©कल्याणी पाठक (वृषाली काटे)
रात्रीचे अकरा वाजलेले अन् श्रुतीची कामं अजून सुरूच होती.
उद्याची तयारी म्हणून तिनं कूकरच्या भांड्यात डाळ अन् तांदूळ काढून ठेवले. परातीत कणीक मोजून ठेवली. गवारीच्या शेंगा मोडून ठेवल्या अन् मेथीची भाजी पाण्याने धुवून निथळून फ्रीजमध्ये ठेवली.
सकाळच्या स्वयंपाकाला लागणारी भांडीदेखील आठवणीने घासून ठेवली.
तिला आठवलं, उद्या सासऱ्यांची एकादशी! तिनं तत्परतेनं साबुदाणा भिजत घातला. बरणीत बघितलं तर शेंगदाण्याचं कूट अगदीच संपलेलं!
तिनं लगबगीनं शेंगदाणे भाजायला घेतले.
तेवढ्यात मोबाईलचं नोटीफिकेशन वाजलं म्हणून तिनं दाणे भाजता भाजता मोबाईल हाती घेतला.
तिच्या ऑफिसच्या मैत्रिणींच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर मेसेज होता.. "उद्या सगळ्यांनी साड्या नेसून ऑफिसला यायचंय." खरं तर हे दुपारीच ठरलं होतं.
तिच्या सहकारी मैत्रिणीचं लग्न ठरलेलं अन् तिला उद्याच केळवण होतं.
पण कुणी विसरायला नको म्हणून त्यांच्या ग्रूप ॲडमिननं रिमाईंडर टाकलेलं!
खरं तर श्रुतीला अशा गोष्टींसाठी वेळच मिळत नसे. रोज हाताला येईल तो ड्रेस अडकवून धावतपळत ऑफिस गाठलं अन् मस्टरला भोज्जा केला की तिला हायसं वाटे.
सकाळची पाचदहा मिनिटं देखील तिच्यासाठी खूप महत्त्वाची असत.
खरं तर तिची बॉसपण एक स्त्रीच होती.. पण महाखडूस! "तिचं स्वतःचं लग्न झालं नाही म्हणून तिला विवाहित स्त्रियांची दुःख अन् धावपळ समजत नाहीत" असं तिच्या सगळ्याच सहकारी मैत्रिणी म्हणत.
"खरं तर बॉसदेखील मनाने वाईट नाही!" श्रुतीनं स्वतःच स्वतःच्या मनाला समजावलं.
नुसता मस्टरचा प्रश्न होता तेव्हा ती पाचदहा मिनिटे ॲडजस्ट करायची. पण हल्ली हे बायोमेट्रिक आल्यापासून तिच्याही हातात काही नाही!" श्रुतीनं उसासा सोडला.
दाणे भाजून झाले होते. तिनं गॅस बंद केला अन् कपाटातून गुलाबी साडी अन् ब्लाऊज बाहेर काढलं..
दोन्हीही चोळामोळा झालेलं! गेल्यावेळी साडी धुतल्यावर तिला इस्त्री करायला श्रुतीला वेळच मिळाला नव्हता. तिनं हॉलमधल्या दिवाणवर साडी ठेवून इस्त्री करायला घेतली.
हॉल मधला लाईट लागलेला बघून तिच्या सासूबाई बाहेर आल्या. "पावणे बारा वाजलेत ग! झोप आता! उद्या कर साडीला इस्त्री!" त्या जांभई देत देत अन् घड्याळाकडे बघत म्हणाल्या.
"हो,आई! उद्या उशीर होईल.. पुन्हा लाईट जाण्याची शक्यता! म्हणून आताच इस्त्री करून ठेवते!" भराभर हात चालवत श्रुती उद्गारली. तोवर सासूबाई पुन्हा त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या होत्या.
"अगंबाई, दाणे आताच सोलून कूट केलेलं बरं! उद्या लाईट गेले तर!" श्रुतीच्या मनात आलं अन् ती घाईघाईने स्वयंपाक घराकडे वळली.
दाणे मिक्सरमधून फिरवताच तिचा नवरा बेडरूम मधून ओरडला.. "अगं! ही काय वेळ आहे का मिक्सर चालवण्याची! आख्ख्या सोसायटीची झोपमोड होतेय! चल, ते ठेव आणि झोपायला चल!"
श्रुतीने घाईघाईने पसारा आवरला अन् ती झोपायला गेली.
सकाळी तिचा डोळा उघडला तेव्हा उन्हं चांगलीच वर आली होती. ती डोळे चोळत बाहेर आली.
तिनं बघितलं.. घड्याळात सव्वा सात वाजले होते. सासूबाईंची आंघोळ झाली होती अन् त्या देवासाठी फुलांचे हार करत होत्या.
सासरे पिशवी घेऊन बाजारात जाण्याच्या तयारीत होते. नवरा मात्र हॉलमध्ये आरामात पेपर वाचत बसला होता.
तिनं मुलींच्या खोलीकडे धाव घेतली. श्रेया अन् प्रिया.. तिच्या बारा अन् दहा वर्षांच्या दोघी मुली अजून गाढ झोपेत होत्या.
तिनं दोघींनाही महत्प्रयासाने झोपेतून उठवलं अन् आवरायला पाठवलं.
"समीर, अरे दोघींचा क्लास असतो रे आठ वाजता! मला रात्री झोपायला उशीर झाला म्हणून मला जाग आली नाही. पण तू लवकर उठलास तर मुलींना उठवायचं ना! खाली ऑटोरिक्षा येऊन उभा राहील आत्ता अर्ध्या तासात!ऑटोतल्या इतर मुलींच्या आया कुरकुरतात रे श्रेयाप्रिया मुळे क्लासला उशीर होतो म्हणून!" श्रुती काकुळतीने म्हणाली.. "आणि आज जर मुलींचं आवरलं नाही ना वेळेत तर तू मुलींना क्लासला घेऊन जा! मी आज ऑटो वाल्याच्या मिनता करणार नाही थोडा वेळ थांब म्हणून!" श्रुतीने नवऱ्याला सुनावलं अन् ती आपलं आवरून स्वयंपाक घराकडे वळली.
"आमचा तिघांचा चहा झालाय ग!" सासूबाईंनी मोठ्याने सांगितलं.. तू फक्त तुझा चहा कर!"
श्रुतीने स्वतःच्या चहाकरिता भांडं गॅसवर ठेवत घड्याळाकडे बघितलं. "साडे सात वाजून गेलेत. आता चहा घेत बसेन तर उशीर होईल!" तिनं चहा घेण्याचा विचार मनातून काढून टाकला अन् मुलींसाठी दूध तयार केलं.
मुलींची टंगळमंगळ सुरूच होती. कधी प्रेमाने तर कधी रागाने तिनं मुलींना तयार केलं. दूधबिस्कीट भरवलं. मुली वेळेवर ऑटोरिक्षात बसल्या अन् तिनं आजच्या दिवसातील पहिली लढाई जिंकली.
आंघोळ करून श्रुती बाहेर आली तर सासरे बाजारातून परत आले होते.
"श्रुती, आज बाजारात रताळी फार सुरेख मिळालीत गं! आज सकाळी रताळ्याचा कीस कर फराळाला!" सासऱ्यांनी फर्मान सोडलं.
"बाबा, अहो, मी साबुदाणा भिजवलाय काल रात्रीच!" श्रुतीने सांगण्याचा प्रयत्न केला.
"तो फ्रीजमध्ये ठेवून दे. हवी तर संध्याकाळी साबुदाण्याची खिचडी करता येईल." सासूबाई स्वयंपाकघरात येत बोलल्या.
"आई, आज उशीर झालाय हो! रताळी किसायला वेळ लागेल ना! अजून मावशी पण आल्या नाहीत पोळ्यांना! काल त्यांच्या नवऱ्याला बरं नव्हतं. माहीत नाही आज कशी आहे तब्येत! आज जर त्या आल्या नाहीत तर पोळ्या पण कराव्या लागतील.." श्रुतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
"अगं, पाच मिनिटात किसून होतील रताळी! मीच किसून दिली असती पण माझे हात दुखतात हल्ली! शिवाय माझी देवपूजा व्हायचीय अजून! आज एकादशी! विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करेन म्हणते!" सासूबाईंनी मोठ्या खुबीने स्वयंपाक घरातून काढता पाय घेतला.
श्रुतीने रताळी किसायला घेतली. खरं तर तिला मनातून रडू येऊ लागलं होतं. आजची ही धावपळ टाळण्यासाठी तिनं काल रात्री जागून तयारी करून ठेवली होती.. पण वेळेवर हे वेळखाऊ काम आलं अन् तिच्या टाईम मॅनेजमेंटचा फज्जा उडाला.
बरं ही काही आजची गोष्ट नव्हती. दोनच दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने सकाळी ऐन वेळेला त्याचे दोन शर्ट साबणाच्या पाण्यात भिजवले. त्याला ते आत्ताच धुवून हवे होते.
"अरे! दुपारी धुण्याच्या मावशी येतील त्या धुवून देतील!" श्रुतीने सांगून बघितलं.. पण नवऱ्याला शर्ट अर्जंट हवे होते.
घरात वॉशिंग मशीन आहे.. पण शोभेपुरती.. त्यात धुतलेले कपडे कुणालाच आवडत नाहीत. मावशी येईपर्यंत धीर नसतो.. अन् मग माझीच दमछाक होते!" श्रुती विचार करत होती.
श्रुतीने रताळी किसून फोडणीला घातली.. पण तिचं कामात लक्ष लागत नव्हतं.
तिनं यांत्रिकपणे कामं उरकायला सुरूवात केली. कुकर लावला.. काल मोडून ठेवलेली गवार फोडणीला घातली.
"मेथी चिरायला वेळ लागेल.. आज एकच भाजी करू या का!" श्रुतीने मनात विचार केला अन् पुढच्याच क्षणी तो बाजूलाही टाकला.
त्यांच्या घरी रोज पालेभाजी करण्याची पद्धत होती. पालेभाजी तब्येतीला उत्तम! पण ती आदल्या दिवशी चिरून ठेवली की त्यातली सत्त्वं निघून जातात असं लग्न झाल्याझाल्याच तिला सासूबाईंनी सांगितलं होतं.
मात्र तिने हट्टाने भाजी. आदल्या दिवशीच धुवून ठेवण्याचं स्वातंत्र्य महत्प्रयासाने मिळवलं होतं.
विचारांच्या आवर्तनातच तिनं मेथी चिरून फोडणीला घातली. भाज्यांना फोडणी घातली.. काकडी टोमॅटोची कोशिंबीर देखील केली. सासूबाईंना जेवणात रोज गोड लागतं म्हणून केळ्याचं शिकरण करून ठेवलं.
पोळ्यांना मावशी आल्या. आज त्यांना नेहमीपेक्षा उशीर झाला होता. इतर वेळी त्या उशीरा आल्या की श्रुती त्यांच्यावर वैतागायची. पण आज तिला त्यांची कीव आली.
"मावशीसुद्धा आपल्यासारख्याच नोकरदार! आपल्याला घरचं सांभाळून ऑफिसला जायला उशीर होतो.. तर त्यांनाही होणारच कधीमधी! त्यांनाही घरदार आहेच की!" श्रुतीच्या मनात विचार आला.
तिनं मावशींच्या नवऱ्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.. अन् मावशींच्या हातात बळेबळेच पाचशे रुपयांची नोट कोंबली.. सगळ्या तपासण्या करून घ्या म्हणून!
" श्रुती,पावणे दहा वाजलेत ग! तुला उशीर होतोय.. तू तुझा डबा भर अन् निघ लगेच! 'हे' काही इतक्या लवकर फराळ करणार नाहीत अन् समीरला अजून वेळ आहे निघायला तर त्याला जेवायला वाढेन मी!" सासूबाईंनी उपकार केल्यागत तिला सांगितलं.
श्रुतीने घाईघाईने डबा शोधायला सुरुवात केली.
"अगं, तुझा जो तीन खणी टिफीन आहे ना.. काल रात्री तू घासून ठेवलेला.. तो सकाळीच शेजारची रमा घेऊन गेली.. तिच्या नवऱ्याला टूरवर जायचं होतं अन् तिला तिचा टिफीन सापडत नव्हता! मला पण तो एकच दिसला गं समोर.. म्हणून मी देऊन टाकला.. तो ती रात्री आणून देईल! तू दुसरा टिफीन घेऊन जा!" सासूबाईंनी बाहेरूनच आवाज दिला.
घरात दुसरा तीन खणी टिफीन होता.. पण तो माळ्यावर.. तो तिथून काढून घासण्याइतका वेळ नव्हता..
मग श्रुतीने किचन ट्रॉली उघडली. त्यात श्रेया पहिल्या वर्गात असताना घेतलेला छोटा टिफीन होता. लहान लहान दोन खणांचा.. तिनं त्यात एक पोळी अन् थोडी भाजी भरून घेतली.
काल रात्री जागून इस्त्री केलेल्या साडीच्या घडीकडे केविलवाणेपणाने बघत तिनं हाताला सापडेल तो ड्रेस अक्षरशः अडकवला अन् ती ऑफिसला रवाना झाली.. रोजच्यासारखीच!
काल रात्रीपासून राबराब राबून.. चारी ठाव स्वयंपाक करूनदेखील ती आजही स्वतःच्याच घरी जेवायला लागणाऱ्या फक्त पंधरा मिनिटांकरिता पारखी झाली होती.. रोजच्यासारखीच!
क्रमशः
©कल्याणी पाठक (वृषाली काटे)
सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत.
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
