© पल्लवी घोडके-अष्टेकर.
रात्रीचे १.०० वाजले होते. माधवीताईंनी प्रज्ञाला सक्त ताकीद देऊन झोपायला पाठवले होते.
तिचा फोनही त्यांनी तिच्याकडून काढून घेतला होता. "तू झोप,मी ही झोपायला जाते." असे सांगून त्या बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या.
प्रज्ञा ४ महिन्यांची गरोदर होती.माधवीताईंची सून असली तरी त्यांना ती मुलीसारखीच होती.
त्या प्रज्ञाचे अतिशय लाड करीत,त्यांच्या एकुलत्या एक मुलाची ती अर्धांगिनी होती. प्रज्ञाही माधवी ताईंचा खूप सन्मान करीत असे.
मनावर दगड ठेवून बिकट परिस्थितीत तिच्या मुलाला घडवणारी ती जणू जिजाऊच तिला भासत असे.
खंबीर निर्णय क्षमता, समाजापुढे झुकते माप न घेण्याचा ताठरपणा,स्वाभिमान,जगावेगळे साहस व प्रेमळ स्वभाव हे माधवीताईंचे गुण तिला अतिशय भावत.
आपल्यातही हे सर्व गुण यावेत असे प्रज्ञाला मनापासून वाटे. कधीकधी ती माधवीताईंना हे बोलूनही दाखवत. त्यावर माधवीताई नुसत्याच स्मित हास्य करत.
त्यांनी प्रज्ञाला झोपायला पाठवलं खरं,पण तिला झोप येणार नाही हे त्यांना माहीत होतं. परवापासून ती हर्षशी बोलली नव्हती.
तिने त्याचा आवाजही ऐकला नव्हता. मग तिला चैन कसा पडेल?
त्याने काही मेसेजही केला नाही. गेल्या ४८ तासात त्याला फोन करायला वेळ मिळाला नाही असे होऊ शकत नव्हते.
एका सैनिकाच्या बायकोची अशा वेळी होणारी अवस्था माधवीताई समजू शकत होत्या.
शेवटी त्याही या सगळ्या अवस्थेतून गेल्या होत्या. प्रज्ञाला कौतुक वाटत असलेला त्यांचा स्वभाव देखील काळाने त्यांना दिलेली भेटच होती.
इतर वेळी स्वतःच्या मनावर दगड ठेवून मनाची समजूत काढणाऱ्या माधवीताई कधीकधी प्रज्ञाला पाहून हळव्या होत.
हर्षचा फोन न लागणे किंवा त्याचा फोन न येणे हे त्यांच्या परिचयाचे होते.
गेल्या ५ वर्षापासून त्यांनी स्वतःच्या मनाला आणखी घट्ट बनवले होते.
पण आता प्रज्ञा………, तिचा विचार येताच त्यांच्या धीरोदात्त डोळ्यातून दोन मोती ओंजळीत पडले.
पण लगेचच त्यांनी डोळे पुसुन स्वतःला सावरले.घड्याळात पाहिले १.२० मिनिटे झाली होती. त्यांनी एक मोठा श्वास घेऊन दोन्ही फोन कडे (मोबाईल) पाहिले. फोनमध्ये कसलीच हालचाल नव्हती.
हळूच उठून आवाज न करता, त्या प्रज्ञाच्या रूमकडे गेल्या. दरवाजा जरासा लोटून त्यांनी आत डोकावले.
प्रज्ञा बेडच्या बाजूला असलेल्या टेबलाकडे तोंड करून एका कुशीवर झोपली होती.तिचा एक हात पोटावर तर दुसरा हात हर्षच्या फोटोवर होता.
चार बोटांनी तिने त्याचा फोटो धरला होता व तिचा अंगठा त्याच्या चेहऱ्यावरून ती हळुवारपणे फिरवत होती.
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहूनही माधवीताईंना तिच्या डोळ्यातील आसवांच्या अस्तित्वाची जाणीव होत होती.
त्या तश्याच माघारी फिरल्या व पुन्हा हॉलमध्ये खुर्चीत जाऊन बसल्या.
त्यांनी डोळे मिटले व दीर्घ श्वास घेतला.थोडे पाणी पिऊन त्या प्रज्ञा चा विचार करू लागल्या. किती हसतमुख,गोड मुलगी पण गेल्या ४८ तासात अगदी कोमेजून गेली.
हर्ष नक्कीच कुठल्यातरी मिशन वर असावा हे अनुभवावरून त्यांनी हेरलं होतं.
पण सैन्य शिस्तीच्या नियमाप्रमाणे त्याने घरी काही कळलं नव्हतं.
"हर्षला काही झालं तर?" या विचारांनी त्यांच्या छातीत धस्सं झालं.आपण सोसलं ते सारं सारं प्रज्ञाच्या वाट्याला येईल, ह्या विचारांनी त्या बेचेन झाल्या.
त्यांना आता खुर्चीत बसवेना त्या खुर्चीतून उठल्या 0१:४५ मिनिटे झाले होते.
प्रज्ञाच्या खोलीकडे जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही.त्यांनी खिडकीच्या बाहेर पाहिले त्या रात्रीच्या काळोखात रातकिड्यांचा तो किर्र…….. किर्र……...आवाज त्यांना आणखीच घाबरवू पाहत होता.
सगळं काही नॉर्मल आहे हे दाखवण्याचा त्या सकाळपासून आटोकाट प्रयत्न करीत होत्या. प्रज्ञाचे मन विचलित होऊन ती घाबरू नये म्हणून त्या सतत प्रयत्नशील होत्या,पण या सगळ्या खटाटोपात त्यांनी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष केले होते.
जुन्या जखमेच्या घावावर नव्याने जखम झाली तर त्याचा आघात माणसाला सहन होत नाही.
खिडकीबाहेर पाहतांना त्यांनी आपले हात जोडले, डोळे काठोकाठ भरले होते ते गच्च मिटून घेतले व परमेश्वराला मनोमन प्रार्थना केली, "हे देवा,जे घाव माझ्या मनावर झाले,जे ओरखाडे माझ्या सुंदर आयुष्यावर ओढले गेले ते प्रज्ञाच्या आयुष्यावर नकोत."
दुःख वेदनेने त्यांचे ओठ थरथरले. पण त्या दुःखातही त्यांनी स्वतःच्या नशिबासाठी देवाला दोष दिला नाही.
कारण हे आयुष्य त्यांनी स्वतः निवडलं होतं,लोकांचा विरोध पत्करून. पण आज प्रज्ञासाठी त्यांचा जीव मात्र तुटत होता.
हर्ष तर त्याच्या वडिलांसारखाच प्रेमवेडा होता. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारा सच्चा देशभक्त.
पण प्रज्ञा…………,त्यांच्या आठवणी आता त्यांच्या डोळ्यापुढे तांडव करू लागल्या.
नको…...नकोच त्या आठवणी म्हणून त्यांनी टीव्हीचे रिमोट हातात घेतले.
पण आवाज ऐकून,'फोन तर आला नाही ना?' असा भास होऊन प्रज्ञा धावत आली तर तिच्या वेड्या मनाला मी कसं समजावू? ह्या विचारांनी त्यांनी रिमोट तसाच अलगत टीपॉयवर ठेवला.
आता रात्रीचे २.०० वाजले होते पण पापण्यांवर निद्र ऐवजी आठवणीच साचत होत्या.त्या पुन्हा खुर्चीत बसल्या व आठवणीत हरवल्या.
तीस-ऐक वर्षांपूर्वी आशिषरावांशी झालेला त्यांचा विवाह, सुरुवातीचे ते गोड दिवस,लग्नानंतर थोड्याच महिन्यात अशिष रावांचे झालेले प्रमोशन, नायब सुबेदार पदावरून "सुबेदार आशिष" अशी मजल, गगनात न मावणारा आनंद, सगळं त्यांच्या डोळ्यापुढे जसेच्या तसे उभे राहिले.
त्यानंतर हर्षच्या आगमनाची बातमी,त्या बातमीने हुरळून गेलेले सासू-सासरे, प्रफुल्लित झालेले आशिष डोळ्यापुढे येताच माधवीताईंच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य तरळले.
"आपल्याला मुलगा होवो किंवा मुलगी, आपण आपल्या अपत्यालाही देश रक्षणाचे धडे द्यायचे." आशिषचे हे वाक्य ऐकून सगळेच हसले होते.
"मग तर तुला मुलगीच होवो." असे सासरे गमतीने बोलले होते.
"बाबा,आता मुलींचाही सैन्यात समावेश होणार आहे निदान माझं मूल मोठं होईपर्यंत तरी नक्कीच होईल."अतिउत्साहात तो बोलून गेला होता.
आशिष कडून सीमेवरील जवानांची किस्से ऐकताना माधवीताईंच्या अंगावर शहारे येत. त्यावेळी मोबाईल फोनचा वापर नसल्याने आशिषराव पोस्टिंगच्या ठिकाणावरून भलेमोठे पत्र माधवी ताईंना पाठवत असे.
त्या पत्राचे पहिले पान आई-बाबांसाठी तर उरलेली ती अनेक पाने माधवीताईं साठी असे.
अजूनही त्या पत्रातील ओळ न ओळ त्यांना आठवते.
एक-एक पत्र त्या वारंवार वाचत असत.पुढील पत्र येईपर्यंत मिळालेले पत्र कितीतरी वेळा वाचून काढत.
त्यांच्या ह्या वेडेपणावर सगळेच त्यांची मस्करी करत. पण सीमेवर असलेल्या सैनिकाच्या पत्नीच्या मनाची अवस्था प्रत्येकाला कशी कळेल? 😰
हर्षचा जन्म झाला तेव्हा सासर्यांनी आनंदाने गावभर पेढे वाटले होते.आशिष ला तार करा म्हणून माधवीताईंनी इतक्या वेळा घरच्यांना सांगितले की, सासर्यांनी, माधवीताईंच्या वडिलांनी व भावाने अश्या तीन-तीन तार पाठवल्या होत्या. त्या तारांनी आशिषला झालेला आनंद तिपटीने वाढला होता हे खरं!😀
त्यावेळी आशिषची पोस्टिंग कश्मीरला होती. माधवीताई वारंवार पत्र लिहून आशिष रावांना येण्याची विनंती करीत होत्या. पण,"सध्या येणे शक्य नाही, सुट्टी मिळाली की येईल." असे प्रत्येक चिठ्ठीत ते लिहीत होते.
शेवटी आशिषराव एक दिवस आले ते तिरंग्यात लपेटून. काश्मीरच्या खोर्यात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत छातीवर गोळी लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.
हर्ष तेव्हा केवळ ५ महिन्याचा होता.
डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा पुसतांना माधवीताई ची नजर पुन्हा घड्याळावर पडली ३.३० वाजले होते.
आशिषरावांची व हर्षीची कधी भेटच झाली नव्हती.
अवघ्या २२साव्या वर्षात माधवीताईंच्या वाट्याला विधवेचं जीवन आलं होतं.
अशावेळी सामान्य स्त्रीचं खचणं स्वाभाविक होतं,पण माधवीताई सामान्य स्त्री नव्हत्याच,त्या एका "परमवीर चक्र" विजेत्या सैनिकाच्या विधवा होत्या.
त्याही अवस्थेत त्यांनी स्वतःला सावरले.
हर्षला उत्तम शिक्षण दिले. सासर्यांचा,भावाचा, सगळ्यांचा विरोध पत्करून त्यांनी हर्षच्या देश प्रेमाचा सन्मान करून त्याला सर्वतोपरी मदत करत सैन्यात भरती केलं होतं.
माधवीताई हर्ष लहान असल्यापासूनच त्याला शूर-वीरांच्या गोष्टी सांगत.
त्यालाही लहानपणापासूनच वडिलांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती.
जसंजसं तो आशिषरावांबद्दल जाणून घेत, तसंतसं त्याच्या देश प्रेमात भरच पडत असे. हर्षच्या धमन्यांमध्ये आशिषचे रक्त वाहत होते. तो वडिलांच्याही दोन पावलं पुढे होता.
उत्तम शिक्षण योग्य मार्गदर्शन व आईची साथ त्याला कॅप्टन पदापर्यंत घेऊन आली होती.
माझा मुलगा कॅप्टन आहे हे सांगताना माधवीताईचा उर गर्वाने भरून येत असत.
त्याच्या युनिफॉर्म वरील कॅप्टन हर्ष गोखले ही नेमप्लेट पाहून त्यांना मनोमन हर्षचा अभिमान वाटे.
बघता बघता सकाळचे ४ वाजले होते,पण अजूनही हर्षचा फोन आला नव्हता.
त्याचा फोन चालू झाला का पाहावा म्हणून माधवी ताईंनी फोन हातात घेऊन हर्ष ला फोन लावला,पण अजूनही तो स्विच ऑफच होता.
घड्याळ पुढे पुढे सरकत होते व माधवीताईंची भीती आणखीच वाढत होती.
सकाळी ५ वाजता प्रज्ञा देखील उठून आली.
झोपे अभावी व बहुदा रडूनही तिचे डोळे लालसर व सुजल्यासारखे वाटत होते.तिने माधवीताईंना हॉलमध्ये पाहून,"आई तुम्ही झोपलाच नाहीत का?" म्हणून विचारले.
पण तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून,"अगं, तू इतक्या लवकर कशी काय उठलीस आज?" असा प्रतिप्रश्न त्यांनीच प्रज्ञाला केला.
आई आपल्याला टेन्शन येऊ नये म्हणून अश्या वागत आहेत हे जाणून प्रज्ञाने बळेच स्मित करून,"आज लवकर जाग आली असे उत्तर दिले." खरंतर तिलाही रात्रभर नीट झोप लागलीच नव्हती ती मधूनच फोनच्या रिंगचा भास होऊन उठत होती.
पण रिंग वाजलीच नाही हे लक्षात येऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करीत होती.
क्रमशः
© पल्लवी घोडके-अष्टेकर.
सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.
फोटो गुगल वरुन साभार ...
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...
अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.
