आणि आयुष्यात इंद्रधनुष्य उमटलं..

 आणि आयुष्यात इंद्रधनुष्य उमटलं 


आज ध्रुव तारा या अनाथआश्रमाचा 25 वा वर्धापन सोहळा होता. श्रीमती सुशीलाबाई  जातीने सर्व तयारी पाहत होत्या. आज त्यांनी स्थापन केलेल्या आश्रमाला 25 वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने आश्रमातील महिला व मुलींनी  मिळून सर्व जय्यत तयारी केली होती. आता सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते सन्माननीय अतिथींचे !!

काही क्षणातच आलिशान गाडीतुन त्या सात जणी उतरल्या. सुशीला बाईना त्यांना बघून  अतिशय आनंद झाला. आल्याबरोबर त्यांनी सुशीलाबाईना मनोभावे नमस्कार केला. 

अतिथीवर्ग मंचावर स्थानापन्न झाला.कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुशिलाबाईनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली..आपले मनोगत व्यक्त केले. 

हा आश्रम कधी आणि कसा स्थापन झाला हे सांगितलं आणि सांगता सांगता त्यांना अश्रू अनावर झाले. त्या क्षणार्धात पंचवीस वर्षे मागे गेल्या.

सुशिलाबाई... एका गरीब घरातली सुशील  सुंदर, तीन बहिणीच्या पाठची चौथी मुलगी.. घरात अठरा विश्वे दारिद्र्य.. त्यामुळे चार मुलींची लग्ने कशी करायची या विवंचनेत असणारा बाप.. घरात आज डाळ आहे तर उद्या तांदूळ आहेत अशी परिस्थिती.. अशातच सुशीलाची सुंदरता बघून एक स्थळ चालून आले. आणि बापाने काही न विचारता तिचे लग्न एका बिजवराशी लावून दिले. थोडक्यात तिचा सौदाच केला गेला. लग्नानंतर तरी काही चांगले दिवस दिसतील या आशेने आलेल्या सुशीलेवर लग्नानंतर तर पहाडच कोसळला. 

बिजवर, रागीट नवरा दररोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करायचा. कजाग सासू सासरे दिवसभर स्वतःच्या तालावर नाचायला लावायचे. या सर्व त्रासाला सुशीला कंटाळली होती. त्यातच नवऱ्याला लिव्हरचा कॅन्सर झाला. आणि तो त्यातच वारला. सुशीलेला घरातल्या लोकांनी अक्षरशः बाहेर हाकलले.. केवळ  अर्धा एकर ओसाड माळरान तिच्या नावावर करून !!

ती हतबल झाली, नाउमेद झाली.. काही झाले तरी आता पुन्हा माहेर आणि सासरची पायरी चढायची नाही हे तिने ठरवले.

पण देव तिच्या भल्यावर होता म्हणून की काय नेमकी तीच जमीन रेल्वेच्या प्रोजेक्ट मध्ये गेली आणि त्याचा मोबदला म्हणून  चांगलीच रक्कम तिच्या खात्यात जमा झाली. पंचवीस लाख रुपये किंमत बघून सासरची मंडळी पुन्हा लाळ घोटत तिच्याकडे आली. तिच्यावर आधीच वाईट नजर असलेल्या दिराने तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली. परंतु सुशीलाने या सगळ्यांना परतवून लावले. आता ती तिचे आयुष्य स्वतंत्रपणे जगणार होती. 

तिने सगळी पुंजी जमा केली आणि त्या गावातुन निरोप घेतला कायमचा. 

इगतपुरी, तिला लहानपणापासून जे ठिकाण अत्यंत आवडत असे तिथे तिने राहण्याचा निर्णय घेतला. आपल्यावर जी वेळ आली तशी कुठल्याच मुलीवर येऊ नये यासाठी तिने त्या पुंजी मधून काही रक्कम शिल्लक ठेवून बाकीच्या रकमेने आश्रम उभारला... त्याला नाव दिले ध्रुवतारा..अशी जागा जिथून तुम्हाला कोणीच कधीच ढकलून देणार नाही !!!

आणि आज त्याच आश्रमाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. 

मनोगत व्यक्त करून सुशीलाबाई बसल्या. 

अतिथी म्हणून आलेल्या सात जणी म्हणजेच अगदी पहिल्या वर्षी आश्रमात दाखल झालेल्या मुली होत्या. त्या प्रत्येकीची कथा सुशीलाबाईच्या नजरेसमोरून तरळून गेली. 

पहिली मुलगी तारामती ... आश्रम उभा करून जेमतेम महिनाच झाला होता. एका सकाळी झाडझूड करत असताना सुशीलेला दाराबाहेर एक गोड गोंडस दुपट्यात लपेटलेले बाळ दाराबाहेर ठेवलेले दिसले. ते भुकेने कळवळत होते. सुशीलेचे ह्रदय कासावीस झाले. तिने मायेने तिला उचलले आणि तिला  नाव दिले तारामती . आज तिच्या अवकाशात खरोखरच एक तारा प्रकाशमान झाला होता,..सुशीलेला खऱ्या अर्थाने आज जगण्याचा आधार मिळाला होता आणि जगण्याचे कारण ही सापडले होते.

त्यानंतर सुशीलाबाईना  दिसली ती .... नारायणाच्या देवळाबाहेर भीक मागत बसलेली अश्राप पोर.. तिला कपड्याची सुद्धा शुद्ध नव्हती.. तिला असेच राहू दिले तर टपून असलेले माणसाच्या वेषातील लांडगे तिची शिकार करतील म्हणून सुशिलाबाई तिला घेऊन आश्रमात आल्या आणि त्यांनीच तिला नाव दिले नारायणी....

तिसरी पियू... सहा  वर्षाची पोर...सिग्नलवर काही बाही विकून पोट  भरत होती.. तिच्या संपूर्ण कुटुंबाला ट्रकने चिरडले. कुणीतरी सुशीलाबाईना हे कळवले.. त्या लगोलग तिला जाऊन घेऊन आल्या.

चौथी हीना.... मामानेच तिच्यावर अत्याचार केला होता.. आणि नंतर कुंटणखाण्यात  विकून टाकले होते. ती कशीबशी जीव वाचवून पळून आली होती. मिळेल त्या गाडीत बसून.. स्टेशन वर भटकत असतानाच तिला ध्रुवतारा या आश्रमाचा पत्ता मिळाला... आणि अजून एका मुलीची आश्रमात भरती झाली.

पाचवी नीलिमा...नुकतीच एम. बी. ए. झालेली होती.एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडालेली.. संसाराची सुंदर स्वप्ने पाहणारी... तो लग्न करेल या आशेने सर्वस्व त्याला अर्पण करून बसली. आणि त्याने ही प्रेग्नेंट आहे हे समजताच हात वर केले. माहेरून तर आधीच  विरोध होता. त्यामुळे माहेरी तिला स्वीकारले गेले नाही आणि हा मुलगा पळून गेला. ही सैरभैर झाली. आत्महत्येचे विचार मनात यायला लागले आणि अशातच तिची अचानक सुशीलाबाईशी भेट झाली. त्यांच्याशी बोलून तिला हलके वाटले आणि तिने निर्णय घेतला आता त्यांच्यासोबत राहून आयुष्यभर त्यांच्यासोबत  काम करायचं...  सामान घेऊन आश्रमात ती जी आली ती इथलीच झाली. 

सहावी पायल..... केवळ दोन वर्षाची असताना कुणीतरी आश्रमाच्या पायरीवर तिला सोडून गेलं होतं... जन्मतः मुकी  असलेली पायल... दिसायला अत्यंत सुंदर पण करंटे नशीब घेऊन जन्माला आली  होती... अप्रतिम नाच करायची म्हणून सगळ्यांनी तिला नाव दिले पायल !!!

नीलिमाचे दिवस भरताच तिने एका सुंदर मुलीला जन्म दिला आश्रमातच  .... फुलासारखी नाजूक आणि कोमल मुलगी म्हणून सुशीलाबाई नी तिचे नाव ठेवले जाई.... 

पहिल्या वर्षी या सात जणी आश्रमात दाखल झाल्या .... सुशीलाबाइनी ठरवलेली नावेही किती समर्पक ठरली...जणू इंद्रधनुष्याचे सात रंग!!! सुशीलाबाईच्या विराण आणि रखरखत्या आयुष्यात या सात जणींनी येऊन जणू सुखद सरींचा शिडकावा केला. त्यांना जगण्याची ऊर्जा मिळाली सात जणींच्या     प्रसन्न अस्तिस्त्वाने सुशीलाबाईंचे आयुष्य जणू उजळून निघाले. त्यांच्या आयुष्यात जणू इंद्रधनुष्य उमटले... त्यांना नवीन कामे करण्याची ऊर्जा मिळाली 

आणि बघता बघता आश्रमाचे खूप चांगले नाव झाले...

नकुशा, परित्यक्त्या, अत्याचार झालेल्या, जीव नकोसा झालेल्या कितीतरी मुली, महिला तिथे दाखल होऊ लागल्या. सुशीलाबाईनी एकच नियम घालून दिला होता काहीही झाले तरी जीव द्यायचा विचार सुद्धा नाही. परिस्थिती बदलते... आणि नाही बदलली तर आपण स्वतः ती बदलायची. 

आश्रमात कामे वाटून दिली जायची आणि स्वतःची कला जोपासण्याची संधी सुद्धा मिळायची. शालेय शिक्षण पूर्ण करावेच लागायचे. पुढे शिकण्याची जिची इच्छा असेल तिला सुशिलाबाई प्रोत्साहन द्यायच्या. 

त्यामुळेच आज बऱ्याच  जणींनी आपली कामे सांभाळून कलेला सुद्धा प्राधान्य दिलेले होते आणि पहिल्या वर्षी दाखल झालेल्या त्यांच्या सात तारका आज आश्रमाबाहेर जाऊन आपलं  कर्तृत्व सिद्ध करत होत्या. 

तारामतीने   जर्मन व फ्रेंच भाषा अवगत केल्या  होत्या आणि आज भारतीय दूतावासात काम करत आणि विदेशातून आपल्या आश्रमासाठी भरघोस मदत सुद्धा मिळवते आहे.

नारायणी ज्या देवळाबाहेर भीक मागत होती त्याच मंदिरात तिचे गाण्याचे कार्यक्रम होतात आणि तिथे हजारोच्या संख्येने लोक तिकीट घेऊन तिथे  उपस्थित राहतात.

पियू मार्केटिंग मध्ये वाकबगार झाली आहे एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहे. 

हीना ने ड्रेस डिझाईन चा कोर्स केला आणि आता तिचा स्वतःचा एक ब्रँड आहे .देशविदेशातून तिच्या ड्रेसेसला भरपूर मागणी आहे. 

पायल ने नृत्यामध्ये विशारद केले आणि भारताचे सांस्कृतिक टीम चे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमू मध्ये दाखल झाली. या  तिच्या कार्याची खुद्द राष्ट्रपतींनी दखल  घेऊन तिला सन्मानीत केले.

 नीलिमा  आश्रमाचे व्यवस्थापन सांभाळते आहे. आणि जाई एक विख्यात डॉक्टर झाली आहे  आणि दर महिन्याला आश्रमाला भेट देऊन जाते. 

या सर्वांनी बाहेर जाऊन आपले अस्तित्व सिद्ध केले ते  सुशीलाबाईच्या वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ! 

आज मावळतीच्या वाटेवर सुशीलाबाईना श्रमसाफल्य झाल्यासारखे वाटत होते आणि आपल्या ध्रुवतारा या आश्रमात या " ता ना पी ही नी पा जा " ह्या सात रंगांची  उधळण होत असताना,  स्वतःच्या मनात  उमटलेल्या या इंद्रधनुष्याकडं त्या कौतुकाने पाहत होत्या. 

**** समाप्त

© अस्मिता देशपांडे

सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क  त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने