झुरळं

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)



सकाळचे आठ वाजलेले अन् नीताची धावपळही चाललेली.

नुकताच देवेंद्र‌ टिफिन घेऊन ऑफिसला गेला... चिनू अजून उठायचाय्...‌ दूध तापायला ठेवलंय् ... सासूबाईंचा नाष्टा व्हायचाय् ... बिलं भरायचीत... दुपारी नेट स्लो असतं ...अजून आंघोळीचा पत्ता नाही ... नीता चांगलीच वैतागली होती.


'डिंग डॉंग' ...बेल वाजली... घाईच्या वेळी कसली मेली कटकट ... नीताच्या मनात आलं.

"नीतूss, कोणी आलंय गं ..." सासूबाईंनी बैठकीतूनच हाळी दिली ...‌

"अहो, येतेय्...ऐकू येतंय मला..." नीताच्या स्वरातून वैताग स्पष्ट जाणवत होता. "ह्यांचं काय..? दिवसभर पाय लांब करून बैठकीत बसलेल्या असतात ... ऑर्डरी सोडायला..." पुटपुटतच नीता दरवाजाकडे धावली.

"नमस्कार , मी प्रिया मुजुमदार, काल रात्रीच वरच्या मजल्यावर राहायला आलो आहोत आम्ही" उभ्या असलेल्या स्त्रीनं ओळख करून दिली.

जीन्स-टॉप ,मोठ्ठाले ईअर रिंग्स, भडक लिपस्टिक आणि मोकळे केस ... ह्या पेहरावाला विसंगत अशी हातात कळशी...

"आत या नं ..." नीतानं प्रसंगावधान राखलं. "पाणी हवंय का तुम्हाला?" तिच्या हातातल्या कळशी कडे पाहून नीतानं अंदाज बांधला ...

"अहो, काय झालं ... वॉटर प्युरिफायरचं फिटिंग व्हायचं आहे अजून ... मंदार गेलाय पाण्याची कॅन आणायला ...पण घरात पाण्याचा थेंबही नाही म्हणून ..."

"या ,स्वयंपाकघरातच या ..." नीता सासूला ओलांडून तिच्याबरोबर स्वयंपाक घराकडे आली ...

"तुमचा पण वन बीएचकेच का ?" प्रियानं येतायेता चटकन घराचं निरीक्षण करून घेतलं होतं !

"हो, घरात आम्ही चौघंच... आम्ही दोघं, आमचा तीन वर्षाचा मुलगा आणि सासूबाई ..." नीता सांगू लागली ... "एक नणंद आहे, ती बेळगावला असते ..भाड्याच्या घरापेक्षा बरा म्हणून हा फ्लॅट घेतला.  पैशांची सोय झाली की टू बीएचके घेणार आहोत ..."

"तुमच्याकडं कोण कोण ?" नीतानंही चौकशी केली ...

"मी आणि मंदार आम्ही दोघेच ... दोघेही आयटी कंपनीत आहोत..." प्रियानंही आपुलकीने माहिती दिली ...

एव्हाना नीतानं  तीन कपांत कॉफी ओतली ..."सासूबाईंना गुडघ्यांचा त्रास आहे. फार चालू शकत नाहीत त्या ... त्यांचा मुक्काम हॉलमध्येच असतो ..."

नीतानं खूण केली तशी प्रियाही तिच्या मागे चालू लागली ...

प्रियानं सासूबाईंना वाकून नमस्कार केला ..."इष्टपुत्रा सौभाग्यवती भव..." आशीर्वाद मिळताच प्रिया गडबडली.

"मुलंबाळं किती ?" सासूबाईंनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. 

"नाही अजून... आमचं प्लॅनिंग सुरू आहे " प्रियानं धीटपणे सांगितलं ... "आणि सासू सासरे..." सासूबाईंचा पुढचा प्रश्न तयारच होता...

"सासरे आमच्या लग्नाआधीच वारले. सासूबाई एकट्याच असतात गावाकडे ... शहरात आम्ही दोघंही बिझी... त्यांना करमणार नाही इकडे ...म्हणून आणलं नाही त्यांना..." प्रियानं कॉफीचा कप खाली ठेवला ... पाण्याने भरलेली कळशी उचलली अन् घाईघाईनं काढता पाय घेतला ...

नीताला मनोमन तिचा हेवा वाटला ... कॉफीचे रिकामे कप घेऊन ती स्वयंपाकघरात सिंकजवळ आली ..

"अगं बाई झुरळ ...!" एक लहानसं झुरळ सिंकमधून ओट्यावर प्रवेश करण्याच्या बेतात होतं ... तिनं ठाकठोक करून झुरळाला घालवून दिलं...

"झुरळांचा पक्का बंदोबस्त वेळीच करायला हवा नाहीतर एकाची पन्नास होतील ती ..." सासूबाईंनी बैठकीतूनच आवाज दिला .

सासूबाईंची ही सवय नीताला मुळीच आवडत नसे. 

ती काही अडाणी नव्हती ! संगीतात एम ए  केलं होतं तिनं ... लग्नापूर्वी एका कॉलेजात लिव्ह व्हेकन्सीवर नोकरी देखील करत होती. 

लग्न ठरताच तिनं सासरच्या गावी एका शाळेत संगीत शिक्षकेकरिता अर्ज देखील केलेला ...

मधुचंद्राहून दोघे परत आले‌ अन् त्याच दिवशी तिच्या सासऱ्यांना पक्षाघाताचा झटका आला ... त्यातच सासूबाईंचा गुडघ्यांचं जुनं दुखणं वाढायला लागलं ... 

दवाखान्याच्या फेऱ्यांमध्ये नीता दमून जाई. त्यातच चिनूची चाहूल लागलेली.. तिच्या नोकरीचा प्रश्न न बोलताच निकालात निघाला होता.‌

बाळंतपणानंतर‌ सव्वा महिन्यातच  ती सासरी परतली अन् तिचे सासरे वारले. त्या दिवसापासून ती जी रहाटगाडग्याला जुंपली ...ती आजतागायत ...

मघाचंच झुरळ आता त्याच्या दोन-तीन जोडीदारांना सोबत घेऊन आलं होतं. तिनं त्यांना घालवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.

तिनं आता घाई केली. चटचट स्वयंपाक आटोपला. आंघोळ केली. चिनूलादेखील आंघोळ घालून तयार केलं आणि जेवू घालून शेजारी खेळायला पाठवलं. 

दोघींची पानं घेतली आणि सासू-सून जेवायला बसल्या. 

जेवण झाल्याझाल्या सासूबाईंनी ताटातच हात धुतले पण शोप खाऊन पुन्हा त्या वॉकरच्या साहाय्याने बैठकीत आराम करायला गेल्या.

मागचं आवरता आवरता नीताचं  विचारचक्र पुन्हा फिरू लागलं.. "त्या प्रियाकडे सासू नाही.. शेजारच्या दीपालीनं सुद्धा सासूला नणंदेकडे पाठवलंय्.. आणि माझ्या मामेबहिणीनी तर सासूला वृद्धाश्रमात ठेवलंय् ... मी मात्र सासू सांभाळायची... दिवसभर गुडघे दुखतात म्हणून गुडघे धरून बसतात... घरात काडीची मदत नाही...उलट मलाच त्यांची सेवा करावी लागते... त्यातून ऑर्डरी ऐका त्यांच्या..." झुरळांनी आता सिंकच्या भिंतीवर मोर्चेबांधणी सुरू केली होती.

"तरी लग्नानंतर मी देवेंद्रला म्हटलेलं, की आत्ताच चान्स नको घेऊ या ...पण तो पक्का श्रावण बाळ ! आई-वडील दैवत त्याचं! आई-बाबांना नातू बघायची घाई‌ झाली म्हणून मातृत्व लादलं माझ्यावर ... मी अडकले संसारात आणि हा मस्त मोकळा..!"

झुरळांची फौज वाढतच होती...

"आज बोलेन मी देवेंद्रशी... सासूबाईंना बेळगावला पाठवू‌ या ..मला विश्रांती हवीय् ... मला माझी स्पेस हवीय् ..."

झुरळांची फौज ओट्यावर आक्रमणाच्या तयारीत होती...

"मला नोकरी करायचीच ! चिनूला हवं तर पाळणाघरात ठेवू या ! नाहीतर माझ्या आईकडे पाठवीन.. आई सांभाळेल त्याला ! पण मी घरात थांबणार नाही ! 'संसार एके संसार'  मला जमणार नाही !"

झुरळांच्या फौजेचं ओट्यावर आक्रमण झालं होतं ...

नीता भानावर आली. तिनं भराभर ग्लोव्ह्ज चढवले .. चेहऱ्याला मास्क लावला अन् कपाटातून कीटकनाशकाची बाटली काढून ओट्याच्या खाली-वर, सिंकच्या छिद्रांत तिनं स्प्रे मारायला सुरुवात केली..

तिला भोवळ आली.. ती दिवसभराच्या विचारांमुळे की कीटकनाशकाच्या वासामुळे... तिला कळलं देखील नाही !

भानावर आली तेव्हा ती त्यांच्या झोपायच्या खोलीत होती. देवेंद्र फोनवर डॉक्टरांशी बोलत होता.

तिला कपाळावर थंडगार मऊ स्पर्श जाणवला. 

सासूबाई तिच्या उशाशी तिच्या कपाळावर हात ठेवून बसल्या होत्या. 

तिनं पडल्या पडल्याच चिनूची चाहूल घेतली..तो तिचा हात त्याच्या चिमुकल्या हातात घेऊन बसला होता...!

अचानक तिला मळमळल्यासारखं झालं. "अरे, देवेंद्र .. हिला ओकारी .." सासूबाईंचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच पोटातल्या मळमळीनं बाहेर पडण्यासाठी तोंडाची वाट निवडली होती ...

सासूबाईंनी मागचापुढचा विचार न करता आपली ओंजळ तिच्या तोंडाजवळ नेली अन् तिच्या पोटातली मळमळ आपल्या हातात गोळा केली.

नीताला आता बरं वाटू लागलं होतं .. ती फ्रेश होऊन आल्यावर सासूबाईंनी देवेंद्रला बोलावलं.

"देवेंद्र अरे, मी बेळगावला जायचं म्हणते आठ दहा दिवस... चिनूला पण घेऊन जाईन ... तो ही आठवण काढतो आत्याची ..." नीता चकीत झाली..

"अरे व्वा ! आम्ही पण येऊ .." नीताला न विचारता परस्पर निर्णय घेण्याची देवेंद्रला सवय होतीच.

"पण, रजा ..?"

"मिळेल अगं,  क्लोजिंग आटपलंय!  आठ दिवस रजा नक्कीच घेऊ शकतो मी ...!"

"जर तुला रजा मिळतेच आहे तर तुम्ही दोघंच फिरून या कुठंतरी.." हा आवाज सासूबाईंचा होता ! नीता मनातून सुखावली ..!

"आणखी माझी एक इच्छा आहे, देवेंद्र .." सासूबाई पुढे बोलू लागल्या.."चिनू आता मोठा होतोय यावर्षी शाळेतही जाईल.. तेव्हा.."

नीता पुन्हा घाबरली .. "आधी फिरायला जा म्हणाल्यात...आता यांची इच्छा म्हणजे नक्कीच चिनूला भावंडं ...!" नीताच्या अंगावर काटा उभा राहिला .

"हं, बोल नं आई " देवेंद्रचं लक्ष आईच्या बोलण्याकडं लागलं होतं.

"अरे , नीतानं आता स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. स्वतःलाही वेळ द्यायला हवा... तिचे छंद जोपासायला हवेत ..!"

"चिनू शाळेत गेला की मी दुपारची तुमच्या बेडरूममध्ये थांबत जाईन. नीताला हॉलमध्ये गाण्याचे क्लासेस घेऊ देत ..."

नीताचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना. तिच्या नकळत ती सासूबाईंना बिलगली ...

"मी चहा करून आणतो" देवेंद्र स्वयंपाकघराकडे जायला निघाला..

"नको नको,  मी करते" म्हणत नीता उठली अन् स्वयंपाकघरात गेली.

स्वयंपाकघरात ओट्यावर काही झुरळं मरून पडली होती... आणि काही विचारांची झुरळं तिच्या मेंदूतही ...काही मात्र जिवंत होती..पण मरगळलेली...

तिनं किचन वायपर हाती घेतलं आणि सगळी झुरळं काढून टाकली ... ओट्यावरची आणि मेंदूतलीही ...

तिचा ओटा अगदी लख्ख झाला होता ..अगदी तिच्या 'मना'सारखाच!

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

2 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने