का राजाचा श्वास कोंडला ???


का राजाचा श्वास कोंडला ??
©® सुनिता चौधरी




प्रिय बायको!
'आजच्या जमान्यात असं पत्र, आणि ते ही एका अशा नव-याने लिहावं ज्याने आपल्या बायकोला सोडून पाच महिने होत आलेत हे जरा हास्यास्पदच आहे नाही का? वरतून हे असं प्रिय चं लेबल चिटकवल्यामुळे तर वाचताना तुझी फारच गफलत होणार हे मला माहीतच आहे. पण तरी आज सगळं मन मोकळं करणार आहे मी हे अगदी ठरवूनच लिहायला बसलोय'.

हो हो हो मला माहीत आहे की आता तुझ्या मनात आलं असेल की, आज तुझ्या नव-याने दोन पेग जास्त मारले असावेत पण विश्वास कर आज मी पूर्ण शुध्दीत आहे आणि मला मी काय करत आहे ह्याचं भानही पूर्णपणे आहे.

"आज मन अगदी भरुन आलंय ग्" ...
आणि कीती लिहू अन् कीती तुला मनातलं सांगू असं झालंय म्हणून आज माझ्या ह्या लिखाणांच्या चुकांकडे थोडं दुर्लक्ष करत माझं मन समजून घेण्याचा प्रयत्न कर.
मी आज तुला फोन ही केला होता माझ्या नवीन नंबर ने, पण का कुणास ठाऊक बोलायची हिम्मतच झाली नाही म्हणून फक्त तुझा आवाज ऎकून मी फोन ठेऊन दिला आणि आता तूला हे पत्र लिहायला बसलोय.



'चौदा वर्षापूर्वी जेंव्हा आपली मैत्री झाली आणि नंतर प्रेम झालं होतं तेंव्हा तू मला खुप मोठाली पत्र लिहायचीस पण उत्तरादाखल मला जास्त काही लिहीताच यायचं नाही म्हणून अगदी साधंसच तोडकं - मोडकं मी काहीतरी लिहायचो. त्या पत्रांमधे तू अगदी स्वतः चं मन ओतायचीस. पत्र वाचताना अगदी सगळं चित्र उभं रहायचं आणि दिवसेंदिवस आपलं प्रेम अगदी घट्ट व्हायचं. त्यावेळी साध्या - सुध्या गोष्टींनाही आपण कीती अलगद समजून घ्यायचो ना'? .....

रूसत ,फुगत ,भांडत आपलं नातं परिपक्व होत गेलं आणि समाजाशी बंड करून आपण लग्न केलं. खरंतर त्यावेळी हातात काही नसतानाही सगळं कसं सोपं वाटायचं. परिस्थितीला मात देत,आपलेही चांगले दिवस येतील म्हणून आपण उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायचो. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद काय असतो हे त्याचवेळेस समजलं होतं.


हळूहळू आपले बरे दिवस यायला लागले. तू घराला घरपण दिलस आणि आपल्या नाराज लोकांना आपलसं केलस. कष्टातले दिवसही तू अगदी हसत खेळत जगायचीस. माझी सगळ्यात मोठी ताकद बनून तू माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभी राहिलीस आणि म्हणूनच मी प्रत्येक कामात यशस्वी होत गेलो. चांगल्या वाईट दिवसात दिवस असाच निघून जात होता आणि एक दिवस तू अगदी लाजत मला मिठी मारत तूझी पाळी चुकल्याची बातमी दिलीस. मला तर त्यावेळी आकाश ठेंगणं झालं होतं आणि आता आपण बापमाणूस झालोय अशी फिलिंग आली होती.
आयुष्याच्या अशा मोठ्या क्षणातही कामाच्या व्यापात मी तुझ्यासोबत तुझे नऊ महीने नऊ दिवस जगू शकलो नाही. खुप वाटायचं ग् की ,तुला स्वतः च्या हाताने काहीतरी बनवून खाऊ घालावं. तुझे लाड पुरवावे पण सगळंकाही तिथल्या तिथेच राहिलं आणि मी भौतीक सुखं गोळा करण्यात गुंगून गेलो.
कोणाचीही मदत न घेता तू तुझं सगळंकाही करत गेलीस आणि एका गोड मुलीला जन्म दिलास. एकटीने लेकीला सांभळत बाहेरची कामं करून घर सांभाळलस तू ...पण कधी कुठल्या गोष्टीचा त्रागा केला नाहीस की कधी मला बोल लावले नाहीस.

दिवस बदलत गेले आणि मी आता माझ्या मस्तीत जगत राहीलो जसा पैसा येत गेला तसा मी फक्त तुला पैसा पुरवत गेलो आणि स्वतः च्या धुंदीत जगत राहिलो. माझं बाहेर राहणं वाढत गेलं, पार्ट्या वाढत गेल्या आणि मी हवं तसं वागायला लागलो.
मला बंधनं तर कुठली नव्हतीच कारण मुलीचा सांभाळ करणं आणि घर बघणं हे तर बायकांचच काम आहे हे तोपर्यंत डोक्यात शिरलं होतं आणि तुमच्यासाठी मी पैसा कमवून देऊन तुमच्या सगळ्या गोष्टी पुरवतोय म्हणजे माझी जबाबदारी संपली असंच वाटत होतं आणि माझ्याशिवाय तुमचं कोणी नाही किंवा मी काही दिल्याशिवाय तुम्ही आयुष्य जगू शकत नाही असा माजही माझ्यात आला होता.

मग काय ! त्या डोक्यातल्या माजाने कधी एकदा तोंडातून गरळ ओकायला सुरूवात केली कळालच नाही. "विनाशकाले विपरीत बुध्दी" म्हणत भांडणाचा 'श्रि गणेशा' झाला आणि मी माझ्यातला पुरूषी अहंकार जोरदार दाखवायला सुरूवात केली. कधीकाळी जिच्यावर साधं आवाज वाढवून बोलायची इच्छा झाली नव्हती तीला मी आज तुच्छ लेखत तुडवत होतो.
कीती सहन केलस ग् तू? ......कशासाठी मला सहन केलस?



अग् ! घर आणि नाती टिकवायला तू तुझा स्वाभिमानही बाजूला ठेवलास आणि स्वतः ला छळत राहिलीस. .....अशी ग् कशी आहेस तू? ...
आम्हा पुरूषांना फक्त घर घेण्याचं कळतं आणि तुम्हा बायकांना त्या घराचं सोनं करता येतं. स्वतः कडे लक्ष न देता तू फक्त माझ्यासाठी आणि मुलीसाठी राबत राहिलीस आणि माझ्या घरच्यांनाही सांभाळत आलीस.
तुला कामंच काय असतं? मजेत तर असतेस तू ! सगळं तर तुला पुरवतो मी?... असं म्हणत तुझ्या मनातलं दु: ख मला कधी दिसलच नाही. इतरांशी तुझी तुलना करताना तुझ्यातली गुणं मी सोईनुसार डोळ्याआड घातली.

जेंव्हा थकून घरी यायचो तेंव्हा तू स्वागताला असायचीस आणि जेंव्हा मला अडचणी आल्या तेंव्हा तू माझी हिंमत बनून राहिलीस.
मी चुकतोय हे ही मोठ्या प्रेमाने कितीतरी वेळा तू मला समजावून सांगत होतीस आणि मी मात्र तुझं हे प्रेम मूर्खपणात गणायचो. तरी तू आपल्या नात्यासाठी तुझे पाय घट्ट रोवून होतीस आणि यालाच मी तूझी लाचारी समजू लागलो.
आभासी दुनियेची मला चटक लागली होती आणि त्यापुढे तुझ्यासारखी बायको मला खुपच आऊटडेटेड वाटत होती.
एकेकाळी आपल्या प्रेमासाठी घरदार सोडून आलेली तूझी मला आता लाज वाटू लागली होती.
तू सगळं सहन केलस पण शेवटी मी सापाच्या शेपटीवर पाय द्यावा असा तुला पाय दिला अन् तू चवताळून उठलीस. जोपर्यंत अन्याय तुझ्यावर होत होता तू सहन केलस पण तेच तुझ्या (माझ्या?) लेकीवर येताच तू लक्ष्मी ची दुर्गा कधी झालीस हे मला कळालच नाही.

"मला नको रे काही.......निदान आपल्या लेकीला तरी बघ"! ..... ह्या तुझ्या आर्त विनवणींना मी नाटकं समजत होतो.
लेकीसोबत तर कधी तिचे प्राॅब्लेम मी शेअर नाही केले एक बाप म्हणूनही कधी तिला वेळ दिला नाही. आणि हेच तुला सहन नाही झालं. एक पती म्हणून नाही तर निदान एक पिता म्हणून तरी मी रहावं हीच तुझी माफक अपेक्षा होती पण तीही मी पूर्ण नाही करू शकलो.

'माझ्या वागण्याचा परिणाम लेकीच्या भविष्यावर बेतू लागला अन् मग तू शेवटी निर्णय घेतलासच मला सोडून जायचा'....... "नाही - नाही मी तुला दोष देतच नाहीये तु जो निर्णय घेतला होतास तो आपल्या लेकीसाठी गरजेचाच होता.

एक आई म्हणून तू नेहमीच परिपूर्ण आहेस म्हणूनच तर तुझी ती शेवटची वाक्यं माझ्या मनात आत्ता खोलवर रूतत चालली आहेत".
"हे बघ! मला असं अजिबात वाटत नाही की आपल्या लेकीने तिच्या बापाकडे तुच्छतेनं बघावं, किंवा तुझा तिरस्कार करावा तिला अजून समज नाही पण ती सगळं बघतीये आणि तिच्या बालमनावर याचे परिणामही होताएत, जे मला नकोय. आता अजून उशिर करण्यात काहीच अर्थ नाही तुला आजपर्यंत समजावूनही तुझं वागणं आहे तसच आहे तर मग मला आता माझ्या लेकीच्या भविष्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील जे मी आत्ता घेतीये. तू स्वतः च्या आभासी दुनियेतून बाहेर पडत नाहीयेस याची बोच मला शेवटपर्यंत राहील. मला आता तुझं काहीही नकोय. मी माझ्या लेकीसाठी सगळंकाही करण्यास सक्षम आहे. फक्त वाईट याचंच वाटतंय की, समाजातल्या ज्या चार लोकांना झुगारून आपण आपला संसार थाटला होता आता त्याच चार लोकांच्यापुढे तुला तुझी प्रतिष्ठा प्रिय झालेली आहे".."काळजी घे स्वत:ची" ! असं म्हणत तू लेकीला घेऊन निघून गेलीस आणि ते ही घरातलं काहीही न नेता मला काहीही न मागता. तुझा निर्णय एकदम ठाम होता आणि म्हणूनच तू एकदाही मागे वळून पाहिलं नाहीस ....

"कीती ग् भरभरून लिहितोय ना मी"?हात दुखून आलाय बघ आता ... पण तरीही मी आज लिहायचं थांबवणार नाहीये .......

बायको! अग् तू आपला दहा वर्षाचा संसार सोडून गेलीस तेही मागे न बघता ! तू सोबत असेपर्यंत जे काही घडलं ते मांडायचा मी प्रयत्न केलाय खरंतर जे तुला माहित आहे तेच मी माझ्या शब्दात पुन्हा सांगण्याचा मूर्खपणाच करतोय हे मलाही माहीत आहे आणि तरीही तू हे सगळं अगदी मन लाऊन वाचशील याची खात्री आहे मला.

त्यादिवशी तू निघून गेलीस आणि घर एकदम मोकळं झालं होतं.
आणि मग !.....
"खरं सांगू का त्यादिवशी एकदम मोकळं - मोकळं वाटत होतं.....वाटलं की, चला रोजची कटकट गेली. आपण सगळं काही मॅनेज करू शकतो असा जणू तर्कच बांधला होता मी". त्या रात्री मी जाम प्यायलो आणि झोपायला गेलो तर नेहमीप्रमाणे पिल्लूला बेडवर शोधत हात फिरवत होतो आणि मग लक्षात आला माझा खरा मोकळेपणा. पण ते सगळं तेवढयापुरतंच ठेऊन मी झोपी गेलो. सकाळी सगळी कामं आवरली आणि मस्त बाहेर खाऊन आ‌ॅफिस केलं, रोजच्या गप्पा - टप्पा आणि पार्टी पण केली. आता कोण विचारणारं आहे मला असं म्हणत स्वतःशीच हसलो. घरी पोचलो आणि सवयीप्रमाणे तुझे बोल कानात नकळत घुमले ....
"अहो काय हे किती वेळ वगैरे वगैरे".........पण नंतर मी परत झोपलो आणि दुसराही दिवस असाच गेला.
नंतर सगळ्या कामाला बाई लावली आणि मी नशेत झिंगू लागलो. पार्टया करत आभासी दुनियेत जगू लागलो. नविन लोकांना भेटू लागलो अन् कसं एकदम भारी वाटायचं.



आठवण पण यायची ग् तुझी आणि पिल्लूची , पण माझा इगो मात्र मला झुकू देत नव्हता. आपण सगळं मॅनेज करू शकतो आपल्यामुळेच तर आहे हे घर ! तुला गरज आहे तर तू परत येशील माझी माफी मागत असं वाटायचं मला.
पण आता हे घर खरच घर राहिलयं का ! फक्त खोल्या उरल्या आहेत ? याचं गणितच लागत नव्हतं बघ.

महिने उलटत होते अन् बघता - बघता पाच महिने होत आले आतातर. इतके दिवस ना घरचं जेवण मिळालं ना घरची माणसं .....तू गेलीस अन् बाकीचेही मला वळून बघेना झाले. तूच तर बांधून ठेवलं होतस सगळ्यांना हे ही त्यावेळीच समजलं ....

हळूहळू एवढं सगळं असूनही सारखी कशाचीतरी कमतरता भासायची .आता तर दारू पिऊन घरी आल्यावर वाटायचं की, तु समोर असावीस आणि मला खुप ओरडावीस. पिल्लू ने, .... मी येताच मिठी मारावी अन् पापे द्यावे. कधीकाळी तीची आणि तुझी बडबड मला कटकट वाटत होती पण तीच बडबड मला आता हवीहवीशी वाटत होती.

अन् 'परवा रात्री झोपलो आणि अचानक किश्याचा माझ्या मित्राचा फोन आला की, त्याच्या बायकोला हार्ट अटॅक आला आहे. मी हाॅस्पीटलला पोहोचलो तेंव्हा आय सी यू च्या बाहेर किश्या हमसाहमशी रडत होता त्याची बायको आता या जगात राहिली नव्हती'. त्याने हाॅस्पीटल डोक्यावर घेतलं होतं आणि म्हणत होता.

"आता कोणासाठी करू ग् सगळं, कोणासाठी राबू मी? दमून भागून घरी आल्यावर हक्काने विचारणारं माणूसच नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ असतो का? ... बायको शिवाय घर हे खरंच घर तरी राहिल का ग् आता? असं म्हणताना किश्या जोरजोरात ऊर बडवत रडत होता" .....



आणि त्याचवेळी लख्ख प्रकाश पडल्यासारखं मी आतून-बाहेरून हादरलो, खरं तर बिथरलो होतो मी.....आणि नकळत मनात काहीतरी खोलवर रुतल्यासारखं झालं आणि मला खुप रडायला आलं म्हणून मी तडक घरी आलो...

अजून उजाडायचं होतं. हवेत गारवाही होता म्हणून तु विणलेला स्वेटर अंगात घातला आणि खुप ऊब मिळाली.

खुप वेळचं हाॅलमधे बसून मी आपले गेलेले सगळे दिवस आठवत होतो आणि स्वतःचीच लाज वाटली. उठून बेडरूममधे गेलो तर सगळ्या भिंती आपल्या पिल्ल्याने चित्र काढून रंगवल्या होत्या, कधीकाळी तीचं हे असं करणं म्हणजे भिंत घाण करणं वाटत होतं पण आज ते पहिल्यांदाच निरखून पाहिलं तर त्या चित्रांएवढं सुंदर काही वाटतंच नव्हतं. मी त्या चित्रांवरून खुप वेळचा हात फिरवत होतो आणि क्षणभर असं वाटलं की, पिल्लू पाठीवर बसून मला पापे देतेय...... मगाशी काहीतरी जे खोलवर रुतलं होतं ते आता मला घायाळ करत होतं.
आणि तेवढयात माझी नजर तुझ्या ड्रेसींग टेबलावर गेली तिथे एक डायरी होती त्यात तू सगळा खर्च मांडला होतास. सिलेंडर पासून ते तुझ्या पाळीची तारीखही त्यात तू लिहिली होतीस. सगळ्या औषधांच्या चिठ्ठ्या तू जपून ठेवल्या होत्यास. मला कुठल्या गोष्टींची अॅलर्जी आहे त्याचीही तू नोंद केली होतीस. सणवार, वाढदिवस आणि नातेवाईकांची सगळी माहिती तुझ्याकडे होती आणि मी समजत होतो की, घर फक्त माझ्यामुळेच चालतं .....



या छोट्या गोष्टीही कीती महत्त्वाच्या असतात हे आम्हा पुरूषांच्या ध्यानीही नसतं बघ ....मला तुझ्या ह्या गोष्टी कधी समजल्याच नाही ग् ......कीती छोट्या अन् बारीकसारीक गोष्टी तू जपत होतीस.

मला आता आठवत होतं तुझं ते रात्र-रात्रभर आमच्यासाठी जागणं, माझं दुखणं - खुपणं सहन करत स्वतः चं दु:ख लपवणं.
"जेवढं दु:ख तुम्ही बायका सोसता ना...... तेवढं दु:ख तर आम्हा पुरूषांना पेलवतही नाही ग् "...हे आज मी स्वतः अनुभवतोय ....
थोड्यावेळाने किचन मधे गेलो,..... म्हंटलं चहा करावा म्हणून डबे उघडत होतो तर त्यात सामानाच्या आत मला , पैसे ठेवलेले दिसले, अजून एक दोन डब्यात पण तसंच होतं आता तर खुपच रडायला आलं होतं, कारण मी एवढं कमावत असूनही तुझी काटकसरची सवय जराही गेली नव्हती.
बॅकेत एवढा बॅक बॅलन्स असूनही तू अशा शंभर -दोनशे रूपयांना सामनांच्या डब्यात साठवून ठेवत होतीस. आतातर मला तिकडे उभंही रहावेना म्हणून मी परत हाॅल मधे आलो.
घरभर नजर टाकली तर घरातल्या त्या प्रत्येक वस्तूत मला तुझंच अस्तित्व दिसत होतं.

"मी .... मीच केलय हे सगळं!" ....असं म्हणत असताना मला तर आता घरातल्या कोणत्याच गोष्टींवर स्वतः च असं काही जाणवतच नव्हतं". जे केलंस ते तू स्वतःच्या प्रेमाने उभं केलंस ग् बायको! हे मला आता समजून चूकलं होतं. आता मात्र चांगलंच उजाडलं होतं आणि माझ्या डोक्यातही चांगला प्रकाश पडला होता. "घर दोघांचं असतं ते दोघांनी सांभाळायचं असतं, एकानं पसरवलं तरी दुस-यानं ते आवरायचं असतं"... ही कुठेतरी वाचलेली वाक्यं आता खरी ठरत होती.
गॅलरीत तू लावलेली झाडंही आता रोज पाणी देऊनही सुकत चालली आहेत कारण त्यांनाही मायेचा स्पर्श कळतोय आणि तू नसल्याचं दु:ख त्यांनाही बोचतय.



बायको! मी खुप चुकलोय...
मला माफ कर, यापुढे मी आता आपलं घर आणि आपलं नातं टिकवायचा खरच प्रयत्न करेन. मला माझं, हक्काचं माणूस हवय ग् !...जे मला माझ्या चुका दाखवून देऊन मला ओरडेल, झापेल अन् प्रसंगी प्रेमाने समजावेल.....
मला आपलं ते प्रेम टिकवायचं आहे ज्या प्रेमासाठी तू सगळं सोडून माझ्याजवळ आली होतीस. मला एक चांगला पिता बनायचं आहे जो लेकीचा खरा हिरो असेल. मला एक परिपक्व माणूस बनायचंय ग् बायको ! जो तुझ्याशिवाय अपूर्ण आहे.

नको असलेल्या ह्या मोकळेपणात आता माझा श्वास कोंडतोय ग् ! माझ्या मनाचा खुप कोंडमारा होतोय . असं वाटतंय की, मोकळं असूनही माझ्या घशाचा कोणीतरी घोट घेतोय आणि मी तडफडत चाललोय . नकोय ! मला आता, असा श्र्वास गुदमरवणारा मोकळेपणा ...

आभासी दुनीयेतली माणसं ही आभासीच असतात, झोपेतून जागं व्हावं आणि बघत असलेलं स्वप्न मोडावं इतकाच त्यांचा आणि आपला संबंध असतो म्हणून आपलं हक्कांचं माणूस कधीच गमवायचा नसतो हे मला आता उदाहरणांसहीत पटलंय आणि म्हणूनच मला आपल्या नात्याच्या गोड बंधनातच रहायचंय ...

आपल्या नात्यासाठी मला शेवटची एक संधी दे . मला आता परत माणूस म्हणूनच जगायचं आहे. मला तूझी ती ओंजळ हवी आहे जी चंद्रशेखर गोखल्यांच्या चारोळीत आहे.

"सर्व काही तुला देऊन, माझी ओंजळ भरलेली , पाहिले तर तुझी ओंजळ, माझ्या ओंजळीत धरलेली" ...



तुझ्या ओंजळीनं मला माझी ओंजळ सतत भरलेली हवी आहे.

बायको! परत ये ग् तू ! मला माफ कर अन् परत ये ! आता पत्र लिहिणं थांबवतोय आणि तुझी मनापासून आतूरतेने वाट बघतोय.

तुझ्यावर भरपुर प्रेम करणारा तुझाच, नवरा ........

#समाप्त....

©Sunita Choudhari.







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने