निर्णय

© सुतेजा फडके


"अगं, तू काय बोलतीयस तुला कळतंय का?.."

"हो,मला कळतंय.."

"वा!..आज बरंच अवसान आलेलं दिसतंय तुला!.."

"अगं...आई.."

"गप्प बस..तुला अक्कल आहे का?..

आम्ही इथं तुझ्यासाठी जीव पाखडतोय आणि तुझा हा निर्णय?.."

"आई,माझं ऐकून तर घे..मी..."

"काही बोलू नकोस..आम्ही काय शत्रू आहोत का तुझे?..

तुझं हीत,अहित चांगलं समजतंय आम्हाला..

हे हे आप्पा, नाना,काका प्रत्येकवेळी येतात आपल्या मदतीला..ते काय चुकीचं सांगतील का?.."

"बाई, तुम्ही शांत व्हा.."

"कशी शांत होऊ आक्का?..

या पोरीनं घोर लावलाय जीवाला..तुम्ही म्हणताय शांत व्हा..

आईचा जीव कसा शांत राहील पोरीला सुख नसल्यावर?..

काय केलं नाही हिच्यासाठी आत्तापर्यंत?..आजपर्यंत माझ्या शब्दाबाहेर नसणारी ही पोर आज मला उत्तर देतेय!..

ते ही निर्णय झालाय म्हणतेय?.."

कणसे बाईंना भावना अनावर झाल्या होत्या..

त्यांच्या एवढ्याशा खोलीत दाटीवाटीनं बसलेल्या शेजाऱ्यांना काय बोलावं तेच सुचेना..

कणसे बाई..गावातल्या अंगणवाडी ताई..

घरचं दारिद्र्य..शेती फक्त नावाला एकरभर..

तीही कोरडवाहू..

एक पीक झालं की पडीक राहणारी..

ते पीकसुद्धा नीट येईल याची शाश्वती नाही अशी..

नवरा अपंग..पोलिओने एक हात आणि एक पाय लुळा असलेला..त्यात दारूचं व्यसन..

त्याची घरात काडीचीही मदत नाही..

बाईंची माहेरची परिस्थितीही बेताचीच..

त्यामुळं तिकडून काही मदत मिळेल ही अपेक्षाच चुकीची..

त्यात भरीस भर म्हणजे तीन पोरी..

दोनवरच थांबावं असं खूप वाटायचं बाईंना, पण म्हातारी सासू खनपटी बसायची..

वंश वाढायला हवा..

पोरगा पाहिजेच..

त्याची वाट पाहता पाहता तीन पोरी पदरात पडल्या..

दमेकरी सासू,अपंग नवरा,तीन पोरी यांचं करता करता बाई कावदरून जायच्या..

तुटपुंज्या पगारात महिन्याची घडी बसवता बसवता त्यांचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा..

 मोठी अलका दिसायला जरा बरी,पण शाळेत डोकं काही चालायचं नाही..

नाही म्हणायला घरचं काम मात्र आवडीनं करायची..

तिच्या पाठच्या सुनीता आणि अनिता दिसायला बऱ्या नसल्या तरी अभ्यासात हुशार होत्या..

त्यामुळं कणसे बाईंचं झुकतं माप त्या दोघींना असायचं..

अलका त्यांची हक्काची होती..

अभ्यासात डोकं नसल्यामुळं शाळेत जायचा तिला कंटाळाच असायचा..

कशीतरी रडतखडत दहावीपर्यंत मजल मारली तिनं..

पण दोनदा गटांगळ्या खाल्ल्यावर बाईंनी तिच्या शिक्षणाचा नाद सोडला..

तिचं नाव काढलं शाळेतून आणि बसवलं घरी..

अलका घरातलं सगळं बिनबोभाट करू लागली..

बाई पण तिच्या जीवावर निर्धास्त राहू लागल्या..

सुनीता अनिता अलकाला अगदी आपली नोकर समजायच्या..

मुळातच अबोल असलेली अलका अधिकच घुमी बनली..

आजी,आई,बाबा,बहिणी यांनी सांगितलेली कामं करत राहणं हेच तिचं जीवन बनलं..

बाईंना तिच्या लग्नाची काळजी करावीच लागली नाही..

शेजारच्या आप्पांच्या नात्यातील स्थळ चालून आलं..

मुलगा थोडा बहिरा होता,पण कंपनीत नोकरीला होता..

घरचे खाऊनपिऊन सुखी होते..

फक्त त्याची सावत्र आई थोडी खाष्ट होती..

तेवढी एक गोष्ट सोडली तर बाकी चांगलं असं आप्पांनी सांगितलं...

बाईंकडं तरी  पाहणारं कोण होतं?..

शेजारी जाऊन घर दार पाहून आले..

मुलगा येऊन पाहून गेला..अलका पसंत पडली त्याला..

मोजक्या लोकांना बोलावून बाईंनी तिचं लग्न उरकलं..

एक जबाबदारी पार पडली म्हणून त्यांनी थोडा सुस्कारा सोडला..

पुढच्याच महिन्यात तिच्या कुरबुरी कानावर यायला लागल्या आप्पांकडून..

सासू तिला अजिबात बरं बघत नव्हती..

तिला कुठलंच काम नीट येत नाही असं म्हणत होती..

खरं तर अलका घरकामात हुशार होती..

पण बोलण्यात..मुखदुर्बळ..

कायम दबून राहिलेली..

त्यामुळं तिच्या मूक राहण्याचा फायदा घेऊ लागली सासू..

अलकाच्या माहेरून काहीच मिळालं नाही याचंही दुःख होतंच..

व्यवहारचातुर्य नसलेली सून..मग काय..राग राग करू लागली...

अलकाच्या नवऱ्याला अलका आवडायची,पण सावत्र आईपुढं त्याचं काही चालायचं नाही..

त्यात तो थोडा बहिरा असल्यामुळं आई काय बोलतेय यातलं निम्मं अर्धचं समजायचं त्याला..

आईच्या हावभावावरून त्याच्या लक्षात यायचं की आज काहीतरी बिनसलं आहे..पण तो दुर्लक्ष करायचा..

कणसे बाईंनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं..

पहिल्या पहिल्या सणाला तिला घेऊन आल्या..

त्यांच्याकडून जसं जमेल तसं केलं..

चार समजुतीच्या गोष्टी सांगून लेकीची बोळवण केली..

पण पुन्हा तेच..

आता तर सासू रोज भांडण काढून अलकाला त्रास देऊ लागली..

त्यामुळं अलका सुकत चालली..

नवरा घरी आला की त्याला हिचं रडकं तोंड आणि आईचं चिडकं तोंड बघावं लागे..

रोजच्या कटकटी ऐकून तोही कंटाळला..

एक दिवस तो घरी असताना आईनं कटकट सुरू केली..

कधी नव्हे ते अलकानं उलट उत्तर दिलं..

झालं...

आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला...

कांगावा करण्यात तरबेज...

त्याच्या जोडीला गळा काढून रडायला लागली...

नवरा तिरमिरीत उठला...

आईला बोलू शकत नव्हता..

सगळा राग बायकोवर काढला..

तिला बदड बदड बदडलं..

रागाच्या भरात तिला घेऊन कणसे बाईंचं घर गाठलं..

"घ्या हिला कायमची ठेऊन..

असली बायको नाही वागवायची मला" असं म्हणून निघूनही गेला..

बाईंना काय करावं सुचेना..

आप्पांना बोलावणं धाडलं..

ते आले..

बराच मार खाल्ला होता अलकानं..

त्यांनाही राग आला..

अलका गरीब होती...

तिला असं वागवावं हे काही कुणालाच आवडलं नाही..

शेजारी गोळा झाले..

सासरच्यांना चांगली अद्दल घडवायला पाहिजे असं म्हणू लागले..

नाना, नारू काका म्हणाले,

"बाई द्या ह्यांचा रिपोर्ट..

पोलिसी खाक्या कळू द्या ,म्हणजे होतील सरळ..."

पण बाईंनी विचार केला..

असं करणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं..

पण आता तिला परत नाही पाठवायची हे ठरवून त्या शांत राहिल्या..

बिचारी अलका..

आधी उल्हास, त्यात फाल्गुन मास असं झालं..

अक्षरशः नशीब फुटलं तिचं..

जसजसे दिवस जात होते तसतशी तिची अवस्था बिकट होत चालली होती..

पाठवायची नाही असं बाईंनी ठरवलं तर खरं, पण पुढं काय आणि कसं होणार या विचारांनी त्यांची झोप उडाली..

शेजारणी अलकाला बघून कुजबुजायच्या..

सुनीता,अनिताला तर आता आणखीच फावलं..

तिला सतत टोमणे मारत त्या काम सांगू लागल्या..

बाईंना ती समोर दिसली की उगाचच चिडायला व्हायचं..

कुठल्याही किरकोळ गोष्टीचा राग तिच्यावर निघू लागला..

अलका नशिबाला दोष देत मूकपणानं आला दिवस ढकलू लागली..

कधी कधी तिला न शिकल्याचा पश्चात्ताप व्हायचा..

शिकलो असतो तर निदान थोडा वेळ तरी घराबाहेर पडता आलं असतं..

सुनीता,अनिता सारखं थोडं धीटपणानं वागता आलं असतं..

पण आता या सगळ्याचा विचार करून काही फायदा नव्हता..

इकडं तिच्या नवऱ्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होत होता..

आईचा स्वभाव माहिती असूनसुद्धा अलकालाच दोष दिला,तिला मारहाण केली,माहेरी सोडली या गोष्टी त्याच्या मनाला चांगल्याच डागण्या देत होत्या..

अलका त्याला मनापासून आवडली होती..तिचा अबोलपणा सोडला तर नावं ठेवण्यासारखं दुसरं काहीच नव्हतं तिच्यात..

तिला परत आणावं असं त्याला वाटायला लागलं..

एक दिवस हिंमत करून त्यानं आईजवळ तिला आणण्याबद्दल विषय काढला..

पण आईत्याचं पूर्ण ऐकण्याआधीच त्याच्यावर वसकन ओरडली..

"ती उंडगी या घरात आलेली खपायची नाही,आधीच सांगून ठेवते बाबू.."

"अगं आई! असं करून कसं होईल?..

जरा माझा पण विचार कर की.."

"ते काही सांगू नकोस..तिचं आणि माझं नाय पटायचं..

तिला आणायचं असंल तर तुझी तू वेगळी चूल मांड.."

असं म्हणून आई तरातरा निघून गेली..

वेगळी चूल तर वेगळी चूल,पण आता बायकोला आणायचंच असं त्याच्या मनानं घेतलं..

मोठ्या उत्साहात त्यानं सासुरवाडीची वाट धरली..

आधी तो आप्पांच्या घरी गेला..

आप्पा घरी नव्हते..चावडीवर गेले होते.काकींनी त्यांना बोलावणं धाडलं.. 

अलकाला न्यायला आलोय असं सांगून तो आप्पांची वाट पाहत बसला..

काकींनी दिलेला चहा पीत असतानाच आप्पा आले..

त्याला बघून आप्पांना खूप राग आला..

"आज तोंड दाखवलंस व्हय?..

आन आज तुला आप्पा दिसलाय?..

त्या दिवशी मारहाण करून तिला रागारागानं सोडून गेलास तवा नाय दिसला तुला आप्पा?.."

तो शांतपणे ऐकून घेत होता..

"आप्पा,खरंच चुकलंच माझं..

मी असं वागायला नको होतं..

पण मला एक संधी द्या..

मी तिला न्यायला आलोय.."

"मी संधी देणारा कोण बाबा!..आता बाई म्हणतील तसं हुईल..

चल,जाऊन येऊ आपण.."

असं म्हणून आप्पा त्याला घेऊन बाईंच्या घरी आले...

दारातच अलका आणि तिचे बाबा बसलेले होते..

अलका बाबांच्या हाताला मालिश करत होती..

अचानक नवरा दारात आलेला पाहून काय करावं हे तिला सुचेना..

थरथरत ती तशीच उभी राहिली..

"बाई,कोण आलंय बघा " असं मोठ्यानं आप्पांनी म्हणताच तिनं वाटी उचलली आणि पटकन घरात गेली..

बाईंनी आप्पांची हाक ऐकली,अलका पळत आत आलेली पहिली..

कोण आहे हे बघण्यासाठी त्या बाहेर आल्या..

अचानक जावई दारात उभा बघून त्याही गोंधळल्या..

घरात या म्हणायचं भानही त्यांना राहिलं नाही..

शेवटी आप्पांनीच या जावाईबापू असं म्हटलं तेव्हा त्या बाजूला झाल्या..

सुनीताला पाणी द्यायला सांगून चहाचं बघते असं म्हणून त्या आत निघाल्या..

"बाई,चहाचं राहुद्या..

आत्ताच झालाय आमच्या घरी..

जावई पोरीला न्यायचं म्हणतात..काय करायचं?.".

असं आप्पांनी म्हणताच इतका वेळ राखलेल्या संयमाचा बांध फुटला बाईंचा..

"माझी पोरगी काय रस्त्यावर पडली की काय?..

आम्ही मागं लागून नव्हतो आलो तुमच्या..की आमची पोरगी जड झालीय..घ्या पदरात म्हणायला..

गुरासारखं मारलंत तिला..

तिचं काय चुकलं हे न सांगताच आणून सोडलंत तिला...

दोन महिन्यात ना फोन ना पत्र...

काय समजायचं आम्ही...

अजिबात पाठवणार नाही तिला..

इथं काही कमी नाही तिला.."

बाईंच्या तोंडून लाह्या फुटत होत्या..

आवाज चांगलाच वाढला होता त्यांचा..

"कुठं आहे ती सासू म्हणवणारी?...

आग लावताना पुढं होती,आता का तोंड काळं केलं तिनं?..

तिला का नाही आणली?.."

अलकाला आईचं बोलणं पटत होतं..

खरी आग तर सासुच लावत होती..

नवऱ्याचा तसा दोष नसायचा..

पण त्या दिवशी चुकलंच होतं..

दरवाज्याच्या आडून ती बाहेरचं बोलणं ऐकत होती..

"मामी,माझं ऐकून तर घ्या.."

"काय ऐकायचं तुमचं?.."

"माझं चुकलं त्या दिवशी..

मी अलकाला न्यायला आलोय.."

तुम्ही न्यायला आलात पण आम्ही पाठवायला पाहिजे ना!..

"असं नका म्हणू.."

"आज न्याल, पुन्हा असंच मारहाण कराल आन आणून सोडाल, तुमचा काय भरोसा.."

"मला एक संधी द्या मामी..

मी तिला चांगलं वागवतो..

अलकाला विचारा..

ती पण सांगेल.."

"तिला काय विचारायचं?..

तिला नाही अक्कल..तुम्ही आलात तसे परत जा..

तुमच्या आईला येऊदे नाक घासत..मग करू विचार.."

"अहो मामी,आई नाही येणार..तिला कशाला बोलावता?..

मी जोडायला बघतोय..तुम्ही ताणून का धरताय?.."

"हे बघा,मी काही तिला पाठवायची नाही..

तुमच्या असल्या गोड बोलण्यावर माझा विश्वास नाही.."

"आप्पा,तुम्ही काही सांगा.."

"बाबा,तू चुकलास.. मी काय बोलू?..

तवा आला असतास तर मला बोलायला शब्द राहिलं असतं..

पण बाई,मला वाटतंय,तुमी जरा विचार करा.. पोरीच्या जिंदगीचा सवाल आहे.."

"कशाचा सवाल?..मला माझी पोरगी काही जड नाही मला.."

"बघा आप्पा!..मी पुढच्या रविवारी येईन परत.

पण प्रामाणिकपणानं सांगतो,मला संसार करायचाय अलकासोबत..

तिला जरा बोलवा ना बाहेर!.."

"ती येणार नाही.."

 असं म्हणून बाईंनी संभाषण खुंटवलं..

आप्पा आणि जावई बारीक तोंड करून उठले आणि बाहेर पडले..

अलकाला बाहेर यावं वाटत होतं पण आईच्या शब्दाचा मान राखून तिनं आपली इच्छा मनातच दाबली..

पुढच्या रविवारी येईन असं सांगून गेल्यामुळं अलकाला थोडी आशा वाटायला लागली..

ती दिवस मोजायला लागली..

शनिवारी बाईंनी तिला मुद्दाम बहिणीच्या गावी मुक्कामी पाठवलं..

रविवारी जावई यायच्या आधी स्वतः तालुक्याच्या गावी निघून गेल्या..

जावयाची खेप फुकट गेली..

बाईंना सल्ले देणारे अनेक होते..काही जण तिला पाठवा म्हणायचे तर काही जण जरा जिरवा जावयाची असं म्हणायचे..

दररोज बाईंच्या घरात शेजारी जमा होऊन बैठका व्हायला लागल्या..

या सगळ्यात अलकाचं मत कुणीच विचारात घेत नव्हतं..

तिला काय हवंय याच्याशी कुणालाच घेणं देणं नव्हतं..

दोनवेळा जावई आला ,पण त्याला बायकोला बघता आलं नाही..भेटणं तर दूरच राहिलं..

तिसऱ्या खेपेस जावयानं आप्पांच्या घरी येऊन काकींना गळ घातली..

"काकी,माझ्यावर एक उपकार करा..

मी आलोय हे कळू न देता अलकाला तुमच्या घरी बोलावून घ्या..

मला तिच्याशी बोलायचंय हो..

तिचं काय म्हणणं आहे हे समजतच नाहीए.."

काकींना त्याच्या मनाची घालमेल समजली..

त्यांनी अलकाला बोलावून घेतलं..

नवऱ्याला समोर बघून अलकाच्या डोळ्यातून गंगायमुना वाहू लागल्या..

तो ही निःशब्द झाला थोडावेळ..

बराचवेळ काहीही न बोलता दोघे फक्त एकमेकांकडे बघत बसले..

ते न बोलणंच खूप काही बोलून गेलं..

त्यानं तिचं मत विचारलं..

पण कधीच कुठलंच मत न देणारी ती काय बोलणार?..

तिला काय बोलावं तेच समजेना..

मी पुन्हा येईन दोन दिवसांनी असं सांगून तो गेला.

गेल्या तीन चार महिन्यांनंतर आज पहिल्यांदाच अलकानं भरून श्वास घेतला..

घुसमटलेला श्वास मोकळा होण्याची संधी तिला मिळाली..

नंतरचे दोन दिवस चातकासारखी वाट बघत राहिली..

यावेळी मात्र तो तिच्याशी स्पष्टपणे बोलला..

"अलका,मी तुझ्यावर खरोखर प्रेम करतो..

मला ते व्यक्त करता येत नाही,पण तुला आनंदात ठेवायचंय मला..

आपण वेगळं राहू..कारण आईनं तशी अट घातलीय..

मला तू समजून घे.."

तिनं हो म्हटलं..

आपलं सुख नवऱ्यासोबत राहण्यातच आहे हे तिला समजलं होतं..

तिला घरी जाऊ दिलं आणि पाठोपाठ तो हजर झाला..

"मी अलकाला न्यायला आलोय..

आज काय तो फैसला करा.."असं कडक शब्दांत त्यानं म्हटलं..

बाई थोड्या गडबडल्या, पण क्षणात सावरून त्यांनी सगळ्या हितचिंतकांना बोलावणं धाडलं...

छोटीशी खोली गच्च भरली..

मिटिंग भरली..

त्यानं आपला मुद्दा मांडला..

सासूने येऊन माफी मागावी यावर बाई अडून बसल्या..

"मामी,अलकाला बोलवा,तिचं काय मत आहे ते विचारा.."

"तिला काय विचारायचंय?..

ती माझ्या शब्दाबाहेर नाही.."असं त्या म्हणताहेत तोच अलका आतून बाहेर आली..

"आई,माझा निर्णय झालाय..मी यांच्याबरोबर जायला तयार आहे..

मला माझं हीत कशात आहे हे चांगलं समजलंय..

आई,कृपा कर..मला जाऊदे यांच्याबरोबर.."

कधी न बोलणारी,आपल्या शब्दाबाहेर न जाणारी आपली पोरगी एवढा मोठा निर्णय घेऊ शकते हेच त्यांना पचनी पडत नव्हते..

तिचा निर्णय योग्य की अयोग्य हे काळच ठरवणार होता..


सौ.सुतेजा सुनीलदत्त फडके

वाशीम

सदर कथा लेखिका सौ सुतेजा फडके यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने