© वीणा श्रीकांत काटे
साधारण अर्धशतकापूर्वी ची गोष्ट...
आम्ही दोघे उत्तर भारत पर्यटनाला निघालेलो अन् कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी हरिद्वार मुक्कामाचा योग आला .
सुवासिनी ह्या रात्री फुलं ठेवलेल्या लहानशा द्रोणात दिवा पेटवून गंगेत सोडत... मीदेखील गंगेत दिवे सोडले ...पण एक नव्हे दोन ... ऋषिकेश ला देवासाठी पाळणे दिले तेदेखील दोन...
घरी परतलो आणि कळलं की मी आई होणार !
मला डोहाळे लागले ते सगळं काही जोडीचं करण्याचे ! देवपूजेचे वेळी दोन उदबत्त्या .. दोन कलश, दोन नारळं ... निरांजनात दोन वाती... काही घ्यावं तर जोडीचं काही द्यावं तर जोडीचं ...
दिसामासाने माझं वजन अपेक्षेपेक्षा जास्तच वाढू लागलं. डॉक्टर म्हणाल्या, "जुळं असू शकेल !" ऐकताक्षणी 'ह्यां'ची प्रतिक्रिया - "दोन्ही मुलीच हव्यात !"
त्याकाळी सोनोग्राफीची सोय नव्हती. एक्स-रे काढला. त्यात एकच बाळ दिसलं. पोटात मात्र दोन बाजूला दोन गोळे जाणवायचे.
सातव्या महिन्यात अचानक कळा सुरू झाल्या. डॉक्टर म्हणाल्या, "कदाचित प्रसूती आताच होईल."
दवाखान्यात ऍडमिट केलं. त्यादिवशी दवाखान्यात ओळीनं दोन जुळी जन्माला आली.
माझ्या प्रसूतीचा दिवस आज नव्हता.
मला सुट्टी झाली . मला वाटलं, "बरं झालं , आज बाळंतीण नाही झाले ...नाहीतर इजा बिजा तीजा ...मलाही जुळं झालं असतं !"
घरी सासूबाईंना सांगितलं ...त्या हसल्या . बोलल्या मात्र काहीच नाहीत...!
यथावकाश प्रसूती झाली ... माझे डोहाळे खरे ठरले आणि डॉक्टरांचा अंदाजही ! 'ह्यांची इच्छाही पूर्ण झाली.
जुळ्या मुलींचा जन्म झाला ...
🏻
बातमी कळली , तशी दवाखान्यात जुळ्या बाळांना पाहण्यासाठी लोकांची रीघ लागली... जुजबी परिचयाची मंडळीदेखील घरी येऊन बारशाचे निमंत्रण मागून घेऊन गेली.
मुलींसाठी जोडीची नावं सुचवण्याची इष्टमित्रांमध्ये चुरस लागली.
पत्रिका छापल्या . बाराव्या दिवशी धुमधडाक्यात बारसं केलं !
मुली दोन-अडीच महिन्यांच्या असताना माझ्या सासर्यांनी दोन बाळं आरामशीर झोपू शकतील अशी ऐसपैस बाबागाडी आणली.
ते दोघींना बाबागाडीत झोपवून सायंकाळी बागेत स्वत: फिरवून आणत. "जुळ्या मुली बघून बायका थांबतात ... ह्यांच्याशी बोलतात ...विचारपूस करतात.. म्हणून ह्यांना नातींना फिरवायचा उत्साह !" सासुबाई कौतुकानं म्हणत. सासरे मिश्कील हसत !
मुली चार महिन्यांच्या असताना आमची बदली मेहकरला झाली.
आमचं चौघांचं छोटेसं विश्व मेहकरला श्री बालाजी महाराजांच्या कृपेच्या सावलीत विसावलं.
मेहकरला दोघीजणी एकाच पाळण्यात झोपायच्या आणि शी-शू करून लक्ष नसेल तेव्हा एकमेकींना लिंपून ठेवायच्या.
एकमेकींशी देवाघरच्या भाषेत बोलायच्या...आम्हाला एकही शब्द कळत नसे पण त्या दोघींचा मात्र संवाद तास न् तास सुरू असे...
दोघी कधी एकमेकींना स्पर्श करत तर कधी एकमेकींचे केस ओढत आणि कधी बोचकारत देखील.
कधी कधी तर एकमेकींच्या दुधाच्या बाटल्या पाळण्यातून खाली टाकून देत !काचेच्या बाटल्या हो .. फुटायच्या...तेव्हा कुठल्या प्लास्टिकच्या मिळायला... आम्ही डझनभर बाटल्यांचा स्टॉक ठेवत असू !
'ह्यां'ची नोकरी बँकेत ! बरेचदा ओव्हर टाइम करावा लागे.
घरी आले की मुलींची सांभाळण्यासाठी वाटणी होई. कधीकधी तर दारातच "जी झोपली असेल ती मुलगी माझी" म्हणून हे हुशारीने आरक्षण करीत.
मुलींचे लंगोट बदलण्यापासून त्यांना अंघोळ घालण्यापर्यंत सर्व करीत.
पुढेपुढे तर रात्री दोन वाजेपर्यंत एक आणि रात्री दोन च्या पुढे दुसऱ्यानी जागण्याची वाटणी करून घेत असू.
'हे' मुलींचं फार मायेनं करत. "तू आई आहेस, बापाचं हृदय तुला कसं कळणार" असं म्हणत.
पहाता पहाता मुली नऊ महिन्यांच्या झाल्या. 'हे' एका महिन्याच्या ट्रेनिंग करिता मुंबईला गेले अन् आले ते दाढीचे खुंट वाढलेले! दोघांनीही बाबांना ओळखलं नाही .
कितीही आमिष दाखवलं तरी बाबांजवळ जाईनात !
शेवटी दोघींपैकी एक जण शूर निघाली. तिनं हिम्मत केली... जवळ गेली ...स्पर्शानं ओळखलं.. दुसरीला बोलावून घेतलं... तिच्यावर विश्वासून दुसरी बाबांकडे झेपावली!
मुली जरा अशक्त असल्यामुळे मी काॅडलिव्हर तेलाने मालीश करून त्यांना गरम पाण्याने अंघोळ घालत असे.
एक दिवस दोघींनाही तेलाने मालीश केली. दोघींना आंघोळी घातल्या.
'हे' बाहेरून आले आणि एका तेलकट मुलीला उचलून आंघोळीसाठी माझ्यापुढे आणून ठेवलं.
"अरे देवा, मी तर दोनदा आंघोळी घातल्या होत्या...!"
दुसऱ्या वेळी बिचारी मुलगी "आंदू (आंघोळ) नको" असं म्हणत का रडत होती ते आता कळालं ...!!!🤦🏻♀️
दोघींचेही फ्रॉक मी घरीच शिवत असे. दोघींनाही अगदी सारखं हवं असे .
एकदा दोन सारखे फ्रॉक शिवले आणि कापडाची जराशी चिंधी उरली म्हणून एका फ्रॉकला 'बो' लावला तर दोघींनी रडून गोंधळ घातला....
. शेवटी लावलेला 'बो' कापून काढला अन माझ्या लेकी शांत झाल्या.
दोघींनाही सर्वकाही एकाच वेळी लागत असे. म्हणून त्यांना खाऊ देताना एकदम दोन्ही हाताच्या मुठी समोर करून दोघींनाही एकत्र खाऊ देण्याचं तंत्र मी शोधून काढलं होतं.
मुलींना घर कामाची फार हौस. त्यांना पाणी भरायला म्हणून दोन छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बादल्या आणून दिल्या होत्या.
एकदा एकीच्या बादलीची कडी तुटली तर दुसरीला तिच्याही बादलीची कडी तोडून हवी होती! मी नको नको म्हणत असताना त्यांच्या बाबांनी त्यांचा बालहट्ट पुरवलाच...
मेहकरला बालाजी मंदिराच्या आवारातच घर होतं. तीन वर्षांच्या असताना मुलींना सकाळी आंघोळीनंतर तयार करून मंदिरात दर्शनाला पाठवत असे.
देवासमोर हात जोडून "देवा, मला बुद्धी दे" असे म्हणायला सांगितलं होतं.
दोघींचेही भाषा आणि व्याकरण अगदी पक्क होतं ! दोघींनाही देवासमोर "देवा, आमच्या आईला बुद्धी दे !" अशी मनोभावे प्रार्थना करताना मंदिरातल्या अनेकांनी पाहिले आहे!
एक दिवस मंदिरातून मुली रडत घरी आल्या . आजोबांनी प्रसाद दिला नाही म्हणून ..
लगेच मंदिरात विचारायला गेले तर पुजारी म्हणाले मुलगी खोटे सांगते ... मी प्रसाद दिला होता !
माझ्या लक्षात आलं ... मी दोघी मुलींना पुजा-यांसमोर उभं केलं.
त्यांनी कपाळावर हात मारून घेत दोघांच्याही हातावर प्रसाद ठेवला.
बालवाडीत गेल्यानंतर जुळ्या मुली आहेत म्हणून शिक्षिकांनी मुद्दाम स्नेहसंमेलनाकरिता लवकुशाचं नाटक निवडलं.
प्राथमिक शाळेच्या संमेलनात दोघीजणी विठ्ठल-रखुमाईच्या शेजारी जय -विजय म्हणून शोभल्या.
कॉलेजात उत्सवप्रसंगी प्रमुख पाहुण्यांना औक्षण करण्यासाठी जरीच्या साड्या व नथी घालून महालक्ष्म्या मिरवल्या.
शाळेत काय किंवा कॉलेजात काय दोघींनाही जवळपास सारखेच गुण पडत ! 'कॉपी करता का ग ?' हा सगळ्यांचा नेहमीचा प्रश्न असे.
मात्र सेकंड इयरला असताना दोघींच्या परीक्षा केंद्रांत दोन किलोमीटरचं अंतर होतं ..पण दोघींनाही गुण मात्र पडले जवळपास सारखेच!
पाहता पाहता दोघी मुली आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत . वर्षांगणिक दोघींचे चेहरे बदलले.. व्यक्तिमत्व वेगळे झाले.. आवडीनिवडी निराळ्या झाल्या ...मुख्य म्हणजे दोघींची आयुष्य दोन दिशांनी धावू लागली !
आमच्या चिमुकल्या जुळ्या मुलींनी मात्र आमच्या आयुष्यातील अनेक क्षण अविस्मरणीय आणि समृद्ध केले !
© वीणा श्रीकांत काटे
सदर लेख लेखिका वीणा श्रीकांत काटे यांचा असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
