मधु इथे अन् चंद्र तिथे - भाग १
©® परवीन कौसर
" अगं झालं का नाही आई तुझे. चल वेळ होत आहे. निघायला हवं.कॅब येईल इतक्यात.इथेच वेळ झाला कि .मग फ्लाईट मिस होईल." नेहाने आईला म्हटले.
" हो हो.झाले गं.जरा यांच्या गोळ्यांचा डबा आणि चष्मा जागेवर ठेवत होते.मग रात्री पुन्हा शोधत बसतील आणि गोळ्या न खाताच झोपतील"
इतक्यात कॅब आली.आणि नेहा तिच्या आईबरोबर कॅबमध्ये बसून निघाली.तिच्याबरोबर तिचे वडिल आणि भाऊ पण बसले.भाऊ समोर ड्रायव्हरच्या बाजूला बसला आणि मागे आई बाबांच्या बाजूला नेहा बसली होती.
एयर पोर्ट जरा लांबच होते.नेहा फोनवर आपले मेसेज, ई-मेल चेक करत होती.समोर तिचा भाऊ पण ड्रायव्हर बरोबर काही बोलत होता.पण...
....पण..आई बाबा दोघेही शांत बसले होते.ते एकमेकांबरोबर एकही शब्द बोलत नव्हते . अगदी मौनव्रत घेतले असे बसले होते.जरी ते बोलत नसले तरी त्यांच्या मौनाची भाषा त्यांच्या मौनालाच कळत होती.आणि त्याला कारणही तसेच होते.आज त्यांच्या लग्नानंतर पहील्यांदाच हे दोघे वेगळे होत होते म्हणजे राधा तिच्या मुलीबरोबर परदेशात तीन महीन्यासाठी चालली होती.आणि रमेशनां त्यांच्या काही कामाअभावे जाता येत नव्हते.जेव्हा पासून राधा रमेशच्या आयुष्यात आली होती तेव्हा पासून हे दोघे क्वचितच म्हणजे कारणाकारणीच वेगळे राहीले होते नाहीतर हे दोघे कायम एकत्र होते.आणि आता आपल्या मुली साठी राधाला जावेच लागणार होते.
नेहा ही राधा रमेश ची मुलगी.त्यांना मोठा मुलगा राहुल आणि नेहा असे दोन अपत्ये.रमेश एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता.नेहाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती देखील तिच्या क्षेत्रात काम करत होती.दोन्ही मुले चांगल्याप्रकारे शिकून नोकरी करत होते हे पाहून आई वडील खुश होते.
आता मुलांची लग्न कार्य उरकले कि आपले रिटायर्ड आयुष्य आपण आरामात जगू.नातवंडात हसत खेळत आपले वृध्द आयुष्य आनंदाने जगुया असे या दोघांनी आपले विचार एकमेकांना सांगितले.
राहुलला राधाच्या चुलत बहिणीच्या मुलीचे स्थळ आले.मुलगी शिकलेली आणि सर्व गुण संपन्न होती.आणि तिला लहानपणापासून अगदी जवळून पाहिले असल्याने तिच्या बद्दल काही विचार करायला हरकत नाही म्हणून राधाने हा विचार रमेश समोर मांडला.
रमेशला देखील मुलगी पसंत होती.आता फक्त राहुलने हो म्हटले कि झाले.राहुलला विचारायचे काम नेहावर सोपविण्यात आले.
नेहाने बहीण नसून मित्र आहे अशा पद्धतीने राहुलला लग्नाविषयी विचारले आणि त्या मुलीबद्दल सांगितले.
....पण...
.....पण राहुल ने नकार दिला आणि आपण आपल्या बरोबर काम करणाऱ्या मुलगीवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत असे सांगितले.
यावर राधा आणि रमेश नाराज झाले.पण शेवटी म्हणतात न कि आई वडील आपल्या मुलांच्या सुखातच आपले सुख मानतात.
आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला.
लग्न अगदी थाटामाटात पार पडले.मुलगी तशी दिसायला इतकी सुंदर नव्हती पण तिचा स्वभाव अगदी साधा मनमिळाऊ होता.शिक्षण पण भरपूर पण त्याचा गर्व नव्हता.लग्न करुन आल्यानंतर आपल्या स्वभावाने आणि प्रेमाने सगळ्यांची मने जिंकली.
लग्नानंतर नोकरी करायची किंवा नाही हा निर्णय तिच्या वरच सोपविला होता.यावर तिने मी नोकरी करेन पण त्याहीपेक्षा घराकडे लक्ष जास्त देईन असे सांगून दोन्ही बाजूला बरोबर बोलल्या प्रमाणे न्याय देत होती.
कधीही कोणाला दुखावले नाही किंवा कोणाच्या विरोधात काही उलट केले नाही.अगदी जशी हवी घराला तशी सुन मिळाली याचा खरा आनंद राधाला झाला होता.
नेहा...
...ती देखील आपल्या कामात मन लावून प्रामाणिक पणे काम करत होती.आता तिला प्रमोशन मिळणार होते.त्यासाठी काही प्रोजेक्ट पूर्ण करायचे होते.आणि त्यासाठी तिला परदेशात जायचे होते.कंपनीमार्फत तिथे तिची रहाण्याची व्यवस्था केली होती.जवळजवळ तीन महीन्याचा प्रोजेक्ट वर्क होता.आणि तिला रात्रंदिवस काम करावे लागणार होते.
" रात्रंदिवस काम करत राहिल्यास तब्येतीची काळजी कशी घेशील.खाण्यापिण्यात आधीच तुझ्या तक्रारी.हेच नको तेच हवं.तु जाशील आणि मला काळजी करायला लावशील गं बाई" राधाने काळजीच्या स्वरात म्हटले.
" जेवणाचे काय सोड.काम इंम्पॉरंटंट आहे.एकदा का प्रोजेक्ट पूर्ण झाला कि तुझी मुलगी बघ कशी उंच झेप घेते."
नेहा म्हणाली.
" हो गं तु खूप मोठी हो.प्रगती कर.देव तुला हवे ते देवो.पण स्वतःला सांभाळ गं.तब्येती कडे लक्ष दे.आधीच नाजूक आणि तिथे काही झाले तर जवळ पण नाही आम्ही." राधा ने अगदीच बारीक आवाजात म्हटले.
इतक्यात सुनबाई ने गरमागरम चहा आणि कांदाभजी करून आणले .आणि म्हणाली," आई एक सांगू का.म्हणजे पटतंय का बघा.नाही म्हणजे गैरसमज नको.तुम्हीच नेहा बरोबर जा.म्हणजे तिला सोबत ही परदेशात आणि तुम्हाला तेवढा विरंगुळा होईल.तुम्हीपण मुलीबरोबर परदेश दौरा करून या.बाबांचीं काळजी करू नका मी आणि राहुल आहोतच."
" अरे यार काय भन्नाट आयडिया दिली.मी हा विचार केला नव्हता.आई आजच मी तुझ्या पासपोर्टसाठी अर्ज करते आणि लगेच होईल ते .आणि मग तुझे नि माझे तिकीट बुक करते"
हे ऐकून राधा स्तब्ध होऊन बसली.आणि म्हणाली" छे काही तरी काय .मी कशी तुझ्याबरोबर जाईन.नको बाई तुझे तुच जा.यांना सोडून एक आठवडा मी राहीले नाही तुझ्या आजोळी कधी आणि तीन महिने.नाही गं नेहा."
" अगं आई तीनच तर महिने.बघता बघता जातील.आणि तु तिथे रोज फिरायला जात जा.मस्त मज्जा कर.इतके वर्षे घर सोडून कोठे गेलीच नाहीस आता जरा बाहेर पड बाहेरचे जग बघं"
शेवटी सगळ्यांनीं समजावले आणि विशेष म्हणजे रमेशनेही तिला सांगितले" तु जा खरंच.मी तर तुला कोठे नेलो नाही फिरायला.आणि खरे तर आपली तेवढी परिस्थिती पण नव्हतीच.मुलांचे उत्तम शिक्षण यातच आपण आपले सगळे आयुष्य वेचलो.आता मुलांच्या तर्फे सुख समृद्धीची दिवस पहायचे.आणि हो माझी काळजी करू नकोस मुळी.सुनबाई आणि राहुल आहेतच इथे.माझे काम नसते तर मी पण आलो असतो."
शेवटी नाइलाजाने राधा जाण्यासाठी तयार झाली.आणि मग नेहाने आईचे पासपोर्ट आणि तिकीट आणि ज्या काही फाॅरमॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्या.
उद्या निघायचा दिवस.आजची रात्र राधाला झोपच लागत नव्हती.ती वारंवार उठून बसत होती.रमेश पण जागाच होता.पण झोपेचे सोंग घेऊन.
सकाळी उठल्यावर राधाने रमेशचा आवडीचा नास्ता बनविला.सगळेजण नास्ता करुन बाहेर हाॅलमध्ये बसले.राधा तिथेच किचनमध्ये उभी होती.तोच तिची सुन आली आणि म्हणाली" हे काय आई तुम्ही अजून इथेच.जा तयार व्हा.मी तोपर्यंत जेवणाचे बघते.स्वैपाक झाल्या झाल्या जेवा.म्हणजे जाण्याची गडबड होणार नाही."
हे ऐकून राधा एकदम दचकली आणि तिच्या डोळ्यात नकळतच पाणी आले ती काही बोलली नाही पण सुनेला तिच्या भावना समजायला वेळ लागली नाही.
सुन म्हणाली" हो आई तुम्ही काळजी करू नका मी बाबांची काळजी घेईन.तुम्ही बिंधास्त रहा.अजिबात इकडची काळजी करू नका"
एकदम स्पीड ब्रेकर आल्याने गाडीला जरासा हादरा बसला आणि राधा ने रमेशचा हात धरला आणि" अहो.." म्हणाली.
रमेशने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला" अग काही नाही स्पीड ब्रेकर मुळे झाले."
....एयर पोर्ट आले.तसे राधाची धडधड वाढली सगळेजण आत गेल्यावर नेहाने आपल्या वस्तू बरोबर आहेत कि नाही हे पाहीले." आई सगळ्या बॅगा घेतल्या न ग गाडीतून बाहेर काढून."
" हो हो बाबा आणि राहुल ने मोजुन घेतल्या "
आता फ्लाईट निघायची वेळ झाली यांना आत जाण्यासाठी सांगितले नेहाने राहुलला आणि रमेशला " चला येतो आम्ही.तुम्ही पण निघा आता.वहीणी पण येईल आॅफिस सुटल्यावर घरी" म्हणाली.
" हो निघतो आम्ही.तुम्ही जा सांभाळून आणि पोहोचले कि फोन कर" राहुल म्हणाला.
हे भाऊ बहीण बोलत होते आणि राधा रमेश फक्त एकमेकांना पहात होते.
राधा रमेशला पाठमोरा जिथं पर्यंत दिसत होता तिथं पर्यंत पहात होती.
फ्लाईट मध्ये मायलेकी चढल्या आणि एयर होस्टेस ने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या त्यांच्या सीटवर विराजमान झाल्या.
विमान प्रवास सुरू झाला.विमान उंच आकाशी उडाले.राधाची सीट विंडो सीट होती.राधा शुन्य नजरेने खिडकीतून बाहेर पाहू लागली.तिला त्या निळ्या नभामध्ये रमेश दिसत होता.आणि ती स्वतःलाच मनात म्हणत होती" मधु इथे चंद्र तिथे"
क्रमशः 👇👇
©® परवीन कौसर....
