©कल्याणी पाठक (वृषाली काटे)
कुळकर्णींच्या घरात आज धांदल होती. त्यांच्या सिद्धीला बघायला मुलाकडची मंडळी यायची होती.
जानकीबाईंनी उत्साहाने कार्यक्रमाच्या तयारीची सूत्रे स्वतःकडे घेतली होती.
दीपा आणि रूपा, त्यांच्या सुना, सासूबाईंच्या हाताखाली धावपळ करत होत्या. त्या दोघींचे नवरेदेखील पाहुण्यांच्या सरबराईकरिता सज्ज होते .
या सर्वांसह सिद्धीचे डोळेदेखील पाहुण्यांच्या आगमनाकडे लागले होते.
कारचा हाॅर्न वाजला. पांढ-या रंगाची चमकदार स्विफ्ट डिझायर घरासमोर येऊन थांबली.
ड्रायव्हिंग सीटवर बसलेला रुबाबदार तरुण एका मध्यमवयीन जोडप्यासह खाली उतरला आणि तिघेही कुळकर्णींच्या बंगल्याकडे चालू लागले.
दीपक आणि रूपक दोघांनीही पुढे होऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
पाहुणेमंडळी सुसज्ज व सुशोभित हॉलमधल्या सोफ्यावर विराजमान झाली.
जुजबी चौकशीनंतर सिद्धीही बाहेर आली अन् दीपक घरातला ज्येष्ठ पुरुष या नात्याने सर्वांचा परिचय करून देऊ लागला...
"हा माझा धाकटा भाऊ रूपक आणि ही त्याची पत्नी रूपा ..." बाजूलाच बसलेल्या आपल्या भावाकडे व त्याच्या पत्नीकडे हस्तनिर्देश करत दीपकनं ओळख करून दिली. दोघांनीही हसतमुखाने पाहुण्यांना अभिवादन केलं.
"माझ्या दोघी सुना सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा बरं का !" जानकीबाईंनी माहिती पुरवली. "आणि हा आमच्या घराचा आधारस्तंभ ...आमची आई ..." दीपकनं पुस्ती जोडली.
"रिद्धी म्हणजे सिद्धीची बहीण पुण्याला असते आयटी कंपनीत ..." गप्पांमध्ये आपला सहभाग नोंदवत रूपकनं सांगितलं...
"आणि हो... ही सिद्धी दीपक कुळकर्णी ... एमबीए झालीय् ...हल्ली पुण्याला जॉब करतेय् .. एका एच आर कंपनीत ..." दीपकनं पुढाकार घेत माहिती दिली.
"आणि, आपला परिचय ...?" पाहुण्या गृहस्थांनी चौकसपणे विचारलं.
"हो, हो ... ते राहिलंच की ...मी दीपक कुळकर्णी आणि ही माझी पत्नी दीपा ...आम्ही सिद्धीचे ...."
"काका काकू !" दीपानं दीपकचं वाक्य पूर्ण केलं...
सिद्धीसकट घरातली सगळी मंडळी दचकली . इतकी की पाहुण्यांच्याही ते लक्षात आलं. दीपक आणि रूपकनं कशीबशी परिस्थिती हाताळली.
गप्पाटप्पा अन् चहाफराळ करून पाहुणेमंडळी मार्गस्थ झाली अन् सगळ्यांनी दीपाला कोंडीत पकडलं !
"आई ती आईच असते शेवटी ! लावणीच्या नात्याला कां येणारे माया ?" जानकीबाईंचा तोल सुटला होता.
"सिद्धीला तू आपली मुलगी मानतच नाहीस का दीपाताई ?" रूपानं ओढणी डोळ्यांना लावली.
रूपक मात्र शांत होता . "लग्नानंतर कितीतरी वर्ष तुम्हाला मूलबाळ नव्हतं, वहिनी... तुमच्यानंतर तुमची धाकटी बहीण रूपा तुमची धाकटी जाऊ म्हणून या घरात आली आणि तुमची सुखदुःखं वाटून घेतली तिनं " रुपकनं दीपाकडे एक कठोर कटाक्ष टाकत म्हटलं.
"तर काय ! एवढ्या नवसासायासानी झालेल्या जुळ्या मुलींपैकी एक तुझ्या ओटीत घातली तिनं...! अगदी बारशाच्या दिवशी ! पण तुला आई म्हणवून घेता येईना गं ! " जानकीबाईंनी दीपाला दोष दिला.
दीपा सुन्न झाली होती. सिद्धी रडत होती. दीपकनं सिद्धीला थोपटून आजीकडे पाठवलं अन् दीपाला घेऊन तो त्यांच्या खोलीकडे वळला.
"मी चुकले कां रे दीपक ?" दीपा आता रडवेली झाली होती. खरंय का रे आई म्हणतात ते ?" दीपकने तिच्या खांद्यावर हात ठेवला.. आश्वासक...!
खरंतर अनाथाश्रमातून बाळ दत्तक घेऊया म्हणून किती हट्ट धरला होता दीपानं ! पण जानकीबाईनी तिच्या आईच्या मदतीनं परावृत्त केलं तिला अनाथाश्रमातून बाळ आणण्यापासून !
यथावकाश धाकट्या रूपाला दिवस राहिले अन् जुळ्या मुली झाल्या.
बाळांच्या बारशाच्या दिवशी केवढा थाट उडवून दिला होता जानकीबाईंनी ! गावजेवण घातलं होतं ! जुळ्या मुलींचा पाळणा जातीने सजवला होता... कित्ती पाहुणे होते घरात .. सासरचे अन् माहेरचेही ...!
दीपारूपाची आई आली होती. तिनं हळूच दीपाच्या कानात सांगितलं, "तू आपली मागे मागेच रहा हो समारंभात ! रुपेची ओटी भरायला पुढे पुढे करू नकोस ! लेकुरवाळी लागते ओटी भरायला ! माझा विश्वास नाही हो असल्या गोष्टींवर ! पण तुमच्या सासरच्यांचं काय सांगावं बाई ! तुझा अपमान झालेला नाही आवडणार मला !"
आईला काय म्हणायचंय ते दीपाला कळून चुकलं .
दीपाला मागेमागे राहताना बघून रूपाच्याही ते लक्षात आलं अन् तिनं चटकन देवघरात पाट मांडला.
दीपाला पाटावर बसवून कुंकू लावलं आणि दुपट्यात गुंडाळलेलं अंगठा चोखत आजीच्या मांडीवर पहुडलेलं एक मुटकुळं आणून तिच्या मांडीवर ठेवत म्हटलं, "आज पासून ही तुझी ...!"
खरं तर दीपा किती हरखून गेली होती !
पण अचानक कोसळलेलं हे आईपण ! भांबावून गेली होती ती !
जानकीबाईंनी सावरलं तिला ! "गुणाची ग माझी रूपा !" म्हणत अलाबला घेतली रुपाची त्यांनी !
संध्याकाळ होत आली . बाळांना पाळण्यात घालायचं म्हणून शेजारपाजारच्या बायका जमल्या.
"रूपे , केतकी नाव ठेवू या का गं हिचं ?" केतकीसारख्या वर्णाच्या गोंडस बाळाकडे बघत दीपा उद्गारली.
"अगं नको, रिद्धी-सिद्धी छान जोडीची नावं आहेत बघ ... रूपकनं सगळी सजावट केलीय ह्याच नावांच्या जोडीची !"
"बरं बरं !" रूपानी आज दाखवलेल्या समजूतदारपणापुढे दीपाची इच्छा अगदीच थिटी होती.
बारसं आटोपलं. पाहुणे मंडळी पांगली. आता सगळे फक्त घरचेच आणि दोघींची आई !
"छकुली उठली वाटतं !" दीपानं बाळाच्या रडण्याचा आवाज ओळखला.
" ए, ताई, छकुली नको ना गं ! चिऊ आणि माऊ म्हणूया दोघींना ! छान आहे किनई ! " रूपा स्वतःच्या कल्पनेवर खुश होती.
"बरं बरं !" दीपा उठली. सिद्धीनं लंगोट ओला केला होता. तो बदलून ती स्वयंपाकघराकडे वळू लागली.
"तुला आवडली नाहीत का नावं ताई ... चिऊ आणि माऊ ?"
"अगं, छान आहेत की !" रूपाने केलेला त्याग इतका मोठा होता की दीपा त्या ऋणाची उतराई होणे शक्यच नव्हतं !
"दोघी बाळं आईचं दूध पीत आहेत तोवर तरी बाळांनी रुपाजवळ झोपावं" ह्यावर दोघी आयांचं एकमत झालं होतं . बरोबरच होतं ! शेवटी तिनं उसनं घेतलेलं आईपण बाळाला दूध थोडंच पाजणार होतं !"
रिद्धीसिद्धीच्या वर्षाच्या वाढदिवसालाही जानकीबाईंनी मोठ्ठा थाट उडवून दिला.
दीपानं रिद्धीसिद्धीसाठी फ्रॉक आणले. सिद्धीसाठी सिंड्रेलासारखा फ्रॉक आणि रिद्धीसाठी वेगळ्या पद्धतीचा !
पण रुपा म्हणाली, "अगं दोघींनाही सारखेच कपडे घालू या ! मी आणले आहेत. छान आहेत की नाही ? " रूपानं दोन बॉक्सेस मधून दोन सारखे फ्रॉक काढत म्हटलं.
रूपासोबत दोघी आयांचं बहुमत होतं !
मग सिद्धीनं दीपा आणि दीपक बरोबर केक कापला आणि रिद्धिनं रुपा आणि रूपक बरोबर ! तिघातिघांचं फोटो सेशनही रंगलं .
काही दिवसांतच दीपकची बदली झाली मुंबईला. "आई, सिद्धी आता एक वर्षाची झाली. आम्ही तिला घेऊन जाऊ मुंबईला ? " दीपानं अधीरतेने विचारलं !
"नको ग बाई, तुला काही तिला एकटीनं सांभाळता यायचं नाही. नेहमी आम्ही असतो ना सोबतीला !" जानकीबाईंनी काळजी व्यक्त केली.
"आई , मला संधीच कुठे मिळालीय् अशी ? मी छान सांभाळीन तिला !" तिनं अपेक्षेने रूपाकडे बघितलं !
'माझी काही हरकत नाही गं ताई ! माझा विश्वास आहे तुझ्यावर ! पण रिद्धीला सवय झालीय गं सिद्धीची ! जरा वेळ दिसली नाही की कावरीबावरी होते !"
दीपा अन् दीपक दोघेच बदलीच्या गावी निघून गेले. रूपानं दोघींनाही आई म्हणायला शिकवलं ! रुपाआई अन् दीपाआई !!
शाळेतही नावं घातली दोघींची ... रूपानंच ... 'सिद्धी दीपक कुळकर्णी' अन् 'रिद्धी रूपक कुळकर्णी '...!!
दीपाचं मन जरासं शांतावलं.
मुली मोठ्या होऊ लागल्या अन् दीपक आणि दीपा बदलीच्या गावी विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरू लागले. दर तीन वर्षांनी नवीन ठिकाण ! शिक्षणाची आबाळ नको म्हणून सिद्धीनं रुपाजवळच रहावं असं रुपानं ठरवलं ... अर्थातच दोघी आयांच्या समर्थनाने ...!
"सिद्धी, सायन्स सगळेच घेतात ! तू लिटरेचर घे नं गं ! त्यातही खूप स्कोप आहे !" दीपानं सांगून बघितलं .
"अगं नको, तिला सायन्स भारी आवडतं ! आणि रिद्धीही सायन्स घेतेय् ..." रूपानंच उत्तर दिलं.
दीपा शांतच होती नेहमीप्रमाणे... रूपाच्या त्यागाच्या ऋणातून कशी उतराई होणार होती ती ...!
दीपा आणि दीपक दोघेही बाहेरगावी राहिले पण गावी सतत येत राहिले ... मुलीच्या ओढीने ...! सिद्धीचा खर्च उचलत राहिले ... कपडेलत्ते, शिक्षण, दुखणंखुपणं सगळंच ! सिद्धीच्या लग्नाची तरतूदही करून ठेवली होती त्यांनी !
आज सिद्धीला बघायला पाहुणे येऊन गेले. पण दीपाच्या डोळ्यांसमोरून भूतकाळ चित्रपटासारखा झरझर सरकून गेला.
"आपण महिन्यातून एकदा गावी यायचो ते सिद्धीच्या ओढीनं ... खाऊ, खेळणी अन् कपडे घेऊन ! .मी कधीतरी सिद्धीची खरी 'आई' झाले का रे दीपक ? आणि तू कधी खराखुरा 'बाबा' झालास तिचा ?" दीपानं हताश होत विचारलं, "अरे, हे सगळं तर काकाकाकू म्हणून केलंच असतं की रे आपण ! उसनं आईपण कशाला रे !"
"दीपा, अगं , माझं नाव लावते की नाही सिद्धी ...! आणि तिचं कन्यादान आपणच करणार बघ ...!" दीपक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला.
हा काय व्यवहार आहे का दीपक ?" तिनं तुझं नाव लावायचं आणि त्याबदल्यात आपण तिचा खर्च उचलायचा ! कन्यादानाचं आयतं पुण्य पदरात पाडून घ्यायचं !
"उसनी आई होण्यापेक्षा सिद्धीची सख्खी मावशी व्हायला आवडलं असतं मला ! "
दीपा कोलमडून पडली होती ! आणि दीपक तिच्यापाशी खाली मान घालून उभा होता ...
सुन्नपणे !!!
© कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
