नाकारलेली ती

सौ प्रभा कृष्णा निपाणे.


आज सकाळ पासूनच ती जरा अस्वस्थ होती. कारणही तसेच होते.  नववा महिना सरत आला होता.  

कामावर जाण्याशिवाय पर्याय नव्हता. 

नवऱ्याच्या एकट्याच्या मजुरीवर सारे भागणार नव्हते . खाणारी सहा तोंडे घरात होती. 

धरसोड करत काम उरकले. आपली आणि नवर्याची शिदोरी बांधली आणि निघाली कामाला. 

चार ,पाच वाजेतोवर काम केले. 

शेवटी मालकाला सांगुन ,थोडे निंदायचे बाकी ठेवून निघाली घरी यायला. 

आल्या आल्या कपभर चहा केला . गुळाचा , बिन दुधाचा. 

पोटात कळा चालुच होत्या. चूल पेटवलेलीच होती. लगोलग भाकरीचे आधण ठेवले . 

तो वर एका बाजूने भाजी फोडणी घातली. कश्या बस्यां दहा बारा भाकरी थापल्या आणि पुंन्हा थोडा वेळ आडवी  पडली. 

तेवढ्या सासूची गर्जना झाली. 

अरे देवा !

ही काय झोपाची वेळ हाये का ? 

काही लाज ? 

 शरम ? 

दिवाबत्तीच्या टायमाले कोणी अस बुहाऱ्या सारखं झोपते का? 

चाल उठ लवकर ! 

कण्हतच म्हणाली , सासुबाई पोटात खूप दुखत आहे. दिवस पण भरले. 

तुम्ही आपल्या पारबती मांगीन ला बोलावून आणता का? अंगावर पण जात आहे !

लगोलग सासुबाई पायात पायताण अडकून गेल्या. जातांना सूचना देऊन गेल्या. कळशीभर पाणी गरम करायला ठेव ! 

आंगपाय धुवाले लागण ! 

पाणी गरम करायला ठेवले. 

पोटातून कळा वर कळा यायला लागल्या. तेवढ्यात सासुबाई पण आल्या पारबती मांगीन ला घेऊन. 

हे पण आले कामावरून. 

सगळ्यांनी तोवर जेवण आटोपून घेतले. 

पारबती मावशी तिला धीर देत होत्या. ती मात्र आतून खूप हादरून गेली होती.

तशी ती काही घाबरायला पहीलट करीन नव्हते . घाबरण्याचे कारण वेगळेच होते. 

पहिल्यांदा ती गरोदर होती तेव्हा मुलगा झाला होता. वंशाचा दिवा म्हणून सगळेच खूप खूष होते. बाळपण मस्त गुटगुटीत होते. पण काय झाले कोणास ठाऊक  ? 

तो सहा महिन्यांचा झाला. नुसते दोन दिवसाच्या तापाचे निमित्य झाले आणि बाळ गेले. वंश वाढ खुंटली. कारण त्यानंतर सलग तीन मुली झाल्या होत्या. 

पहिली मुलगी झाली.  सगळे खुष होते. पहिली बेटी, धनाची पेटी असेच म्हणत होते. 

पण नंतर  सलग दोन मुली झाल्यावर सासूने आणि नवऱ्याने घर डोक्यावर घेतले होते. 

आता तर दोघांनी ठाम सांगितले होते . 

आता जर मुलगी झाली तर आम्ही तिला तुझ्या आंघोळी साठी जो घरात खड्डा करतात . त्यात टाकुन वरून माती टाकुन पुरून देणार. 

 ती देवाला मनोमन प्रार्थना करत होती. 

देवा !  मुलाचेच दान घाल रे बाबा पदरात ! 

पुन्हा  तिच्या डोक्यात विचार यायचे .

बापरे ! 

मुलगी झाली तर !!!!

खरच मारून टाकतील का माझ्या बाळाला ? 

देवा नको रे माझी अशी परीक्षा घेऊ.  

या धर्मसंकटातून सोडव रे बाबा ! 

मुलगाच होऊ दे ! 

मिळू दे एकदाचा यांना वंशाचा दिवा ! 

चालवू दे घराण्याचे नाव !  तेवढ्यात  तिला एक जोराची कळ आली आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आला. 

सगळ्यांचे कान त्या बंद दाराकडे होते. खड्डा करून तयार होता. पारबती मावशी बोलल्या पुन्हा मुलगीच झाली !!!!

तशा तिच्या  सासूबाई तरातरा उठल्या. 

पुन्हा कार्टीच झाली रे बाबा ! तुव्ह नशिबच फुटक त्याले कोणी काय करणार ? 

टाक आता तिले मारून !

काही विचार करू नको ? 

टाक तीले त्या खड्ड्यात !  कितीक पोरी उजवशीन ? (लग्न करून देशींन) 

पिचक एकडावची  ! 

सासूने पोरीला हातात घेतले . 

नुकतीच बाळंत झालेली ती कुठून इतके बळ आले कोणास ठाऊक.  

ती उठली, सासूबाईंच्या हातातून पोरगी घेतली , घट्ट पोटाशी धरली आणि सगळ्यांना ठणकावून सांगितले.

खबरदार  ! 

माझ्या पोरीला कोणी हात लावेल तर !!!! 

मी !  ही. !  पाहते कोण तिला मारून टाकते तर ? 

मारून टाकायसाठी मी तिला नऊ महिने पोटात नाही वाढवली ! 

मी तसेही कामाला जातेच ! अजून जास्त काम करीन !  पण ! पण !  तिले मारून टाकू देणार नाही. 

मी ! मी ! 

मी तिले वाढवीन ! 

येऊन दाखवा माझ्यापुढे ! बघतेच एकेकाला ? 

सगळे जागेवर गप्प. तिच्या त्या उग्र रूपाने सगळे शांत बसले . 

सासूने मात्र तीचा अजिबात लाड केला नाही. नवरा मात्र खूप लाड करत होता. 

ती  मात्र  तिचे सारे काही करत होती. तिला ही काय समजत होत कोण जाणे ? 

 तिने कधी बाबा म्हणून तोंडातून शब्द काढला नाही का आजी म्हणाली नाही! 

ती एक वर्षाची झाली आणि दुसऱ्याची मोलमजुरी करणारे  तिचे बाबा, त्यांना एका कोऑपरेटिव्ह बँकेत ड्राइवर म्हणून नोकरी लागली. 

गिरगिट रंग बदलत नसेल तशी माणसे रंग बदलतात. 

लगेच  तिच्या सासूबाई म्हणाल्या भाग्यवान आहे हो माझी नातं ! 

लगेच बापाला नोकरी लागली! लक्ष्मीच्याच पावलांन आली ! नवरा पण तेच म्हणायला लागला !

ती  म्हणाली , का मारून टाकणार होते न तिला?

आता बरी लक्ष्मी दिसते !

अजून एक सुखद धक्का मिळाला. 

ती झाली, त्या नंतर तीन वर्षाने पुन्हा दिवस गेले. यावेळी मात्र मुलगा झाला आणि ह्या मुलीचे भाव मात्र वाढले. कारण तिच्या बाबांना नोकरी लागली आणि  तिच्या पाठीवर भाऊ पण झाला.

तिला तिचा जन्म झाला तेव्हाच्या गोष्टी कोणी कोणी सांगत होते. तुला मारून टाकणार होते. हे ऐकून तिच्या बाल मनावर याचा  खूप खोलवर परिणाम झाला. 

तिने वयाच्या तेरा वर्षा पर्यंत आपल्या बाबांना , बाबा !  अशी हाक कधीच मारली नाही कि , आजीला आजी म्हणाली नाही! 

आई आणि बाबा दोन्ही तिच्यासाठी तिची आईच !  काही लागल तर आईलाच बोलणार.

तिचे बाबा तिला  खूप समजावून सांगायचे . म्हणायचे बेटा तू तर माझी गुडिया आहे ! 

 बेटा चुकलो मी ! 

पण ही,  हु नाही ! 

का चू नाही ! 

एक दिवस कोणत्यातरी गावी जात होते. सोबत ही आणि पाठचा भाऊ होता. बोलतात बोलता बाबाने तिला घट्ट मिठी मारली. म्हणाले बाई चुकलो माँ मी ! 

या बापाला तू कधीच माफ करणार नाही का ?

एकदाच बाबा म्हण ! 

तुझ्या तोंडून बाबा ऐकायला आसुसलो बेटा ! 

 पाण्याने डबडबले बाबांचे डोळे आज तीने पहिल्यांदा पाहीले.  

तिचे बाबा तिच्या आई जवळ  नेहमी आपल्या चुकीची कबुली द्यायचे . पण आज त्यानीं चक्क लेकी जवळ आपल्या चुकीची कबुली दिली होती. 

पुन्हा म्हणाले, काहीतरी बोल  बेटा ! 

इतकी मोठी शिक्षा नको देऊ माँ ! 

या बापाला! 

मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार ??? 

तीचे मन आज पाझरले आणि..आणि तिने पहिल्यांदा त्यांना बाबा ....!!!! अशी हाक मारली आणि घट्ट मिठी मारली. 

बाबा आपल्या लेकीला मायेने कुरवाळत होते. ती सुध्दा आज बाबांच्या मिठीत विसावली होती. 

दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

    

  सौ प्रभा कृष्णा निपाणे

   कल्याण.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने