रामाज्ञा

 © नेहा बोरकर देशपांडे



"आई ,कशाला गं दरवर्षी तू हा सुंठवडा करतेस? 

'अरे, रामनवमी आहे, कशाला काय? आणि प्रसाद म्हणून खायचा, मधुरा शार्दूलला म्हणाली.

मधुराने घरातील पितळी कोरीव राममुर्तीला नाजूक मोग-याचा हार घालून मनोभावे नमस्कार केला. 

प्रसादाचा सुंठवडा खाऊन ती पुढच्या कामाला लागली, पण मनात मात्र त्या सुंठवड्याला तीने अगदी कमीच मार्क दिले.. 

छे.. काही करा आपला सुंठवडा काही फोनकाकू सारखा होत नाहीच मुळी... 

हात यंत्रवत काम करत होते, पण मनात मात्र  फोनकाकूच्या आठवणींनी रिंगण धरलं होतं.

'रामतीर्थ' सोसायटीत मधुराचे माहेर. 

चार चार मजल्याच्या दोन बिल्डिंगची सोसायटी. 

बिल्डिंगला नंबर होते, एक आणि दोन. 

समोरासमोरच्या दोन बिल्डींगमध्ये व्यवस्थित अंतर होते, त्यामुळे त्या मधल्या जागेत मुलांना खेळायला भरपूर जागा होती.

दोन नंबर बिल्डिंगच्या तळमजल्यावर फोनकाकू रहायच्या. 

ते आठवून आत्ताही मधुराला हसू आले.. हे काय नाव आहे का? 

पण त्या वेळेस त्यांच्याकडे म्हणजे सान्यांकडे नुकताच फोन आला होता आणि त्यांचा नंबर दोन्ही बिल्डिंगमधील सर्वांकडे त्यांनी दिला होता. 

सानेकाकू मुलांना हाका मारून सांगायच्या फोन आलाय, मग घरचं कोणीतरी खाली येऊन थांबायचे मग परत फोन यायचा मग बोलणं व्हायचे....

सानेकाकूंनी कोणाला हाक मारली कि मुलं किंवा घरचे विचारायचे ,'काय हो काकू? फोन , फोन अशा हाका मारायच्या काकू.  

तेव्हापासून त्यांना ते नाव पडले "फोनकाकू".

'आई, वाढ ना जेवायला, शार्दूलने आवाज दिला... तसे मधुराने रिंगणाचा एक हात सोडवला... पण दुसरा मात्र काही सुटेना... तिला कळेना आजच का आपल्याला त्यांची इतकी आठवण येतेय..घरातल्यांची दुपारची जेवणं आटपून ती तिच्या खोलीत आली.


परत रिंगणात ती अनाहूतपणे ओढली गेली, तेवढ्यात तिची बालमैत्रिण राधा हिचा फोन आला तिला.

 'अगं, मधुरा , आत्ता थोड्याच वेळापूर्वी फोनकाकूंना देवाज्ञा झाली गं... तु येशील ना.. चार वाजेपर्यंत नेणार आहेत त्यांना... कित्ती नशीबवान बघ ना ...रामनवमीलाच मरण आलं गं... राधा काही बाही बोलत राहीली, पण मग मधुराने डोळ्यांतील पाणी पुसत हो, येते हं असं म्हणत फोन ठेवला.

आता त्या आठवणींचे कारणही कळले....

गो-यापान , नितळ कांतीच्या, लांबसडक पाठीवर रूळणारा शेपटा, रेखीव कुंकू, व्यवस्थित उंची, प्रसन्न सुमुखाने त्या कायम वावरायच्या. 

साने काका वकील होते. त्यामुळे पैसाआडका , दागदागिने यांची काही कमतरता नव्हती. मुलबाळ मात्र नव्हते... पण याची कधीही खंत काकूंकडून जाणवली नाही. 

गोंदवलेकर महाराज व रामाच्या त्या निस्सीम भक्त....

महाराज व रामाराया  योग्य तेच करतील यावर त्यांचा फार विश्वास होता. 

सानेकाका त्याच्या व्यापात व्यग्र असायचे. त्या दोघांत छान सुसंवाद होता.

नातेवाईक फार नव्हते त्यांचे, त्यामुळे सोसायटीमधील सगळ्यांशी संबंध चांगले... रामाला काय वाटेल असाच विचार करून त्या इतरांशी वागायच्या.

'फोनकाकू, आज बाबांचा सातारहून फोन येणार आहे तर मी थांबू का इथेच ? मधुराने विचारलं... 

हो थांब ना... विचारतेस काय? 'आई आली का ऑफिसमधून?', 'नाही काकू,  आज तिला उशिर का झालाय तेच कळत नाहीये, मधुरा म्हणाली.

'अगं, असूदे, ती येई पर्यंत इथे थांबलीस तरी चालणार आहे हो.... इति फोनकाकू...

'हे घे गरमागरम वरणभात झालाय, बस जेवायला...बिनदिक्कत मी खायला बसले, मधुराला एक एक प्रसंग आठवत होते.

तेव्हा बाहेर काही पदार्थ मिळत नव्हते आणि पैसेही नसायचे... आणि दुस-यांकडे खायचे कोणालाही वावडेही नव्हते...

लट घरातले सोडून शेजा-यांकडेचे पदार्थ चविष्ट लागायचे. 

असं बरेच वेळा व्हायचे, माझंच नाही बाकीच्या मुलांच्या बाबतीतही. 

खेळताना काही लागलं, पाणी प्यायचे असले कि फोनकाकूचे घर ठरलेले.

कायम गजबजलेले घर असायचे काकूचे.

या सगळ्यांत तिची रामभक्ती वाखाणण्याजोगी होती. 

रामपाठ तिला मुखोद्गत होता.  

गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत तिला रामप्रेमाचे भरतं आलेलं असायचे. रामाचा ध्यास लागला पाहिजे, म्हणायची. 

हे नऊ दिवस ती रोज संध्याकाळी आम्हां मुलांना बोलवून गोंदवलेकर महाराजांच्या गोष्टी सांगायची, शेवटी रामरक्षा म्हणायला सांगायची...

त्याचा खरं तर आम्हा मुलांना कंटाळा यायचा... पण नंतर मिळणा-या  खाऊसाठी आम्ही मुलं म्हणायचो.

नऊ दिवस तर ती नामस्मरण करायचीच पण या दिवसांत तर तिचा चेहरा तेजःपुंज दिसायचा, महाराजांचे प्रवचनाचे पुस्तकाचे तर तिचे पारायण झालेले होते.

रामनाम घट्ट धरावे, अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, स्वतःला पूर्ण विसरून जावे. असं कायम म्हणायची... 

मरण सुद्धा रामाज्ञेने यावे असं म्हणायची.

सानेकाका देवाघरी गेले आणि काहीच दिवसांत काकू भ्रमिष्ट झाली. 

दिवसभर तशी चांगली असायची पण संध्याकाळनंतर फोन लावत बसायची... काही लागायचे तर काही नाही... 

ती मात्र बोलत रहायची, कुठे तरी तिची मुल नसल्याची खंत जाणवायची तर कधी राघव म्हणून कोणाला तरी संबोधून गप्पा मारायची.

आजूबाजूचे लोक, परिस्थिती आता बदलली होती. 

मधुराही लग्न होऊन गेली होती. 

आई कडून नाहीतर राधा कडून फोनकाकूची बातमी कळायची. लग्नानंतर राधाचं सासर  तिथेच होतं. 

फार वाईट वाटायचे... रामाचे ऐवढेही तिच्या कडे लक्ष नाही का? असं वाटायचे. 

खरं तर रागच यायचा.... रामाचा

मधुरा लग्नानंतर पहिल्यांदा फोनकाकूकडे गेली होती तेव्हा अतिशय सुंदर पितळी कोरीव  राममुर्ती तिला भेट म्हणून दिली होती. 

रामाची उपासना सोडू नकोस, राम तुला कधीही एकटं पाडणार नाही. 

रामाला विनवणी करायची कि तू मला आपलं म्हणं..  तेव्हापासूनच मधुरा रामनवमीला  पुजा करायची.

चार वाजता मधुरा गेली रामतीर्थ सोसायटीत. 

आत्ता उठून बोलू लागेल असाच काकूचा चेहरा होता. 

तिथे नमस्कार करून मधुरा राधा जवळ गेली.

'रामाचीच कृपा गं, राधा सांगू लागली, एवढे दिवस काकू कोणाला फोन लावायची काही कळत नसे... पण काल रात्री मात्र तिने लावलेला फोन गोंदवलेकर महाराजांच्या मठात काम करणारा राघव म्हणून मुलगा आहे, त्याला लागला बरोब्बर... 

तिने काय सांगितले ते कळले नाही बघ... 

पण तो राघव आज दुपारी बरोबर रामजन्माच्या वेळेस इथे आला. 

काकूच्या हातून सुंठवडा घेतला आणि काकूने त्याला विचारले आज आहे ना रामाज्ञा?

तो कसं कोण जाणे 'हो' म्हणाला गं.... आणि काकूने जोरात श्रीराम म्हटलं.

काकूचे वाक्य कानात घुमलं..... राम कधीही एकटं सोडणार नाही...  

काकूचा रामावरचा विश्वास आज जिंकला होता...

© नेहा बोरकर देशपांडे
२१|४|२०२१
रामनवमी


सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..


धन्यवाद.!!!

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार


अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने