डार्लिंग सासूबाई !!


© पल्लवी घोडके-अष्टेकर.




"Thank you Darling." असं ती shopkeeper सासुबाईंना म्हणाली व त्यांनी वळून माझ्याकडे पाहिलं. त्यांना English बोलता येत नाही, पण समजतं. 

तरीही त्यांनी मला विचारलं, "काय म्हणाली ती बाई?" तेव्हा मी हसून म्हणाले, "तुम्हाला Darling म्हणाली ती." ते ऐकून त्या थोड्या लाजल्या व त्यांना आश्चर्यही वाटलं.

पुढे आम्ही फळं विकत घेतली व आईंना (सासूबाईंना) इथले पैसे कळावे म्हणून मी त्यांच्या हातात पैसे दिले. 
त्यांच्या हातून पैसे घेता-घेता तो फळवाला त्यांना 'Thank you Sweetheart' म्हणाला आणि त्यांना खूपच शरमल्यासारखे झाले.

माझी डिलिव्हरी होऊन दोन-अडीच महिने झाले होते,दिवस थंडीचे होते म्हणून मुलाला school मधून आणायची जबाबदारी सासूबाईंनी घेतली होती. 

त्यांना London ला येऊन सहा-सात दिवस झाले होते.

मी त्यांना school ला जाण्याचा रस्ता दाखवून दिला होता. २-३ वेळा त्यांच्या बरोबर school ला ही गेले होते. येतांना वाटेत छान मार्केट होतं. तेथून रोज आम्ही खाऊ म्हणून फळं आणायचो.

मी सासूबाईंना पैसे दिले व येताना मुलाच्या आवडीचे फळं आणायला सांगितले. पण पहिल्या दिवशी त्यांनी फळं आणली नाहीत.

मुलाने घरी आल्या आल्या प्रश्न केला," तू आईला (आज्जीला) पैसे का नाही दिले? तिने आज फ्रुट्स घेतले नाहीत." मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा," मला नाही बाई इथले पैसे कळत म्हणून मी नाही आणले." असे त्या म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा त्यांना पैसे समजावून दिले. पण पुन्हा तेच. 

"आई,नेमकं कारण काय?" विचारल्यावर त्या थोड्याशा संकोचून म्हणाल्या,"अगं ते लोक मला डार्लिंग वगैरे म्हणतात मला नाही आवडत, तू भैय्याला (नवऱ्याला) का नाही सांगत फळं आणायला?"

तेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं की ते फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्याच गिर्‍हाईकांना असं म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात.

आपण कुणाला मदत केली आणि ती व्यक्ती आपल्या ओळखीची नसली तरीही ती आपल्याला Thank you Darling,Thank you Sweetheart किंवा अगदी Thank you my love असंही बोलतात.

स्त्रियांना Young lady, Old lady असं संबोधण्याची तर पुरुषांना Gentleman, Young man, Old man. असे संबोधण्याची यांची संस्कृती आहे.

आपण त्यांच्या दुकानातून साधे फळं किंवा भाज्या घेतल्या तरी ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असे विशेषण वापरतात.

डॉक्टर्स आपल्या पेशंटला get well soon my love किंवा you will be fine sweetheart.असही म्हणतात.

असे मी त्यांना समजावून सांगत होते,तेव्हा त्यांनीही मोकळेपणाने दोन्ही भिन्न संस्कृती बद्दल माझ्याशी चर्चा केली संस्कृतींची देवाण-घेवाण म्हणजे नेमकं काय? तर ज्या गोष्टी आपल्याला इतरांच्या आवडतात त्या घ्यायच्या, ज्या आपल्या गोष्टी इतरांना आवडतात त्या त्यांना द्यायच्या. 

विचारांची व वागणुकींची आवडीनुसार केलेली आदलाबदल ही खरंच अत्यंत सुंदर आदान प्रदान आहे.शतकानुशतके लोक असेच एकमेकांकडून नवीन गोष्टी शिकत आलेत.

म्हणूनच तर भारतात चायनीज मंचुरियन, इटालियन पिझ्झा,अमेरिकेन बर्गर,ब्रिटिशांचा चहा वगैरे पदार्थ अगदी सर्रास मिळतात व आपण ह्या पदार्थांची चव नेहमीच चाखतो.

पण फक्त आपणच त्यांचे पदार्थ खातो असे नाहीये, तर भारताबाहेर देखील भारतीय रेस्टॉरंटला अगदी निदान दोन तास आधी फोन करून टेबल बुक करावा लागतो नाहीतर जागा मिळत नाही. 

खाद्य पदार्थांची देवाणघेवाण आपण अगदी बिनधास्त करतो पण भाषा व संस्कार आपण फारसे अंगवळणी पाडून घेत नाही.

पण आपल्याला आवडलेल्या गोष्टींचे अनुकरण करायला काय हरकत आहे? बाहेर नाही, निदान घरात तरी आपण असे विशेषणं वापरूच शकतो.

उदाहरणार्थ समजा नवरा ऑफिसमधून आल्यावर बायकोने गरम गरम चहा हातात ठेवला आणि नवऱ्याने हसून "Thank you Sweetheart!" म्हंटले तर तिचा दिवसभराचा शीण निघून जाईल. नाही का! 

थोडी गंमत म्हणून, बायकोने देखील नवऱ्याने एखादे काम केले आणि त्याला "Thank you Handsome!"असे म्हणून उत्तर दिले तर त्यालाही कामाचा कंटाळा येणार नाही.

आपल्याकडे "फ्रेंडशिप मे नो सॉरी नो थँक्स" असा चित्रपटाने घालून दिलेला नियम आहे आणि पती-पत्नी हे आपलं कामच आहे,अशा समजुतीत सगळे कार्य पार पडत असतात.

पण बघा,आपण वेळीच आभार मानल्यास समोरच्या व्यक्तीला आपण योग्य काम केल्याचं समाधान मिळतं व योग्य वेळी माफी मागितल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

मुलांकडून छोटी-छोटी काम करून घेतानाही Thank you Dear!, Thank you Honey!.असे विशेषण कधी वापरून पहा त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव तुम्हाला बरंच काही सांगून जातील त्यांना केलेल्या कामाचे समाधान वाटू लागेल व तेही दिवसभर छोटी-मोठी कामं आनंदाने करू लागतील.(स्त्रियांनी ही ट्रिक नवऱ्याबद्दल वापरायलाही हरकत नाहीये.😀)

दुसऱ्या दिवशी मात्र सासूबाईंनी आठवणीने फळं आणली.त्यांनी फळं आणलेली पाहून मी सहजच "डार्लिंग…..आखो से आखे चार….. " गुणगुणले.

त्यांनी हसून एक कटाक्ष माझ्यावर टाकला. त्यानंतर मात्र त्या नेहमी न विसरता भाजी व फळं आणत असत.

त्यांची जाण्याची वेळ झाली तेव्हा निघतांना त्यांना भावना अनावर होऊन रडू कोसळले.

शेवटी निरोप देतांना मी त्यांना "Don't worry Darling, आपण लवकरच भेटू." असं म्हटलं आणि रडता-रडताही त्या खुदकन हसल्या.


©® पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर लेख लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांचा आहे. लेखाचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने तो ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेला आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने