एल. ओ. सी

© अपर्णा देशपांडे



रावी आज जास्तच हिंसक झाली होती . 

गेल्या काही दिवसांच्या रौद्र पावसाळी थैमानाने तिचा अवखळपणा जाऊन तीला आक्रमक बनवले होते .

भारतीय सेनेचा एक ट्रक गेल्या दोन दिवसांपासून पंजाल गावात अडकला होता . 

पलीकडच्या मिलिटरी बेसवरती रसद पोहोचवण्या साठी त्यांना पंजाल पार करून जाणे भाग होते . 

ट्रक सोबत ड्रायव्हर , नायब सुभेदार मनप्रित आणि सुभेदार तेजनसिंग असे तीन जण होते . 

बाकी दोन ट्रक पुढे गेले होते .

इतक्या पावसातही त्यांनी सगळ्यांनी एक संपुर्ण दिवस ट्रक मधेच काढला होता .

त्या रस्त्या लगत एका छोट्या गावातील लोकांना जेव्हा हे कळाले , तेव्हा त्यांना रहावले नाही . काही जण तिथे आले .

अत्यंत आदराने ते जवानांना भेटले .

" सरजी , तुम्ही सगळे आमच्या सोबत गावात चला . सुके कपडे घाला .दोन घास आमच्या बरोबर खा , पूर ओसरला की जावा पुढे . "
 
सुभेदार साहेब म्हणाले ,
" धन्यवाद , पण आम्हाला ह्या सगळ्याची सवय आहे . चिंता करू नका . "

गावकऱ्यांनी ऐकलेच नाही , आणि वातावरण निवळायची चिन्ह ही नव्हते , म्हणून ट्रक सहित सगळे गावात गेले .

ड्रायव्हर बरकतसिंग आणि दोघे यांना एकाच घरात रहायला मिळाले . 

घर अगदी छोटे होते . एक दोन ठिकाणी गळत पण होते . 

घरात कृपाल चाचा , चाची आणि त्यांची एक तरुण मुलगी कमलीआणि पाच वर्षांचा नातू अंगद, इतके कुटुंबीय होते . 
अंगद ला खूप उत्सुकता होती .

" ही बंदूक आहे ? "

" हा बेटा . ही रायफल आहे . "

" त्यांनी माझ्या बाबाला अशाच रायफल नि मारलं . "
 
" मला पण सैनिक बनायचंय . "
अंगद बोलून गेला .

एकदम कमली पुढे झाली .

तिने पटकन त्याला आत नेले .

मनप्रित अतिशय अस्वस्थ झाला होता .

ते लक्षात येऊन चाचा म्हणाले ,
" काही अतिरेकी घुसले होते गावात .

माझा मुलगा हट्टा कट्टा जवान होता .

सरळ जाऊन भिडला . 

दोन जणांना त्यांच्याच बंदुकीने मारले . 

पण बाकी गाववाले कुणीच आले नाहीत मदतीला . 

एकटा किती पुरणार ....

एक विचित्र शांतता पसरली . 

भिंतीवर तरुण माणसाचा हार घातलेला फोटो होता .

" चला , जेवण तय्यार आहे . "

चाचीने गरम गरम जेवण करून वाढले . 

सगळ्यांना भूक लागली होती , सगळे पोटभर जेवले .
 
" तुम्ही पण घ्या न आमच्या सोबत . " सुभेदार म्हणाले .

" अंगदला दे ग जेवायला . बाकी नंतर बघू . "

कमलीने छोट्या अंगदला वाढले .

बाहेरच्या खोलीत तीन पाहुण्यांची सोय केली होती .

बाकी घरातील लोकं पण झोपायची तयारी करत होते .

" साबजी , भांडे तर सगळे रिकामे झाले होते . त्यांचं जेवण आपण जेवलोय . आता काही अन्न नाही असं दिसतंय . " न रहाऊन मनप्रित म्हणाला .

" किती मोठ्या मनाची माणसं ही . कोण लागतात आपली. 

तरुण मुलगा गेला , लग्न झालेली मुलगी इथेच आहे ,
दारिद्र्य दिसतंय ते घरातील फुटक्या वस्तुतून . 

मनं मात्र किती श्रीमंत !! "
 
" सगळी माणसं अशी का नसतात रे मनप्रित ? किती आनंद भरला असता न साऱ्या पृथ्वीवर ? मग देशा देशांत मध्ये LOC ची गरजच पडली नसती . कुणी कुणाच्या जीवावर उठणार नाही ....कुणी कुणाची रोटी हिसकावून घेणार नाही . असेल फक्त देण्याची भाषा ... चला थोडावेळ झोपा , जातांना रस्त्यात काही पोते धान्य घेऊन ट्रक मध्ये टाकायचेय . 

त्यांनी मोठ्ठा श्वास घेतला .

पावसाचे तांडव शांत झाले होते . 

रस्ता मोकळा झाल्याची खबर आली होती . 

अगदी पहाटे साडे चारलाच तिघे निघाले . 

चाचा , चाची त्यांना निरोप द्यायला उठले होते . 

अत्यंत प्रेमाने गळाभेट घेऊन तिघे निघाले . 

ट्रक वस्ती बाहेर गेला. 

डोळे चोळत कमली बाहेर आली .

पापाजी , त्यांना थांबवा ....गेले का ते ?

 हे अंगद च्या खिशात होतं .

तिने दाखवले . ती एक चिठ्ठी होती .

' चाचाजी , आम्ही आर्मीवाले हे दुर्दम्य आशावादावर जगतो. आमच्यातील ऊर्जा अशीच पेटती ठेवायचे फार मोठे काम आपल्या सारखे लोक करत असतात . 

भावी मेजर अंगद ला
आमचा जयहिंद !!!!.'

भरल्या डोळ्यांनी चाचाने पाहिले ,
सहा पोते धान्य कोपऱ्यात शिस्तीत रचून ठेवले होते .


© अपर्णा देशपांडे

शेअर करायची असल्यास कृपया मूळ नावासकट करावी .

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने