© पल्लवी घोडके-अष्टेकर.
वयाची ५ वर्षे एका अनाथाश्रमात काढल्यावर सरिताला एका निपुत्रिक जोडप्याने दत्तक घेतले होते.
त्यानंतर ती मोठ्या लाडात तिथे वाढली होती. पण आपण अनाथ आहोत व हे आपले खरे आई-वडील नाही हे तिला माहित होतं.
म्हणूनच की काय,पण तिने कधीही कुठल्याही गोष्टीचा हट्ट तिच्या आई-बाबांकडे केला नव्हता.
प्रशांतचे स्थळ तिला आले तेव्हा आपण पहिले ५ वर्षे अनाथाश्रमात वाढल्याचे तिने त्याला सांगितले होते.
पण प्रशांतने त्या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नव्हते. तिच्या भूतकाळाशी त्याला काहीही घेणे-देणे नव्हतं.
त्याला सरिता पसंत होती व मी याच मुलीशी लग्न करेल असं आई-वडिलांना सांगून तो मोकळा झाला होता. त्याच्या आई-वडिलांनाही मुलगी व तिचे संस्कार आवडले होते, म्हणून त्यांनीही आढेवेढे न घेता त्यांचे थाटात लग्न लावून दिले.
सरिता व प्रशांत एकमेकांना साजेसे,अगदी सुखी जोडपे होते.
सरिता अत्यंत शांत व गोड स्वभावाची सुंदर मुलगी होती, तर प्रशांत अगदी कर्तुत्ववान व कार्यक्षम असा तरुण होता. त्याने त्याच्या डॉक्टरी पेशात चांगलाच जम बसवला होता.
त्याला सरिताबद्दल एक वेगळा लळा व आदर होता. पण बऱ्याचदा ती सहानुभूती असल्याचा भास सरिताला होत.
अनाथाश्रमातील मुलांचे जीवन, त्यांचे होणारे हाल,आई-वडिलांबद्दल वाटणारे आकर्षण, प्रेम व आई-वडील मिळावे यासाठीची तडफड तिने अनुभवली होती.
त्यांच्या भावना ती समजू शकत होती. त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करावं असं तिला मनापासून वाटे.
पण शिक्षण पूर्ण करताच प्रशांतचे स्थळ तिला आले व आई वडिलांची इच्छा म्हणून सरिताही लग्नाला तयार झाली.
आपण सुदैवी ठरलो म्हणून आपल्याला आई-वडील मिळाले, ज्यांना ते मिळाले नाही त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही ह्याची सल तिच्या मनात होती.
लग्नानंतर २ वर्षांनी तिने एका मुलीला जन्म दिला व मग बाळाचे संगोपन करतांना अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचं राहूनच गेलं
बघता बघता "दिया" आता १२ वर्षांची झाली.
त्यांच्या प्रशस्त बंगल्याच्या जवळच दिया ची शाळा होती इतर वेळी प्रशांत तिला हॉस्पिटलला जाण्या आधी शाळेत सोडत असे. पण आता त्याला थोडं लवकर हॉस्पिटलला जावे लागत असल्याने त्याने रखुला (घरी कामास असलेल्या बाईस) तीला शाळेत सोडण्याची जबाबदारी दिली होती.
पण तरीही सरिता दारापर्यंत निरोप द्यायला येतच असे. "अगं….आई,मी काय लहान आहे का आता?आणि जवळच तर आहे शाळा, जाईल की मी एकटी." दिया म्हणत.
पण त्यांच्या बंगल्यापासून चार-पाच बंगले सोडल्यावर कॉर्नर ला रस्ता क्रॉस करावा लागे व नंतर ४-५ मिनिटांच्या अंतरावर शाळा होती म्हणून रखुला सरिता बळेच सोबत पाठवी.
काल रात्री पाऊस पडून रस्त्यात थोडा चिखल झाला होता. दिया जातांना तिच्या शूज वर चिखल उडाला व ती चिडली.
शाळेजवळच एक मुलगा शुज पॉलिश करण्याचे काम करत होता. त्याला पाहताच ती तिकडे वळली. तिने तिचा शु स्टॅन्ड वर ठेवला.त्या मुलाने तिला स्माईल देऊन शु स्वच्छ करून दिला.
रखुने मुलाला पैसे दिले व दियाला शाळेत सोडले.
दियाने त्या मुलाला आज पहिल्यांदा निरखून पाहिले होते. यापूर्वी तिचे लक्ष त्याच्याकडे कधी गेले नव्हते. घरी आल्यावर देखील ती त्या मुलाबद्दल विचार करीत होती.
दुसऱ्या दिवशी शुजला पॉलिश असूनही दिया त्या मुलाकडे पॉलिश करण्यासाठी गेली.
रखुने तिला अडवलं तेव्हा, "तू पैसे दे."असे म्हणत तिने रखुकडे दुर्लक्ष केले. पण रोज हे शक्य होणार नाही हे दियालाही माहीत होते.
आता हळूहळू दियाची व त्या बूट पॉलिश करणाऱ्या मुलाची मैत्री वाढू लागली.
आज दियाने सरिताकडे दोन लंच बॉक्स मागितले. एक मैत्रिणीला द्यायचा आहे असे सांगितले.
सरिताने दिलेला एक डबा तिने त्या शू पॉलिश करणाऱ्या मुलाला दिला.
रखुने डोळे वटारताच, "घरी सांगू नकोस,नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही." अशी धमकी तिने रखुला दिली आणि सुरुवात झाली तिच्या खोटे बोलण्याची.
आता एक खोटं तर ती बोलली होती. म्हणतात ना एक खोटं लपवण्यासाठी १०० खोटे बोलावे लागते.
आता रोजच वेगवेगळे खोटं बोलून कधी पुस्तके, कधी पैसे, तर कधी डब्बा अश्या विविध वस्तू ती त्या मुलाला पुरवु लागली.
कधीकधी मैत्रिणीकडे जाते असं सांगून दिया चक्क एक-दोन तास घरातून गायब होत असे. मैत्रिणीकडे चौकशी केल्यावर ती तर आलीच नाही असे उत्तर जेव्हा सरिताला मिळाले तेव्हा काहीतरी वेगळं चाललंय हे तिच्या लक्षात आलं.
पण दिया तिला कसलाही सुगावा लागू देत नव्हती. शेवटी रखुकडून माहिती मिळवावी म्हणून सरिताने व प्रशांतने रखुला विचारपूस केल्यावर त्यांना त्या मुलाबद्दल समजले.
"आपण आता शांत राहून उद्या जाऊन बघूया नेमकं काय चाललंय ते." प्रशांत ने सुचवले.
सरिताला तर या प्रकरणाने रात्रभर झोप येईना. माहित नाही का? पण तिला प्रचंड अपराध्यासारखे वाटत होते.
दियाला काहीही कळू न देता दुसऱ्या दिवशी प्रशांत व सरिता शाळा भरल्यावर त्या मुलाला भेटायला गेले तर तो दियाचेच पुस्तक वाचत असल्याचं तिच्या लक्षात आले.
प्रशांतने आधी त्या मुलाला प्रेमाने दिया बद्दल विचारले. त्यावर तो आधी थोडा गोंधळला.
प्रशांत दिया चे वडील आहे हे कळल्यावर मात्र तो घाबरला. पण तरीही तो काहीही सांगण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसांची भीती दाखवल्यावर तो बोलू लागला.
त्याने दिलेले माहिती ऐकून सरिता व प्रशांतला धक्काच बसला.
त्या मुलाला शिकण्याची इच्छा होती. त्याचे वडील मजूर काम करीत. पण या मुलाला चांगल्या शाळेत शिक्षण घेण्याचे वेध लागले होते.
तर त्याला कोणीतरी "शाळेच्या जवळ बुट पॉलिश करत जा, म्हणजे शाळेत मुले सोडायला आलेल्या पालकांना तुझ्यावर दया आली तर शिकवतील तुला." असा सल्ला दिला होता.
त्यानुसार तो हे काम करीत होता. त्याला बऱ्याच पालकांनी शाळेत जात नाहीस का? म्हणून विचारणा केली खरी, पण…. त्यापुढे मात्र कुणीच पाऊल टाकले नव्हते.
ती दियाच होती जिने त्याच्या मनातली शिक्षणाची लालसा ओळखली व त्याला जमेल ती मदत करण्याचे ठरवले.
शाळा सुटल्यावर आठवड्याचे दोन दिवस ती त्याला शाळेजवळच्या बेंचवर इंग्रजी वाचन आणि लिखाण शिकवत असे.
आता पात्र सरिताला हळूहळू सगळे कोडे सुटू लागले.पुस्तकांना लागलेले काळे डाग, मैत्रिणीसाठी डबा, मानसीकडे अभ्यासाला जाणे…..सगळेच.
आपण अनाथ असूनही हे असे काही करावे हे आपल्याला सुचले नाही, सुचले असते तरी प्रशांतला अशी कुणाची मदत करायला सांगायची तिची कधी हिंमतही झाली नसती.
पण दियाने कुणाचीही मदत न घेता किती सहजपणे हे शक्य केलं होतं.
आज तिला मनोमन दियाचा खूप अभिमान वाटला.
प्रशांत ने एकदा सरिताकडे पाहिले, तिच्या मनात चाललेले विचार जणू तो वाचण्याचा प्रयत्न करीत होता.
मग त्याने त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून "आम्ही तुला भेटायला आलो होतो हे दियाला सांगू नकोस." असे सांगून ते घरी परतले.
दुसऱ्या दिवशीपासून सरिता दियाला शाळेत सोडू लागली.
नेमकं काय झालंय हे रखुला मात्र कळले नव्हते. सरिता समोर दियाला त्या मुलाशी बोलता येत नव्हते.
तिची त्याला भेटण्याची धडपड सरिताला कळत होती. पण दिया काही बोलत नसल्याने तिने दुर्लक्ष करण्याचे ठरवले.
दोन दिवसांनी प्रशांत आणि सरीता दोघेही दियाला सोडवायला निघाले तेव्हा,"तुम्ही दोघे मला सोडवायला का येत आहात? मी जाईन माझी-माझी." असे म्हणून दिया त्या दोघांवर रागावली.
पण "आज येतो उद्या पासून रखुच सोडेल असे सांगून प्रशांत व सरिता दियासोबत निघाले.
शाळेजवळ पोचल्यावर दियाला ते पॉलिशचे दुकान व तो मुलगा दोघेही दिसले नाही. म्हणून ती अगदी रडवेली झाली.
पण पुढच्याच क्षणी तिने आत प्रवेश करताच स्वच्छ सुंदर शाळेचा युनिफॉर्म घातलेला, तेल लावून नीट केस केलेला तो मुलगा व त्याचे आईवडील तिला दिसले.
त्याला पाहताच ती हसली व "तू.…..?" असे तिने खुशीत विचारले.
त्याच्या आई-वडिलांनी पुढे होऊन प्रशांतला नमस्कार केला व आभार मानले.
सरिता आश्चर्याने प्रशांत कडे पाहत होती. तर दियाने पुढे येऊन प्रशांतला मिठी मारली.You are the best Dad in the world! तिने म्हणताच प्रशांत हसला व "हा दादा वयाने मोठा असल्याने पुढच्या वर्गात शिकणार आहे." असे तिला सांगितले.
"हरकत नाही…., मी दादाला English शिकवले आहे. बाकीचं टीचर शिकवतील." असे म्हणून पुन्हा तिने आनंदाने प्रशांतला मिठी मारली.
सरीतानेही अभिमानाने प्रशांतचा हात हातात घेतला.
समाप्त
© पल्लवी घोडके-अष्टेकर.
सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
