पोराचं लग्न करुन द्या मग सुधारेल तो !
© डॉ. सुनिता चौधरी
कमलाबाई आणि त्यांचे पती विलासराव सगळ्या कामांकडे जातीने लक्ष देऊन होते. सगळी कामं सुरळीत चालली होती.
तेवढ्यात ! स्वतः च्या शरीरावरचा ताबा सुटत दारूच्या नशेत असलेला त्यांचा मुलगा राकेश झिंगतच घरात आला. घरातल्या बाकी कोणाला किंवा कामगारांना याचं काही वाटलं नाही कारण त्यांना याची सवय झाली होती. सगळे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपाआपली कामं करायला लागले.
'अरे नालायका ! आज पण ढोसून आलास का? अरे निदान लग्न होईपर्यंत तरी असली थेरं करू नकोस म्हणून किती बजावलंय तुला मी' ! म्हणत, विलासराव राकेशवर गरजले.
तेवढ्यात कमलाबाई मध्यस्थी करत म्हणाल्या....
'अहो जाऊ द्या , नका ओरडू ! आता त्या लोकांची यायची वेळ झाली आहे, त्यांच्यासमोर हा तमाशा नको नाहीतर ठरलेलं लग्न मोडायची वेळ येईल.
आधीच ह्याच्या असल्या व्यसनांमुळे गावात कोणी मुलगी देईना म्हणून मोठ्या कष्टाने दुस-या गावची मुलगी शोधली आणि ह्याचं लग्न ठरलं आता थोडक्यासाठी ह्या सगळ्यांचा बट्टयाबोळ नको! म्हणत ,त्यांनी राकेशला त्याच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवलं.
'अग् पण मुलीकडचे मुलाला भेटायचं म्हणाले तर ह्या दारूच्या नशेत त्यांना भेटवणार आहेस का तू त्याला'?
विलासरावांचा पारा चढतच होता.
'ते येतील खाणंपिणं करत, पुढची बोलणी होत वेळ जाईल आणि तोपर्यंत राकेशही शुध्दीवर येईल मग भेटवता येईल त्यांना, त्यात काय एवढं म्हणत कमलाबाई फणकारत निघून गेल्या. आणि ह्या मुलाचं कसं होणार म्हणून विलासराव मात्र काळजीतच होते'.
कमलाबाई आणि विलासराव यांचा एकुलता एक मुलगा राकेश. घरात गडगंज संपत्ती आणि त्यात एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे हवे असलेले आणि नको असलेले लाडही पुरवण्यात आले. नकार ऎकायची सवय नसलेला राकेश श्रिमंतीच्या थाटात अजुनच लाडावला गेला आणि आता परिस्थिती अशी झाली की, सगळ्या व्यसनांनी त्याच्या शरीरावर विजय मिळवला होता.
गावातला सगळ्यात टूकार, व्यसनाधीन आणि चारित्र्यानेही चांगला नसलेला अशी ओळख होती राकेशची. बिघडलेल्या पोराला आता सुधरवावं कसं म्हणत आईबाप चिंतेत होते मात्र त्याच्या ह्या परिस्थितीला जबाबदारही तेच होते.
अशातच एकदिवस कमलाबाईंची मैत्रीण आशाबाई त्यांना भेटायला आली आणि कमलाबाईंनी सगळी परिस्थिती आशाबाईंना सांगितली.
'अग् होतं असं कधीकधी, मग त्यात असं घाबरायचं काय? दारू पिणाऱ्या मुलांची लग्न होत नसतात का? तू एक काम कर ! राकेशचं लग्न लाऊन दे , अंगाखांद्यावर एकदा का जबाबदारी आली की मग बघ कसा सुधारेल तो ! तुमचं ऎकत नाही पण बायकोचं ऎकेल आणि नंतर मग एखादं मूल झालं की, त्यातच रमेल. मग कशाला दारू ढोसत फिरत बसेल नाही का? लग्नानंतर पोरं सुधारतात. तू काळजी करु नको'.
कमलाबाईंना आपल्या मैत्रीणीचा सल्ला पटला आणि त्यांनी राकेशच्या लग्नाचा घाट घातला पण गावात राकेश कुप्रसीध्द होता म्हणून कोणी त्याला आपली मुलगी द्यायला तयार नव्हते.
अखेर एका मध्यस्थीच्या मदतीने दुस-या गावातली एका गरीब घरातली मुलगी लग्नासाठी भेटली. लग्न ठरलं तेंव्हा राकेशचा धुर्त पण मवाळ चेहरा पाहून आणि घरातली श्रिमंती पाहून आपली मुलगी गरीबीत राहण्यापेक्षा श्रीमंतीत राहील. म्हणून पुढची कसलीच चौकशी न करता मुलीकडच्यांनी होकार दिला. अखेर लग्न ठरलं पण तारीख काढण्यासाठी आणि पुढची बोलणी करायला आम्हीच तुमच्या घरी येतो म्हणत मुलीकडचे आज घरी येणार होते आणि राकेशला सांगूनही तो आज नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत झिंगत आला होता.
सगळी तयारी झाली अाणि मुलीकडच्यांचं आगमन झालं. सोबत राकेशशी ज्या मुलीचं लग्न होणार होतं ती ही आली होती. नाकीडोळी सुरेख हलकीशी उजळ आणि चेहऱ्यावर एक अनोखं तेज असलेली सानीका हसतमुख चेहऱ्याने आली सोबत तिचे आई-वडील आणि अजून दोघं नातेवाईक आले होते.
'या या ! काही त्रास तर झाला नाही ना तुम्हाला यायला'... म्हणत, राकेशच्या वडिलांनी सर्वांचं स्वागत केलं. राकेशच्या आईने लगेच आलेल्या बायकांचं स्वागत करत कशी आहेस "सानीका " म्हणत सानीकाकडे मोर्चा वळवला. गोड हसत सानीका आल्या - आल्या सर्वांना नमस्कार करत आपल्या आईपाशी शांततेने बसली.
इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या आणि तेवढयात एक गोंधळ सुरू झाला....
"ए सोड मला, सोड म्हणतोय ना मी"?.....असा जोरजोरात ओरडा करत झिंगतच राकेश आपल्या बेडरूममधून बाहेर आला. कमलाबाई पोराची रुम बाहेरून बंद करायला विसरल्या होत्या आणि झोप न घेता दारूच्या नशेतच राकेशचा धिंगाणा सुरु झाला आणि तो ही त्याच्या होणाऱ्या सासर मंडळींसमोरच !
कमलाबाईंनी प्रसंगवधान राखत राकेशला आत नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एक जोरदार धक्का देत,
"ए म्हातारे आये !मला परत असा हात लावलास तर बघ उगाच माझा नाद करायचा न्हाय"!
'राकेश पाटील' ! हाय मी ; तुमच्या घरातला एकुलता एक वारस !
समजलं का ! म्हणत, राकेश धाडधीशी जमिनीवर आपटला.
कामगारांच्या मदतीने विलासराव आणि कमलाबाईंनी त्याला त्याच्या बेडरूममध्ये नेऊन परत झोपवलं पण ह्यावेळी ते बाहेरून कडी घालायला विसरले नाही.
सानीकाच्या घरच्यांना ह्या सगळ्या प्रकाराने एक धक्काच बसला. ज्या मुलाला ते आतापर्यंत चांगलं समजत होते त्याचं हे असं रुप पाहिल्यावर त्यांना खुप वाईट वाटलं. श्रिमंती पाहून आपली मुलगी सुखाने इथे नांदेल या स्वप्नाचा क्षणातच चुराडा झाला होता.
कमलाबाई आणि विलासराव खजील चेहऱ्याने बाहेर आले. सानीकाचे घरचे काही बोलतील तोच कमलाबाई बोलत्या झाल्या.....
'हे जे तुम्ही पाहिलंत ते खरं नाहीये, सध्या राकेश त्याच्या कामाच्या टेंशन मधे असल्याने त्याने दारू पीली आहे. तसा आमचा मुलगा खुपच गुणी आहे. तुमच्या मुलीला इथे सगळी सुखं मिळतील. उगाच ह्या असल्या एका कारणामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका' म्हणत ,कमलाबाई स्वतःच्या मुलाच्या चुकांवर पांघरूण टाकत कसंतरी हे लग्न जमवण्याच्या नादात होत्या. विलासरावांनीही खुप सारवा सारव केली.
'अहो ! आज कोणता मुलगा दारू पित नाही'? हल्लीची ही फॅशनच झालीये आता. सानीकाशी लग्न झाल्यावर तो असं काही करणारच नाही... बघा तुम्ही ! म्हणत, त्यांनी प्रसंग हसण्यावारी नेला.
'तसं तर राकेशच्या लग्नासाठी मुलींच्या स्थळांची रांगच आहे हो sss पण म्हंटलं! एका गरीब घराच्या मुलीलाच "सून" म्हणून आणावी म्हणून तुमचं स्थळ आम्हाला आवडलं' म्हणत, कमलाबाई खोटेपणाचा पदरावर पदर चढवत होत्या.
सानीकाच्या घरचेही राकेशच्या आईवडीलांच्या बोलण्याला भुलत होते पण मगाच पासून शांततेत बसलेली सानीका आता एकदमच उठून बसली आणि बोलती झाली.
'माझ्या सारख्या गरीब आणि साध्यासुध्या मुलीची तुम्ही सून म्हणून निवड केलीत त्याचा मला खुपच आनंद झाला होता. पण आज माझ्या समोर जो काही प्रकार झाला ते पाहूनही मी राकेशशी लग्न करेन असा गैरसमज तुम्ही तरी कसा काय केलात'?
तुमच्या मुलाला ज्याप्रमाणे मी आज पाहीलं त्याने मला असं जाणवलं की, तो नियमित पित असावा आणि त्याच्या ह्या गोष्टींची तुम्हांलाही सवय असावी म्हणूनच तर सारवासारवी करायला तुम्ही तयारच होता नाही का?
सानीकाचं बोलणं थांबवत मधेच,
"हे बघ सानीका ! कितीतरी मुलांना अशा सवयी असतात; पण एकदा का लग्न झालं आणि एखादं मूल पदरात पडलं की मुलगा सुधारतोच" म्हणत, कमलाबाई नम्रपणे बोलत्या झाल्या.
'अच्छा ! म्हणजे तुमचा हा व्यसनी मुलगा सुधारावा म्हणून माझं त्याच्याशी लग्न लावताय का तुम्ही ? अरे वाsss रे वाsss तुमच्या व्यसनी मुलाला सुधरवायला एका मुलीचा बळी देताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही? त्याला सुधरवायचंच असेल तर मग व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्याला सुधरवा ना ! त्यासाठी लग्नाचा जुगार का खेळताय ? अाणि समजा! उद्या लग्न झालं आणि हा तुमचा मुलगा सुधारलाच नाही तर त्याचं खापरंही तुम्ही माझ्याच माथी फोडायला मोकळे नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलाला आजपर्यंत त्याचे आईवडील सुधारू शकले नाहीत त्याचं लग्न करून दिल्यावर तो सुधारेल असं कसं काय होऊ शकतं'?
आज तुमच्याकडे गडगंज संपत्ती का असेना मात्र तुमचा मुलगाच चांगला नसेल तर त्या संपत्तीचा काय फायदा ? उद्या जाऊन कदाचित तुमचा मुलगा सुधारेलही पण मला हा असा लग्नाचा जुगार खेळायचा नाहीये मला त्यात माझा स्वतः चा बळी द्यायचा नाहीये.
समजलं! .....
सानीका बोलतच होती आणि तिच्या घरचे तिच्याकडे ; अवाक! होत पाहू लागले. आपली मुलगी बरोबर बोलत आहे हे समजून आता सगळे उठले त्यांनी कमलाबाई आणि विलारावांना हात जोडून नमस्कार केला आणि ते बाहेर पडले.
'लग्न करून द्या मग पोरगा सुधारेल ह्या घाणेरड्या प्रथेला सानीका बळी पडली नाही'.
समाप्त.
© डॉ सुनिता चौधरी
सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!! 📝
माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
