© अस्मिता देशपांडे
किर्ती आज जरा रागातच होती... त्याला कारणही तसेच घडले होते.. कार्तिकने तिला खबरच तशी सांगितली होती ना!!
कीर्तीच्या दोघी मोठ्या नणंदा अश्विनी आणि विशाखा आठ दिवसांसाठी माहेरी येणार होत्या. मुलांना घेऊन.
सासूसासरे आणि पुन्हा या सगळ्यांचे करावे लागेल या विचारानेच किर्ती जाजावली गेली होती.
सासूसासरे दोन मुलांचं सगळं करण,आणि घरचे काम हे सगळं कसे सांभाळावे याचीही तिला धाकधूक लागली होती.
पुन्हा मोठ्या नणंदा म्हणजे, काही चुकलं तर टोमणेही मारत राहतील की काय याचीही थोडी धाकधूक होतीच मनात.
सासुबाई होत्या मदतीला पण तरीही तिच्या डोक्यावर टांगती तलवार होतीच!!
कार्तिक मात्र खूष होता.. कितीतरी वर्षानंतर दोघी बहिणी एकत्र माहेरपणासाठी येणार होत्या.. ते ही एवढ्या दिवसांसाठी!!
तसंही त्यांचे फार येणे व्हायचे नाही. काही कार्यक्रम असला तर त्या यायच्या आणि लगेचच परत जायच्या.
आता जवळपास तीन चार वर्षांनी हा योग आला होता.
ठरल्या दिवशी दोघी त्यांच्या मुलांसोबत आल्या. किर्ती आणि कार्तिकने अगदी आनंदाने स्वागत केले.
आईबाबा पण खूप खूष झाले.
कितीतरी दिवसांनी ते सगळी नातवंडे एकत्र पाहत होते. आपलं सुखाचं गोकुळ अनुभवत होते.
पहिल्या दिवशी किर्तीने अगदी सुंदर स्वयंपाक केला सगळ्यांचा एकटीने.
दोघी नणंदानी भरभरून कौतुक केले तिचे. सासुबाईंनीही माझी गुणांची सून म्हणून खूप कौतुक केले कीर्तीचे.
संध्याकाळी पुन्हा वेगळा स्वयंपाक करताना कीर्तीला वाटले आता कोणीतरी मदतीला येईल पण कोणीच किचनकडे फिरकलेसुद्धा नाही.
सासुबाई सुद्धा मस्त गप्पा मारत बसल्या होत्या.
झालं कीर्तीचा पापड मोडला. तिला राग आला होता पण सांगते कुणाला?
धुसफूस करत तिने कसाबसा स्वयंपाक केला.
सगळ्यांना बोलवायला गेली.. तर जोरजोरात हसण्याचा आवाज येत होता बेडरूम मधुन.
आई आणि तिच्या दोघी मुली गप्पा मारत होत्या आणि किर्ती जशी आली तशा तिघी गप्प झाल्या आणि कुजबुज सुरु झाली त्यांची.
हा प्रकार जवळपास चार पाच वेळेस झाला होता.
तिघींच्या गप्पा चाललेल्या असायच्या आणि किर्ती तिथे गेली की लगेचच त्या तिघी गप्प बसायच्या किंवा लगोलग विषय बदलायच्या.
त्यामुळेच कीर्तीला अजूनच राग आला तिने थोड्या मोठ्याच आवाजात सांगितले चला जेवायला वाढले आहे आणि ती रागातच किचनकडे वळली.
दुसऱ्या दिवशीसुद्धा असेच झालं.
किर्ती एकटीच राबत होती किचन मध्ये आणि या तिघी मात्र मस्त गप्पा मारत बसल्या होत्या.
वरून कार्तिकला काही काही वस्तू घेऊन येण्याचीसुद्धा ऑर्डर सोडत होत्या.
किर्ती त्यांच्या खिजगणतीतही नव्हती.. कार्तिक ही किर्तीला काही आणायचे आहे का विचारात नव्हता.
भरीस भर म्हणजे चारही भाचे कंपनी मामी हे कर,मामी ते कर म्हणून तिच्याच मागे लागली होती.
कीर्तीचा राग वाढतच चालला. त्यात कार्तिक सुद्धा काही मदत करायला येत नव्हता.
तो ही वर्क फ्रॉम होम करत होता आणि उरलेल्या वेळात मस्त बहिणीसोबत गप्पा गोष्टी करायचा.
किर्ती दोनच दिवसात घरकामाने बेजार झाली त्याही पेक्षा डोक्यात राग होता त्यामुळे ती जास्त थकली होती.
तिसरा दिवस उजाडला. आज थोडी मुद्दामच उशिरा उठली किर्ती.
तिला वाटले चहा झाला असेल सगळ्यांचा एव्हाना. बाहेर येऊन पाहते तो काय सगळे वाटच पाहात होते तिने चहा करण्याची.
कीर्तीचा रागाचा पारा पुन्हा चढला आणि तिने धुसफुसतच चहाचे आधण टाकले.
सर्वाना बसल्याजागी चहा नेऊन देताना ती धूमसत होती रागाने.
ह्यांना काय जातंय मस्त चहा घ्यायला. एका कामाची मदत करत नाहीत अगदी.
सासूबाई सुद्धा केवढ्या बदलल्या दोनच दिवसात. त्याही काही विचारत नाहीत.
मी एकटीच किती न काय काय करू. कंटाळा आलाय मला. हे विचार फिरून फिरून तिच्या डोक्यात येत होते.
झालं... चहा झाला... आणि मग किर्ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली.
आता हा उरकणे तिच्या अगदी जीवावर आलं होतं पण करते काय..
रागात तिने कुकर उचलला तेवढ्यातच घरातले सगळे तिच्या मागे येऊन उभं राहिले आणि सर्वांनी मिळून जोरात हैप्पी बर्थडे टू यू डिअर किर्ती म्हणत तिच्यावर फुले उधळली.
पाठोपाठ दोघी नणंदा एक सुंदरसा केक आणि हातात तिच्या आवडत्या रंगांची गर्द हिरवी पैठणी घेऊन उभ्या होत्या.
तिला घेऊन सगळेच एका बेडरूममध्ये गेले.
तिथे तिच्या लहानपणापासूनच्या फोटोचा सुंदर असं कोलाज तयार केलेला होता.
तिच्या आवडत्या निशिगंधाच्या फुलांनी पूर्ण रूम सुंदर सजवली होती. तिची आवडती गाणी मंद आवाजात लावली होती.
एकूणच वातावरण किर्तीची आवडनिवड लक्षात घेऊन केले होते.
अश्विनी आणि विशाखा पुढे होत तिला म्हणाल्या, अगं तुझा वाढदिवस येतोय पंधरा दिवसांनी पण तेव्हा आम्ही नसणार ना.. म्हणून आम्ही दोघीनी आजच तुला सरप्राइज द्यायचं ठरवलं.
त्याचीच चर्चा दोन दिवस करत होतो आम्ही आणि कार्तिकने सांगितलं होतं तुझी थोडी फिरकी घ्यायला.
त्याला बाईसाहेबाना रागाला आणायचं होतं म्हणून त्याने आम्हाला सूचनाच दिली होती तशी काही मदत करू नका तिला. मज्जा करू तिची.
रागानंतर आलेलं सरप्राईज जास्त गोड वाटेल ना तुला म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा कट रचला.
तुला राग आलाच होता नं. आम्हाला जाणवला तो.
किर्ती या अनपेक्षित गोड धक्क्यातून सावरतच होती.
तिला स्वतःच्या वागण्याचे मनातुन वाईट वाटले.
या दोघी आपल्यासाठीच काहीतरी गोड प्लॅन करत होत्या आणि आपण काहीतरी वेगळाच विचार करत होतो या विचाराने अपराधीपण दाटून आले तिच्या मनात!!!
पण तेवढ्यात कार्तिक तिच्या जवळ जातं म्हणाला मग काय बाईसाहेब.. आता खूष नं?? आज तर तुम्हाला स्वयंपाक करायचा नाहीय करण आज आपण सगळेच बाहेर जातो आहोत तुझ्या रागावरचा उतारा म्हणून!!! आता पैठणी नेसून तयार होऊन ये पाहू पटकन.
किर्तीच्या घशात आवंढा आला तो तसंच ठेवत ती अश्विनी आणि विशाखाला म्हणाली, ताई माफ करा मला. थोड्या वेळासाठी का होईना पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग दाटून आला होता.
अश्विनी आणि विशाखा हसतच तिला म्हणाल्या ..अगं ठीक आहे होतं असं कधी कधी नात्यात. कधी राग तर कधी प्रेम हेच तर नात्यांना भक्कम बनवतात.. नाही का!!
आणि तुझा राग खरंतर अळवावरच्या पाण्याच्या मोत्यासारखा आहे. हात लावला की विरून जाणारा म्हणून तर तू या घरची लाडकी आहेस सगळ्यांची.
किर्ती हे ऐकून भारावली आणि आनंदाने पैठणीची घडी मोडण्यासाठी वळली.
© अस्मिता देशपांडे
सदर कथा लेखिका अस्मिता देशपांडे यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
