दृष्टिकोन (भाग १)

© स्वामिनी (अस्मिता) चौगुले



सकाळची वेळ होती आणि विदीशाचे हाता बरोबर तोंड ही सुरू होते.

आता नऊ वाजले होते त्यामुळे सरगम आणि श्रविकाला धृव आत्ताच स्कुलबस मध्ये बसवून आला होता आणि त्याने घरात पाऊल ठेवताच विदीशाने तोंडाचा पट्टा सुरू केला होता.

विदीशा,“ ध्रुव माझ्याचसाठी  तुझ्याकडे कायम पैसे नसतात ना!मी काही मागितले की तुझे असेच असते; थांब जरा! मला काही माहीत नाही मला पन्नास हजार हवेत म्हणजे हवेतच!” ती नाष्टा बनवत तणतणत होती.


धृव,“try to understand! विदू, अग आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे त्यासाठी पैसे लागणार आहे! श्रवू आणि सरूच्या क्लासेसची फी भरायची आहे! तुला तर माहीतच आहे की लॉक डाऊनमुळे कंपनीने पेमेंटमध्ये वीस टक्के कपात केली होती या महिन्यापासून पेमेंट सुरळीत होईल! मी तुला दिड लाख दिले आहेतच की दोन महिने थांब ना देईन मी तुला पैसे!” तो वैतागून टाय बांधत बोलत होता.


विदीशा,“ हो ना दिलेत ना दीड लाख मला पण तो हार चार तोळ्यांचा आहे आणि त्यासाठी अजून पन्नास हजार हवेत मला!” ती ब्रेकफास्ट सर्व्ह करत बोलत होती.


धृवेंद्र,“मी नाही देऊ शकत दोन महिने तरी पैसे!” असं म्हणून तो रागाने बॅग घेऊन निघाला.


विदीशा,“ अरे ब्रेकफास्ट तरी करून जा!” ती किचन मधून त्याच्या मागे हॉल पर्यंत येत म्हणाली.


धृवेंद्र,“ नको मला भरलं पोट माझं!” असं म्हणून त्याने दार आपटले आणि तो निघून गेला.


विदिशा,“ झालं गेला हा उपाशी! तरी बरं मी डबा आधीच बॅगेत ठेवला म्हणून! मी काही मागितले की याची नकार घंटा सुरू होते.” असं स्वतःशीच पुटपुटत तिच्या कामात गढून गेली.


विदिशा सरनाईक एक उच्च मध्यम वर्गीय स्त्री वय साधारण त्रेचाळीस तरी ही अजून दिसायला सालस! गोरी गोमटी, गुंडगूळ्या अंगाची!


दोन मुलींची आई असली तरी राहणीमान छान आणि वेलमेन्टेन्ड होती.ती उच्च शिक्षित असली तरी गृहिणीच होती.


धृव सरनाईक एका  कार्पोरेट कंपनीमध्ये  सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि उच्च पदस्त अधिकारी होता.वय साधारण त्रेचाळीस! दिसायला सावळा असला तरी नाकी-डोळे नीटस आणि अजून ही हँडसम होता.


त्याला गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती.पुण्यासारख्या शहरात एका हाय सोसायटीमध्ये टू बी.एच के फ्लॅट आणि दोन सोन्या सारख्या मुली!


आई-वडील त्याच्या भावा सह गावाकडे राहत होते.एकूण वरून सगळं आलबेल असलेलं सुखवस्तू कुटुंब!

  

विदिशा तिचे काम करत होती खरं पण जसजसा लंच टाईम येऊ लागला आणि घड्याळात दीड वाजले तशी तिचे विचार चक्र फिरू लागली.“हा न नाष्टा करताच गेला.आता लंच ब्रेक झाला जेवला असेल ना धृव! त्याला फोन करून विचारावे का?नकोच राहू दे मी पण ब्रेकफास्ट केला नाही या सगळ्यात आता पोटात कावळे ओरडत आहेत.


जेवून घेते मी आता दोन तासात मुली येतील मग निवांत जेवता ही येणार नाही.”ती हा सगळा विचार करून जेवायला बसली पानात जेवण वाढून घेतले आणि तितक्याच तिचा मोबाईल वाजला.


स्क्रीनवर त्याचाच नंबर फ्लॅश होत होत तिने गालात हसून फोन उचलला आणि म्हणाली.


विदिशा,“जेवलास का रे ध्रुव?” तिने विचारले. समोरून,“ मी धृव नाही वहिनी मी प्रशांत बोलतोय आहो! ध्रुव चक्कर येऊन पडला आहे ऑफिसमध्ये आम्ही त्याला अपोलो हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत! तुम्ही लवकर या इकडे!” तो म्हणाला.


विदिशा,“ काय? काय झालं तो कसा आहे? त्याला काय झालं आहे?” ती काळजीने विचारत होती.


प्रशांत,“तुम्ही शांत व्हा वहिनी!आणि हॉस्पिटलमध्ये या लवकर!” त्याने इतकच बोलून  फोन ठेवला.


विदिशा आहे त्या अवतारातच  पर्स आणि A.T. M. कार्ड घेऊन घराला लॉक करून  ती शेजारी रश्मीकडे धावतच गेली.


विदिशा,“रश्मी अग मुली येतील शाळेतून  चार पर्यंत मी हॉस्पिटलमध्ये चालले आहे धृव चक्कर येऊन पडला आहे ऑफिसमध्ये फोन आला होता प्रशांत भाऊजीचा!” ती घाबरतच म्हणाली.


रश्मी,“ अग इतकी घाबरतेस काय? काही नाही होणार दादाला अशक्तपणा वगैरे आला असेल चल मी ही येते तुझ्या बरोबर आई आहेत त्या पाहतील मुलींकडे!” ती आपुलकीने म्हणाली आणि विदिशाचा बांध फुटला. ती रश्मीच्या गळ्यात पडून रडत बोलू लागली.


विदिशा,“माझ्याचमुळे झाले आहे सगळं! आज मी ऑफिसला जाताना धृवशी भांडले! म्हणून तो  चिडून  न नाश्ता करता गेला ऑफीसला!”


रश्मी,“ अरे देवा! तुला किती वेळा सांगितलं ग विदू की बाहेर जाणाऱ्या खास करून कामाला निघालेल्या  माणसाशी भांडू नये! पण तू ऐकत नाहीस आणि ध्रुव दादा ही काही कमी नाही लगेच त्याला राग येतो आणि तो असा  न खाता पिता तो व्यक्त करतो! बरं झालं ते झालं चल आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये!” ती म्हणाली.


दोघी ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.तर रिसेप्शन जवळ प्रशांत त्यांची वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूपच चिंतीत वाटत होता. पण तो काहीच न बोलता दोघींना दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्याने विदिशा आणि रश्मीला एका I. C. U. च्या बाहेर नेले आणि त्यांना म्हणाला.


प्रशांत,“ विदिशा वहिनी धृव आत आहे. तुम्ही त्याला पाहून घ्या मग आपण डॉक्टरांकडे जाऊ!” 


विदिशा I. C. U. पाहून खूपच घाबरली. पण काहीच न बोलता ती आत गेली.


धृव झोपला होता. त्याला लाईफ स्पोर्टिंग सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.


विदिशाने त्याला इतकं मलूल या वीस वर्षाच्या कालावधीत कधीच पाहिलं नव्हते.


विदिशाचा विश्वास बसत नव्हता की सकाळी धडधाकात असणारा आपला नवरा संध्याकाळ पर्यंत I. C. U. मध्ये पोहोचला. ती खुर्चीवर बसली आणि धृवचा हात धरून रडत  त्याला म्हणाली.


विदिशा,“ I am sorry धृव. मी खरंच चुकले मी तुझ्याशी भांडण केलं पण प्लिज असा निपचित राहून मला शिक्षा नको करुस वाटले तर तू म्हणशील ती शिक्षा मी भोगेन!” तिला काचेतून असं रडताना पाहून रश्मी आत गेली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत म्हणाली.


रश्मी,“ विदिशा रडू नकोस! दादाला काही नाही होणार! चल डॉक्टर काय म्हणतात ते पाहू!” ती  म्हणाली. 


विदिशा  डोळे पुसून उठली तिने धृवच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि दोघी डॉक्टरच्या केबिनमध्ये गेल्या.डॉक्टर त्यांना पाहून गंभीर होत म्हणाले.


डॉक्टर,“ have a seat! तुमच्यात  मिसेस सरनाईक…!” ते दोघीकडे पाहत म्हणाले.


विदिशा,“ डॉक्टर मी मिसेस सरनाईक ही माझी मैत्रीण आहे! धृवला काय झाले आहे डॉक्टर! सकाळी तर तो ठीक होता पण आता असा I. C. U. मध्ये?” तिने आवंढा गिळत धीर एकवटून विचारले.


डॉक्टर,“ हे पहा मिसेस सरनाईक मी जे तुम्हाला सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्या. Mr. सारनाईकांना सिव्हीअर हार्ट अटॅक आला आहे.” ते म्हणाले आणि विदिशा उडालीच.


विदिशा,“ काय बोलताय काय डॉक्टर! अहो माझा धृव त्रेचाळीस वर्षांचा आहे फक्त! त्याला बी.पी.चा काय पण आत्ता पर्यंत कोणताच त्रास नाही झाला आणि तुम्ही म्हणताय त्याला सिव्हीअर हार्ट अटॅक आला आहे!” ती थोडी रागानेच म्हणाली.


डॉक्टर,“ मी समजू शकतो तुम्हाला काय वाटते ते मिसेस सरनाईक पण आज काल हार्ट अटॅक आणि वयाचा काही संबंध नाही उरला. सतत टेन्शन, स्ट्रेस आणि धावपळ या सगळ्याचा परिणाम असू शकतो हा!  Mr. सरनाईकना तुम्ही कोणता त्रास झाला नाही असे म्हणत आहात तर कदाचित त्यांनी तुमच्या पासून त्यांना होणारा त्रास लपवला आहे. गेल्या एक वर्षा पासून कदाचित त्यांनी हे दुखणे अंगावर काढलेले दिसते.अटॅक येण्या पूर्वी ही चार-पाच दिवस मानवी शरीर त्याची लक्षणे दाखवते पण त्याच्याकडे ही Mr. सरनाईकनी दुर्लक्ष केले आहे आणि त्याचा हा गंभीर परिणाम आहे. गेल्या चार-पाच दिवसात त्यांच्या छातीत वेदना झाल्या असतील ते खूप थकलेले दिसले असतील जिना चढताना धाप लागली असेल पण या सगळ्याकडे त्यांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळेच आज त्याची कंडिशन क्रिटिकल आहे.


विदिशा,“ काय? डॉक्टर त्याला काही होणार तर नाही ना?” तिने धीर एकवटून पुन्हा विचारले.


डॉक्टर,“ हे पहा मिसेस सरनाईक आपल्याला त्यांची तातडीने अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे. त्यांच्या हार्टमध्ये तीन ठिकाणी ब्लॉकेज आहे. त्यामुळे त्यांना दुसरा हार्ट अटॅकही येऊ शकतो. मी हार्ट सर्जन डॉ. चव्हाणना बोलावले आहे ते सर्जरी करतील Mr. सरनाईकांची पण त्या नंतर ही चोवीस तास मी काहीच सांगू शकत नाही कारण ते या सगळ्या इलाजाला कसा रिस्पॉन्स देतात त्यावर हे सगळे अवलंबून आहे. तुम्ही फॉर्मेलिटी पूर्ण करा आणि पैसे भरा अर्ध्या तासात डॉ. चव्हाण येतील. सर्जरीला नेण्या आधी तुम्ही त्यांना पाहू शकता ते सध्या बेशुद्ध आहेत!” डॉक्टरांनी एका दमात सगळं सांगितले.


हे सगळं ऐकून विदिशा मात्र  पूर्णपणे आतून कोलमडून गेली. तिला काहीच सुचत नव्हते. ती खुर्चीवरून उठली आणि तिचा तोल गेला रश्मीने तिला सावरले.


ती सुन्न होऊन रिसेप्शन जवळ गेली. फॉर्मवरचा मजकूर वाचून ती आणखीनच घाबरली होती पण रश्मी आणि प्रशांतने तिला धीर दिला.


ध्रुवच्या ऑफिस मधील आणखीन दोघे तिथेच होते.


तिने अश्रू ढाळत कशीबशी  थरथरत्या हाताने सही केली आणि तिचे ए. टी. एम. कार्ड स्वाईप केले.


तो पर्यंत डॉ. चव्हाण हॉस्पिटलमध्ये पोहोचले. विदिशा धृव जवळ पुन्हा त्याला पहायला गेली आणि तिचा बांध फुटला. रश्मी तिच्या बरोबर होती. ती धृवचा हात धरून पुन्हा बोलू लागली.


विदिशा,“ I am sorry Dhruv! मी पत्नी म्हणून नालायक ठरले मला तुला होणारा त्रास दिसलाच नाही. मी सतत तुला मला हे हवं ते हवं म्हणून भांडत राहिले.मी नाही मागणार इथून पुढे तुला काही! पण प्लिज मला इतकी मोठी शिक्षा नको देऊस! मी नाही राहू शकणार तुझ्या शिवाय! तू आहेस तर मी आहे आपलं घर आहे! मी  एकटी नाही सांभाळू शकणार आपल्या मुलींना! रश्मी तू तरी सांग ना याला काय शिक्षा द्यायची ती मला दे म्हणावं पण असं नको वागूस सांग ना तू त्याला!”ती रडत बोलत होती.


रश्मी,“ विदिशा प्लिज स्वतःला सांभाळ अग तूच असं वागलीस तर  कसं होणार! काही होणार नाही धृवला समजलं तुला तो कुठेच नाही जाणार आहे समजतंय का तुला? अग तू असं केलंस तर मुलींना! काका-काकूंना कोण धीर देणार! तुझा धृव दादावर विश्वास आहे ना?” तिने तिला रोखून पाहत विचारलं.


विदिशा,“ हो स्वतः पेक्षा जास्त!” ती रडतच म्हणाली.


रश्मी,“ मग पुस ते डोळे आणि सांग त्याला की तुझ्यासाठी, मुलींसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी त्याला या कंडिशनशी लढावं लागेल. सांग त्याला ठणकावून तू असा मला अर्ध्यावर सोडून नाही जाऊ शकत. तो प्रत्येक गोष्ट ऐकतो ना तुझी मग ही पण ऐकेल! तुझं प्रेम जसं त्याच्यावर आहे तसं किंबहुना तुझ्या पेक्षा जास्त त्याच तुझ्यावर आहे. अशी कोलमडून नको जाऊस!” ती विदिशाला थोड जरबेनेच म्हणाली. 


विदिशा,“ हो! धृव ऐकतो आहेस ना रश्मी काय म्हणतेय ते तुला या कंडिशनशी लढावेच लागेल माझ्यासाठी आपल्या कुटुंबासाठी! इथून पुढे नाही भांडणार मी तुझ्याशी आणि  काहीच होऊ देणार  मी तुला!” ती डोळे पुसत त्याचा हात धरून त्याच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणाली.तो पर्यंत डॉक्टर आणि वॉर्ड बॉय आले आणि त्याला O. T. मध्ये घेऊन गेले.


विदिशा अस्वस्थपणे O. T. बाहेर देवाची मनोमन प्रार्थना करत बसून राहिली.


रश्मीने गावाकडे  धृवच्या भावाला फोन करून इथली परिस्थिती कळवली आणि धृवचा भाऊ आई-बाबांना घेऊन लागलीच  पुण्याला यायला निघाला.


प्रशांत आणि धृवचे दोन सहकारी मित्र ही तिथेच होते.


घड्याळात संध्याकाळचे सात वाजून गेले होते.


विदिशा वरून शांत दिसत असली तरी तिच्या आत एक वादळ उठले होते!


क्रमशः

धृव वाचणार होता का? की विदिशावर कायमचा पश्चात्ताप करण्याची वेळ येणार होती? पण विदिशा धृवशी असे वागण्याची कारणे तिच्या भूतकाळात तर दडलेली नव्हती? 

ह्या प्रश्नांची उत्तरं वाचा पुढील आणि अंतिम भागात.



©® स्वामिनी(अस्मिता) चौगुले 


सदर कथा लेखिका स्वामिनी (अस्मिता) चौगुले यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने