पण तो घरजावई झाला होता त्यामुळे तो त्याच्या पत्नी सह त्याच्या सासू सासऱ्याकडे राहत होता. 

घरातील कोणालाच रावीसाठी तो पसंत नव्हता. तिच्या आईच्या म्हणण्यानुसार रावीला तो शोभत नव्हता. रावीला मात्र देखणेपणा आणि सुंदरता याचे आकर्षण कधीच नव्हते. तिने अभयेंद्रला पसंती दर्शवली आणि इथेच तिने चूक केली.

मग रावीच्या आनंदासाठी तिचे आई-वडील तयार झाले. 

अभयेंद्रची बाहेरून चौकशी करण्यात आली पण त्याच्या बद्दल कोणतीच आक्षेपार्ह माहिती आढळून आली नाही.

घरातील पहिलेच मंगल कार्य कारण रावी मोठी मुलगी!. तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच अभयेंद्रने आणि त्याच्या वडिलांनी लग्नात काहीच मागणी केली नाही त्यामुळे सगळ्यांना असे वाटले की माणसे खरच चांगली आहेत आणि इथेच रावी आणि तिच्या कुटूंबाची फसगत झाली. 

दहा लाख खर्च करून थाटामाटात लग्न रावीच्या आई-वडिलांनी करून दिले.

लग्न झाले आणि ती डोळ्यात खूप सारी स्वप्ने घेऊन देशमुख कुटुंबात प्रवेशकर्ती झाली.

सगळे पाहुणे अजून घरात होते.दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा झाली आणि सगळे पाहुणे निघून गेले. 

रावीचे मोठे जाऊ-दीर आणि जावेचे आईवडील दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जाणार होते. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. 

रावीने तिच्याच पसंतीची पूजेसाठी घेतलेली अबोली कलरची सुंदर डिझायनर साडी नेसली. तिच्या जावेने तिला तयार व्हायला मदत केली. 

गोऱ्या-गोमट्या रावीला तो रंग खुलून दिसत होता.तिने केलेला लाईट मेकअप या मुळे ती आणखीनच सुंदर दिसत होती. 

तिची जाऊ तिच्या पेक्षा दिसायला कमी त्यामुळे तिने तोंड वाकडे केले. रावीने स्त्री सुलभ भावना म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष केले. पण जावेची आई दिलखुलास आणि मनाने चांगली होती.

तिने रावीला “किती सुंदर दिसत आहेस रावी!” असं म्हणून तिने रावीला दिलखुलास दाद दिली.हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला.

अभयेंद्रने रावीला पाहिले.दोन मिनिटं पाहतच राहिला. 

रावीला मनोमन वाटत होते त्याने तिचे कौतुक करावे पण अभयेंद्र तिला तुसडेपणाने म्हणाला ,“ जा, साडी बदल कुठे बाहेर जाणार असल्या सारखी तयार झाली आहे!” असं म्हणून तो निघून गेला.

आणि रावीच्या स्वप्नांचा चुराडा व्हायला इथूनच सुरवात झाली. 

रावी हिरमुसली पण ती कोणालाच काही बोलली नाही.

 गोव्याला फिरायला जाताना तिच्या वडिलांनी तिला खर्चायला म्हणून पैसे दिले पण ते पैसे अभयेंद्रने काढून घेतले.

घरी आल्यावर सासऱ्यांचा स्वभाव तिला आता कळायला लागला.प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवरून किरकिर करणं किरकोळ करणावरून भांडण उकरून काढणे. 

तुझ्या बापाकडे खूप पैसा आहे त्याचा तुला माज आहे असं म्हणून तिला सतत त्रास देत हे उद्योग सासऱ्यानी सुरू केले.

रावीने हे सगळं अभयेंद्रला सांगितले तर त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष कर असा सल्ला दिला. 

अभयेंद्र तिच्याशी प्रत्येक गोष्ट खोटं बोलू लागला. 

लग्न होऊन महिना झाला तरी अभयेंद्रने तिला ना पगार दाखवला ना तिला खर्च करण्यासाठी पैसे दिले. उलट तिच्या आईने दिलेले पैसे ही तो काढून घेऊ लागला. 

लग्न होऊन दोन महिन्यातच तो रावीकडे वेगवेगळ्या मागण्या करू लागला.तरी रावीचे आई-वडिल पैसे देत, घरात वाणसामान भरून देत.

इकडे सासऱ्यानेही तिला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. 

रावीला या सगळ्या गोष्टी खूप खटकत होत्या पण ती सहन करत होती. अभयेंद्र चेंगट असावा सुधारेल हळूहळू असे तिला वाटत होते.

आता अभयेंद्रने तिला कुठे तरी जॉब कर असा तगादा लावला. रावी मात्र आतून तुटत चालली होती कारण अभयेंद्र तिच्यामध्ये कोणत्याच बाबतीत रस दाखवत नव्हता.

असेच लग्नाला चार महिने झाले आणि वटपौर्णिमा आली. 

रावी त्या दिवशी माहेरी जाणार होती. अभयेंद्र कामाला जाणार होता पण त्याच्या मोबाईलला चार्जींग नव्हते म्हणून रावीचा मोबाईल घेऊन त्याचा मोबाईल तिच्या जवळ सोडून तओ गेला. 

तिची बहीण तिला माहेरी घेऊन आली. रावीची आई स्वयंपाक करत होती.

रावीने अभयेंद्रच्या मोबाईलचे सहज म्हणून कॉल रेकॉर्डिंग चेक केले. 

सगळे कॉल व्हाईस रेकॉर्ड होते. तिने सहज ते ऐकायला सुरवात केली आणि ती ते ऐकून हादरली. 

कारण दारू प्यायला कोठे जाऊ, सिगरेट घेऊन ये, मटका लाव, इथे जुगार खेळायला ये असे मित्रां बरोबर अभयेंद्र बोलत असलेले तिला ऐकायला मिळत होते.

एवढेच नाही तर सावकारा कडून काढलेले कर्ज केंव्हा देणार आहेस परत म्हणून सावकार त्याला धमकावत होता.

हे सगळं ऐकून रावी आणि तिच्या घरच्यांच्या पाया खालची जमीनच सरकली.

रावीला कळून चुकले की आपण फसवले गेले आहोत.

अभयेंद्र नुसता दारुडा नाही तर जुगारी आणि कर्जबाजारी ही होता. तो आणि त्याचे वडील रावीचा उपयोग एक ए. टी. एम. मशीन सारखा करू पाहत होते. पण रावी गप्प बसणाऱ्यातली आणि अन्याय सहन करणाऱ्यातली नव्हती.

ज्या दिवशी स्त्रिया जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून देवाला प्रार्थना करतात. वडाला फेऱ्या मारतात त्याच दिवशी सावीने अभयेंद्रला म्हणजेच तिच्या नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. 
ही रावीची नियतीने केलेली घोर विटंबनाच म्हणावी लागेल.

पण रावी डगमगली नाही तिने तिचा निर्णय स्पष्टपणे तिच्या आई-वडिलांना सांगितला.
त्यांनी ही तिला साथ दिली.

लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल? याचा विचार तिने केला नाही कारण ज्या माणसाने तिला फसवले,जो माणूस व्यसनाधीन आहे, त्याला आपली जबाबदारी स्वीकारायची नाही, ज्या माणसाला आपला आणि आपल्या आई-वडिलांचा पैसा हवा त्या माणसाशी तिला कोणताही संबंध ठेवायचा नव्हता.

म्हणून तिने हा निर्णय घेतला. आणि अभयेंद्रच्या विरुद्ध घटस्फोटचा आणि नुकसानभरपाईची खटला कोर्टात दाखल केला आणि आज तिला नुकसानभरपाई सह घटस्फोट मिळाला होता.

भावाने गाडी थांबवली आणि रावी भानावर आली.

आज ती मुक्त होती. नविन स्वप्न पहायला आणि नवीन जीवनसाथी निवडायला ही!

●●●●
आज अनेक ठिकाणी मुलींची लग्नात फसवणूक होते. कधी नवरा व्यसनाधीन निघतो! कधी सासरचे आज ही माहेरहून पैसे आण म्हणून मुलींना छळतात! कधी स्त्री कमावती असली तरी तिचा पगार नवरा आणि सासरचे लोक काढून घेतात! आज समाजात अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रकारचा जाच सहन करावा लागतो!

तडजोड कुठे करावी हे प्रत्येक स्त्रीने ठरवले पाहिजे.समाज आणि लोक काय म्हणतील हा विचार करून महिलांनी आणि त्यांच्या आई-बाबांनी कोणाचा ही अन्याय सहन करू नये. जर खूप जास्त छळ होत असेल आणि नवरा आणि सासरचे लोक नीट वागवत नसतील तर कथेतील रावी सारखा घटस्फोटाचा निर्णय घेऊन पुढचा मार्ग स्वीकारायला काहीच हरकत नाही.


©अस्मिता(स्वामिनी)चौगुले


सदर कथा लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने