गोड समज

 "गोड समज" 

© सौ प्रभा कृष्णा निपाणे


रोहन आणि रश्मी दोघेही एकाच IT कंपनीत. एकमेकांच्या रोज कामानिमित्त भेटी गाठी , सोबत डबा खाणे त्यामुळे एकमेकांचे स्वभाव आवडले, प्रेमात पडले . मग LOVEBIRDS  म्हणून संपूर्ण कंपनीत फेमस झाले. प्रत्येक प्रियकर प्रियशी आपली LOVELIFE एन्जॉय करतात या दोघांनी केली. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडल्यावर त्यानीं आपापल्या घरी आपले निर्णय सांगितले. घरच्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला. तेवढ्यात रश्मीला दुसऱ्या कंपनीत चांगल्या पगाराची ऑफर आली आणि रश्मीने इथल्या IT कंपनीत राम राम ठोकला.

आता दोघांच्या रोज भेटीगाठी होत नव्हत्या. त्यात रश्मीची नवीन कंपनी तिला पगार जास्त तेवढ्याच जबाबदाऱ्या पण जास्त होत्या. तिला फोनवर बोलायला सुद्धा उसंत नव्हती. तरी रविवारी मुद्दाम वेळ काढून त्याला भेटायची. पहिल्या कंपनीत एकत्र असल्यामुळे एकमेकांना छान समजून घेत होते. म्हणून मग त्यानीं लवकरचा एक चांगला मुहूर्त बघून लग्नाचा बार धडाक्यात उडून दिला. 


लग्न झाले, हनीमूनला युरोप टूर करून आले. सुट्ट्या संपल्या आणि दोघेही आपल्या नोकरीच्या शहरात आले. आल्या आल्या घराची सर्व जबाबदारी दोघांवर पडली. प्रेम आणि संसार दोन खूप भिन्न आहे. हे लग्न झाल्यावर दोघांनाही कळून चुकले आणि मग छोट्या मोठ्या कुरबुरी रोजच होऊ लागल्या. लग्नाच्या आधिही रश्मी जॉब करत होती. आणि जेवण पण बनवायची. पण तेव्हा त्या चार रुममेट मिळून राहत होत्या. जेवण त्या सगळ्या मिळून बनवायच्या .चौघीत सगळे काम वाटले जायचे. कुणी कुकर लावायचा, कुणी भाजीची तयारी करून द्यायची तर कुणी पीठ मळून द्यायचे, कुणी भांडी घासायच्या, कुणी घुवायच्या. काम कधी सुरु व्हायचे आणि कधी संपायचे कळत सुद्धा नव्हते. 

रोहनचे सगळे उलट. बॅचलर लाइफ एन्जॉय करत होता. सकाळचे जेवण तो ऑफिसच्या कॅन्टिग मध्ये करायचा. संध्याकाळी घरी डबा यायचा. पण त्याने दोन डबे घेऊन ठेवले. एक भरलेला डबा घेतला , की तो रिकामा डबा फक्त विसळून ठेवायचा आणि त्या मावशीच्या हवाली करायचा. ते सुध्दा तीन रुममेट. पण तिघेही तसेच. टापटीप शब्द त्यांच्या बहुदा डिक्शनरीत नसावा. घराचा नुसता उकिरडा असायचा.

आता लग्न झाले. पण रोहनच्या सवयीत काहीच बदल नाही. बाल्कनीत उभा राहून चहा प्यायला आवडायचे. तिथेच रश्मी त्याला चहा बिस्कीट नेऊन द्यायची. देतांना सांगायची  रोहन,  येतांना कप सोबत घेऊन ये ! 

 हो म्हणायचा आणि विसरून जायचा. बाथरूम मध्ये आंघोळीला जाणार , टॉवेल बाहेर. हातातले काम सोडून रश्मीला जावे लागायचे. इकडून तिकडून टॉवेल नेऊन दिला तर अंग पुसून टॉवेल बेडवर. सगळे अस्थाव्यस्थ ! कंगवा, तेल,  पावडर,  डियो, सगळाच पसारा. 

बाहेर यावे तर बुटपॉलिश , ब्रश सगळी फेकाफेक. मग रश्मी ची खूप चिडचिड व्हायची. तिच्या तोंडाचा पट्टा चालू. सॉरी म्हणून हा मोकळा. ती घुस्यातच ऑफिस गाठायची. घरी आल्यावर पुन्हा आवराआवर. जेवण बनवणे सगळे करायची अगदी निगुतीने. पण चेहऱ्यावरचे तेज मात्र हरवले होते.

शेजारच्या कोसराबे काकू  तिला जाता येता पाहायच्या. सुरवातीला हसमुख असलेली रश्मी आताशी मलून दिसते. ते त्यांच्या चाणाक्ष नजरेतुन सुटले नाही. हल्ली हल्ली तर असे वाटत होते की, ही पोर मुखवटा घालून फिरते. एक दिवस रश्मी लवकर घरी आली. कोसराबे काकूबाजारातून आल्या . पिशव्या ठेऊन दारच उघडत होत्या. बाजूलाच रश्मी दार उघडत होती. कोसराबे काकूंनी रश्मीकडे पाहून SMILE दिले. रश्मी कसनूस हसली.  

कोसराबे काकूंना चैन पडेना. त्यानीं न राहवून रश्मीला विचारलेच. रश्मी लवकर आलीस बरं नाही का बाळा ? 

 कोसराबे काकूने बाळा म्हटले आणि रश्मी सुखावली.

 हो काकू जरा बर वाटत नाही !  

काय ग ताप वगरे आहे की काय ? 

त्यांनी तिच्या कपाळाला हातच लावला. अंग तापलं होत. मग कोसराबे काकू म्हणाल्या रश्मी ते दार बंद कर आणि माझ्या बरोबर घरात ये. मस्त आलं घालून चहा करते. मलाही घ्यायचाच आहे आणि हो आजच मक्याचा चिवडा केला. तेल पण कमी असते . थोडा तो खा ! 

चहा घे ! 

सोबत एक तापाची गोळी  घे ! 

आणि मग घरी जाऊन आराम कर ! 

 आणि हो जेवण करायच्या भानगडीत पडू नको ! 

पाठवते मी ! 

एकादमात कोसराबे काकू सारं बोलून गेल्या. रश्मी म्हणाली नाही, नको काकू  ! 

खरचं नको ! 

करेन मी काहीतरी  ! 

अग पण मी दिल तर कुठे बिघडल ? 

आज पर्यंत बोलत नव्हते ग !  वाटले तुम्ही शिकलेल्या पोरी ! आवडत नाही आवडत ! 

पण आज  जरा लवकर आलेली पाहून राहवलं नाही गेलं ग ! 

काकू काही तरीच काय हो ? 

न आवडायला काय झाल ? माझी आई सुद्धा तुमच्याच सारखी आहे काकू ! 

खरतर काकू आम्हालाही आवडत हो शेजार्यांशी बोलायला ! 

काकू आम्ही पण गाववरूनच इकडे आलेलो. गावी सगळे कसे मिळून मिसळून राहतात. काकू आमच्या शेजारी  एक कुटूंब बदलून आलं होत. त्याची मुलगी माझ्याच वर्गात. अहो आम्ही एकमेकांच्या घरात असे रुळलो की हक्काने त्यांना काय काय करून मागायचो. त्याही तेवढंच प्रेम करायच्या. माझी आई आणि त्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. तीन वर्षात त्याची बदली झाली. पण काकू अजूनही संपर्कात आहोत आम्ही. माझ्या लग्नाला सुद्धा आले होते सगळेच. ऋजुता , त्यांची मुलगी तिचेही लग्न ठरले. डिसेंबर मध्ये आहे. आईबाबा जाणार आहेत. माझं नक्की नाही.

कालच आई सांगत होती. अजून रोहनशी बोलले नाही या विषयावर. पण प्रयत्न नक्की करते जायचा.

वेळेचे गणित जमत नाही हो काकू  ! 

काकू जाता येता तुम्हाला बघून खूपदा वाटत होत . थाबावं दोन शब्द बोलावे पण काकू वेळच मिळत नाही हो तुमच्याशी इतर शेजाऱ्याशी बोलायला.

 हो ग समजू शकते मी !

 बर आता तू घरी जाऊन आराम कर ! 

जेवणाचं मी बघते.  रश्मी कोसराबे काकूंचा मोबाईल no. घेऊन आपला नंबर त्यांना दिला. कोसराबे काकु म्हणाल्या, बर नाही वाटलं तर कधीही फोन कर.

रश्मी दार उघडून घरी गेली.एक झोप काढल्यावर तिला जरा बरे वाटले.मग तिला आठवले आत्ताच कोसराबे काकूंचा नंबर घेतला. त्यानां सांगते काकू जेवण बनवू नका. खरच खूप बरं वाटतं आता.  तिने फोन करायला मोबाइल हातात घेतला. तेवढ्यात कोसराबे काकूंचा फोन आला. रश्मी मी जेवण बनवले . आणि हो तुझ्या तोंडाला चव नसेल म्हणून मिक्स भाज्यांचे सूप पण केले. रश्मी म्हणाली काय ओ काकू तुम्ही ? 

कशाला इतका त्रास करून घेतला...? 

अग त्यात त्रास कसला ! 

खरं सांगू रश्मी आम्ही चाळीत राहत होतो. दोन दिवस आजारी पडलो न तरी सगळ्या शेजारणी मदतीला धावून यायच्या. तोच गुण अंगात आहे ग ! 

 पण इथे ब्लॉक मध्ये जरा विचार करूनच वागावे लागते. नाहीतर तुमच्या सारख्या शिकलेल्या पोरी गावंठळ समजायच्या. 

नाही ओ काकु खरच असं काही नाही ! 

 आणि काकू तुम्ही आमच्या शिकलेल्या मुलीचा ग्रह  मनातून काढून टाका बरं !  आम्हालाही आवडत हे सगळ हं  ! 

त्याला अपवाद असु शकतात. खरंय ग तुझं ! 

बर दार उघड. मी सूप आणि जेवण घेऊन आले.

  तिने दार उघडले. संध्याकाळचे सात वाजले होते. रश्मी गरम गरम सुप प्यायली. जेवण झाकून ठेवले. मग दोघी बोलत बसल्या. पहिल्यादा त्या रश्मी कडे आल्या होत्या. रश्मी ला विचारले रोहन,  कधी येतो ग ? 

आठ पर्यंत ! 

मग कोसराबे काकू बोलायला लागल्या. रश्मी विचारू !  विचारा न काकू ! परमिशन काय मागता ? 

 बाळा आजकाल खूप मलून दिसते तू ! 

सॉरी  !

पण नाही राहवत म्हणून विचारते ! 

काही गुड न्युज आहे का बाळा ? 

नाही ओ काकू !

असं काही नाही . 

अग ,मग काय झाले ? 

 ती सांगू लागली , काकू मला इतके काम करायची सवय नाही हो ! 

त्यामुळे दमायला होतं ! 

अग मग रोहनला घ्यायचे न मदतीला ! 

मग ती त्याचे एकेक किस्से सांगू लागली ! मग कोसराबे काकूंच्या लक्षात आले. 

ती म्हणाली सांगू लागली , तो काही हे मुद्दाम करत नाही. पण त्याला त्याची जाणीव पण नाही. विचार करतच  त्या घरी परत यायला निघाल्या . 

दारात रोहन, कोसराबे काकुकडे बघून हसला. म्हणाला नमस्कार काकू ! सुखी राहा रे बाबा ! असे बोलून घरात जाणार ,पुन्हा डोक्यात विचार आला.रोहनला घरी बोलवून समजवावे का ? पुन्हा विचार आला. 

बाई ग ! हा समजून घेईल का ? 

  नाहीतर काहीतरी उलटच व्हायच. पण केलीच हिंमत. बोलावलेच त्याला घरात. पाणी दिले, पाणी प्यायला तो. मग आजच केलेले दोन लाडू त्याच्या पुढ्यात ठेवले. म्हणाला नको काकू . त्या म्हणाल्या घे रे ! 

आजच केले ! 

त्याने एक लाडू तोंडात टाकला .

 म्हणाला छान झाले काकू लाडू ! 

मग त्यांनी मुद्यालाच हात घातला. त्या  म्हणाल्या रोहन मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्याला वाटलं सोसायटी मेंटनन्स चा काही प्रॉब्लेम असावा. 

काकू माझे सोसायटीचे सगळे मेन्टेनन्स क्लिअर आहे. सॉरी रे ! 

मी तुला त्यासाठी नाही बोलावले. 

अच्छा !

काय काम आहे काकू ?

सांगते ! सांगते ! पण प्लीज राग नको येऊ देऊ आणि हो गैरसमज पण नको करून घेऊ.

नाही करणार, बोला काकू ! मग त्यांनी त्याला समजवणीच्या सुरात सांगितले, हे बघ रोहन ! रश्मी लग्न करून तुझ्या सोबत आली. पण तिला इतके सगळे काम करायची सवय नाही रे ! कोणत्याच मुलीला नसते ! हळूहळू अंगवळणी पडते ! आणि मग ती एक कसलेली गृहिणी बनते !

रश्मीचे पण तेच झाले. त्यात तू  ! 

पसारा करतो, पण मदत नाही. अरे नवरा बायकोनी एकमेकांना समजून घ्यावं रे !ती तुला समजून घेते पण तुला त्याची जाणीवच नाही ! 

अरे दोघे सोबत निघता तुम्ही ! मला सांग सकाळी तुझा तिला काय हातभार होतो.?  

चहा तुझ्या हातात. डबा हातात. 

मग तोच म्हणाला खरच चुकतो काकू मी ! त्याच्या वाईट सवइचा त्यानेच पाढा वाचला. त्या म्हणाल्या रोहन ! तू तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण केले ! 

किती मलून दिसते रे ती ? 

तुला नाही जमत तर मदत नको करू. पण निदान काम तरी नको वाढवू ! 

काकू खरंच सॉरी ! पण काकू मी तिला त्रास व्हावा म्हणून मुद्दाम नाही करत ! हो रे !

ते तिलाही कळते. म्हणून फक्त त्रागा त्रागा करते. पण तुझ्याशी जास्त वाद घालत नाही. 

खरंय काकू तुमचं ! 

सकाळी ती पायाला चक्री लावून फिरत असते. मी आरामात बाल्कनीत बसून पेपर वाचत असतो. मला आवडतो म्हणून तिथे चहा आणून देते. जातांना सांगून जाते येतांना कप घेऊन ये. पण मी मात्र तिथेच ठेऊन जातो. 

आल लक्षात काकू ! 

बर आज तिला बरं नाही माहित आहे का? 

हो काकू तिचा फोन आला होता ! आणि आता पावणेसातला पण फोन केलेला .आता बरे वाटते म्हणून बोलली ती मला ! कोसराबे काकूंनी चिवडा, चहा आणि गोळी दिली आणि आता जेवण पण देणार आहे.पण मला आता बरे वाटते तर खिचडी टाकते बोलली. 

अरे तिला बर वाटत नाहीच ! आत्ताच जेवण देऊन  आणि सूप पाजून बाहेरच पडत होते मी. तेवढ्यात तू दिसला.

तिने तुझी तक्रार नाही केली बर का रोहन? 

नाहीतर तुमच्या दोघात माझ्यामुळे वाद. 

काकू खरं तर तुम्ही माझे डोळे वेळीच उघडले. 

खरंच काकू खूप खूप धन्यवाद ! 

खरचं मला माझ्या  चुका आज तुमच्या मुळे कळल्या . 

मी आजपासूनच त्या नक्की दुरुस्त करतो. 

शुभस्य शिघ्रम ! 

काकू तुम्ही लाडवा सोबत दिलेला" गोड समज " खरच खूप आवडला. 

असे बोलून, धन्यवाद देऊन रोहन निघून गेला. 

 घरी गेका, काहीच बोलला नाही. रश्मीच्या कपाळाला हात लावून पाहिला ताप नव्हता. 

मस्त हातपाय घुतले. पावडर, डियो , कंगवा वापरून जिथल्या तिथे ठेवला. KITCHEN मध्ये गेलो  देवाजवळ अंधार होता. दिवा लावला , अगरबत्ती लावली. जेवण गरम केले. दोघं मस्त जेवलो. 

 ती उठून भांडी आवरणार रोहन बोलला तू आराम कर ! मी ठेवतो भांडी नेऊन. सर्व भांडी आवरली. बेसीनध्ये मध्ये ठेवणार पुन्हा विचार केला... घासूनच टाकावी का ?

आणि भांडी घासायला सुरवात केली. आत्ता पर्यंत शांत असलेली रश्मी उठून KITCHEN मध्ये आली. त्याच्या हातचे भांडे ठेवत म्हणाली रोहन ! अरे हे काय करतो ? 

 अरे खरचं मला आता बर वाटतं ! 

आणि हो मी भांडी सकाळी घासेन. ! 

तशीही मी उद्या सुट्टीच घेतली आहे ! 

खरच बर वाटते रे ! 

आधी तू ते भांडी ठेव बाबा! मला कसतरीच वाटते बघ!  

रोहन म्हणाला,  बाजूला हो आणि शांत झोप .

मी आलोच ! 

नाही ती भांडी सोड तू आधी !

रोहन प्लीज ! 

त्याने हात धुतले. अलगद तिला मिठीत घेतले. म्हणाला रश्मी जाणून बुजून नाही पण चुकलो . खरचं माफ करशील तुझ्या रोहनला ! 

सॉरी म्हणून पुन्हा कान पकडले. रोहन मध्ये झालेल्या या  बदलांकडे रश्मी पाहतच राहिली...

रोहनने मनोमन कोसराबे काकूंचे...लाडू देऊन ...वेळीच गोड समज दिल्याबद्दल आभार मानले.

समाप्त

©️®️  सौ प्रभा कृष्णा निपाणे

         कल्याण.

सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने