© नेहा बोरकर देशपांडे.
'एक मिनिट, सायली, काहीतरी गल्लत होतेय, मी त्याला माझ्या जाण्याबद्दल सांगितल तर तेव्हा तो स्वतःच म्हणाला आई,मी नंतर रहात नाही, संध्याकाळीच निघेन.
त्याला मी हो म्हटलंय इतकंच, उलटसुलट शब्द फिरवू नको. इतर सगळ्या नातेवाईकांना मी बोलावणं केलं नाहीये, ज्यांनी स्वतःहून चौकशी केलीये आणि ज्यांना सहज शक्य तेच लोक येणार आहेत. मुख्य म्हणजे थोडक्यात वर्षश्राद्ध करणार आहे मी.',
'आई, अगं, हे ठरवण्याआधी तु मला किंवा दादाला काहीच विचारलं नाहीस ? सायली म्हणाली, एवढंच काय परवा काश्मीरला जाणार आहेस हे पण बुकिंग झाल्यावर सांगितलंस तू...
वसुधाने सायलीकडे एक कटाक्ष टाकला पण काहीही न बोलता आतल्या खोलीत निघून गेली.
सायली आणि सागर हे दोघे वसुधा व वसंत यांची मुले.
सायली लग्न होऊन गावातच रहायला होती.
सागर मात्र मुंबईत नोकरीनिमित्त रहात होता. त्याचेही लग्न झाले होते.
थोड्याच वेळात सागर आणि बायको माधवी ,मुलगा मुंबईहून येऊन पोहचले.
सायलीने चहा करून दिला.
सायली आणि सागर एकमेकांना खाणाखुणा करत होते. माधवी मात्र जेवढ्यास तेवढं करत होती.
रात्रीची जेवण झाल्यावर वसुधाने या चौघांना तिच्या खोलीत बोलावले. जेवायच्या आधी तिने सायलीच्या नव-याला अश्विनला बोलावून घेतले होते.
' काय आई, काय करायचं आहे ? उद्याचं होईल अगं व्यवस्थित, नको जास्त ताण घेऊ, सागर म्हणाला.
वसुधा मंद हसून म्हणाली, अरे ते होईलच , त्याची काळजी नाहीये मला.
तुम्हा चौघांना मी माझे काही निर्णय सांगणार आहे, ते एकत्रच सांगता यावेत म्हणून बोलावलं, अनायासे उद्यासाठी येणार होताच तर आताच सांगू म्हटलं.
'आई, अगं असं काय सांगणार आहेस तू?? , उगीच मृत्युपत्र वगैरे विषय नकोय बरं का? बाबा नाहीयेत यावर अजून आमचा विश्वास बसत नाहीये, त्या तू असं काही बोलू नकोस, सागर तावातावाने म्हणाला.
'अरे, असं काही नाहीये... म्हणजे ते सगळं करणार आहे पण नंतर', वसुधा म्हणाली.
माझं लग्न झालं तेव्हा मी नुकतीच सरकारी नोकरीत लागले होते, वसुधा सांगू लागली. आपल्या घरात तेव्हा आम्ही पाच जण होतो ,तुमचे आजीआजोबा, आम्ही दोघे व आजोबांची आई म्हणजेच माझ्या आज्जेसासूबाई.
त्यामुळे कायम घरात मोठ्यांना विचारून करायची सवय जडली. तुम्ही लहान असताना सासुबाई सांगायच्या. मला आधारच होता तो. सासुबाई पण सगळं व्यवस्थित करायच्या हं, त्यांच्या जीवावर मी नोकरी केली.
ह्यांची कायम फिरतीची नोकरी होती. सुरवातीला जरा जवळची ठिकाणं असायची मग बढती मिळाल्यावर लांब लांबची भारतातील ठिकाणे असायची जवळपास अर्धाहून अधिक भारतभ्रमण म्हटलं तरी चालेल.
मला फिरायची खूप आवड होती, पण व्हायचं काय हे कायम फिरती वर, त्यांना घराचा सहवास कमी मिळायचा त्यामुळे त्यांच्या बरोबर असं कधी फिरणं झालंच नाही .
अगदी कधी गेलो तर कुलदेवतेला ते ही सगळ्यांना घेऊन.
एकदा काय झालं....
सायली तू खूप लहान होतीस, तुला घेऊन कोल्हापूरच्या अंबाबाईला जायचं ठरलं आणि पुढे पन्हाळाला, गेलो देखिल, पण ते एकत्र गेलो ते शेवटचं ठरलं. कारण इथे घरी चोरीचा प्रयत्न झाला.
सासूबाई, सासरे आणि आज्जेसासूबाई घरात असून देखिल, चोरी झाली नाही ,सास-याच्या सतर्कतेने पण याच्या धसका बसून आज्जेसासूबाईची वाचा गेली, ती शेवटपर्यंत.
हे सगळं घरी आल्यावर कळलं.
त्यांच्यावर अनेक उपाय केले पण वयोमान ,मानसिक ताण यामुळे झालं असं डॉक्टर म्हणाले.
तेव्हापासून देवाला गेलो की लगेच घरी यायचाच अलिखित नियमच होऊन बसला, कोणीही मुद्दाम न ठरवता.
पुढे पुढे तर तेही रहात गेलं. ह्यांची फिरती लांबत जायची मग परत कुठे निघा, तुमच्या शाळा, क्लासेस त्यामुळे मी कायम घरातच बांधले गेले.
नंतर सासरे गेले, सासूबाईंनी अंथरूण धरले. त्याचवेळेस माझी नोकरी पेंशन चालू होईल इतकी झाली होती.
'हे म्हणाले, तू नोकरी सोडलेली बरी कारण दिवसभराला बाई ठेवली तर कमावलेलं तिलाच द्यावं लागेल, अशीही तुला पेंशन मिळणार आहे तर तू ठरव....
मलाही ते त्यावेळेस योग्यच वाटलं , घरात कोणीतरी असणं खरंच गरजेचे होते.
पण यात माझे बाहेर जाणे मात्र किराणा आणि भाजी पुरतंच होऊन बसलं. अगदी आईंच करून बाहेर जेवायला जायला पण जमायचे नाही, हे म्हणणार अगं मी रोजच बाहेर खातो, घरी आल्यावर काय परत बाहेर जायचं ? तुम्ही मुलं या ना त्या निमित्ताने खाऊन यायचात ,पण माझा कधी कोणी विचार केला नाहीत.
त्यावेळेस फार जाणवले नाही ,पण त्या माझ्या इच्छा खरंच अपुर्ण आहेत. हे रिटायर्ड झाल्यावर जरा परत नव्याने करू म्हटलं पण मागच्या वर्षी ह्यांनी अचानक न फिरण्याची वाट धरली गं, सायली.
सागर जवळ येऊन बसला, सायलीचे तर डोळे वाहतच होते.
ह्याचे सगळं झाल्यावर सागर तु मला तुझ्याकडे घेऊन गेलास, मलाही बरं वाटलं, पण खरं सांगू का तुम्ही मला नाही सामावून घेऊ शकतात, 'आई ,तुम्ही आराम करा', या नावाखाली मला कायम एक अंतरावर ठेवलंत रे, मी अगदी छान धडधाकट असताना.
आत खोलवर कुठेतरी दुखत रहायचे तिथे असताना.
माझ्याकडून मी खूप प्रयत्न केले तिथे मन रमावायचे, पण नाही जमले रे. परत आले.
इथे सायली येऊन जाऊन असायची पण तिनंही मला गृहीत धरायला सुरवात केली.
'आई, मला आणि अश्विनला पार्टीला जायचं, कधी पिक्चरला, कधी तर चार दिवस ट्रिपला , आर्या व अयानला माझ्याकडे सोडून. माझी त्यांना सांभाळायला ना नाहीये पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. नातवंड प्रियचं आहेत पण ती माझीच जबाबदारी असल्यासारखेच झाले हळूहळू. अडीअडचणीला मी कायम तुमच्या बरोबर आहे पण तेवढ्यापुरतंच ,हे सांगावं लागलं मला तुला सायली.
राग मानू नकोस गं, पण हे सांगणे गरजेचे वाटलं मला.
सायली आणि सागरला तर खूपच वाईट वाटत होतं, पण वेळ निघून गेली होती आता.
वसुधा पुढे म्हणाली , मी एका ट्रॅव्हल कंपनीची सभासद झाले आहे. यापुढे त्यांच्या जिथे सहली असतील तिथे मी जाणार आहे.
आपल्या घराच्या मागच्या खोलीत ऑफिसला जाणा-या एक किंवा दोन बायका भाडेकरू म्हणून ठेवणार आहे.
ज्यांची बदली होऊन इथे आल्या आहेत अशा, म्हणजे शनिवार रविवार त्या त्यांच्या घरी जातील आणि दिवसभर ऑफिस असल्यावर बाकीचा पण कुठला त्रास नाही.
रात्री मलाही सोबत होईल. मी ट्रिपला गेल्यावर पण घराकडे आपोआपच लक्ष राहील, आर्थिक मदत होईल ती वेगळीच.
***
तुम्ही म्हणाल तेव्हा जरूर तुमच्या घरी येईन , मी इथे असताना तुम्हीही हक्काने येऊच शकता.
पुढचे पुढे जसं घडेल तसं माझे 'निर्णय' मी सांगत जाईनच.
मला वाटतं, आता तुमच्या शंकांच निरसन झालं असेल.
सागर, माधवी आणि सायली, अश्विन या चौघांनी माना डोलावल्या.
वसुधानेही मनातल्या मनात 'स्वःत' घेतलेल्या निर्णय बद्दल स्वताची पाठ थोपटली.
***
समाप्त
© नेहा बोरकर देशपांडे.
© नेहा बोरकर देशपांडे.
सदर कथा लेखिका नेहा बोरकर देशपांडे यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
