खट्याळ सासू नाठाळ जावई

 © अपर्णा देशपांडे


" अहो , चलताय न , उशीर होईल आपल्याला . " चंदा ने सदानंद ला गदागदा हलवत म्हटलं . 

सदाला काहीच फरक पडला नाही . पोटभर तुडुंब जेवून सुस्त पडलेल्या अजगरा सारखा सदा सोफ्यात लोळत क्रिकेट मॅच बघत होता . 

चंदा त्याला पाघळलेला बेसनाचा लाडू म्हणायची . ..गरम असतांना वळला तर कसा पसरतो , तसा आपला नवरा सोफ्यात पसरतो असे वाटे तिला . 

" अहो , ती बघा , झिया आपल्या  'डॉगी'  ला चक्क कडेवर घेऊन फिरायला जातीये . " 
   
" कुठे  , कुठे ?" म्हणत सदा ताटकन उठला आणि बाल्कनीत जाणार इतक्यात चंदा गुरकावली "तिकडे कोंन्नी नाहीये , मुकाट चपला घाला पायात ."  आता मात्र सदा चिडला . 

चिडला म्हणजे कसा , त्या कार्टून शो मध्ये कसं , टॉम पुढे पिटुकला जेरी कमरेवर हात ठेवून त्याला  ""टशन"""  देतो , तसा सदा तिच्याकडे बघू लागला . 

 " अहो आई वाट बघतेय , """ऑस का s य हो कोरटॉ """"  असे ओठाचा चंबू करत ती म्हणाली , मग त्याला जाणे भाग पडले . ....तीच्या ह्या लाडिक बोलण्याला भुलून नाही , तर पुन्हा तिने असले भयानक अस्त्र आपल्यावर फेकू नये म्हणून त्याने पटकन चपला पायात घातल्या . 

 " अहो s ,  ल्याचच्या किल्ल्या कोण घेणार ? " 
यांत्रिकपणे त्याने किल्ल्या घेतल्या .

कसं मेलं माझ्याच नशिबी हे ध्यान आलं.....असा कटाक्ष टाकून ती बाहेर पडली . 

सुटीच्या दिवशी आराम सोडून  सासूबाईंकडे जायचं म्हटलं की सदा  असाच कंटाळा करी आणि फरफटत नेल्या सारखे बायको त्याला घेऊनच जाई . 

सासरेबुवा तसे मिश्किल आणि स्वभावाने गरीब होते . पण   सासूबाईची गडद छाया सासरेबुवांवर पडल्याने त्यांची  "" पर्सन्यालिटी""  झाकोळलेलीच होती . 

अर्धग्लानी अवस्थेत सदा खुर्चीत बसून होता . 

सासरेबुवा  कुठलातरी दरिद्री सिनेमा बघत होते . 

कुटुंबातील एकमेव सुसह्य सदस्य , मेव्हणा चंद गावी गेला होता , सुपारीचा हिशोब करायला . 

 "अहो , आता टीव्हीत तोंड घालायचे तेवढे बाकी राहिले तुमचे . किती चिटकून बसलाय . " इति सासूबाई .

" अग तुझ्या पहाडी आवाजापुढे मला काहीच ऐकू येत नाहीये ना ! " 

" जावई माणूस आलंय घरी , चार शब्द बोला त्यांच्या सोबत ..."

 नशीब  जावई  """ माणूस "" आहे हे मान्य आहे तर ! सदा ला वाटले . 
      
जेवण वाढतांना सासूबाई सारख्या  सदा कडे बघत होत्या . 
जावईबापू  ' लावून "  आलेत की काय अशी त्यांना शंका येत असावी . 

" सदाराव , तुम्ही किनई हरिद्वार ला जाऊन जरा शरीर स्वास्थ्यासाठी  'ध्यान , आहार आणि विहार '  असा आठ दहा दिवसांचा वर्ग करून या  बरं . फार सुस्ती बरी नाही . .....ह्या सासरेबुवांना ही घेऊन जा सोबत . " आणि  खी ! खी! करून हसल्या त्या चक्क . 

" काहीतरीच काय !!!  विचित्र बाई !! मला ऑफिस मधून सुटी मिळणे शक्य नाही . आज रविवार आहे , छान आराम करु की इथे येऊन दिवस खराब करुन घेऊ ?........ असे त्याने मनातल्या मनातच म्हटले . 

बाहेर फक्त " हम्मम " इतकाच आवाज आला . 

" आमच्या चंदाला पण घेऊन जा सोबत . ती देखील चार योगासने शिकेल बिचारी . " 

  """ बिचारी???"""  आपली लेक बिचारी आणि जावई काय मग खाटीक ?  असे त्याचे मन ओरडत होते .  

आणि तुमच्या चंदाला सोबत न्यायचं तर मग 'ध्यान'  लावायला तिथे कशाला जायचं ? ध्यान  तर इथे ही सोबत आहेच की ...( हे सगळं मनात बरं !!) 

" आई , भारी आयडिया आहे !! मला करायचाय असा कोर्स हरिद्वारला जाऊन . यांना राहुदेत इथेच . बाबा आपण तिघेच जाऊया ."  चंदा म्हणाली आणि सासूबाईंनी ते फारच मनावर घेतलं .
 
 " चंदे , आपण तर जाऊ ग , पण तुझ्या नवऱ्याला इथे एकटे का रहायचे आहे ?  लक्ष ठेव बाई . " 

" नाही ग आई . यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर . आणि काही लफडं करायला न , हिम्मत लागते . "  यावर दोघी मायलेकी जोरात हसल्या .

 ******  

सदाची अवस्था  'स्वर्ग दोन बोटे' अशी होती . पूर्ण 700 स्क्वे . फु .   वर आपलेच राज्य !! आहाहा !! त्याने लगेच  आपला बालमित्र  दिवाकर ( दिव्या) ला फोन केला .

" कुठाएस दिव्या !! हा , हा , आज मै उपर , आसमा नीचे .."

" चंदा वहिनी माहेरी गेल्यात वाटतं . पण लेका , मी तुझ्याइतका भाग्यवान नाहीये रे  .... सासूबाईंना घेऊन  त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला आलोय " 

दिवाकर नाही म्हटल्यावर कुणाला बोलवावे असा विचार करत असतानाच बेल वाजली . 

सदाने दार उघडले . ...त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना . दारात एक अतिशय देखणी , उंच , मॉडर्न आणि आकर्षक तरुणी उभी होती . 

" आपण कोण ?" आतून आनंदाच्या उकळ्या झेलत त्याने विचारले . 

डोळे फडफडवत ती उत्तरली , 
 " मी सोफिया . आत येऊ का ? " त्याला थोडेसे विचित्र वाटले , पण खास सुटी घेऊन घरी राहावे आणि असे सुख अलगद दारी यावे ह्या सुंदर योगायोगात तो अजून गटांगळ्याच खात होता .

ती आत आली . आल्याबरोबर तिने कोपऱ्यातील झाडू घेऊन काही मिनिटातच घर झाडून टाकले , फडक्याने पुसून टाकले . 

आपल्या कामवाल्या मावशीला इतकी देखणी मुलगी किंवा भाची असल्याचे आपल्याला कसे माहीत नाही याचे त्याला तीव्र दुःख झाले . 

सोफियाने गचाळ झालेला ओटा , गॅस शेगडी आणि मोरीतील भांडी चुटकीसारशी साफ करून टाकली . 

जाळे काढले , बाल्कनीत कुंड्यांना पाणी घातले , आणि ती आत बेडरूम मध्ये गेली .
  
तिच्या सगळ्या यंत्रवत वाटणाऱ्या हालचाली अतिशय "" बारकाईने"" बघत असलेला सदा आता एक्साईट झाला होता .

तिने बेडवरील चादर झटकली , उश्यांच्या खोळी काढल्या , आणि वॉशिंग मशीन मध्ये टाकायला  गेली , की सदा ने गादीवर अंग टाकले . 

तो आतुटेने तिच्या येण्याची वाट बघत होता . इतक्यात भरा भरा गादी गुंडाळल्या गेली . सदा आतून ओरडत होता , " सोफिया , मी आहे आत , मी आहे s " बघता बघता गादी उचलल्या गेली .

सोफियाने भर भर पायऱ्या चढायला सुरुवात केली . 

सदा आदळत होता , डोके भिंतीवर आपटत होते , पाउले रेलिंगला घासत होते , हात पाय मात्र गच्च गादीत गुंडाळलेले . 

तिने गादी गच्चीत आणून उन्हात भिंतीशी उभी लावली ....सदाचे डोके खाली आणि पाय वर अशा अवस्थेत ! 

सदाचा पार खुळखुळा झाला होता . पाचच मिनिटात त्याचा श्वास गुदमरायला लागला .

खाली सदा नाही म्हटल्यावर त्याला बघत सोफिया पुन्हा वर आली आणि "उपस्स !"  म्हणत तिने गादी उचलली . 

" अग माझे आई , आधी मला बाहेर काढ ना ! " हे सदा बोलला , पण बाहेर आवाजच आला नाही . 

पुन्हा तोच अत्याचार . डोके आपटत , पाय घासत त्याची वरात खाली आली .
 
तिने पलंगावर आणून गादी उकलली , तसा सदाने भरभरून श्वास घेतला . चादर घालून उश्या नीट लावून झाल्यावर तिनेही पलंगावर अंग टाकले . 

सदा ह्या क्षणाची जिवाच्या आतून वाट बघत होता . 

ही मावशींची भाची फारच जास्त  'स्मार्ट' होती  बुवा . 

अंगातील सगळी गेलेली ताकद एकवटून सदा उठला , त्याने आधी भरपूर पाणी ढोसले , मग अंगावर मादक सुगंध फवारला आणि कॉट वर बसणार इतक्यात बघतो तर काय , सोफिया एका बाजूला निपचित पडली होती . 

इतक्यात कशी झोपली असा विचार करत  त्याने घाबरतच तिला हात लावला , आणि दचकून मागे सरकला ....तिच्या पोटाजवळ कापड्यातून लाल लाईट दिसत होता .  

ही काय भानगड आहे बुवा म्हणत त्याने हात लावताच आवाज आला " बॅटरी रिचार्ज करा ....बॅटरी रिचार्ज करा ..." ...हे भलतच काय ह्याचा विचार करत असतानाच बेल वाजली . 
आता मात्र सदाची कढी पातळ !!

आपल्या बेडरूम मध्ये एक मादक तरुणी अशी झोपलेली !!!  कुणी पाहिलं तर!   मग  सोसायटीच्या सगळ्या बायका आपल्याला  दोन्ही पाय पकडून दगडावर आपटून आपटून मारताएत असे चित्र त्याला दिसले ,आणि थरथर कापतच त्याने दार उघडले . 

" अय्या भाऊजी तुम्ही घरी ? चंदा कुठाय ? " असे म्हणत शेजारच्या फ्लॅट मधील  राधा वहिनी आत घुसणार इतक्यात  सदा मध्ये आला . ....

.." व व वहिनी , ती आईकडे गेलीये , तुम्हाला काय हवंय , साखर ? "

" ईश्श !! साखर नाही काई , थोडंसं विरजण द्या मला ..मी घेऊ का .."

" न ..न .. नको , मी देतो न आणून  " 

 ती अजून चार पाऊल पुढे आली तरी आतली  "" सोफिया "" तिला दिसणार होती . 
विजेच्या वेगाने जाऊन त्याने विरजण आणून दिले ...वहिनी गेल्या आणि सदा ने सोफ्यात अंग टाकले . 
सगळे जेवण उतरले होते.   घशाला कोरड पडणे म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव तो घेत होता . शिवाय सगळे अंग ठणकत होते . 

आत बेडरूम मध्ये आल्यावर तो भानावर आला .

""बॅटरी रिचार्ज करा ""  म्हणजे ...ही ...ही  एक रोबोट आहे ?  ह्युमनोईड रोबोट ? म्हणजे ही कामवाल्या मावशीची मुलगी नाही ! 

हिला कोणी पाठवले ? आणि कीती पटापट काम करते ही . 

त्याच्या अपेक्षांना जरी सुरुंग लागला तरी  इतकी सुंदर रोबोट आता आपल्या सेवेत असेल ह्या विचाराने खूष झाला तो .  बॅटरी रिचार्ज झाली की सोफिया उठली . पुन्हा कामाला जाणार इतक्यात सदा ने तिचा हात पकडला . 
 
ती कसली लाजली . 

" रोबोट्स लाजतात ? "

" मी मानवी रोबोट आहे . " किंचित मेटॅलिक आवाज आणि काही हालचाली सोडल्या तर ती पूर्ण मानवच होती . 

" माझे आजचे मुख्य काम तुम्हाला योगासनं शिकवणे हे आहे . तुमची सुस्ती घालवायची आहे न ? " 
......सुस्ती घालवायचिये ? हे तर आपल्या पूज्य सासूबाईचे वाक्य !! हिला कसं माहीत ?....

"  मला आधी सांग , तुला इथे कुणी पाठवलं ? " 

" निर्मला गणपुले "  तिने खरखरीत मेटॅलिक आवाजात सांगितले ,आणि सदा चे कान उभे राहिले . 
....नि . ग ,  म्हणजे आपल्या सासूबाई ? त्यांनी हा रोबोट इथे पाठवला ? 

इतकी सुबुद्धी त्यांना कुणी दिली ? जगातील समस्त सासु जमातीला त्याने मनापासून धन्यवाद दिले . 

अचानक सोफियाने आपला पवित्रा बदलला आणि सदा ला आपल्याजवळ ओढले . 

त्या अचानक पुढाकाराने सदा गांगरला .  

त ..त ..प्प ..हे s ...आ s ..अहो ...

त्याला घाम फुटला . तिने लगेच रुमालाने त्याचा घाम पुसायला हात पुढे केला तसा सदा पट्कन उठला ..

" मी पुसतो ...मी पुसतो न " 

काही तरी वाजत होते . त्याने इकडे तिकडे पाहिलं , त्याचा मोबाईल वाजत होता . 

" हॅलो !! " फोनवर आवाज ऐकूनच तो उभा राहिला . सोफिया त्याच्याकडे बघत , आपले डोळे उघडझाप करत  कान देऊन ऐकत होती . 

" येस सर ! ...हो सर ... देतो सर ! " 

 " बॉस चा फोन होता ? " 

" हो , त्यांनी मला एक रिपोर्ट पाठवायला सांगितला होता . तुझ्यामुळे सगळंच राहिलं . 
आता मला ताबडतोब कामाला लागलं पाहिजे . 

" कसला रिपोर्ट ? " 

सदाने काय ते सांगितले .
 
" मला गरम गरम कॉफी मिळेल ? ....प्लिज ? " आपले रेखीव डोळे रोखून तिने विचारले .
किती हिम्मत हिची ! कामवाली रोबोट असून मला कॉफी मागते ? असा विचार करतच चडफडत तो आत गेला . 

कॉफी घेऊन येतो तर रिपोर्ट तय्यार !!! 

 अख्खा क्रिकेटचा बॉल बसेल इतका तोंडाचा मोठ्ठा आ करत तो बघताच राहिला . 
" तू हे कसे केलेस ?"

" मी प्रोग्रॅम्ड आहे न " ओठांची कातील हालचाल करत ती म्हणाली . 

" आपण एक सेल्फी घेऊया ?  आमच्या मालकाच्या करारानुसार आपली वेगवेगळ्या पोझ मध्ये सेल्फी घेतली पाहिजे , म्हणजे डिजिटल मीडिया कडून आम्हाला खूप रोबोट्स च्या ऑर्डर्स मिळतील , आणि मला काम . " 

" ..पोझ .....म ...म्हणजे ?" 

" म्हणजे  'हग' करतांना ,  ' किस ' करतांना ,  खास फोटो " 

 " हे फोटो तू इन्स्टाग्राम , फेसबुक वर टाकणार ?"  घामाघूम सदा बोलला .

" हो s s !! नाय टाकायचे ? " तिने गळ्याभोवती हात टाकले तास टुणकन उडी मारून सदा सोफ्यातून बाहेर आला . 

 " असं काय करता गडे !! " म्हणत ती मागे लागली . लहानपणी सुध्दा कधी पळापळी न जमलेला सदा वेडा वाकडा वाट मिळेल तसा पळू लागला . 

काहीच सुचेना म्हणून शेवटी अलमारीवर चढून बसला . 

 " ए सोफिया , तुला कुणी बनवले , कुणी इथे पाठवले मला काही देणं घेणं   नाही . पण तू आता जा . तुमची काय फिस असते ? मी देतो , पण तू जा बाई . " 

" योगासनं शिकायचे राहिलेत ना ! "
त्याच्या म्हणण्याला बिलकुल भीक न घालता ती त्याचे पाय ओढू लागली 

तसा त्याने चंदाच्या नावाचा धावा सुरू केला .
" चंदा s , चंदा s , मला वाचव ग !!" 

आणि काय आश्चर्य ! 

चंदा तर नाही  पण दिवाकर आला होता  .
काय तरतरी आली सदाला ! ,

धप्पकन कपाटावरून खाली उडी मारून तो त्याच्या मागे लपला . 

 " अरे , असा लपटपटतोय काय ? ती बिचारी योगा शिकवते म्हणतेय " 

"   तूला काय जातंय म्हणायला ! ह्या तुझ्या बिचारीने माझे सगळे पुर्जे ढिल्ले केलेत . मी केव्हाच तिची बॅटरी काढून तिची हवा फुस्स केली असती . पण सासूबाईंनी खास माझ्या सेवेसाठी हिला पाठवलिये . सासर च्या कुत्र्याला देखील  ' अहो हाड ! '  म्हणावे लागते न . मग ही तर ...." 
 
हे बघा  ताई , तुम्ही तुमचे आजचे कामाचे पैसे घेऊन जाऊ शकता . "
       

सोफियाने कपड्यातून स्वाईप मशीन काढले . सदा ने कार्ड वापरून तिचे पैसे दिले . ठुमकत ठुमकत सोफिया गेली . जाताना एक उडते चुंबन फेकून गेली . 

 " काय येडा आहेस रे सदा ! ही काय खरच रोबोट वाटली का तुला ? म्हणे सासूबाईंनी पाठवलीये ! " 

" अरे , आधी मी खरंच फसलो होतो . कारण  असे रोबोट्स बनले आहेत हे तर खरच न? ..पण जेव्हा ती  सेल्फी चा आग्रह करत होती , तेव्हा शंका आली आणि मग योगासनाबद्दल बोलली तेव्हा मात्र खात्रीच पटली की ही आमच्या खट्याळ सासूबाईंची  चाल आहे . " 

  " वहिनी कधी येणार आहेत ? " 

  " अजून पाच दिवसांनी . ....दिव्या , ऐक! " ....सदाच्या कुरापती डोक्यात  काहीतरी शिजत होते .  

  *********    

 " त्या हरिद्वारला नुसता उकडलेला पाला खाऊन जीव वैतागला ग बाई ! " निर्मला गणपुले , म्हणजे सासूबाई म्हणाल्या . 

 " आई , मी आज जाते ग घरी . बिचारा माझा नवरा ....तू पण काय भन्नाट डोकं लढवलंस ग ! पद्मिनी राव ने काय जबरदस्त वठवला रोबोट चा रोल ! ती काय हुशार , फिट आणि ताकदवान आहे, खरच ! आमच्या साहेबांची कशी  घाबरगुंडी उडाली असेल ना? " 

" हो ना ग . मला न , ह्या पुरुष जातीवर बिलकुल विश्वास नाही . दिसली सुंदर बाई , की पाघळले लगेच . आणि  हे जावई लोक तर फार स्मार्ट असल्याचा आव आणतात . ही सासू पण काही कमी नाही म्हणावं . "

" कमी नाहीच मुळी . मला विचारा न ! " ...श्री गणपुले.
        
दारावर कुणी आले होते . त्याने एक चिठ्ठी दिली ,आणि काही न बोलता लगेच गेला . 

श्री गणपुल्यांनी  बघितले...... "अग, जावई बापूंची चिठ्ठी आहे . स्वतः न येता चिठ्ठी पाठवली ? आश्चर्य आहे ! "

" बडबड न करता वाचा की . " 

प .पु . सासूबाईस ,
सा . न 
आपण जगातील सर्वोत्कृष्ट सासू आहात . जावयाची किती काळजी!!  आपल्या मुलीच्या अनुपस्थितीत  त्यांना कुठलीच कमतरता जाणवू नये म्हणून एव्हढा परफेक्ट , तीव्र बुद्धिचा  मानवी रोबोट पाठवलात. मी आणि """सोफिया "" नि कसली धमाल केली पाच सहा दिवस . 

स्वर्गीय ...अनु..अनुभव . "  गणपुल्यांनी चंदा कडे पाहिले . 

पाणी काठा पर्यंत आलेच होते . बस बांध फुटायचा बाकी होता . 

" अहो वाचा की पुढे !! " सासूबाई कडाडल्या. 

ते वाचू लागले.....
" इतकी सर्वगुणसंपन्न स्त्री ,म्हणजे रोबोट असल्यावर आयुष्यात आणखी काय हवं ? आता मला दुसऱ्या  कुण्णा कुण्णाचीही  गरज नाही. मी आणि माझी सोफु डार्लिंग ..बस! तुमचे कित्ती कित्तीआभार  मानू ?
                                तुमचा   जावई , ( पूर्वाश्रमीचा )
                                        सदानंद  ""
गणपुल्यांनी चमकून चंदाकडे पाहिलं .  

तिचे नाक , कान लाल झाले होते.

सासूबाई सुन्न होऊन स्थिर बसल्या होत्या . आणि अचानाक उठल्या .
" वा रे वा ! असे कसे !!  मी आत्ता पद्मिनी ला फोन लावते . काय खरं काय खोटं ता आत्ता कळेल. तू रडू नकोस ग नंदा! सारखं आपलं मुळूमुळू." 

त्यांनी पद्मिनीला फोन लावला .....हा नंबर अस्तित्वात नाही...असे उत्तर आले , आणि चंदाने मोठ्याने गळा काढला .

 " काय गरज होती  त्यांची परीक्षा घ्यायची ? किती चांगला गुणी माझा नवरा , उगाच खोडी काढलीस त्याची !!! आता त्या सोफु बरोबर बसला असेल गुलगलू करत !! तीही पाघळली लगेच !!! आ s हा s s ...." तिने भोकाडच पसरले . 

 ******** 

बेल वाजली आणि सदाने दार उघडले .दारात सासूबाई , सासरे आणि चंदा राणी उभ्या होत्या .  चंदा तिरासारखी आत घुसली . 

सासूबाई आपले फुगलेले तोंड घेऊन धप्पकन सोफ्यात बसल्या . 

सासरेबुवा शांतपणे तिथला पेपर तोंडासमोर घरून बसले . 
 " कुठाय ती सटवी ? " घरभर फिरून येऊन चंदाने विचारले .

 " सोफु का  ? माझी सोफु जरा बाहेर गेलीये . बॉडी रिचार्ज करायला . दमली ना बिचारी ! " सदा ने लाडिक आवाजात म्हटले .

 " माझी सोफु ?   माझी सोफु ? आणि रिचार्ज व्हायला ती रोबोट फिबोट काही नाहीये . माणूस आहे माणूस !! "

 " ती कशीही असली तरीही मस्तं आहे . किरकिर नाही , आरडाओरडा नाही , आणि आता तर सासू माँ देखील नसतील मध्ये मध्ये करायला ....आहाहा !!! काय सुंदर आयुष्य आहे हे !! धन्यवाद सासू मा!! "

" मला ही अशीच एखादी  ""सोफु""  द्यायला पाहिजे होती आमच्या सासूबाईंनी . " गणपूले म्हणाले आणि सदा ने त्यांना जोरात टाळी दिली.

  तसे दोघेही हसायला लागले ...सदा तर हसता हसता आडवाच पडला .
  
मायलेकी  गोंधळात पडून एकमेकीकडे बघू लागल्या .

" मानलं तुम्हाला जावईबापू ! मला वाटलं आमचं खटलंच फक्त खट्याळ आहे . तुम्ही तेव्हढेच नाठाळ निघालात . अगदी पद्मिनीलाही सामील करून घेतला प्लॅन मध्ये !!! सासू खट्याळ तर जावई नाठाळ !!!! "

© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
           

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने