एक अनपेक्षित कॉफी

 एक अनपेक्षित कॉफी

© पल्लवी घोडके-अष्टेकर


"कॅफे अरोमा" रस्त्याच्या बाजूला असलेल्या बोर्ड कडे रोहनचे लक्ष गेले आणि नकळत त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.सिग्नल सुटला,तो गाडीचा गेअर चेंज करणार इतक्यात एका फॅन्सी बाईक वरील एका तरुणाने त्याला हात दाखवत गाडी 'कॅफे आरोमा' कडे वळवली. ते पाहून रोहन त्याच्यावर ओरडला,

"अरे ऎ हि काय पद्धत आहे गाडी चालवायची?"

"सॉरी सर" असे म्हणून त्या मुलाने रोहनला हात केला.आपणही ५-६ वर्षांपूर्वी असच वागत असल्याची जाणीव रोहनला झाली. पण तरीही त्याला राग आलाच होता,त्या तरुण मुलाचा नव्हे तर 'कॅफे आरोमा'चा.


रोहन ऑफिसमध्ये पोहोचताच त्याच्या ऑफिसमधल्या लोकांनी "Good morning sir" असे म्हणून त्याचे स्वागत केले,त्याला प्रतिउत्तर न देता तो तसाच त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.

खुर्चीवर बसता बसता त्याला समोर टेबलवर ठेवलेली blue फाईल दिसली,ती फाईल पाहताच तो थोडासा वैतागला व त्याने इंटरकॉम वरून मि. शहाणेंना आत बोलावले.

मिस्टर शहाणे आत येताच त्याने फाईल कडे बोट दाखवून "हे काय आहे?" विचारले.


शहाणे बोलले," सर काम कालही झालं नाही,मॅडम काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत.कदाचित तुम्हालाच जावे लागेल आता."

"काय?मला जावं लागेल?" त्याने वैतागून विचारले.

"हो राणे साहेबच म्हणाले रोहन साहेबांना जायला सांगा,तुम्ही बोलून घ्या हवं तर राणे साहेबांशी" शहाणे उत्तरले.

शहाण्यांना जाण्याचा इशारा करत रोहनने डोक्याला हात लावला "मी जायचं कलेक्टर ऑफिसला?" त्याने स्वतःलाच प्रश्न केला आणि तो विचारात गढून गेला.


रोहन एका नामांकित केमिकल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. कंपनीने त्याला चांगला पगार, गाडी व बंगला देखील दिला होता.तो खुश होता,पण अचानक एक दिवस पर्यावरणप्रेमींनी त्याच्या कंपनीकडून पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा केला होता. रोहनच्या कंपनीकर्वे Industrial waste  नदीपात्रात सोडले जात होते व त्यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत होते. ते जनावरांसाठी, जलचरांसाठी व एकंदरीतच पर्यावरणासाठी हानिकारक होते.त्यांच्या आरोपाची दखल न घेता रोहनच्या कंपनीचे काम अरेरावी पणे चालूच होते आणि पंधरा दिवसांपूर्वी तर कलेक्टर ऑफिस मधून खुद्द कलेक्टर मॅडम ची नोटीसच कंपनीला आली होती. कंपनीसाठी ही फार मोठी बाब नव्हती,अशा प्रकारच्या नोटिसांची कंपनीला सवय होती.नोटीस आली की संबंधित अधिकाऱ्यांना पैसे चारून कंपनी काम चालू ठेवत असे. 



ही नोटीस जेव्हा राणेंनी रोहनच्या केबिन मध्ये पाठवली तेव्हा नोटीस वाचून रोहनला धक्काच बसला. "हे काम माझ्याकडून होणार नाही, शक्य असल्यास दुसऱ्या कुणाला तरी सांगावे"अशी विनंती रोहनने राणे साहेबांना केली. सहसा कुठल्या कामाला नाही न म्हणणाऱ्या रोहनचे उत्तर ऐकून त्यांना आश्चर्य वाटले,पण फार खोलात न जाता त्यांनी ती जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर सोपवली होती. पण त्यांच्याकडून काम पूर्ण न झाल्याने ही जबाबदारी आता पुन्हा रोहन वर आली होती.

दारावर नॉक करून बाळू आत आला आणि त्याने "सर कॉफी" असे म्हणत टेबलावर कप ठेवला."सर कॉफी" या आवाजाने रोहन कसल्याश्या विचारातून बाहेर आला.


त्याने ती फाईल उघडली व पुन्हा एकदा ती नोटीस वाचली.नोटीस नेहमी सारखीच होती पण नोटीस च्या शेवटी कलेक्टर चे नाव "नुपूर राव"असे होते. हेच ते कारण होतं ज्यामुळे रोहनला कलेक्टर ऑफिस मध्ये जायचं नव्हतं. पैसे देऊन काम होणार नाही हे रोहनला माहीत होतं आणि कंपनीचे नुकसान करून योग्य ते बदल कंपनी करून घेणार नाही हेही तो जाणून होता. त्याने कॉफीचा सिप घेतला,त्याची नेहमीचीच  डार्क कॉफी त्याला जरा जास्तच कडू वाटली. कॉफीचा मग खाली ठेवून तो राणेंच्या केबिन कडे चालू लागला.




आज पहिल्यांदाच रोहन Industrial waste water treatment plant बद्दल भरभरून बोलत होता त्याने तर waste water treatment  वर presentation सुद्धा बनवलं होतं.कंपनीमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान…..त्यासाठीच्या उपाययोजना, कंपनी व पर्यावरणाचा मेळ….अशा अनेक मुद्द्यांवर तो बोलत होता आणि हे सर्व करणे किती गरजेचे आहे हे तो राणे साहेबांना पटवून देत होता शेवटी हे असं proposal नेलं तरच त्या 'बाई' ऐकून घेतील व हे आपल्याला करावच लागेल हे त्याने राणे साहेबांना समजावलं. मी हवं तर या कामासाठी लागणारा कालावधी 'त्या' बाईंकडे मागू शकतो असे रोहनने सांगितले.

आज संध्याकाळी ४.०० वाजताची appointment होती मि.बेंद्रे,रोहनच्या ऑफिसमधील अधिकारी ज्यांच्याकडे ही केस सोपवण्यात आली होती त्यांनीच appointment घेतली होती. मि.बेंद्रे ऐवजी रोहन मिटींगला जाणार होता हे त्याने कलेक्टर ऑफिसला कळवले नव्हते.


गाडी काढून रोहन निघाला खरा पण त्याची छाती कमालीची धडधडत होती."ती आता कशी दिसत असेल?काय म्हणेल? तिच्या मनात अजूनही राग असेल का? मला पाहून तिने कंपनीचे नुकसान होईल असा काही निर्णय घेतला तर…...?" त्याला आठवले तिने UPSC च्या  exam ला बसायचे म्हटल्यावर आपला पुरुषी अहंकार कसा जागृत झाला, आपण किती बोललो तिला,मदत व प्रोत्साहन द्यायचं सोडून जमणार नाही असं सांगून सरळ ब्रेकअप केलं. सगळं-सगळं त्याला आठवत होतं. आता त्या घटनेला जवळपास सहा वर्षे लोटली होती आणि आपण उगाचच तिच्याशी भांडलो,ती इतकी हुशार असून एक संधी देखील आपण तिला दिली नाही. सरळ नातं तोडून टाकलं? किती बालिशपणे वागलो आपण?त्याचे मन त्याला खात होते.



नोकरी लागून ४ वर्षे झाले तरी तो मुली बघायला तयार नव्हता आईने हट्ट करून बळेच ३-४ मुली दाखवल्या पण त्यांना नुपूरची सर नव्हती. खरंतर तो नुपूर ला विसरूच शकत नव्हता. दोघांचे कॉलेज वेगळे होते पण त्यांच्या एका कॉमन मैत्रिणीकर्वे एके दिवशी त्यांची ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत व मैत्रीचे रूपांतर प्रेमात.नंतर रोहनने MBA करायचे ठरवले  व नुपूर ने UPSC.

बसं इथे सगळं बिनसलं. Competitive exam किंवा लग्न यातून तिने Competitive exam निवडली आणि रोहनच्या पुरुषी अहंकाराला धक्का बसला.आधी काही महिने तर तिनेच मला सोडले असे म्हणून तो तिलाच ब्लेम करायचा. पण हळूहळू त्याला त्याची चूक कळून चुकली.पण तरीही त्याने तिला कॉन्टॅक्ट करण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. 


रोहन ५ मि. आधीच ऑफिसमध्ये हजर झाला होता पण आता इथून निघून जावं असं त्याला वाटत होतं. तिथे बरेच पंखे चालू होते पण तरीही त्याला घाम फुटला होता. तो जाण्यासाठी उठला तेवढ्यात तेथील (peon)चपराश्याने त्याला बोलवले. हातातील लॅपटॉपची बॅग सावरत तो आत गेला. त्याला पाहताच नुपूर आधी काही क्षण त्याच्याकडे पहातच राहिली. नंतर हसून "तुमचं नाव मि. बेंद्रे आहे हे माहीत नव्हतं मला." तिने असे बोलून वातावरणात थोडी नरमी  निर्माण केली. 

रोहनने येण्याचे कारण सांगून नोटीसच्या उत्तरादाखल कंपनीचे प्रत्युत्तर म्हणून आणलेले presentation दाखवून त्यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती केली.तिनेही अगदी बारकाईने सगळ्या बाबी तपासून पाहिल्या त्या तपासत असतांना तिच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची झलक रोहनला दिसली व आपण तिच्याशी जे वागलो त्याबद्दल त्याला आणखीनच वाईट वाटले."मी कंपनीच्या वतीने लवकरात लवकर काम सुरू कसे करता येईल हे पाहिल" असे आश्वासन देऊन रोहन उठला.


ते दोघेही त्यांच्या personal life बद्दल काहीच बोलले नव्हते.आपण इतक्या सुंदर,सुशील व बुद्धिवंत जोडीदार गमावला ह्या विचारातच तो तिथून निघाला. तो दाराजवळ पोहोचला तेवढ्यात त्याच्या कानावर अनपेक्षितपणे नुपूरचे शब्द पडले.


"जर free असशील तर संध्याकाळी कॉफी घेऊया?" 


तिच्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला.पण त्याचा चेहरा आता खुलला होता.एक क्षणही न दवडता त्याने लगेच,


"कॅफे अरोमा?" असा प्रतिप्रश्न केला.


ती ही हसली."मी बाहेर वाट पाहतो." असे म्हणून तो निघून गेला.


आधी त्यांच्या जवळपास सगळ्याच भेटी 'कॅफे अरोमा' मध्ये रंगत असत. पण गेल्या ६ वर्षात तो 'कॅफे आरोमात' फिरकला नव्हता.सकाळी ज्या 'कॅफे अरोमा' चा त्याला खूप राग आला होता,त्या कॅफे मधली ती डार्क कॉफी मात्र तिच्यासोबत आता त्याला भलतीच गोड लागत होती.🥰

*** समाप्त

©® पल्लवी घोडके-अष्टेकर.


सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. तसं त्यांचं संमतीपत्र आमच्याकडे आहे याची नोंद घ्यावी. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...


 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने