अनोखे पितृत्व

 " अनोखे पितृत्व "

© सौ प्रभा निपाणे



गणेशच्या लग्नाला चार वर्ष झाली. अजूनही घरात पाळणा हलत नव्हता. सुरवातीला हळुहळू कुजबुज करणारे शेजारी पाजारी, मैत्रिणी आणि नातेवाईक आता निमाताईंना उघड उघड बोलत होते. 

कुणी तर म्हणायचे काय ग, पोरांना नाही कळत पण तुला तर अक्कल हवी ना ? 

किती दिवस झाले घरात पाळणा हलत नाही ? 

काय प्रॉब्लेम आहे ? 

का राहत नाही ? 

तो सांगत नसेल तर तुला विचारायला नको ? 

निमाताई खूप अस्वस्थ व्हायच्या. कितेकदा त्या त्यांचे पती वासुदेवराव यांना म्हणायच्या, अहो ! तुम्ही तरी गणेशचा मित्र बनून त्याच्याशी या  विषयी बोला. पण या बाबतीत ते कायम अलिप्तच राहिले.  धाकटा मुलगा इंजिनिअर  होता. दोघे भाऊ तसेही खूप कमी बोलत होते.

निमाताई त्यांचा धाकटा  मुलगा  जयला म्हणाल्या. जय तू मागे बोलला होता तुझ्या मित्राची बायको गायनिक आहे. तू जरा त्यांच्याशी बोलतो का ?  गणेश आणि साक्षी दोघांना आता ट्रीटमेंटची गरज आहे असे मला तरी वाटते. 

आई पण आधी तू या बाबतीत त्या दोघांशी बोल. त्यांचे प्लानिंग पण असू शकते. 

नाही अरे ! 

त्यांनी एक वर्ष झाले प्लानिंग बंद केले,  बोलले मी त्यांच्याशी ! 

त्यांना मी सांगितले जयच्या मित्राची बायको गायनिक आहे, त्यांच्याकडे जा म्हणून. हो म्हणाले. पण तू पडतो त्यांच्या पेक्षा लहान. त्यात तुम्ही दोघे खूप कमी बोलता. म्हणून विचार केला आपणच बोलावे. 

असे असेल तर बोलतो आई मी माझ्या मित्रा सोबत. तिचा पण नंबर घेतो. 

 ठीक आहे !

 लवकर विचारून हा प्रश्न मार्गी लाव बाबा ! 

 आता जाता येता लोक एकच प्रश्न विचारतात रे.

 घरी पाळणा कधी हलणार ? घराबाहेर पडावेसे वाटतच नाही आजकाल . भीती वाटते लोकांची, त्यांच्या  त्याच त्या प्रश्नांची .  या दोघांना कोणी विचारतात की नाही माहीत नाही ? 

 जय म्हणाला, आई मला सुद्धा माझे मित्र विचारतात . तुझ्या भावाला अजून काही नाही का ? 

तू काका कधी होणार ?

खरच यांना कोणी काही विचारत नसतील का ग ? 

मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो. 

जावू दे ! 

तू नको काळजी करू! 

येईल त्या दोघांना अक्कल ! 

थांब आई ! 

मी आत्ताच विचारतो माझ्या मित्राला. 

त्याने मित्राला फोन केला. आज रविवार त्यामुळे त्याची बायको घरीच होती. त्याने बायकोला फोन दिला. जयने थोडक्यात सगळे सांगितले.

आईला म्हणाला , आई ! 

उद्याच या म्हणून बोलल्या डॉक्टर. उद्या सकाळी अकरा ची appointment दिली. 

आई लगेच गणेश आणि साक्षीला सांगायला गेल्या. 

निरोप सांगून  निमाताई बेडरूम मध्ये आल्या. 

खूप अस्वस्थ होत्या त्या. सारखा देवाचा धावा करत होत्या, देवा राहूदे सगळ नीट! 

वासुदेवराव , त्यांचे पती यांना म्हणाल्या, अहो ! सगळ ठीक असेल ना हो ! मला खूप काळजी वाटते हो ! नाही म्हणता म्हणता दोघांचे पण ३२ वय झाले. खरतर जुनी लोकं नेहमी म्हणायचे वयात सगळ व्हायला पाहिजे. 

 मी मात्र या बाबतीत बोलायची हिंमतच केली नाही. 

 माझच चुकलं हो !

आधीच या दोघांना डॉक्टर कडे पाठवायला पाहिजे होते!  पण आजकाल मुलांना आणि सुंनाना पण आवडत नाही. त्यात आपण असे बोलणारे सासू सासरे जुनाट वळणाचे वाटतात. त्यांना त्यांच्या संसारात आपली लुडबुड वाटते.  म्हणून इच्छा असूनही बोलले नाही. आता लोक उघड उघड बोलायला लागले. म्हणून  हिम्मत केली. 

पण एक बर झाल, कुठलेही आढेवेढे न घेता जायला तयार झाले. देवा आता सगळ नीट कर बाबा ! 

आपसूकच त्यांचे  हात जोडले गेले. 

दोघे डॉक्टर कडे गेले. तीन दिवस वेगवेगळ्या टेस्ट केल्या. साक्षीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल होते. पण गणेश कधीच बाबा होऊ शकणार नव्हता.दोन्ही कुटुंबाला हा धक्का न पचणारा होता.

पाच सहा महिने लोटले.आता अनाथ आश्रमातून बाळ दत्तक घ्यावे असे सर्वांना वाटत होते. पण जयची ईच्छा वेगळीच होती. 

एक दिवस सगळे जेवून गप्पा मारत बसले होते. जयने विषय काढला. म्हणाला बाळ दत्तक घ्यायचा विचार करता खूप चांगली गोष्ट आहे. एका अनाथ मुलाला घर मिळेल. पण मी डॉक्टर गौरीशी बोललो, अजून एक ऑप्शन आहे. थोडे खर्चिक आहे. पण बाळ साक्षीच्या गर्भात वाढेल. त्यामुळे ती आई बनण्याचे सुख अनुभवू शकेल.

 म्हणजे रे? आई म्हणाली. 

म्हणजे असे , एखाद्या सुदृढ पुरुषाचे शुक्राणू साक्षीच्या गर्भाशयात सोडले जाणार. कोणाचे आहे हे देणारा आणि जिच्या गर्भात सोडले जाते तिला सुध्दा माहित नसणार. हे सगळ गुप्त असते. हळूहळू बाळ साक्षीच्या गर्भात वाढणार. मुख्य म्हणजे, गणेश दादा त्या बाळाचे कला कलाने वाढणे स्वतः अनुभवणार. आपले मूल जन्माला आले याचा आनंद असणार.

इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. ती म्हणजे ते बाळ साक्षीच्या पोटात वाढलेलं असणार त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्या बरोबर त्याचा संवाद आईच्या गर्भातून होणार. 

माझ्या एका मित्राने केले असेच. तो म्हणाला माझ्या बायकोच्या गर्भात बाळ वाढत असताना मला कधीच असे जाणवले नाही की हे बाळ माझे नाही. शिवाय बाळ माझ्या बायकोच्या गर्भात वाढते म्हणजे त्याच्या प्रत्येक हालचाली मी अनुभवत होतो. एक प्रकारचे बाप लेकाचे नातेच अनुभवत होतो आम्ही. तो त्याच्या आईच्या पोटात असताना खूप गप्पा मारल्या आम्ही. मग बाहेर आल्यावर त्याच्याशी त्याच गप्पा मारल्या तर टुकू टुकू बघायचा. 

ऐकून होतो रे, मुलं आईच्या गर्भात सगळे ऐकत असतात, मी हे अनुभवतो . तो पाच वर्षाचा होईल आता. मला आजपर्यंत एकदाही असे जाणवले नाही की तो माझा अंश नाही. उलट त्याच्या आई पेक्षा माझाच  जास्त लळा आहे. 

कधीही बाप न होऊ शकणारा मी, असे पितृत्व खूप आनंदाने व्यतीत करत आहे. बघ तू अनाथ आश्रम पेक्षा मला हे जास्त छान वाटले. कारण मी प्रत्येक क्षण अनुभवला आणि जगलो. 

सर्वांना हाच निर्णय योग्य वाटला. 

 लवकरच सगळ्या तपासण्या करून एका पुरुषाचे शुक्राणू साक्षीच्या गर्भाशयात सोडण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात साक्षी गरोदर राहिली. 

आपण कधीही बाबा होऊ शकत नाही, हा विचार गणेशला  शिवत सुध्दा नव्हता. साक्षीच्या प्रत्येक हालचालीवर तो बारीक लक्ष ठेऊन होता. तिची खूप काळजी घेत होता. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी साक्षी जेव्हा डॉक्टरकडे फॉलोअपला जायची तेव्हा गणेश तिच्या सोबत असायचा.

साक्षीला सातवा महिना लागला,सोनोग्राफी करायला सांगितली. गणेश स्वतः तिच्या बरोबर जाऊन सोनोग्राफीतले ते बाळ देहभान हरपून पाहत होता. 

मुलगा असेल का मुलगी ?  

तो मनात म्हणायचा काहीही होवो. सुखरूप आणि सुदृढ राहू दे. 

यथावकाश नववा महिना सरला आणि साक्षीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सगळेच खूप खुश होते. 

 आज मात्र वासुदेवराव गणेशला म्हणाले,  गणेश तू आज बाबा झालास. मी आजतागायत तुझ्याशी फारसे बोललो नाही. आईचं सगळ करायची , सांगायची. आताही ती नक्की सांगणार खात्री आहे. पण आज  मला तुझ्याशी बोलायचे आहे आणि ते खूप महत्वाचे आहे.

गणेश म्हणाला, बाबा मला माहित आहे, तुम्ही न बोलता ,न सांगता आमचे सगळे करत होतात. आजही माझ्या भल्याचाच विचार करत असणार. बोला बाबा ! 

हे बघ गणेश, हे  बाळ तुझे नाही हे तुला माहिती आहे. कुणाचे तरी शुक्राणू साक्षीच्या गर्भात सोडले, जे तिला सुध्दा माहित नाही. पण तिने नऊ महिने ते बाळ आपल्या गर्भात वाढवले. त्यामुळे तिच्या आई होण्यात काहीच फरक पडणार नाही. पण तुझे तसे नाही.  तेव्हा आज या क्षणी हे लक्षात ठेव की,  कधीही तुझ्या मनात ह्या बाळा विषयी कोणतीच शंका राहणार नाही. एका बापाचे कर्तव्य तू पार पाडणार. शिवाय त्या बाळाला हे कधीही कळू देऊ नको की हे मुल तुझे नाही.

 गणेश इतकच म्हणाला, बाबा ! तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बाळ माझे आणि साक्षीचे आहे.

खरोखरच मला आज या देवरुपी डॉक्टरचा अभिमान वाटतो. असे कितीतरी पुरुष असतील , जे माझ्या सारखे बाप होऊ शकत नाही त्यांच्या साठी हे अनोखे पितृत्व जीवनात खूप आनंद देऊन जाणार. फक्त त्याला ते समजले, आणि जगता आले पाहिजे. 

बाबा ! मी हे अनोखे पितृत्व खूप आनंदाने व्यतीत करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. 

अत्यानंदाने त्याने बाबांना घट्ट मिठी मारली. 

इतकेच म्हणाला, बाबा ! मी बाबा झालो !!!!

बाबा ! तुम्ही आजोबा झालात आई आजी आणि आपला जय काका. 

बाबा मी खरच खूप खुश आहे. 

Love You baba...

 

©️®️

    सौ प्रभा कृष्णा निपाणे

          कल्याण.

सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने