श्रीमंती
© सौ सुतेजा फडके
'नीताच्या आई!..हा घ्या पेढा.तुम्हीच राहिला होतात..'
'कशाचा पेढा वहिनी?..'
'अहो,आमच्या जान्हवीचं लग्न ठरलं..'
'अरे वा!..अभिनंदन !...'
'इतकं छान स्थळ मिळालं..अहो,आम्ही तर अपेक्षाच नव्हती केली..
खूप म्हणजे खूपच श्रीमंत आहेत हो ते लोक...
शंभर एकर तर उसाची शेतीच आहे...
साखरपुड्याला शालू घेतला बघा त्यांनी..
शिवाय अंगठी,पोहेहार, पैंजण...
थाट नुसता...
विचारू नका काही...'
'मुलगा काय करतो?..'
'बँकेत कॅशिअर आहे..
वयात थोडं जास्त अंतर आहे,पण तितकं वाटत नाही..'
लेले बाई बोलतच होत्या..
मंदिरात भजनाला जमलेल्या सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते..
'खरंच नशीब काढलं हो तुमच्या जान्हवीनं...'
'अहो,खरंच ...
एकत्र कुटुंब आहे..
आणि ही सर्वांत लहान...
त्यामुळं लाड पण खूपच होणार..'
लेले बाई एक वाक्य ऐकलं की दहा वाक्ये ऐकवून कौतुकसोहळा करताना थकत नव्हत्या..
'छान,छान!'..
असं म्हणत निताची आई तिथून सटकली.
आणि घरी जाता जाता मनातल्या मनात तुलना करु लागली....
निताची आणि जान्हवीची...
नीता आणि जान्हवी..दोघी अगदी जिवलग मैत्रिणी...
एकाच शाळेत,एकाच बाकावर बसणाऱ्या..
सुखदुःखात एकमेकींना वाटेकरी करणाऱ्या...
दोघीही हुशार..
असंच छान स्थळ माझ्या नीताला पण मिळायला हवं.. असं म्हणत त्या घरी आल्या..
नीताच्या बाबांना हे सगळं सांगून आता नितासाठी सुद्धा वरसंशोधन सुरू करू असा घोषा त्यांनी लावला..
जान्हवीचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं..
योगायोगानं त्याच महिन्यात निताचं सुद्धा लग्न ठरलं आणि झालं..
मात्र नीताला सासर साधारण मिळालं..असं नीताच्या आईला वाटलं..
सासरी फक्त तिचा नवरा आणि सासरे..
सासू नव्हती.. त्यामुळं नितावरच घरची जबाबदारी होती..
खाऊन पिऊन सुखी होतं,पण जान्हवी इतकं तालेवार घर न्हवतं..
निताचा नवरा खाजगी कंपनीत नोकरीला होता..
सासरे पण नोकरी करत होते..
त्यामुळं नीताला माहेरी जास्त राहता यायचं नाही..
आली तरी उभ्या उभ्या येऊन जायची..
जान्हवी मात्र आठ आठ दिवस रहायची..
यथावकाश दोघींना मुलं झाली आणि त्या आपापल्या संसारात रमल्या..
पण लेले बाई भेटल्या की तोंड फाटेपर्यंत लेकीचं आणि तिच्या सासरच्या लोकांचं कौतुक करत..
आणि मग उगाचच नीताच्या आईंना आपल्या मुलीचं सासर खूपच साधारण वाटायचं..
जान्हवीच्या मुलाची मुंज करायचं ठरवलं..
लेले बाईंनी भजनातल्या चार मैत्रिणींना खास बोलावणं केलं..
त्यात नीताच्या आईलाही बोलावलं..
अगदी स्पेशल गाडी करून त्या मैत्रिणींना घेऊन नातवाच्या मुंजीला पोचल्या..
खरं तर लेकीची श्रीमंती मैत्रिणींना दाखवायची हाच त्यांचा उद्देश होता..
जान्हवीचं घर खरंच छानच होतं..
खूप मोठा बंगला होता..
उतरल्या उतरल्या त्यांचं स्वागत दारात ठाण मांडून बसलेल्या जर्मन शेफर्ड कुत्र्यानं केलं..
घरच्या कुणीतरी त्याला चुचकारून बाजूला केलं..मग ही मंडळी आत गेली..
पाहुणे आल्याची वर्दी आत मिळाली.
पण कुणी हसून आनंद दाखवला नाही त्यांच्या येण्याचा..थोडक्यात फारशी दखल घेतली नाही त्यांच्या येण्याची..
या,या असं लेले बाईंनीच म्हटलं आणि त्यांना आत घेऊन आल्या..
एक पोरसवदा तरुणी तांब्याभांडं घेऊन आली..त्यांच्यासमोर पाणी ठेऊन अंतर्धान पावली..
त्यानंतर पाच दहा मिनिटं नुसती शांतता..
थोड्याच वेळात चहा आला..
चहा झाल्यावर ट्रे घेऊन तीच तरुणी गेली..
आणि ...बहुतेक जान्हवीच्या सासूबाई असाव्यात,त्या आल्या आणि समोरच्या भिंतीवर नजर ठेवत म्हणाल्या,
'हातपाय धुवून घ्या...जेवण तयार आहे, आधी पुरुषांची जेवणं होतील आणि मग बायकांची..'
इतकं सांगून त्याही गेल्या..
प्रवास कसा झाला किंवा बरं झालं आलात वगैरे काहीही त्या बोलल्या नाहीत..
विहीण आल्याचा आनंद काही त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही..
नीताच्या आईला उगाचच अवघडल्यासारखं झालं..
लेले बाईंची नजर भिरभिरत होती..
येऊन जवळपास पाऊण तास झाला होता,पण लाडकी लेक अजून दिसली नव्हती..
नीताच्या आईला राहवलं नाही..
'वहिनी,जान्हवी दिसली नाही हो?...'
खरं तर लेले बाईंना पण तिला भेटण्याची उत्सुकता होतीच,पण...
'छे!..ती कसली येतेय आत्ता बाहेर?..अहो,मुंज मुलाची आई नाही का ती?
खरं तर तीच उत्सवमूर्ती....तिच्याशिवाय पान पण हालत नसेल..
तिला कुठली फुरसत मिळतेय!..'
असं म्हणून त्यांनी मैत्रिणींची..खरं तर स्वतःचीच समजूत काढली..
मग जेवणाच्या पंगती सुरू झाल्या..
नीताच्या आई हळूच डोकावून आल्या..
त्यांना पदर खोचून खालमानेनं वाढणारी जान्हवी दिसली..
चेहरा कोमेजलेली..थकलेलीच वाटली त्यांना..
पंगतीत तिचा लेकही जेवायला बसला होता..
नीताच्या आई परत हळूच आडोशाला जाऊन उभ्या राहिल्या आणि पाहू लागल्या..
आग्रहाने वाढणं सुरू होतं..
जान्हवी मात्र कुणाकडे जास्त न बघता आपल्या लेकाच्या पानात भरपूर वाढत पुढं जात होती..
त्याच्या शेजारी त्याचे बाबा बसले होते..
ते तिला म्हणालेही.. 'अगं, किती वाढतेस त्याला!..इतकं खाणार तरी आहे का तो?..'
अन झालं तसंच...
खूप मोठं उष्टे टाकून तो उठला...
माणसं उठली...
बायकांची मागचं आवरायची लगबग सुरू झाली...
आणि...आणि जान्हवी आपल्या लेकाच्या पानासमोर बसली आणि अक्षरशः अधाशासारखं जेवू लागली...
तिची मोठी जाऊ तिच्यावर ओरडली..
'जान्हवी..अगं, काय हे!..उष्ट्या पानावर काय बसलीस?..ऊठ..'
पण जान्हवीनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि खाणं सुरूच ठेवलं...
नीताच्या आई अवाक झाल्या..
अच्छा,म्हणून ही इतकं वाढत होती तर!...
भूक लागलीय पण माणसांचं जेवण झाल्याशिवाय जेवता नाही येत..
एकत्र कुटुंबात लहान असल्यामुळं काही बोलता नाही येत..
खूप श्रीमंती आहे,पण काय उपयोग..वेळेला पोटभर जेवता नाही येत..
माहेरच्या माणसांना भेटता नाही येत..
आपल्याच तालात आणि श्रीमंतीच्या गर्वात असलेले हे लोक..
मनानं किती गरीब!..
आलेल्या पाहुण्यांचं हसून स्वागत सुद्धा करण्याचं सौजन्य नाही दाखवू शकत..
आपण उगाचच कुढत होतो आपल्या पोरीच्या नशिबावर..
नसेल तिथं इतकी श्रीमंती..
पण आपण गेलो तर तोंडभर हसून स्वागत होतं आपलं..
लेक लगेच येऊन गळ्यात पडते..
चटणी भाकरीच असेल पण आनंदात देतात..
आपल्या येण्याची दखल घेतात..
खरी श्रीमंत तर आपलीच पोर आहे..
असा विचार करत त्या येऊन बसल्या आपल्या जागेवर..
जेवायला बोलवायची वाट बघत..
©® सौ.सुतेजा फडके, वाशीम
सदर लेख लेखिका सौ.सुतेजा फडके, वाशीम यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
