© अपर्णा देशपांडे
गोपिकीशन ने पांघरूण दूर सारलं , शरीर वेडं वाकडं पिळून आळस दिला , आणि घड्याळाकडे बघितलं . चांगले अकरा वाजले होते .
ऑफिस तर केव्हाच सुरु झालं होतं , पण त्याच्या मते आपल्या सोईने , निवांत सगळं आटोपून मग ऑफिस ला जाण्यात वेगळीच शान होती . जीवाची तगमग करून वेळ गाठणं त्याच्या 'शिस्ती' च्या विरोधात होतं .
त्याच्या व्याख्येनुसार कारकून हे पद नाही , तर ती एक मानसिकता होती . म्हणजे शिस्तीत वेळ पाळणाऱ्या कलेक्टर साहेबांविषयी बोलतांना तो चक्क 'कारकुंड्या साला' असं म्हणे . म्हणजे कुणी साहेबाने ऐकलं तर सरळ तुरुंगात जाईल अशी भाषा . मी एक मलंग कर्मचारी असं सांगण्यात भूषण वाटे त्याला .
ह्या गोपिकीशन ला इतरांच्या भानगडीत नाक , कान डोळे ( हात , पाय ) खुपसायचा नाद होता . म्हणजे आपण फार मोठे हेर आहोत असा ठाम विश्वास होता त्याचा .
कैलाश मामांच्या दिवट्या गोट्याला सत्तर टक्के कसे पडू शकतात? ....
थोरातांच्या बाबू ची म्हैस कोणत्या बैलामुळे गाभण राहिली ?....
वडाखालच्या मंदिरातील वाहिलेले नारळं कुठे जातात ?....
खोतांची लतिका कुणाबरोबर पळून गेली?....
ह्याचा शोध तो बरोबर लावत असे .
आताशा मात्र त्याला खमंग बातम्या आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागे . त्यातून एकापेक्षा एक रंजक कथा तयार होत .
त्याच्या तोंडून असे नवीन किस्से ऐकण्यासाठी गावातील लोकांची चढाओढ असे . गोपिकीशन चा भाव एकदम वधारला होता .
झालं काय होतं , की गावात एक नवीन पोलीस सबइन्स्पेक्टर आला होता .
रंगीन मिजाज , शौकीन आणि छंदी फंदी सबइन्स्पेक्टर राजासाहेब आल्यापासून आधीच्या साहेबांनी लावलेली पोलीस स्टेशनची सगळी शिस्त ढासळली होती.
एक दिवस गोपी ला घनश्याम सावकाराच्या गोदामात काही कामाने जावं लागलं . तिथून बाहेर पडतांना त्याला मोटारसायकल वरून जाणारे राजासाहेब दिसले .
' साहेब इकडे ? ह्या वेळेला ?' असा विचार करत गोपी लपत छपत त्यांच्या मागे गेला . नाक्यावर साहेबांची मोटारसायकल थांबली .
गोपीच्या डोक्यात भुंगा ...इथे काहीतरी पाणी मुरतंय...
आणि तसंच झालं . झाडा मागून एक नखरेल साडी चालत आली .. गाडीवर बसली ..आणि गाडी चौरसिया च्या फार्म हाऊस कडे रवाना ...
पाठीमागे आपले गोपी भाऊ .
फार मोठा माहितीचा खजिना हाती लागला होता . सगळी इत्यंभूत ज्वलंत माहिती खिशात .
आता आपला टी . आर. पी. जाम वधारणार ह्या विचारानेच मोहरला गोपी .
दुसऱ्या दिवशी खरंच गोपी चा भाव कसला वधारला होता .
" ऐका राजासाहेबांचं लफडं !" म्हणत पुरेपूर भाव खाऊन त्याने ग्यारेज वाल्या कामदार च्या बायकोचं अन राजासाहेब चं 'लफडं' रंगवून रंगवून सांगितलं .
गावातील पाचसात 'मोठ्या' मंडळीनी तर ह्या मौल्यवान माहिती साठी गोपिला चक्क पार्टी कबूल केली .
मग आधीच ऑफिस च्या नावाने बोंब असलेल्या गोपिला हा चटपटीत विषय मसाला लावून सांगायला फार आवडू लागलं .
तो सतत साहेबांच्या मागावर राहू लागला . वस्तीतील गजराबाई , माळावरच्या दौलतरावांची कामना , असे साहेबांचे बरेच 'हितसंबंध' त्याला माहित झाले होते . त्याच्या कडून असल्या खबरा ऐकायला मंडळी वाटच पहात.
राजासाहेबांच्या च्या सगळ्या लफडयांची चोख माहिती तिखट मिठ लावून पुरवायची आणि मस्त ढाब्यावर ओल्या पार्ट्या झोडायच्या हा त्याचा छंदच होऊन बसला .
काही लोक तर , "फक्त मलाच सांग बरं " म्हणत त्याला भरपूर आमिष देत . गोपीचा खिसा जड होऊ लागला . त्याला आता ह्या लाचखोरीची सवय लागली होती .
आपला नवरा आजकाल सारखा बाहेर पार्ट्यां करतो , घरात काय काय वस्तू आणतो , कधी पैसे देतो , ह्यावरून सरू त्याला टोकत असे .
अनेक प्रश्न विचारल्यावर तो "अग , असतात कामं , ते करवून घ्यायला जावं लागतं बाहेर " अशी उत्तरं देई . भाबडी सरू मुकाट ऐकून घेई .
साहेबांच्या खास भेटी गाठी ह्या नेहमी गावाबाहेर असत . त्यामुळे त्यांचा पाठलाग करायचा म्हणजे गोपी ला पण तितक्या दूर गाडी पळवत , वेळ घालवत जावे लागे .
एक दिवस मात्र वेगळंच घडलं . साहेब पोलीस स्टेशनमधून बाहेर आले , आणि नाक्याकडे न जाता गावातच आत वळले . गोपीनेही आपली दुचाकी तिकडे वळवली .
दुर्गा चौक ओलांडला , त्यानंतर मारुतीचं मंदिर मागे पडलं ....' इकडं भलतीकडं कुठं जातोय हा बाब्या ' म्हणत आपला संशय येणार नाही अशा अंतराने गोपी मागे मागे गेला .
साहेबाची गाडी जशी वडाच्या झाडाजवळ आली , तसं गोप्याला कापरं भरलं . ...
' हा आपल्याच घराकडं चाललाय ! आपल्या सरू ला बिचारीला यातलं काहीच माहीत नाही ...
हा बाप्या शेजारी कुणाकडे जातोय का ? ....आयला !! हा आपल्याच घराजवळ थांबला की!! ' आता मात्र गोपी ची टरकली .
साहेब बाहेर ओट्याजवळच थांबले होते .
गोपी ची धडधड वाढली .
साहेबांनी इकडे तिकडे बघितलं . आता आजूबाजूच्या घरातून मुंडके बाहेर दिसू लागले होते . थोडी खुसफूस पण सुरू झाली होती .
गोपी ला अचानक स्फुरण चढलं , आणि तो धावत सामोरा गेला . शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीचे सगळे रेकॉर्ड्स मोडत त्याने साहेबांना गाठलं .
" अरे ! गोपिकीशन साहेब ? तुम्ही इकडे ? " नाटकी आवाजात साहेबांचा प्रश्न .
" या न सर , हे घर माझंच आहे ! "
" माहितेय मला , म्हणूनच आलोय ..म्हटलं वहिनी साहेबांना भेटून जावं ! " त्याच्या डोळ्यात खोल निरखून बघत साहेब म्हणाले .
" म्म्म ..माझं..माझी ...साहेब , ते न , "
त्याची पार बोबडी वळली होती .
साहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला .
म्हणाले ,
" लय हेरगिरी चाललीय आजकाल तुमची "
" साहेब , कृपा करून थोडं पुढे चला , हॉटेलात बसू , निवांत बोलू न आपण ." दम खात हे वाक्य त्याने पूर्ण केलं , आणि साहेब चक्क तयार झाले .
" बोला , काय म्हणताय ? तुमच्या घरचा पाहुणचार घ्यायचा राहिलाच की !" हॉटेल मध्ये अनेक पदार्थ रिचवून झाल्यावर दात काढत साहेब म्हणाले .
" ......" गोपी ची दातखीळ .
" सांगतो आता सगळ्यांना की गोपीशेठ कडचा पाहुणचार झाला म्हणून !!"
" साहेब , माझ्यावर विश्वास ठेवा , मी तुमच्या बद्दल कुणालाच काहीच सांगत नाही ,....म्हणजे काही नाहीच न तसं !!"
" गळ्यातील चैन खूप चमकतीये तुमच्या ...नाही ? " त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत , गळ्याकडे बघत साहेब म्हणाले .
गोपू ने चटकन गळ्यातील साखळी काढून दिली .
" नवीन मोबाईल घेतला म्हणे !!....नाही , त्या चमेलीच्या ****भावाने दिला म्हणे !! "
" साहेब , खोटं बोलतो तो !!"
" प्रूफ आहे आपल्याकडे !"
" तो मोबाईल तुम्ही घेऊन टाका साहेब , पण तेव्हढं माझ्या घरचं कुणाजवळ बोलू नका ."
" इथून पुढे माझ्या भानगडीत नाक खुपसलं , लफडयाची चर्चा केली , आणि त्यावरून कमाई सुरू केली , तर काय होईल समजलं न ? ...
नाहीतर चर्चेत 'आपलं' कुटुंब ही असेल लक्षात ठेवा ! " असं धमकीवजा सूचना देउन साहेब उठले , आणि ताडताड पाय टाकत गाडी काढली .
गोपी समोर हॉटेलचं मोठ्ठ बिल पडलं होतं . त्याकडे तो बघत असतांना साहेब फिरून माघारी आले ..
" हा s , गोपीशेठ , पुढच्यावेळी असल्या फडतूस हॉटेल चालणार नाही बरं , चांगली 'मॅजेस्टिक' मध्ये पार्टी द्यावी लागल !!"
गोपी ने कसंनुसं तोंड करत मान हलवली . साहेबांचे लफडे भलतेच अंगाशी आले होते .
😀😀😀😀😀😀
©अपर्णा देशपांडे
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
