तिच्यासारखी मुलगी घरची सून कशी बनेल?

© डॉ सुनिता चौधरी




'काय ग् ऎकलंस का काही'? जोशी काकुंनी हळूच पाटील काकुंना विचारलं तसं पाटील काकू उत्तरादाखल म्हणाल्या की,
'काय हो काय ऎकलं का विचारताय तुम्ही'?

'अग् !मेहंदळे बाईंच्या पोराचं आशीषचं लग्न ठरलंय म्हणे',......

'हो का! अरे वाह् , मग तर छानच झालं की हो म्हणत पाटील काकूंनी आनंद व्यक्त केला'.

पण पाटील काकुंकडे तिरसट हसत जोशी काकू म्हणाल्या की,
'काय चांगलंय त्यात? अग् एकुलता एक, चांगला राजबिंडा पोरगा अन् त्याचं लग्न ठरलंय ते ही कोणाबरोबर माहीते का'?....त्या शेजारच्या विंग मधल्या आरती सोबत ....

आरतीचं नाव ऎकताच पाटील काकुंनीही डोळे मोठे करत आश्चर्य व्यक्त केलं आणि म्हणाल्या, "काय सांगताय काय जोशीबाई ?.....अहो, आरती तर तीच आहे ना ......गेल्या वर्षी जिचं प्रकरण गाजलं होतं"? 

'बाई - बाई आता काय म्हणावं ह्या, मेहंदळेबाईंच्या पसंतीला'! "एकुलता एक पोरगा आणि त्याचं लग्न अशा मुलीबरोबर"?.... 'छे ! त्यांना मुलींची काय हो कमी होती की, एवढ्या छान मुलासाठी त्यांनी अशा मुलीला पसंत केलं'. म्हणत, दोघीही काकूंचं गाॅसीप चांगलं रंगात आलं होतं.

तेवढ्यातच , मेहंदळेबाई त्यांना समोरून येताना दिसल्या आणि त्यांच्या समोर येऊन प्रसन्न चेहऱ्याने त्या बोलत्या झाल्या; "जोशीबाई , पाटीलबाई तुम्हाला आनंदाची बातमी कळालीच असेल ना" 'अहो, आपल्या आशीषचं लग्न ठरलंय आणि त्यानिमित्त आम्ही जरा त्या लग्नाच्या गोंधळाच्या आधीच आपली एक घरच्याघरी छोटीशी पार्टी करायचं ठरवलंय' ! म्हणूनच 'आज संध्याकाळी आमच्या घरी पर्टीसाठी यायला अजिबात विसरू नका ह्ं ! आपल्या बिल्डिंगमधल्या सगळ्या लोकांना बोलावणार आहे मी, गप्पा - गोष्टी होतील आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या सुनेची नव्यानं ओळखंही होईल सगळ्यांना नाही का? .....तसंतर तुम्हा सगळ्यांना आमची होणारी सुन माहीतच आहे हो ना ? .... बरं चला निघते मी, संध्याकाळची तयारी करायची आहे , पण यायला विसरायचं नाही हा'? म्हणत, मेहंदळेबाई , बाकी ठिकाणी पार्टीसाठी आमंत्रण देण्यासाठी निघून गेल्या.

मेहंदळेबाईंच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत, जोशीबाई आणि पाटीलबाईंना चांगलंच आश्चर्य वाटत होतं.

बघता- बघता संध्याकाळच्या पार्टीचं निमंत्रण सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि चर्चेला एकच उधाण आलं.

असं कसं होऊ शकतं?
आशीषसाठी आरतीचं स्थळ का असेल?

जिथं एकीकडे अशा चर्चेला उधाण आलं होतं तिथंच दुसरीकडे;
आरतीच्या घरच्यांनी कसलंतरी आमिष दाखवलं असेल?
आशीष मधेच काहीतरी प्राॅब्लेम असेल?
बहुतेक ह्या दोन्ही घरात नक्कीच काहीतरी झालं असेल त्याशिवाय का आशीष आणि आरतीचं लग्न ठरतंय ?


गप्पांना ऊत आला होता. लग्न ठरलं आणि लोकांना चर्चेसाठी एक आयता विषय मिळाला. 

सगळ्या बायका तर बायका पण पुरुषही हा विषय अगदी चवीने चघळताना दिसत होते. 

आता ह्या सगळ्यात संध्याकाळच्या पार्टीची उत्सुकता सर्वांना लागली होती.

इकडे आशीषच्या घरी पार्टीची जय्यत तयारी झाली होती.

आशीषचे आई- वडील तसेच सगळा परिवार एकदम खुशीत होता आणि अशातच एक- एक करून पार्टीसाठी सगळे हजर होत होते.
 
संध्याकाळच्या पार्टीची रंगत वाढत होती पण त्या रंगत पेक्षाही "आशीषसाठी आरतीसारख्या मुलीचंच स्थळ का"? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना हवं होतं.

आशीष तयार होऊन आला आणि त्याच्या आईबरोबर आरतीचं आगमन झालं आणि सगळ्यांच्या नजरा आरतीवर खिळल्या .....

आरतीला आई नव्हती.... लहानपणापासूनच वडिलांनी तिचा आणि तिच्या बहिणीचा सांभाळ केला होता. 

दोघींना उच्चशिक्षित करुन बापाने आपली जबाबदारी चोख बजावली होती. 

मोठी बहीण शिल्पा लग्न होऊन सुखाचा संसार करत होती आणि असाच संसार आरतीचाही व्हावा म्हणून तिचे बाबा स्वप्न रंगवत होते, पण आरतीबरोबर जे झालं त्यामुळे ते पुरते कोसळून गेले होते. 

लोकांच्या नजरांनाही तोंड देणं त्यांना जमत नव्हतं म्हणूनच की काय तेवढ्या पार्टीतही ते आपलं अंग चोरून बसले होते.

आशीषच्या आईबरोबर आरती सर्वांसमोर आली खरी पण समोरच्या कुत्सित नजरांनी ती ही भेदरून गेली होती. वर्षभर लोकांच्या टिकांमुळे ती आतून खचली होती म्हणूनच समाजासमोर येण्याचं ती टाळत होती. 

ज्याची त्याची नजर तिला घाणेरड्या नजरांनी पाहत होती आणि आजही नेमकं हेच झालं होतं.

आशीषला तीची नेमकी परिस्थिती समजली आणि तीला मनाची साथ द्यायला तो तिच्या पुढ्यात गेला पण त्याहीपेक्षा खरी परिस्थिती ओळखून मेहंदळेबाई म्हणजेच आशीषची आई आरतीच्या खांद्यावर हात ठेवत तीला मायेची साथ देत सर्वांसमोर अगदी प्रसन्न चेहऱ्याने बोलत्या झाल्या.

'मला समजतंय की, तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय की, आरतीसारखी मुलगी आम्ही आशीषसाठी का निवडली पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे की, आरती सारखी मुलगी सून का नाही बनू शकत'?

यावर जोशी काकू म्हणाल्या की, 'तुम्हाला माहित नाही का की, आरती सोबत काय झालंय' ? माहिती असुनपण असा प्रश्न कसा काय करता तुम्ही?....

यावर आशीषची आई म्हणाली की, काय झालंय तिच्यासोबत? आणि जे झालं त्याचा बाऊ का करताय तुम्ही लोक? ...
'आपल्या ह्या अशा लेकीला जिवापाड जपावं, तिला चांगलं शिक्षण देऊन काहीतरी बनवावं आणि अशा वेळी असाच कोणीतरी अनोळखी येतो तिच्या मर्जी विरूध्द तिला कुस्करतो तिच्या शरीराचे लचके तोडत तिच्यावर बलात्कार करतो अशा वेळी चूक कोणाची असते? जिच्यावर बलात्कार झाला तिची का ज्याने बलात्कार केला त्याची'? ....
आरती स्वतः गेली का त्याच्याकडे की, "ये आणि तोड माझे लचके"? .....
ती हिम्मत करून त्याच्याविरूध्द लढली पण तुम्ही लोक तिलाच दोषी ठरवताय ?काय चूक तिची?

'रात्री-बेरात्री बाहेरून यायची , मित्र मैत्रीणिंसोबत सारखी असायची, बिनधास्तपणे जगत होती म्हणून असं झालं. जरा बाई-माणूस म्हणून राहिली असती तर असं झालंच नसतं म्हणून चूक तर आरती चीच असणार ना'? ....पाटील काकू ठसक्यात म्हणाल्या .....

'वाह् वा! म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की, ती तिच्या मनासारखं राहिली म्हणून तिच्यावर असं झालं मग मला एक सांगा लहान पोरींवर बलात्कार होतात तेंव्हापण तुम्ही असंच बोलणार का'?

'काय तुमचे ते विचार? अहो, जर माणसाची प्रवृत्तीच निच असेल तर त्याला लहान - मोठं कोण कसं वागतंय कसं राहतंय दिसत नाही. त्याच्या मनात फक्त वासनेचा खेळ असतो आणि त्यासाठी कसंही करून ओरबडून ते मिळवायचं एवढं एकच समजतं अशा नराधमांना'! ....

आशीषची आई भरभरुन बोलत होती.
'आपण सतत दोष तिलाच का देतो? असं का करतो? अशावेळी मानसिक स्थिती ढासाळलेली असते त्यावेळी गरज असते; ती समजून घेण्याची ! पण आपण मात्र सरसकट कसलाही विचार न करता तिला गुन्हेगाराच्या नजरेनं बघत राहतो' !.

'तो बघा तो "बाप" ! कोपऱ्यात अवघडून बसलाय; जणु काय त्यानेच पाप केलंय !म्हणत आरतीच्या वडिलांकडे आशीषच्या आईने बोट दाखवलं !
आणि ही बघा एक कोवळी पोर जीला हवं तसं कुस्करून सोडलं आणि समाजातल्या तुमच्या सारख्यांच्या नजरेत दोषी ठरवलं. कीती भेदरलीये ही पोर !बघा जरा म्हणत आरतीचा चेहरा त्यांनी वर केला. बघा ! जरा हिला ; हिला! तीच्या वाटेचं सुख मिळवण्याचा हक्क नाहीये का'?

'आपण तिला असंच नजरांनी रोज - रोज मारून टाकायचं का? आज ही लोकांची पोरगी आहे पण हिच्या जागी आपलीही मुलगी असू शकते ह्याचा विसर तुम्हाला कसा काय पडतो'? .....

आशीषची आई भरभरून बोलत होती आणि आतापर्यंत आरतीला जे दोष देत होते, ते हे सगळं ऎकून खजील झाले होते.

'आशीषचं प्रेम आहे आरतीवर आणि जे झालं त्या सगळ्यांचा आम्हाला काहीच फरक पडत नाही कारण आरती ही आमच्या नजरेत आधीही गुणी मुलगी होती आणि आजही ती तशीच आहे. तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे तिच्याकडे बघण्याची दृष्टी बदलू नका एवढंच मला सांगायचं आहे. तिलाही जगण्याचा, तिच्या वाटेच्या सुखांचा उपभोग घेण्याचा पूर्ण हक्क आहे त्यापासून तिला वंचित करू नका.
आणि आता अशीच एक नवीन सुरुवात आपण करूया' ....

'तिच्या सारख्या मुलींचं दु:ख तर वाटून घेता येणार नाही पण ते दु:ख वाढणार नाही याची तर काळजी आपण घेऊ शकतो ना'? आणि 'तिच्यावर बलात्कार झालाय म्हणून तिला नाकारणं, किंवा ती आता कोणाच्याही घरची सून बनू शकत नाही हे ठरवणं निदान आतातरी बंद करूयात' !....

आशीषच्या आईने तिचं बोलणं संपवलं तशी आरती त्यांच्या मिठीत जाऊन हमसाहमशी रडू लागली. कोप-यातल्या तिच्या बापाने आज पहिल्यांदाच नजर वर करत आशीषच्या आईचे नजरेनेच आभार मानले आणि जमलेल्या जोशी काकू, पाटील काकू आणि बाकी लोकांना एक नवीन धडा मिळाला.

#समाप्त.

© डॉ सुनिता चौधरी

सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!! 📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने