गुपित


गुपित 

©® सौ. अश्‍विनी दप्तरदार-टेंबे

‘अरे राहूल सांग ना रे... काय झालय, किती भाव खाशील... मी नाही सांगणार तुझं गुपित कुणाला.‘ इती आशा.

‘अग हो तुझ्याशिवाय कुणाला सांगणार, आफ्टरऑल यू आर माय बेस्ट फ्रेन्ड ना. हे बघ काहीही असलं तरी तुला सांगितल्याशिवाय मी मरणार देखील नाही... हा हा हा...‘ नेहमीप्रमाणे मोठमोठ्यानं हसून राहूल निघून गेला. 

मग आशाने तडक कल्याणीचं घर गाठलं. 

दारात चपला काढतच... ‘अग... कल्लू मला ना राहुलच काही कळत नाही बाई, त्याच्या मनात काहीतरी चाललय. पण तो सांगतच नाही, असं कधी करत नाही तो..... पण डॅम शुअर त्याचं काहीतरी बिनसलय.... तो मला टाळतोय असं वाटतय....‘ आशाने मनातली राहूल बाबतची काळजी कल्यणीजवळ व्यक्त केली. 

तसा राहूल आशाचा खूप चांगला मित्र. 

कॉलेजच्या अगदी पहिल्या वर्षापासून. कॉलेजची यूथ फेस्टिव्हल्सदेखील त्यांच्या ग्रुपने गाजवली.
त्याचं आशाच्या घरीही येणं जाणं असायच. मितभाषी असला तरी गमत्या होता. खूप हसवायचा. 

इतरही तिचे मित्र होते पण हा थोडा वेगळाच. मुलींच्या बाबतीत विचार केला तर त्यंच्यासमोर शायनिंग मारणारा. त्यातच नेहाकडे थोडं झुकतं माप असणारा. तिच्याबद्दल आशाशी खूप मनमोकळं बोलणारा. 

अरे मग तिला विचार तरी, असं आशाने म्हटल्यावर अग, माझ्या मनात जी आहे ती नक्कीच चारचौघींसारखी नाही, असं म्हणून तुला मात्र वेळ आल्यावर नक्कीच सांगेन.... असं म्हणणारा राहूल. तो अलीकडे आशाला टाळत होता. 

कल्याणीच्या हातातून पार्णंयचा ग्लास पडला तशी आशा एकदम आपल्या विचारातून भानावर आली.  
कल्याणीने कपातला उरलेला चहा संपवला आणि म्हणाली, ‘अग आशे राहुल घरी आला की नीट थंड डोक्याने विचार ना त्याला. तो नक्कीच सांगेल बघ. तुझ्याशिवाय त्याला तरी चांगली मैत्रीण कोण आहे. ?‘

‘अरे हो... ते आहेेच. बर चल बाय, उद्या भेटू नक्की. अग आता जाते.‘ असं म्हणत आशा तिथून उठली आणि घरी आलीे. 

जेवायला सगळेच तिची वाट पाहात होते. 

दोन भावांची धाकटी बहिण म्हणून लाडात वाढलेली. बाबांच्या खास मर्जीतली. 

पण म्हणून उद्धट किंवा उर्मट नाही बर का. 

परिस्थितीशी जुळवून घेवून घरात, बाहेर, मैत्रिणी, नातेवाईक सर्वांशीच आपुलकीने वागणारी आशा. तिला भेटलेला राहूल असो, वा कल्याणी अगदी तिच्यासारखेच. त्यामुळेच त्यांचे अधिक पटत असावे.
 
आज मात्र राहूलच्या विचाराने तिला काही झोप लागेना. तिच्याबरोबरच तिच्याच वर्गात शिकणारा, तिच्या घरात कायम येवून जावून असणारा राहूल. काय झाले असेल त्याला.

वडिलांकरीता त्याने काही काळ कॉलेजचे शिक्षण सोडले होते. आणि तो नोकरी करत होता. पण शिक्षण पूर्ण करण्यासाठीच तो आला होता. त्याची नोकरी पुण्यात. आणि कॉलेज सांगलीत. 
पण आठवड्यातून दोन दिवस तो असायचा कॉलेजमध्ये. 

खूपदा तिच्या घरी यायचा. आशाचे बाबा, आई, दोन्ही भाउ सार्‍यांशीच त्याची चांगली गट्टी होती. त्यांच्या गप्पा नेहमीच रंगायच्या मग त्यला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. 

बर्‍याचदा त्यातही नेहाबद्दलच तो अधिक बोलायचा. 

पण आशाने कधीही त्याला अरे एवढं तिच्याबद्दल बोलतोस मग विचार ना तिला असं म्हटल्यावर तो म्हणायचा, ‘अग ती आवडती म्हणजे एक मैत्रिण म्हणून शिवाय आपल्या लहान भावासाठी वडिलांच्यानंतर तिच तर उभी आहे. एवढ करुन शिक्षणही पूर्ण करतेय. यासाठी मला तिचा खूप आदर वाटतो. माझी ती नक्की कोण हे तुला नक्कीच सांगणार त्याशिवाय मरणार नाही.......‘ हसत हसत हेच शब्द तो  पुन्हा पुन्हा उच्चारत असतो. 

जाउ दे काय करतो ते करु दे. आता आशाने हज्जारदा त्याला सांगितलं पण...असो, आशा विचारात गढून गेलेली असतानाच झोपेने तिला कवेत घेतले. 
  
‘आशा ए आशा... अग ये की लवकर, उशीर होतोय. तुझं रोजचच आहे, कधीही वेळेवर आवरत नाहीस, आणि आम्ही लवकर उठून वेळेवर आवरुन इथे येवून अर्धा तास काढतो... शी बाई... आवर‘, केतकी ओरडतच घरात आली. 

आशामुळे कॉलेजला जायला रोजच उशिर व्हायचा हेदेखील खरेच आहे. 

आणि तिचा हा ओरडा पण रोज खायला लागायचा, पण पठ्ठी कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आशाला सोडून मात्र कधीच गेली नाही.

12 जणींचा हा कॉलेजचा ग्रुप. सायकलीवरुन पुरतं सांगली मिरज पालथं घातलं. 

अभ्यासातही बर्‍यापैकी होतो. नाही असं नाही पण कॉलेजला दांडी मारण्यात आणि कॅन्टीनमध्ये खाण्यात या ग्रुपने अनेक तास घालवले आहेत. 

ही नेहा पण याच ग्रुपमधली. स्मार्ट, बर्‍यापैकी राहणीमान असणारी. पण घरचं वातावरण खूपच कडक. 

तसं आशाच्या सर्वच मैत्रिणींच्या घरचं वातावरण तापलेलंच. त्यात मुलांचा विषय म्हणजे, घरातल्या कुणा भल्या माणसाचा उद्रेक होवू नये म्हणून कॉलेज संपलं की आमचा 12 जणींचा अड्डा आशाच्या घरीच जमायचा. 

घर कसं भरलेलं वाटायचं. खूप दंगा करायच्यो. घराच्या पायरीवरच बसून हं. सरांच्या नकला, वर्गात असणार्‍या मुलांच्या नकला. बाप रे धम्माल....


खूपदा राहूलही यात असायचा. खूप हसवणारा, कधीतरी एकदमच काहीतरी तत्वज्ञान सांगून जाणारा... असं हे व्यक्तिमत्व इतक्या गंभीरपणे कुणाचाही कसा विचार करु शकतं,ं याचं तिला नवलही वाटायचं आणि काळजीही. 

ही काळजी मनात ठेवूनच कॉलेज संपलं. सगळेच आपापल्या उद्योगाला लागले. 

मुलींची लग्नही झाली, मुलं आपापल्या नोकरीत, काही व्यसायात रमली. हळूहळू आठवणीदेखील पडद्याआड जावू लागल्या. 

आशालाही चांगलं घर मिळालं. सारी हौसमौज पूर्ण करणारा देखणा नवरा मिळाला. अर्थात लव्ह मॅरेज असलं तरी दोन्हीकडून अ‍ॅरेंज करण्यात आल होतं.

आशाने लग्नाची पत्रिका पाठवूनही लग्नाला राहूल आला नव्हता. तेवढ्यापुरती तिला हूरहूर वाटली पण नव्या घरात, संसारात, नव्या माणसात आशा रमली.
 
कधीतरी मैत्रिणींचे फोन असायचे. 

राहूल आशाच्या बाबांना फोन करायचा. त्यामुळे त्याची खुशाली कळायची. पुढे पुढे तेही बंद झाले.

एक दिवस आशा माहेरपणाला आली. माहेरच्या सुखाच्या छान मउशार दुलईतुन उठावेंसे वाटत नव्हते, तोच कल्याणीचा फोन आला. ‘अग आशे उठ, पहाटे राहुलला मोठा अपघात झालाय...त्याला बुरांडे हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट केलय. आयसीयू त आहे. 

‘ बाप रे... आशा कशीतरी उठून बाहेर आलीे.  आशाच कशातच लक्ष लागेना. कसंतरी आावरलं आणि हॉस्पीटलला गेली. 

आयसीयूच्या छोट्या खिडकीतून राहुलला पाहिलं.

तो मुळचा कोकणातला. इथे रुमवर रहायचा. त्याचे पालक येईपर्यंत त्याचे दोन मित्र , आशा आणि कल्याणी यांना हॉस्पीटलमध्ये थांबणं भाग होतं. 

दुसर्‍या दिवशी आई वडिल येण्यापूर्वीच राहुल गेला कायमचाच. त्याचे नातेवाईक आल्यानंतर सारे सोपस्कार झाले आणि त्याचे साहित्य त्याच्या पालकांकडे सोपवण्यासाठी आम्ही साहित्य घ्यायला त्याच्या रुमवर गेलो. त्याचं सारं साहित्य पँक  केलं.

फक्त कपातला ड्रॉवर तपासायचा राहिला होता. तो उघडला आणि तिथे त्याची  डायरी दिसली. त्याची शेवटची आठवण म्हणून आशाने कुणाच्याही नकळत ती डायरी स्वत:जवळ ठेवली. 

काळ जात होता. अशाच एका संध्याकाळी एकटी असताना तिला राहुलच्या डायरीची आठवण झाली. तिने सहज म्हणून ती वाचायला घेतली. 

हळूहळू एक एक पान उलटताना तिला  त्याच्या मनातलं गुपित उलगडत गेलं. प्रत्येक पानात आशाचं नाव, आशाबद्दलचा एकतरी प्रसंग होताच.

त्यादिवशी नेहाला आज विचार म्हटल्यावर हो म्हणून राहुल जो गेला त्याचे दर्शन चक्क तो गेल्यावर व्हावे.

आशाच्या लग्नाच्या दिवशीही त्याने डायरी लिहिली होती, पण त्यानंतर तब्बल आठ वर्षे ही डायरी कोरीच होती. 

ते शेवटच पान वाचताना आशाचे हात थरथरु लागले. या राहुलच्या मनात, नजरेत दुसरी तिसरी कोणीही नसून चक्क ती मुलगी आशाच होती. 

तो कायम हसत बोलायचा तुला सांगितल्याशिवाय मरणार नाही.... आणि अखेर मरणानंतरच त्याचं गुपित आशाला कळालं. कितीतरी वेळ ती डायरी हातात धरुनच शून्याकडे नजर लावून आशा बसली.


सौ. अश्‍विनी दप्तरदार-टेंबे, कोल्हापूर.

सदर कथा लेखिका सौ. अश्‍विनी दप्तरदार-टेंबे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

 धन्यवाद.!!! 📝 

माझी लेखणी 

फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने