निर्णय एका आईचा
©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
रंजनाचं एवढंस खोपटं आज गावातल्या माणसांनी खचाखच भरलेलं…..
खोपट्याच्या बाहेरही माणसांची गर्दी वाढतच चालली होती ….प्रत्येकजण आपापसात कुजबुजत होते….पण कोणाला कसलाच थांगपत्ता लागतं नव्हता….
काय झालंय?..... अन पुढे काय होणार??....ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं….
'बाभळवाडी'.....जेमतेम पन्नास घरांचं गाव… त्यामुळे कोणाच्याही घरात काही खुट्ट झालं तरी अख्या गावाला खबर लागे ….आणि न बोलावताही सगळा गाव त्या घरी जमा होई….
आज ही तेच झालं होतं….
रंजनाच्या घरात जे घडलं ते समद्या गावासाठी आक्रितचं होतं….गावात ती खबर वाऱ्यासारखी पसरली…
अन झाडून सगळा गाव रंजनाच्या घराभोवती जमा झाला….
गावातील काही वरिष्ठ मंडळी रंजनाच्या घरात बसून सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत होते….
दुसरीकडे रंजनाच्या घरात सगळ्यांच्याच चेहऱ्यावर सुतकी भाव दाटलेले होते ….रंजना एका कोपऱ्यात आपल्या चौदा वर्षाच्या लेकीला प्रियाला आपल्या पोटाशी कवटाळून बसली होती….तर रंजनाची सासू आपल्या कपाळाला हात लावून नशिबाला दोष देतं बसली होती …
रंजनाची नणंद शोभा तिच्या तोंडाचा पट्टा तर चालूच होता… कधी रागाने ती रंजना कडे पाही तर कधी मुटकुळं करून आईच्या कुशीत शिरलेल्या प्रियाकडे….
गावच्या वरिष्ठ मंडळीसोबत शोभा चा नवरा राकेश ही बसला होता… त्याच्या चेहऱ्यावर मात्र जणू….. काही घडलंच नाही असा आवीर्भाव होता...
रंजना मात्र केविलवाण्या नजरेने सगळ्यांना पाहत होती… आपली व आपल्या लेकीची बाजू ही सगळ्यांनी ऐकून घ्यावी म्हणून सगळ्यांना विनवीत होती….आपल्या साडीच्या पदराआड आपल्या लेकीचं मुटकुळं लपविण्याचा केविलवाना प्रयत्न करत होती…
रंजनाची लेक प्रिया झाल्या प्रकरणाने चांगलीच भेदरली होती… आपल्या आईच्या कुशीत जितकं स्वतःला सामावून घेता येईल तितकं ती अधिकच रंजनाच्या कुशीत शिरत होती….
गावच्या सरपंचांने जमलेल्या मंडळीना आणि तावातावाने बडबडणाऱ्या शोभाला शांत केलं…
"झाल्या प्रकरणाबद्दल सगळ्यांचं आधी ऐकून घेतलं जाईल आणि मगच काय तो निर्णय घेण्यात येईल…
तेव्हा शोभा नक्की घडलंय काय ते आधी नीट आम्हांला सांग"….सरपंच शोभाला समजावनीच्या सुरात म्हणाले.
शोभाचा चेहरा रागाने लालबुंद झालेला… ती तावातावाने बोलू लागली… "सरपंच… माझा भावड्या आम्हांला सोडून गेला तेव्हापासून मी आणि माझ्या नवऱ्याने या घरासाठी किती आणि काय काय केलंय हे या सगळ्या गावातील लोकांनी पाहिलं आहे…माझ्या लग्नाला वीस वर्ष झाली…पण आम्हांला मूल बाळ नाही झालं… माझ्या भावड्याची शेवटची आठवण त्याची लेक प्रिया….तिला आम्ही आमच्या मुलीसारखच मानलं...आमच्या लेकीसाठी जे काही करू ते सगळं आम्ही प्रियासाठी केलं… तिच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा असो की तिला सणासुदीला काही हवं नको ते पाहणं असो… मी आणि माझ्या नवऱ्याने सारं काही अगदी प्रेमाने,आपुलकीने केलं….रंजनाला,माझ्या आईला आधार दिला….पण आज या दोघी मायलेकीनी…
शोभाने रागारागानेचं आपलं बोट रंजना आणि प्रियाच्या दिशेने रोखलं आणि म्हणाली… "या दोघींनी आमच्या उपकारचे चांगलेच पांग फेडले… माझ्या देवासारख्या नवऱ्यावर यांनी आरोप केलाय की त्याने प्रियावर वाईट नजर टाकली… "आता मात्र शोभाच्या रागाचं परिवर्तन अश्रूत झालं… ती जोरजोरात रडायला लागली तश्या जमलेल्या काही बायकांनी तीच सांत्वन करत तिला शांत केलं…
घरात जमलेली सगळी मंडळी एकमेकांकडे पाहू लागली… हे सगळंच त्यांच्यासाठीही धक्कादायक होतं… गेली 20वर्ष ते राकेश ला जावई म्हणून या गावात पाहत होते… आजवर कधीही त्याच्या बद्दल वावडं काही कानावर आलं नव्हतं… आणि आता जे काही ऐकायला मिळतंय ते सगळंच धक्कादायक होतं…
रंजनाची सासू आपला ऊर बडवत रडू लागली… माझ्या लेकाला तर या मायलेकीनी खाल्लं...माझ्या म्हातारपणाचा आधार माझी लेक आणि जावई त्यांच्या संसारावर ह्यांचा वाईट डोळा आहे.. म्हणूनच हे कुभाण्ड रचलंय या दोघींनी….स्वतःचा संसार नाही सांभाळता आला… आता माझ्या लेकीचा संसार मोडायला निघाल्यात या… हे दिवस दाखवण्यापेक्षा देवा!!!मला तुझ्या कडे का नाही रे बोलावलंस?
इकडे रंजनाने इतका वेळ रोखून धरलेला अश्रुंचा बांध फुटला….अन डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या ….
आपल्यालाही बोलायचं आहे… सगळं सांगायचं आहे… पण इथं माझं कोणी ऐकून घेईल का??... तिच्या मनात वेगळंच वादळ उठलं होतं… झाल्या प्रकरणाने ती ही पुरती हादरली होती… स्वप्नातही ज्या गोष्टीचा विचार केला नव्हता ते घडलं होतं…
सरपंच रंजनाला म्हणाले…." पोरी आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं… तुझी बाजू्ही ऐकून घेतली जाईल… काय झालंय आम्हांला नीट सांग…."
सगळ्यांच्या नजरा रंजना अन प्रियावर खिळल्या होत्या….रंजना काय बोलतेय याकडे सगळ्यांचचं लक्ष लागून होतं…
रंजनाने आपल्या लेकीच्या अंगावरून एकदा मायेने हात फिरवला… जणू काही ती आपल्या लेकीला आश्वासन देतं असावी की काळजी नको करू मी आहे तुझ्या सोबत…
आपला सगळा धीर एकवटून रंजना ने बोलायला सुरुवात केली…" प्रियाचे बाबा आम्हांला सोडून गेले… तेव्हापासून शोभा ताई आणि त्यांच्या नवऱ्याने आम्हांला खूप आधार दिला… त्यांच्या उपकारांची जाणीव मला कायम आहे… पण त्या उपकारांची परतफेड म्हणून जर कोणी माझ्या लेकीवर वाईट नजर टाकणार असेल तर ते मला चालणार नाही…"बोलताना तिचं सारं शरीर थरथरत होतं…
राकेश स्वतःला सावरत स्वतःची बाजू मांडू लागला…." हे बघ रंजना तू जे समजते आहॆस तसं काही नाही… प्रिया मला माझ्या मुलीसारखी आहे… मी तिला जवळ घेतली ती वडील या नात्याने त्याचा ती असा चुकीचा अर्थ काढेल हे मला नव्हतं माहित….तरी तिचा जो काही गैरसमज झाला आहे… तो आपण तिच्याशी बोलून दूर करूयात… "
गावातल्या वरिष्ठ मंडळीकडे पाहत राकेश बोलू लागला….चौदा वर्षाची एवढीशी पोरं तिच्यावर विश्वास ठेवला जातोय….. आणि माझ्या वर नाही….
"मी सांगतो तुम्हांला…..हे सगळं या घरासाठी सुरु आहे… रंजना ला वाटतंय की आम्ही तिचं हे घरं बळकावू… आणि तिला व तिच्या लेकीच्या वाट्याच सारं काही हिसकावून घेऊ….पण हे बघ आम्हांला हे घरं नको आहे… तुमच्या वाटणीचं काहीच नको आहे….पण माझ्यावरचे हे घाणेरडे आरोप मागे घे...मी माझ्या आयुष्यात सुखी आहे...त्या सुखाला आगं नको लावू……."राकेश म्हणाला
एवढं बोलून राकेश प्रिया जवळ येऊ लागला… त्याला जवळ आलेलं पाहताच रंजना ने त्याला दूर ढकललं… "खबरदार माझ्या मुलीला तुमचा घाणेरडा स्पर्श जरी केलात….माझ्या इतकं वाईट दुसरं कोणी नसेल…"
तिचा तो जमदाग्नी अवतार पाहून राकेश घाबरून चार पावलं लांब सरकला… त्याचा डाव त्याच्यावरच उलटला होता….घरात राकेश वर जेव्हा रंजना ने आरोप केले… तेव्हा आपल्या सासूला आणि बायकोला शोभाला आपल्या गोड बोलण्याच्या जाळ्यात ओढून घेतले… त्या दोघीही राकेश च्या बोलण्याला भुलल्या…
पण ही बातमी बाहेर पडून लोकांनी आपल्या वर संशय घ्यायला नको म्हणून त्याने मुद्दामच गावच्या वरीष्ठाना बोलावले… त्याला वाटले… रंजना लेकीची अब्रू चव्हाट्यावर येऊ न देण्यासाठी शांत बसेल… आणि आपली झालेली बदनामी ही पुसून जाईल…
पण झाले उलटेच… रंजना आपल्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली…
रंजना बोलू लागली… " मला नाही माहित तुम्ही सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही… पण मी आज बोलणार कारण गोष्ट माझ्या लेकीची आहे….या माणसाची माझ्यावर ही वाईट नजर होती...मी आजपर्यंत गप्प होते कारण घरची इज्जत….मी खरं कोणाला सांगितलं असतं तरी दोष माझ्यातच शोधला गेला असता… मी मुकाट्याने सारं काही सहन केलं… पण आता नाही… या दुष्ट माणसाची नजर माझ्या मुलीवर पडली… तेव्हाच मी ठरवलं याचं खरं रूप सगळ्यांना सांगायचं… आज मी याला प्रियाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना रांगेहात पकडलं….पण सासूबाई आणि शोभाताई माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत…
जमलेल्या मंडळीना समजेना कोण खरं बोलतंय अन कोण खोटं बोलतंय… सगळ्यांची कुजबुज सुरु झाली… राकेश बद्दल याआधी असं काहीच ऐकलं नव्हतं… मग अचानक तो असं का करेल?.... की तो असाच आहे पण जगासमोर मुखवटा घालून फिरतो आहे….आणि रंजना ती खरं बोलतेय कशावरून??...यात तिचा तर काही डाव नसेल ना….?
सगळ्यांचं मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले….काय निर्णय घ्यावा?... कोण चूक कोण बरोबर काहीच समजेना….
शेवटी रंजना आपल्या लेकीला घेऊन उभी राहिली….प्रिया घाबरून आपल्या आईच्या मागे झाली….तिचा हात आपल्या हाताशी घट्ट धरत रंजना म्हणाली…."मला कोणाच्याही निर्णयाची अपेक्षा नाही…कारण माझा निर्णय झाला आहे… आज या क्षणी मी व माझी मुलगी हे घरं सोडून जातं आहोत… ज्या घरातील कर्ती व्यक्ती… घरातील स्त्रियांवर वाईट नजर ठेऊन आहे… ज्या घरात माझी मुलगी सुरक्षित नाही… ज्या घरात मला तिच्या सुरक्षेबाबत सतत काळजी राहिलं….ज्या घरात सुनेवर, नातीवर विश्वास ठेवला जात नाही त्या घरात यापुढे मी एक क्षण सुद्धा राहणार नाही….मी काबाडकष्ट करेन… पण लाचार बनून या घरात राहणार नाही ज्या घरात स्त्रीच्या अब्रूची किंमत केली जातं नाही…
कदाचित काही दिवसांनी सगळं काही ठीक होईल… पण माझ्या लेकीच्या मनावर झालेल्या जखमा मला पुसता येणारं नाही….आणि या घरात राहिलो तर त्या जखमा बऱ्या न होता सतत चिघळत राहतील… आणि त्याचे डाग आयुष्यभरासाठी माझ्या लेकीच्या मनावर राहतील….ते मी कधीच होऊ देणार नाही… मी ज्या मानसिक त्रासातून गेले त्या त्रासातून माझ्या लेकीला जाऊ देणार नाही…..
रंजनाने आपल्या लेकीचा हात घट्ट धरतं… अंगावरल्या कापड्यांनीशी ते घरं कायमच सोडलं….तिच्या त्या निर्णयाने सगळेच अवाक झाले… पण कोणीही तिला थांबवीण्याचा प्रयत्न केला नाही…
कारण एका आईने आपल्या लेकीसाठी तिच्या अब्रूसाठी घेतलेला तो निर्णय सगळ्यांसाठीच एक आदर्श होता….
©® शितल ठोंबरे
कथा आवडल्यास लाईक करा,कमेंट करा, शेअर करा … तुमच्या प्रतिक्रिया माझ्या लेखनाला सुधारण्यास मदतचं करील….
सदर कथा शितल ठोंबरे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने ती ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना कृपया नावासहितच शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

छान कथा लिहिली आहेस शितल. शेवट खुप आवडला.कुठेतरी हिमतीने सुरुवात केली की अन्यायाला वाचा फुटते...
उत्तर द्याहटवा