® सौ.सुतेजा फडके, वाशीम
'ही मेली अवलक्षणी!..
लक्ष्मीच्या पायानं नाही आली..
हिच्या रुपात अवदसा शिरलीय घरात..
अजून काय काय बघायला लावतीय कुणास ठाऊक?..'
दररोजची ही उद्धाररूपी भूपाळी ऐकत निमाची सकाळ व्हायची..
नवीन स्वप्नं मनात घेऊन तिनं या घराचा उंबरठा ओलांडला..
पण तिचं लग्न झालं आणि आठवड्यातच तिच्या आजेसासूनं डोळे मिटले कायमचे..
नातवाच्या लग्नाची आस लाऊन बसलेल्या त्या आजीनं खरं तर सुखानं शेवटचा श्वास घेतला,पण हिला शिक्का बसला वाईट पायगुणाचा..
निमाची सासू स्वतः दमेकरी...
हातून कुठलंच काम नाही व्हायचं..
आभाळ दाटून आलं की वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अशी अवस्था व्हायची..
सासरे किरकिरे होते..
बायकोच्या सततच्या आजारपणामुळं किरकिरे बनले होते..
निमाचा नवरा,भगवान एकुलता एक होता..
अति लाडात वाढल्यामुळं वाया गेल्यात जमा होता..
कसाबसा दहावीपर्यंत ढकलगाडी करत शिकला,पण गाडी जी अडली ती काही दहावीच्या पुढं सरकलीच नाही..
शेवटी नाद सोडून दिला..
रिकामं हिंडणं, मित्र जमवून चकाट्या पिटत राहणं मनापासून आवडायचं..
तंबाखूचा तोबरा भरून लाळ गाळत बोलायला लागला की त्याचे बाबा खूप चिडायचे..
पण असुद्याहो..बाकी पोरांसारखं दारू पिऊन धिंगाणा तर नाहीए ना करत?..असं म्हणत आई त्याला पाठीशी घालायची..
लग्नाचं वय टळायला लागलं तरी काही कमवावं, बापाला हातभार लावावा असं काही त्याला वाटत नव्हतं..
पोरगा काहीच करत नाही म्हणून कुणी मुलगी देईना..
जवळच सोयाबीन फॅक्टरी सुरू झाली आणि भगवानची लॉटरी लागली..
त्याचे दोन तीन रिकामटेकडे मित्र आणि तो अशा सर्वाना तिथं काम मिळालं..
भगवानला आणि त्याच्या आईला जणू आभाळच ठेंगणं झालं..
निमाचं स्थळ कुणीतरी सुचवलं..
आईबापाची चौथी,नकोशी असलेली निमा ओझंच होती..
परिस्थितीनं समजूतदारपणा अंगीच होता तिच्या..
दहावीनंतर खरं तर तिला पुढं शिकायचं होतं, पण..
हा पण तिला घरात राहण्यासाठी पुरेसा होता..
भगवानच्या स्वभावाची किंवा घरच्यांची कोणतीच चौकशी न करता खपवायची म्हणून पटकन ऊजवून टाकून तिचे आईबाप मोकळे झाले..
आपला नवरा नोकरदार आहे याचाच निमाला खूप आनंद झाला होता..
आणि त्या आनंदातच मोरपिशी स्वप्न रंगवत ती या घरात आली होती..
काम तर तिथंही करावं लागतं होतं..
नकोशी तिथंही होतीच..
फरक काय होता?..
तिथं ती मुलगी होती,इथं सून होती..
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं कामाचं जू तिच्या खांद्यावर रहायचं..
तिथं निदान आई खायला प्यायला तरी मायेनं विचारायची..
इथं सगळा आनंदच..
भगवान सकाळी डबा उचलून चालायला लागायचा ते संध्याकाळी यायचा..
चहा घ्यायचा आणि मित्रांसोबत बाहेरच रमायचा..
रात्री उशिरा उगवायचा,हवं तसं सुख ओरबाडायचा..
निमाच्या मनाची त्यालासुद्धा काही पर्वा नव्हती..
पावसाळा सुरू झाला आणि मागच्या खोलीची खचलेली भिंत पडली..
झालं..सासूला निमित्तच मिळालं..
पडलेल्या भिंतीचं खापर निमावरच फोडलं ..
निमाला खूप राग आला त्या गोष्टीचा..
नवरा आल्यावर ही गोष्ट त्याच्या कानावर घातली,तर कामावरून आल्या आल्या काय कटकट म्हणून त्यानं हिच्याच कानाखाली वाजवली..
सुनेला मार बसला,सासूला आनंद झाला..
तिचं तोंड आणखीनच सुटलं..
दुष्काळात तेरावा महिना ...
तसं निमाचं नशीब..
पुढच्याच आठवड्यात भगवानला कामावरून काढून टाकलं..
सोयाबीनची आवक कमी झाल्यामुळे कामगार कपात केली,त्यात याचा नंबर लागला..
निमाचा पायगगूणच खराब हे सासूनं मुलाच्या मनात ठसवलं..
आधीच नोकरी गेली,त्यात खाणारं तोंड वाढलं..या सगळ्यात भर आईचं चिथावणीखोर बोलणं..
भगवान सगळा राग निमावर काढू लागला..
दररोज सकाळी उठून तो दुसरी नोकरी शोधायला म्हणून बाहेर पडायचा..
दिवसभर बाहेर रहायचा..
घरी आला की आई विचारायची,'मिळालं का काम?..'
नाही उत्तर आलं की निमा कशी कारणीभूत आहे याचे पाढे वाचणं सुरू करायची..
निमा काही बोलायला गेली की भगवान तिला हातात दिसेल ती वस्तू फेकून मारायचा आणि तोंड काळं कर म्हणायचा..
..... ...... ..... ....… ......
आजही तसंच घडलं..
संध्याकाळी भगवान घरी आला..
सासरे बाहेरगावी गेले होते..
सासू त्याला बघून लगेच उठून आली..
'का रे बाबू!..मिळालं का कुठं काम?..'
मानेनंच नाही म्हणत तो तसाच बसला..
निमा चहा घेऊन बाहेर आली..
तिला बघताच सासूच्या तळपायाची आग मस्तकात गेली..
'अरे,ही, ही अवलक्षणी आलीय घरात,तेव्हापासूनच पीडा लागलीय मागं..
हिचं अपेशी तोंड बघून जातोस म्हणूनच तुझं काम होईना..
हिच्या बापानं खपवली..आपल्या गळ्यात मारली..
आली की आजेसासुला गिळलं..
घराची दुर्दशा केली..
तुझी नोकरी घालवली..'
'अहो आई, काय बोलताय?..
मला का कारणीभूत धरता?..'
'बघ,बघ कशी उलट उत्तर करतेय..
माजलीय फुकटचं खाऊन!..'
असं म्हणतात भगवानचं डोकं फिरलं..
कोपऱ्यात असलेली धुणं वाळत घालायची काठी त्यानं उचलली आणि तिरमिरीने धावला निमाला मारायला..
डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच...
तोच निमानं त्याचा वार हुकवला आणि विजेच्या चपळाईने भगवानचा हात पकडून पिरगाळला...
या अनपेक्षित चढाईमुळं तो थोडा ढिला पडला...
निमानं काठी हिसकावून घेतली आणि.....
आणि...
तिनं भगवानला एका हातानं रेटत कोपऱ्यात नेलं आणि चांगलं धुवून काढलं..
त्याला प्रतिहल्ला करण्याची अजिबात संधी नाही दिली..
'मी अवलक्षणी काय?..
स्वतःच अपयश लपवण्यासाठी मला बळीचा बकरा बनवता?..
किती दिवस मार खाऊ?..
आता अंगावर हातच टाकून बघा..
हातच तोडून टाकीन..'
तिचं हे चंडिकेचं रूप बघून तिची सासू घाबरून बाजेवर जाऊन गोधडीत लपली..
मन शांत झाल्यावर तिनं काठी टाकून दिली..
शांतपणे घरात गेली..
स्वतःसाठी चहा कपात ओतून घेतला आणि तिथंच बसून पिऊ लागली..
भगवान अवाक झाला होता..बायकोचं हे नवं रूप बघून..
निमाला सुद्धा आज स्वतःची ओळख झाली होती..
©® सौ.सुतेजा फडके, वाशीम
सदर लेख लेखिका सौ. सुतेजा फडके यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल साभार
