स्काय ब्ल्यू

 स्काय ब्ल्यू

© धनश्री दाबके



आज आदित्यमुळे राहुलला कॉलेजमधून घरी यायला तसा उशीरच झाला होता. सगळी लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स संपली तरीही आदित्य घरी निघायला तयारच नव्हता. आदित्य सध्या खूप स्ट्रेसमध्ये होता. गेले चार दिवस त्याला त्याची दिल की धडकन म्हणजेच सोनल दिसत नव्हती कॉलेजमध्ये. ती दिसेल म्हणून आदित्य कॅंटीनमधे टाईमपास करत बसला आणि राहूल पोटपूजा. 

सोनल त्यांच्याच कॉलेजमधे कॉमर्सला होती आणि आदित्यची  तिला पाहूनच विकेट गेलेली. हल्ली तिला नुसतं पाहाण्यासाठी आदित्य त्याची सायन्स प्रॅक्टिकल्स बुडवायलाही मागे पुढे पाहायचा नाही. तिच्या वर्गाबाहेर फेऱ्या मारत राहायचा. एखादा दिवस जरी ती दिसली नाही तरी खूप बेचैन व्हायचा आणि आता तर चार दिवस होत आले होते तिचे दर्शन घेऊन. तिच्या गृपमधल्या एक दोघांना गाठून ती कॉलेजला का येत नाहीये ह्याचा शोध घ्यायचा प्रयत्नही केला होता आदित्यने. पण काहीच  सुगावा लागला नाही.

आदित्यचा हा love at first site वगैरे प्रकार राहुलला काही झेपत नव्हता. नुसतं तिला पाहूनच ही अवस्था. पुढे जाऊन काय होणार ह्या आदित्यचं काय माहिती. त्या सोनलला तर अजून ह्यातलं काही माहितही नाही. कळेल तेव्हा जे व्हायचंय ते होईलच. पण सध्या तरी तिची आणि आदित्यची निदान ओळख तरी व्हावी असं राहुलला मनापासून वाटत होतं. 

आदित्य त्याचा आठवीपासूनचा खास मित्र होता. आणि सो त्याचा मूड तो आपला मूड. त्यामुळे त्याचा मूड चांगला रहावा म्हणून कुछभी. आज कॉलेजमधून बाहेर हाकलेपर्यंत राहूल आदित्यची सोबत करत कॅंटीनमधे बसून राहिला. पण शेवटी ती नाही तर नाहीच दिसली आजही. मग आदित्यला घरी सोडून राहुल घरी आला. बाईक पार्क केली. खिशातल्या चावीने घराचे लॉक उघडून आत आला. आई बाबा दोघही नोकरदार. त्यामुळे घराची चावी सांभाळणं आणि स्वतःला सांभाळून वागणं राहुल बऱ्याच लवकर शिकला होता. 

आल्या आल्या राहुलने बॅग सोफ्यावर फेकली. शूज काढले आणि फोन उघडून सोफ्यावर लोळला. आज पोट तुडुंब भरलेले असल्याने  किचनमधे जाऊन स्नॅक्सचे डबे धुंडाळावे लागले नाहीत त्याला.

फोन चाळता चाळता त्याला पेंग यायला लागली. तेवढ्यात शर्वरीचा पिक-अप साठी येतोस का म्हणून मेसेज आला. 

खरंतर राहुलला खूप कंटाळा आला होता पण तरीही तो निघाला. 

वीस पंचवीस मिनिटांत तो शर्वरीच्या बिल्डींगखाली पोहोचला. तिला खाली आलोय म्हणून मेसेज केला. त्यावर अजून पाच दहा मिनिटे लागतील यायला असं उत्तर आलं. तिला यायला वेळ आहे म्हणून राहुलने तिथेच कंपाउंड मधल्या झाडाखाली बाईक लावली. हेलमेट काढून हॅंडलला लटकवलं आणि बाईकला टेकून इकडेतिकडे बघत उभा राहिला. 

आणि त्याला समोरच्या बिल्डींग मधून सोनल बाहेर पडतांना दिसली. तिला पाहून राहुल एकदम चमकला. अरे ही इथे कुठे? कॉलेजमध्ये तर आली नाही ही आज. पण कॉलेजची बॅग पाठीवर घेऊन ही इथे काय करतेय? तिच्या बरोबर अजून दोन मैत्रीणीही होत्या. मग त्या बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बोर्डकडे राहुलचं लक्ष गेलं. सामंत क्लासेस फॉर कॉमर्स ॲंन्ड आर्ट्स. तो बोर्ड पाहून सोनल इथे काय करतेय ह्याचा उलगडा झाला राहुलला. ओह हो ही तर स्कॉलर दिसतेय कारण सामंत क्लासेसमधे कोणा ऐऱ्या गैऱ्याला ॲडमिशन मिळत नाही. 

वा! ब्यूटी विथ ब्रेन. मानना पडेगा यार आदित्य तुझे..

ही कॉलेज बुडवून बहुतेक इथे क्रॅश कोर्स करतेय आणि तो तिचा देवदास पारो पारो करत क्रश्ड होतोय बिचारा.

राहुलने घाईघाईने आदित्यला फोन लावला.

"अरे देवदास, तू मत हो उदास..तुझी पारो आत्ता इथे माझ्यासमोर आहे आणि ती एकदम टकाटक आहे "

 "आयला, काय सांगतोस काय? कुठे आहेस तू ? मी येतो तिकडे लगेच " 

"मी सामंत क्लासेस समोर आहे रे. ती बहुतेक तिथूनच बाहेर पडलीये. तिच्या मैत्रीणींशी बोलत उभी आहे. पण तू येइपर्यंत थोडीच थांबणार आहे ती?"

" खरंच की. ए राहुल यार, एक फोटो काढून पाठव ना तिचा. वो नही तो उसकी तसवीर ही सही. मला बघायचंय तिला आत्ताच्या आत्ता "

"ए बाबा, काय डोकं बिकं फिरलय का रे तुझं? तिला कळलं तर मला चपला पडतील इथे. तुझं काय जातय? म्हणे फोटो काढ. मी तुला ती ठीक आहे हे सांगायला फोन केला रे. हे फोटो बिटो मला नाही झेपणार. हा..  पण इतकी सॉलिड दिसतेय माहितीये ती. व्हाईट कलरची जीन्स आणि त्यावर स्काय ब्लू टॉप. तुझ्या फेवरिट स्काय ब्ल्यू कलरच्या टॉपमध्ये पटाका लग रही है बॉस.."

"ओह..हो..बस क्या यार. एक तर फोटो बनता है यार."

" नाही रे बाबा. ते नाही जमणार. पण खरंच यार तू आत्ता इथे असायला हवा होतास रे. वो स्काय ब्ल्यू मधे बोले तो एकदम हॉट ॲन्ड  xx लग रही है" 

राहुल असं सोनलकडे बघून बोलत असतांना त्यांच्या मागून शर्वरी आली आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तिला असं एकदम जवळ पाहून राहुल गोंधळला.

" आई?? तू ?"

"म्हणजे? तू मलाच घ्यायला आलायंस ना? " शर्वरीने हसून विचारले.

" हो तर.... हॅलो .. बाय रे.. आली आई. आता मी निघतोय. बोलू नंतर" असं म्हणून राहुलने फोन ठेवला आणि बाईक काढली. शर्वरी मागे बसली आणि दोघं घरी निघाले. 

आईने नक्कीच आपण बोलत होतो ते ऐकलंय ह्या विचाराने राहुल गप्प गप्प होता. 

शर्वरीने राहुलने केलेलं त्या मुलीचं वर्णन ऐकलं होतंच पण ती त्यावर काहीच न बोलता नेहमीसारख्या त्याच्याशी नॉर्मल ऑफिसमधल्या गप्पा मारत घरी आली. नुकताच त्यांच्या आधी आज कधी नव्हे तो सुधीरही घरी आला होता. 

घरात येऊन शर्वरीने पर्स टेबलवर ठेवली, टेबलावरच्या जार मधलं पाणी प्यायलं आणि रुममधे फ्रेश व्हायला जातांना समोरच सोफ्यावर बसलेल्या राहुलला ती म्हणाली " राहुल, तुला एक सांगू ? मला ना स्काय ब्लू रंग खूप आवडायचा म्हणजे अजूनही आवडतो. पण मी वापरत नाही तो जास्त. कारण मी त्या रंगात खूप हॉट दिसते" हे ऐकून राहुल एकदम गडबडला. त्याला काय बोलावं तेच कळेना. सुधीरही काही न बोलता आ वासून तिच्याकडे बघत होता. त्याला कळेचना हिला काय झालं आणि ही हे काय बोलातेय.

एक पॉझ घेऊन शर्वरीच पुढे म्हणाली "हे  मी नाही पण माझ्या ऑफिसमधले पुरुष म्हणतात. म्हणजे माना तुटेपर्यंत वळवून माझ्याकडे बघत त्यांना हे म्हणतांना मी  ऐकलय. तसं मी कुठला रंग वापरावा ही सर्वस्वी माझा प्रश्न आहे पण आता मनातूनच नको वाटतो हा स्काय ब्लू आणि कधी कधी कुठलाच रंग." 

शर्वरीचं बोलणं ऐकून राहुलने मान खाली घातली. सुधीर तरीही शॉकमधेच होता. एवढं बोलून शर्वरी आत निघून गेली. 

मग भानावर येऊन तिच्या मागे आत जात सुधीरने विचारले,  "अगं, काय झालं अचानक? आणि काय सांगितलंस तू त्याला हे? राहुल आत्ताच कॉलेजला जायला लागलाय. सगळंच इतकं स्पष्ट बोलायची गरज होती का तुला?"

"हो होती रे.. जे मी अनुभवलंय त्यातून दुसरी कोणी जाऊ नये म्हणून हे स्पष्ट बोलणं गरजेचंच आहे. इतर बायकांमधे आपल्या आईला, बहिणीला बघता यायला हवंच मुलांना" असं म्हणून शर्वरी बाथरुममधे शिरली आणि सुधीर सुन्न होऊन ती गेलेल्या दिशेला पाहात राहिला.

******

©® धनश्री दाबके

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार







टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने