बलिदान परम धर्म: ( भाग २)

© पल्लवी घोडके-अष्टेकर.


भाग 1 इथे वाचा

दोघींनीही सकाळचा चहा घेऊन आंघोळ केली.

माधवीताई देवपूजेला बसणार एवढ्यात प्रज्ञाच्या फोनची रिंग वाजली. 

दोघांनीही एकमेकांकडे पाहीले,त्यांच्या उदास चेहऱ्यावरून एकमेकींना काय समजायचे ते समजले. 

प्रज्ञाची काळजी लक्षात येताच माधवीताईंनी,"थांब मी बघते!" असे म्हणून त्या घाईतच फोन जवळ गेल्या. 

मोबाईलच्या स्क्रीनवर प्रज्ञा च्या आईचे नाव पाहून त्यांनी प्रज्ञाला फोन दिला व आत गेल्या. खरं तर कुणाचा फोन आलाय, हे पाहतांना पण त्यांच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढले होते. 

त्या दोघींना हर्षच्या फोनची प्रतीक्षा तर होतीच पण चुकूनही हर्ष बद्दलची इतर कुठलीही माहिती देणारा फोन त्यांना नको होता. 

त्यामुळे फोन वाजला की छातीत प्रचंड धडधड होऊ लागे. 

इतर वेळी सहज वाटणाऱ्या गोष्टी आता त्या दोघींना सहज वाटत नव्हत्या. 

फोनची रिंग, दारावरची बेल, आता त्यांना अस्वस्थ करीत होती. 

माधवीताईंचे लक्ष पाणी पितांना स्वतःच्या हाताकडे गेले व त्यांना जाणवलं हृदयाची धडधड हातापर्यंत येऊन आता हातही थरथरू लागले होते.

मन शांत करण्यासाठी आता देवपूजा हा एकच मार्ग उरला होता. 

त्या हॉलमध्ये परत आल्या तेव्हा प्रज्ञा अगदी हळू आवाजात तिच्या आईशी बोलत होती. 

बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माधवीताईंनी पुढे होऊन तिच्या गालावरून ओघळणारे अश्रू पुसले व तिच्या हातातला फोन घेतला. 

"हॅलो, नमस्कार! बोला, काय म्हणताय?" म्हणून त्यांनी प्रज्ञाच्या आईशी बोलायला सुरुवात केली. 

"काही नाही हो,येईल संध्याकाळपर्यंत त्याचा फोन, नाही आला तर करेल मी आर्मी हेडकॉटर ला फोन. तुम्ही नका काळजी करू, आणि प्रज्ञाची चिंता करू नका मी आहे इथे.आणि हर्षचा फोन आला की मी कळवेल तुम्हाला." एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला.

"मी देवपूजा करते मग आपण बाहेर मंदिरात जाऊन येऊ. तू नाष्टाचे बनव आणि खाऊन घे. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुला? त्यांनी प्रज्ञाला ती गरोदर असल्याची जाणीव करून दिली.

आज देवपुजेतही त्यांचे मन लागत नव्हते.

मागील आठवड्यातील उरी येथे झालेल्या बेसावध सैनिकांवरील हल्ला त्यांना आता आठवू लागला होता. 

टीव्हीवरील त्या बातम्या,शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारांचा आक्रोश त्यांना पहावत नव्हता.

त्या घटनेस ८-१० दिवस झाले असतील पण तरीही न्यूज पेपर मध्ये अजूनही शहीद सैनिकांच्या परिवारांचे मनोगत येतच होते. 

माधवीताईंना देवपूजा करूनही शांती मिळत नव्हती म्हणून पूजा झाल्यावर त्यांनी मनःशांतीसाठी मनाचे श्लोक पठण करायला सुरुवात केली.

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ।।१।।

प्रज्ञा नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन आली तेव्हा माधवीताईंचा सोळावा श्लोक चालू होता.

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ।
पुरेना जनी लोभ रे क्षोभ ते ते।
म्हणोनि जनि मागुता जन्म घेते।।१६।।

श्लोक म्हणल्यावर त्या थोड्या थांबल्या त्यांचा कंठ दाटून आला आवंढा गिळून त्यांनी पुढचा श्लोक म्हंटला.

मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊन जाते।
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतिमंद ते खेद मानि वियोगे।।१७।।

१७ व्या श्लोकानंतर मात्र त्यांना रडू आवरेना.

माधवीताईंची अवस्था लक्षात येताच प्रज्ञा जागेवरून उठली. "आई,चला बरं! तुम्हालाही गोळ्या घ्यायच्या आहेत,नाष्टा करून घ्या. आपल्याला मंदिरात जायला उशीर होतोय."असे म्हणून प्रज्ञाने माधवीताईंना सावरण्याचा प्रयत्न केला. 

त्यांनीही स्वतःचा हुंदका दाबून धरला.पदराला डोळे पुसत त्या उठल्या. नाश्ता करून दोन्ही मंदिरात गेल्या. हर्षच्या सलामतीसाठी दोघींनीही देवाला साकडे घातले व घरी परतल्या.

घरी येऊन त्यांनी टीव्ही लावला तर बातम्यांमध्ये सर्जिकल स्ट्राइक ची भारत सरकार कडून घोषणा झाल्याच्या बातम्या झळकत होत्या. 

तेवढ्यात माधवीताईंच्या भावाचा फोन आला. 

माधवीताईंनी फोन कट केला व लक्षपूर्वक बातम्या पाहू लागल्या. 

प्रज्ञाही प्राण कानात आणुन ऐकत होती. कश्मीर मधील उरी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून इंडियन आर्मी ने सर्जिकल स्ट्राइक केले होते. 

त्यात एक जवान शहीद झाला होता.

आता माधवीताईंच्या डोळ्यापुढे अंधार पसरला.

त्यांना आठवले हर्षने 26 सप्टेंबर ला संध्याकाळी फोन केला होता. म्हणजे 27 व 28 या दोन दिवशी त्याने फोन केला नव्हता.

26 सप्टेंबरला संध्याकाळी त्याचा फोन येऊन गेल्यावर 27 सप्टेंबरला फोन आला नाही, लावला तर लागला नाही. म्हणून त्या दोघी काळजीत होत्या. 

आणि आज 29 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राइक ची टीव्हीवरील बातमी पाहून त्या सासू-सुना स्तब्ध होत्या.

म्हणजे हर्ष……………...

म्हणजे हर्ष नक्कीच कुठल्यातरी मिशनवर होता. 

त्यांना वाटणारी काळजी रास्त होती.आता मात्र त्या दोघींना कसेही करून हर्ष सुखरूप असल्याची बातमी हवी होती.

आतापर्यंत हर्ष कुठल्यातरी मिशनवर असेल अशी त्याना शंका होती, पण आता खात्री पटली होती.

कश्मीरच्या चकमकीत नवऱ्याचा प्राण गमावणाऱ्या स्त्रीला आता शांत व संयमी राहणे शक्यच नव्हते. 

त्यात बातम्यांमध्ये एक जवान शहीद झाल्याची बातमी जीवाला चटका लावत होती. मिडीया त्या जवानाचे नाव जाहीर करत नव्हती.

माधवीताई मटकन सोफ्यावर बसल्या,इतका वेळ धरून ठेवलेला हुंदका आता नकळत बाहेर पडला. 

प्रज्ञा ही त्यांना बिलगली.

या दोघीही एका अनामिक भीतीने हृदयात साठवून ठेवलेल्या दडपणाला डोळ्यातून वाट मोकळी करून देत होत्या.

त्यावेळी फक्त त्या दोघीच नाही तर देशाच्या सीमेवर सज्ज असलेल्या प्रत्येक जवानाची आई व पत्नी देखील ह्याच दडपणाखाली असणार. 

जी अवस्था माधवीताई व प्रज्ञाची होती तीच अवस्था देशातल्या अनेक घरात असणार, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना त्याचा विशेष फरक पडत नसतो.

आपले दैनंदिन कामं, नोकरी,टीव्हीवरील सासू-सुनांच्या मालिका पाहणे अशी कार्ये चालूच असतात.

त्या अनेक स्त्रिया ज्यांनी आपला पुत्र देशरक्षणासाठी पाठवला आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने जिजाऊ कळली आहे,त्याच खऱ्या अर्थाने जिजाऊंचे दुःख जाणू शकतात.

आज फक्त हर्षची जिजा आणि सई रडत नव्हत्या तर सीमेवर लढत असलेल्या प्रत्येक शिवाजीची जिजा रडत होती.

अनेकांनी भारत सरकारने उरी हल्ल्याचा बदला घेतला म्हणून जल्लोषही केला असेल.पण ज्या असामान्य मातांचे वीर पुत्र सीमेवर लढतात त्यांच्या आयुष्यावर या घटनेचा किती मोठा परिणाम होतो हे शब्दात नक्कीच मांडता येणार नाही.

ज्या ज्या मुलांनी गेल्या दोन दिवसांपासून घरी फोन केला नसेल त्या सगळ्या मातांपैकी एक माता आज दुर्दैवी ठरणार होती. 

आता फक्त ती माता कोण होती याच प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकी होते‌.शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी असे का म्हणतात याची प्रचीती अशा वेळी येते.

खंबीर,ताठर,स्वाभिमानी वाटणार्‍या माधवीताईंमध्ये आता प्रज्ञाला केवळ एक आई दिसत होती.

त्या आईला आता ती सावरू शकत नव्हती आणि नुकत्याच आई होऊ पाहणाऱ्या प्रज्ञालाही स्वतःला सावरणे शक्य नव्हते.

पण अजूनही एक आशेचा किरण त्यांच्या दुःखावर मात करीत होता. 

शहीद झालेल्या जवानाचे नाव अजूनही कळले नव्हते.

गेल्या दोन दिवसांपासून दाबून धरलेले दुःख,भीती, दडपण सगळं अश्रूत वाहून गेलं.

जरा वेळाने त्या शांत झाल्या तशा एकमेकींना सावरू लागल्या, "ऐ वेडी,अशी रडतेस काय?हर्ष ह्याच मिशनवर गेला असेल कशावरून?"माधवीताई बोलल्या. 

"हो ना,आपण उगाच काळजी करतोय,तसं काही असतं तर हर्ष बोलला असता!" डोळे पुसत प्रज्ञाही बोलू लागली. 

पण म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. 

मनाचे विचार काही थांबत नसतात. थोड्यावेळाने माधवीताईंचा फोन वाजला. अनोळखी नंबर पाहून त्या घाबरल्या. 

घाबरतच त्यांनी फोन उचलला." हॅलो s s s हुं……...हुं…...‌ आता कसा?……. कधी?...... ठीक आहे." एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. त्यांचे हात थरथरत होते डोळ्यातून अश्रू वाहत होते.प्रज्ञाला काहीच कळेना ती माधवीताईंकडे टक लावून पाहू लागली.

माधवीताईंनी एक दीर्घ श्वास घेतला.प्रज्ञाचा हात हातात घट्ट धरून थरथरत्या ओठांनी त्यांनी बोलायला सुरुवात केली."प्रज्ञा…...आपला हर्ष,आपला हर्ष सुखरूप आहे प्रज्ञा!" 

एवढे बोलून त्यांनी तिला मिठी मारली. अत्यानंदाने प्रज्ञा ही बावरून गेली.

 मग मात्र त्या दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

हर्ष सर्जिकल स्ट्राइक साठी गेला होता.त्याच्या टीमने एक जवान गमावला होता व हर्षच्या पायाला थोडी दुखापत झाली होती.

सध्या तो आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता आणि उद्या त्याला डिस्चार्ज मिळणार होता. 

ही माहिती हर्षच्या मित्राने फोन वरून माधवीताईंना कळवली होती.

त्या दोघींच्या डोळ्यात आता जरी आनंदाश्रू होते तरी एका जिजाऊने तिचा पुत्र देशासाठी गमावला होता.

उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात आले असले तरी हल्ल्यात शहीद झालेल्या त्या १९ जवानांच्या आई-वडिलांचे दुःख मात्र यत्किंचितही कमी झाले नव्हते.

युद्ध हे नेहमी विनाशकारीच असते, पण तरीही देश आणि धर्मा साठी सैनिकांना प्राण हाती घ्यावे लागतात.देशवासीयांच्या सुरक्षेसाठी,भारत मातेच्या रक्षणासाठी जे प्राण पणाला लावतात त्या जवानांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या भावना मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न या लेखातून मी केला आहे. 

वास्तविक पाहता त्या भावना व त्यांची हिम्मत शब्दात मांडताच येणार नाही.

माधवीताईंसारख्या अनेक माता या भारत मातेच्या खुशीत आहेत ज्या आपल्या काळजाचा तुकडा देशरक्षणासाठी अर्पण करतात.अशा सर्व महान मातांना मानाचा मुजरा!

प्रज्ञा सारख्या कितीतरी स्त्रिया सुखी संसाराचे स्वप्न एखाद्या पेटीत बंद केल्यासारखा जगतात. आपल्या सौभाग्याची दोर कधी गळून पडेल या चिंतेत आपले आयुष्य अर्पण करतात‌. 

सीमेवर लढणारे जवान महत्त्वपूर्ण कार्य करतच असतात पण तेवढेच धैर्य व हिंमत त्यांच्या परिवारातील सदस्यही दाखवतात, म्हणूनच आपण सुरक्षित आहोत ह्याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवायला हवी.

ज्या स्त्रियांनी आपला पती युद्धात गमावला आहे त्या कर्माने क्षत्रिय असलेल्या आईने आपला पुत्रही देशसेवेसाठी बहाल करणे म्हणजे अत्यंत धैर्याचे कार्य आहे. अश्या अगन्य सहज,शौर्य व संयम असणाऱ्या असामान्य स्त्रियांसमोर नतमस्तक होणे देखील भाग्यच आहे. अश्या आई-वडील,पत्नी, भाऊ-बहीण सर्वांनाच मानाचा मुजरा!

जय हिंद!

© पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने