© परवीन कौसर...
" आई गं....
आई्ई्ई
आई गं....
मालू जोरात ओरडली.
" काय गं काय होतंय मालू.का ओरडतेस? " मालूची आई दचकून जागी झाली.
" आई पोटात दुखायला लागले आहे गं." मालू ने विव्हळत म्हटले.
" अगं बाई आज काय ओझे उचलले होते का? तुला जरा आराम कर म्हटले तर ऐकत नाही." म्हणत मालूच्या आईने उठून पटकन दिवा लावला.
मालू पोटाच्या दुखण्याचा त्रास सहन करु शकत नव्हती.मालूची आई गडबडीने बाहेर जाऊन तिच्या वडिलांना उठवले आणि मालूच्या पोटात दुखायला लागले आहे दवाखान्यात घेऊन जाऊया.म्हटले.
लगेच त्यांनी रिक्षा काढली आणि दवाखान्यात नेले.तिथे डॉ.नी तिची प्रसुती होईल आता असे सांगितले.हे ऐकून मालूची आई घाबरली." अहो डॉ.सातवा महीना सुरू आहे.आणि आताच म्हणजे? ......
मालू ...शांता आणि महेश यांची धाकटी मुलगी. शांता आणि महेश यांना मोठा मुलगा होता.तो नोकरी साठी दुसऱ्या शहरात होता.
महेश रिक्षा चालक होते.मालूचे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती आणि ती आपल्या पहील्या बाळंतपणासाठी माहेरी आली होती.
तिला माहेरी येऊन एक आठवडा झाला होता.आणि आज तिला पोटात दुखायला लागले होते.
"अभिनंदन.तुम्ही एका गोजिरवाण्या गोंडस मुलीचे आजी आजोबा झालात" नर्सने बाहेर येऊन सांगितले.
तशीच मालूची आई देवाला नमस्कार केला आणि आपले डोळे पुसले.
हे बघुन महेश म्हणाला" आजीबाई रडता कशाला?" आणि दोघेही एकमेकांना पाहून हसु लागले.
बाळाला गरम पेटीत ठेवण्यात आले होते.तिला लांबूनच पहायचे.अजून थोडे दिवस तिला असेच ठेवावे लागणार.डाॅक्टरांनी सांगितले.
मालूच्या आईला डॉ.नी बोलावून घेतले आणि म्हणाले" हे बघा या बाळाची प्रकृती चांगली आहे पण...पण तिला आत पडजीभ नाही. यामुळे ती आपल्या सारखे बोलणार नाही. तिचे बोलणे स्पष्ट येणार नाही.जरा गुणगुण असे ती बोलेल."
हे ऐकून मालूच्या आई रडू लागली.
" अहो यात रडण्यासारखं काय.असतात अशी मुले. तसे पहाता सातव्या महिन्यात जन्म झाला तरी तिची प्रकृती उत्तम आहे"
" नाही डाॅ.तसे पण आधीच मालूला तीन वर्षे लग्नाला झाली बाळ नाही झाले म्हणून टोमणे मारत होते आणि आता ही अशी मुलगी म्हणजे तिला काय करतील ते लोक"
इकडे मालूच्या सासरी मुलगी झाली असे कळविण्यात आले तर तिकडून कोणी आले नाही. "आमच्या घरी पहीला मुलगाच होतो.मुलगी ...." असे म्हणत नाक मुरडत मालूची सासु म्हटली.
मालूचा नवरा मात्र खुप खुश झाला.त्याला खरे तर मुलगीच हवी होती.तो एका छोट्या कपड्यांच्या दुकानात कामाला होता.पगारपण जेमतेम होता.
आता मालूला डिस्चार्ज मिळाला.तिला महेश ने घरी आणले.नातीचे स्वागत आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांनी केले.शेजाऱ्यांना मिठाई दिली.ते लहान गोंडस बाळ आईच्या मांडीवर झोपलेले होते.
तोच शेजारच्या काकू आल्या आणि मालूच्या भावाचा फोन आला आहे म्हणून त्यांचा फोन मालूला दिला.
" हैलो,माले माझ्या भाचीचा पायगुण चांगला आहे बघं.आज ती घरात आली आणि माझे प्रमोशन झाले.मला बढती मिळाली.मला आता पगारवाढ आणि गाडी पण देणार आहेत.लक्ष्मी आहे बघं लेक तुझी'
हे ऐकून मालूच्या डोळ्यात पाणी आले.
दुसऱ्या दिवशी महेश रोज प्रमाणे सकाळी लवकर उठून रिक्षा काढली आणि स्टेशन जवळ गेला.तिथे त्याला एका पॅसेंजरला जरा लांबच सोडायचे होते ते भाडे मिळाले.आणि तो त्याला तिथे सोडून गेला.
त्यानंतर महेश परत फिरला आणि चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर गेला.चहा पिऊन जरा रिक्षा पुसायला मागे सीटवर गेला तर तिथे त्याला एक पेपरची बॅग दिसली." अरे बापरे हे साहेब इथे विसरले वाटते"
पुन्हा त्याने रिक्षा वळवली आणि जिथे त्या पॅसेंजर ला सोडले होते तिथे गेला.आणि त्याची ती बॅग त्याला परत केली.ती बॅग परत मिळाली हे पाहून त्याने महेशचे आभार मानले आणि त्याच्या प्रामाणिक पणाचे कौतुक केले आणि म्हणाला " हे खुप महत्वाचे पेपर आहेत.आणि ही माझ्या आयुष्यभराची कमाई आहे.तुमचे खुप खुप उपकार झाले" म्हणत त्याने महेशला आपल्या गळ्यातील सोन्याची चैन आणि पैसे दिले.आणि आपला फोन नंबर दिला काही गरज भासली तर फोन करून सांगावे असे सांगितले.
महेश आनंदी होऊन घरी परतला आणि म्हणाला आपली नात खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे आज तिच्या पावलाने मला आज इतके मोठे बक्षीस मिळाले" म्हणत आपल्या गळ्यातील सोन्याची चैन त्या बाळाच्या गळ्यात घातली.
इकडे मालूच्या सासरी ...
....मालूची नणंद लग्नाची होती.तिला खुप स्थळे येत होती पण काही न काही कारणाने तिचे लग्न जमतच नव्हते.
आज ती तिच्या मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी गेली असता तिच्या मैत्रिणीच्या आतेभाऊ साठी विचारले आणि तिच्या वडिलांना बोलावून घेऊन सगळे बोलणी करून लगेच लग्न करायचे ठरविले.
मालूची सासु पण इतके वर्षे आम्ही हिच्या लग्नाचा प्रयत्न करत होतो आणि जमायचे नाही आणि आज एका दिवसात जमले म्हणत खुप खुश झाली.
तोच मालूचा नवरा जिथे काम करत होता तिथे त्या दुकान मालकाने आणखी एक दुकान घेतले मग तिथे त्या दुकानाची सगळी जबाबदारी मालूच्या नवऱ्याला दिली.आणि त्याची पगारवाढ पण दुपटीने वाढली.
जेव्हा हातात दुप्पटीने पगार मिळाला तेव्हा त्याने देवासमोर हात जोडले आणि म्हणाला ' देवा परमेश्वरा माझ्या पोटी लक्ष्मी दिलीस तु.तिच्या पायगुणामुळेच तर हे घडले"
आणि तो घरी आला.घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला पगार वाढ झाली हे सांगितले आणि हे सगळे तिच्या नातीच्या पायगुणानेच .
हे ऐकून त्याची आई म्हणाली" असे काही नाही.तुझी मेहनत आणि इमानदारीने काम करतोस त्याचे हे फळ आहे"
यावर तो काय बोलणार.त्याची द्विधा मनस्थिती झाली होती.
तसाच तो आत जाऊन आपली कपड्यांची बॅग भरली आणि आईला येऊन म्हणाला" आई मी मालूला आणि माझ्या लेकीला भेटायला जात आहे."
हे ऐकून जरा ठसक्यातच आई म्हणाली" हुं जा.मी काय नको म्हणणार आहे कि तुला."
अगदी आनंदाने तो मालूच्या गावी आला.त्याला कधी एकदा आपल्या लेकीला पाहीन असे झाले होते. गावी पोहोचल्यानंतर लगेचच रिक्षा करून तो मालूच्या आईच्या घरी आला.गडबडीने रिक्षावाले ला पैसे दिले आणि तो आत आला.
मालू मुलीला झोपवत होती.आणि अचानक आपल्या नवऱ्याला समोर बघून आश्चर्य चकित झाली.
" अहो तुम्ही ."
" हो नाही तर कोण" म्हणत हसत तो तिच्या जवळ बसला.
" माझी राणी बेटी झोपली का? आण तिला माझ्या जवळ कधी एकदा पहातो आहे असे झाले आहे मला'
मालू ने लेकीला अलगद त्यांच्या हातात दिले.ते लहान बाळ बापाच्या स्पर्शाला ओळखून आपले हात पाय हलवू लागली.तिचे ते छोटे छोटे हात पाय पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले.आपल्या पोटचा गोळा इतका लहान कमी दिवसांत जन्मलेले बाळ किती नाजूक आहे हे.तो मनात विचार करत होता.
मुलीबरोबर आपण ही जणू काही लहान बाळच असे तो वागू लागला.बापलेकीचे खेळ बघुन मालू आनंदली.
रात्री जेवताना मालूच्या वडिलांनी आपल्या जावयाला मुलीबद्दल सांगितले कि तिची पडजीभ नाही आणि ती जरा गुणगुणत बोलेल स्पष्ट बोलणार नाही.
हे ऐकून तो जरा स्तब्ध झाला.आणि मग पुन्हा जणू काही झालेच नाही असा झाला.आणि म्हणाला" त्यात काय ऐवढे.तुम्ही काही काळजी करू नका.मी माझ्या मुलीला आयुष्य भर चांगले सांभाळेन.मी तिला खूप शिकवून मोठी करणार.तिला जे काही करायचे ते करु देणार.तिला या एवढ्या गोष्टी साठी कशातही कमी पडू देणार नाही"
हे ऐकून मालूच्या डोळ्यात पाणी आले.
दुसऱ्या दिवशी तो परत आपल्या गावी आला.
आपल्या घरी आल्यावर त्याने आपल्या आईला तिच्या नाती बदल सांगितले.यावर तिने तिला इकडे आणूच नये असे सांगितले. यावर मालूच्या नवऱ्याला खुप राग आला. तो म्हणाला" जर माझी मुलगी या घरात येऊ शकत नाही तर मी पण इथे राहणार नाही.मी मालूला घेऊन दुसरी कडे राहतो"
नंतर त्याने मालूला फोन केला आणि सगळे सांगितले.
पण या गोष्टीला मालूने विरोध केला.ती म्हणाली" आई बाबांना सोडून वेगळे कसे राहायचे.आता तर तुमच्या बहीणीचे लग्न आहे.या वेळी खरी तुमची गरज आहे तुमच्या आई वडिलांना.हवे तर मी इथेच माझ्या आई बाबा सोबत राहते.तुम्ही तुमचे घर सोडू नका" हे ऐकून तिचा नवरा म्हणाला " तुझा चांगुलपणा माझ्या आईला का दिसत नाही.का ती अशी वागते"
हे दोघांचे संभाषण मालूच्या नणंदेने ऐकले आणि हे सगळे आपल्या आईला जाऊन सांगितले आणि म्हणाली" बघं आई तु वहीणीबद्दल उगीचच काही तरी बोलते.बघ ती किती चांगली आणि समजुतदार आहे.नशीब तुझे अशी सुन मिळाली आणि आपल्या छोट्या परीचाच हा पायगुण आहे कि माझे लग्न ठरले.दादाला पगारवाढ झाली.आई अजून तरी तुझे डोळे उघड.असे वागू नकोस.ती पोर लक्ष्मी आहे लक्ष्मी."
हे ऐकून मालूच्या सासुला स्वतः च्याच वागण्याचा राग आला आणि ती आपल्या मुलाला म्हणाली " चुकले रे पोरा मी.चल आपण आताच जाऊ आणि माझ्या नातीला घेऊन येऊ.लक्ष्मी आहे रे ही आपल्या घरची लक्ष्मी.तिला वाजत गाजत घेऊन येऊ"
आणि हे सगळेजण मालूच्या गावी जाऊन मालूला आणि आपल्या छोट्या परीला घरी वाजत गाजत घेऊन आले.
समाप्त
©® परवीन कौसर
सदर कथा लेखिका परवीन कौसर यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
