© सौ. प्रभा निपाणे
काल त्याचा फोन आला , म्हणाला भाऊ सुधाकर बोलतो.
अरे सुधाकर !
कसा आहेस ?
मी मस्त !
तुमचा नंबर नव्हता. पुंडलिक कडून घेतला.
आज कशी काय आठवण काढली रे ?
भाऊ मी तुम्हाला विसरलोच कधी आठवण काढायला ?
फक्त जरा विशेष आहे, म्हणून तुम्हाला निमंत्रण करतो. आग्रहाचे !
भाऊ माझ्या मुलीचा साखरपुडा आहे. तुम्हा दोघांना नक्की यायचे आहे.
मी म्हणालो, अरे फक्त ५० लोकांना परमिशन. मग आम्ही नाही आलो तर नाही चालणार का ?
जवळचेच दोन्ही कुटुंब मिळून ५० लोक होतात.
तो म्हणाला, भाऊ एखादा जवळचा कमी करेन पण तुम्ही दोघे यायलाच पाहिजे.
मी फोन ठेवला. बायकोला आवाज दिला. अग इकडे ये जरा ?
काय हो ?
अग तो सुधाकर आहे न ! कोण हो ?
अग तो !
शेट्टे की काय ?
माझ्या नाही बाई लक्षात !
मग आम्ही दोघे कॉटवर बसलो. हे म्हणाले, तो नाही का ग ?
त्याला तू १३०० रुपये दिलेले ! ऑपरेशन साठी !
तो सुधाकर !
अच्छा !
तो ! होय !
तोच अग !
उद्या म्हणे त्याच्या मुलीचा साखरपुडा आहे . बोलावले आपल्याला.
ही म्हणाली, अहो !
जावूया आपण !
हो ग नक्की जाऊ !
३५ वर्षा पूर्वीचा सुधाकर आमच्या दोघांच्याही डोळ्यासमोर दिसायला लागला.
सुधाकर मूळचा विदर्भातील एका खेडे गावातला मुलगा.
घरची अत्यंत गरिबी. छोटे मोठे काम करून त्याने शिक्षण पूर्ण केले. थोडे थोडके नाही तर M.COM. केले.
आता नोकरीचा शोध सुरू झाला. शेजारचा ओळखीचा मुलगा मुंबईला जॉब करत होता. तो म्हणाला चल मुंबईला . रूम आहेच माझी. भाड्याची चिंता करू नको. फक्त थोडीफार खाण्याच्या सामानाची मदत कर. बाकी करू adjustment.
आईचा पुढचा प्रश्न, बाबू परीक्षा देत जाजो मां !
आपले बरे दिवस पाहाचे असन त अभ्यास करालेच पायजे !
बाप नाही, मामाच्या आसऱ्यान रायतो!
मामा बी गरीब हाये !
थो कुठवर पुरून उरल !
आईचे हे बोल सुधाकर ने हृदयावर कोरून ठेऊन मुंबई गाठली.
सुधाकर मुंबईला आला. अभ्यास करू लागला. एअर इंडिया मध्ये जागा निघाल्या. उसने पैसे घेऊन फॉर्म भरला. परीक्षा दिली , रिटर्न आणि ओरल दोन्ही परीक्षा पास झाला.
पण इथे सुधाकरचे दुर्दैव आडवे आले. मेडिकल मध्ये तो नापास झाला. कारण त्याच्या मांडीला बारीकशी गाठ होती.
त्याला सांगितले ऑपरेशन करून घे. मग तु जॉईन करू शकतो.
सुधाकर ने विचारले अंदाजे किती खर्च येणार ऑपरेशनचा. १३०० मध्ये सगळे होईल !
सुधाकरला भोवळ यायची बाकी होती. संपूर्ण जग आपल्या भोवती गरागरा फिरत आहे आणि आपण त्या भोवऱ्यात पूर्ण अडकलो आहोत. बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नव्हता त्याला.
नातेवाईक सर्व गरीब. आजतागायत १०० ची नोट कशी असते पाहिली नाही त्याच्या अख्या खानदाणाने. १३०० रुपयाचा बंदोबस्त कसा करणार ? गरीबाला इतके पैसे देणार तरी कोण ?
प्रश्न ???
फक्त प्रश्न????
आणि प्रश्नच????
सुधाकर विचाराच्या तंद्रीतच घरी आला. उतरलेला चेहरा पाहून पुंडलिक ने विचारले. काय झाले सुधाकर ?
तु असा का दिसतो ?
तुझे तर सिलेक्शन झाले होते ना ?
हो रे सगळे पार पडले !
पण मेडिकल मध्ये फेल झालो !
म्हणजे मी फिटनेस मध्ये कमी नाही पडलो मित्रा !
माझ्या मांडीला एक छोटीशी गाठ आहे.
बस त्याचे ऑपरेशन झाले तर ही नोकरी पक्की !
पण मित्रा माझ्या घरची परिस्थिती तुला ठाऊक आहे. नातेवाईक पण गरीबच. इतके पैसे कुठून आणू ?
तु घरभाडे , साबण , सोडा कसलेच पैसे घेत नाही. जेमतेम खर्चाला मदत करतो मी !
माझे काही होऊ शकत नाही? मी जातो गावी !
एवढे बोलून सुधाकर ढसाढसा रडायला लागला. मित्र जवळ गेला म्हणाला, रडू नको ! निघेल काहीतरी मार्ग !
तु हिम्मत हारायची नाही !
पुंडलिक आमच्या कडे नेहमी यायचा. त्या काळी टीव्ही वर रामायण लागायचे . ते पाहायला तो दर रविवारी यायचाच. एक दोन वेळा त्याच्या सोबत सुधाकर पण आलेला.
हा सुधाकर, माझा रूममेट एवढीच त्यांची आमच्याशी ओळख करून दिली होती.
त्या मित्राने त्याला सांगितले. एकच व्यक्ती तुला मदत करू शकते ते म्हणजे पखाले भाऊ आणि वहिनी.
अरे पण ते मला ओळखत पण नाही पुरते !
एकदोन वेळा तुझ्या सोबत आलो तेव्हढच !
एवढ्यावर कोणी मला इतके पैसे कसे देणार ?
नाही मित्रा !
मला नाही जमणार ?
मी गावी जातो .
काही होऊ शकत नाही माझ्या सारख्या गरीबांचे !
हे बघ सुधाकर !
तुला या साठी कोणाची ना कोणाची मदत घ्यावी लागेलच !
अरे मी आल्या पासून या दोघा नवरा बायकोला ओळखतो . ते फुल ना फुलाची पाकळी नक्की देतील. तु हिम्मत तर कर, जा एकदा. मी म्हणतो म्हणून जा !
तु चल ना रे बरोबर !
नाही हे काम तुलाच एकट्याला करायचे आहे. इथे कुणीही सोबत नको. बिनधास्त जा. फार काय तर नाही म्हणतील ?
पण प्रयत्न तर कर !
ठीक आहे, उद्याच रात्री जातो. हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. गावी पण telegram करतो. बघतो किती सोय करू शकतो मामा आणि आई.
ये हूई न बात !
चल जेऊन घे आता. उद्या नक्की जा पखाले भाऊ कडे.
दुसऱ्या दिवशी सुधाकर भितभित आमच्या कडे आला. अचानक हा एकटा दारात पाहून आम्ही दोघे आश्चर्याने पाहत राहिलो.
ये सुधाकर !
आत ये !
बस !
घरात आला, भितभित सोफ्यावर बसला. आधीच तो जरा लाजरा बुजरा. त्याची चुळबुळ बघून ही म्हणाली तुला काही बोलायचे, सांगायचे आहे का?
तो घाबरत घाबरत म्हणाला, हो एक काम होते वहिनी ?
कोणते ?
आम्ही करू शकु का ?
हो वहिनी !
तुम्हीच करू शकता !
दुसरे कुणीच नाही!
बोला सुधाकर !
काय काम आहे ?
वहिनी मला ५०० रुपये पाहिजे?
काय ?
हो वहिनी!
एवढे कशाला ?
मग त्याने सर्व घटना सांगितली.
सुधाकर मग बाकीच्या ८०० चे काय ?
वहिनी गावी कळवले !
बघू काही जमले तर !
आणि नाही जमले तर ?
तर माझी हातची नोकरी गेली समजायचे.
डोळे मात्र अश्रुंनी भरून आले होते.
अलगद कडा पुसल्या, आमच्या लक्षात आलं ते .
सुधाकर घरी गेला. आम्ही दोघे विचार करू लागलो.
काय करावे ?
आपण तर या पोराला फारसे ओळखत पण नाही.
हे लगेच म्हणाले, हे बघ श्रद्धा उगाच मागे काही लाऊन घेऊ नको. सरळ त्याला नाही म्हणून सांग.
श्रद्धा सुध्दा खूप गरीब परिस्थितीतून इथवर पोहचली होती. दिवाळी तोंडावर होती. श्रद्धा नवऱ्याला म्हणाली.
अहो ! तुम्ही मला दिवाळीला किती रुपयाची साडी घेऊन देणार ?
नवरा म्हणाला तू म्हणशील तेव्हढ्याच किमतीची.
नक्की !
हो!
का ?
घेऊन नाही दिली का ?
दिली हो !
मी कुठे नाही म्हणते ?
या वर्षी मला साडी नको !
का ?
मला त्या सुधाकरला मदत करायची आहे. न जाणो या १३०० रुपयाने ने त्याचे आयुष्यच बदलून जाईल. पुंडलिक सांगत होता हो !
तो खूपच गरीब आहे म्हणून !
देऊ या हो आपण त्याला पैसे !
हो !
नाही !
करता करता हे तयार झाले.
मग म्हणाले, त्याला १३००रुपये पूर्ण देऊ या !
काय ?
हो अग !
पुन्हा त्याची बाकी पैश्याची जुळवाजुळव नाही झाली तर???
आणि तुझी इच्छा आहे न त्याला मदत करायची !
झालं तर मग !
दुसऱ्या दिवशी आम्हीच त्यांच्या रूम वर गेलो.
त्याला जेव्हा सांगितले उद्या घरी येऊन १३०० रुपये घेऊन जा !
त्याने पायावर डोकेच ठेवले. आनंदाश्रू ने डोळे भरून वाहत होते.
सकाळी येऊन पैसे घेऊन गेला.
लगेच ऑपरेशन केले. आठ दिवसात appoinment order मिळाली.
जॉईन व्हायच्या दिवशी सुधाकर सकाळी सकाळी घरी !
वहिनी हे पेढे !
नमस्कार करतो वहिनी !
आज जॉईन होतोय !
तुमच्या कृपेने !
सुधाकर असे काही नाही ! आम्ही नाही तर कोणी तरी नक्कीच मदत केली असती.
माहित नाही वहिनी !
ज्या मुलाने आजवर १००रुपयाची नोट पाहिली नाही. एक साथ १३०० रुपये दिले तुम्ही.
वहिनी ! मी हे उपकार कधीच विसरणार नाही !
आम्ही दोघांनी आमची आशीर्वादाची गाठोडी सुधाकर कडे रीती केली.
सुधाकर जॉईन झाला. पहिला पगार मिळाला. सुधाकर सकाळीच घरी. वहिनी पहिला पगार मिळाला हे ४०० रुपये आणि हे पेढे.
वहिनी !
तीन महिन्यात सगळे परत करतो !
खूप खूप आभारी आहे वहिनी !
अरे सुधाकर ! दे हळूहळू !
काही घाई नाही !
सुधाकर ने तीन महिन्यात सगळे पैसे परत केले.
लग्न झाले, दोन मुली झाल्या. त्यांना पण आमच्या बद्दल सगळे सांगितले.
बऱ्याच वर्षांनी एकदा निमंत्रण द्यायला दोघे सुधाकर कडे गेलो. रविवार होता. सगळे घरीच होते.
घरी गेल्या बरोबर सुधाकर ने सर्वांशी ओळख करून दिली. म्हणाला हीच ती देव माणस ज्यांचे नाव मी नेहमी घेत असतो.
दोन्ही मुली, बायको पाया पडले. सुधाकर सुध्दा.
मुली बोलल्या, काकु बाबा कायम तुमचे नाव काढत असतात. तुम्हाला प्रत्यक्ष नाही पाहिले. पण बाबा फोटो दाखवत होते. म्हणतात हीच ती देव माणस !
गहिवरून आले !
एखादा व्यक्ती छोट्याश्या मदतीची किती जान ठेवतो. याचे उदाहरण म्हणजे हा सुधाकर.
त्या नंतर सुधाकर काल भेटला. मुलीच्या साक्षगंधाला.
आजही तितकाच साधा, लाजरा बुजरा. माणुसकी काठोकाठ जपलेला.
एअर इंडिया मध्ये मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालेला सुधाकर !
त्याच्यात मोठेपणाचा कुठेही लवलेश नव्हता.
मनात आम्ही दोघे म्हणालो !
सुधाकर !
खरच !
तुझ्या सारखा तूच रे बाबा !
पुन्हा एकदा आज आम्ही आशीर्वादाची गाठोडी रिकामी केली. त्याच्या लेक, जावयाला आशीर्वाद देण्यासाठी.
सत्य घटनेवर आधारित...
सदरच्या लेखाचे सर्व हक्क माझे आहे. परवानगी शिवाय forward करू नये.
©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
