हो ! मी काळी आहे, पण शोभेची बाहुली नव्हे...!

© डॉ सुनिता चौधरी



"काजल ऎक ना ग् ..... माझ्या सगळ्या मित्रांनी मला आपलं लग्न ठरल्याची पार्टी मागितली आहे आणि त्या पार्टीत त्यांना आपल्या दोघांना बघायचं अाहे. कधी ठेऊयात मग ती पार्टी"? ....

अतुलच्या बोलण्याने काजल थोडी लाजली होती. त्याच्या मित्रांना भेटायची ही पहिलीच वेळ होती.

अतुल आणि काजल यांचं लग्न ठरलं होतं. 

एकदा कुठल्यातरी कॅफे मधे अतुलने काजलला पाहिलं होतं आणि "लव अॅट फस्ट साईट" होत , त्याला ती खुपच आवडली. 

नंतर तिची सगळी माहिती मिळवत त्याने आपल्या घरी सगळं सांगितलं ......आणि तिच्याशीच लग्न करायचं म्हणून हट्ट करून बसला होता.

अतुलच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं कारण काजल नावाप्रमाणेच काळीसावळी होती आणि अतुल मात्र गोरापान होता. 

अतुलच्या घरात सगळेच गोरे होते आणि आता सून म्हणून काळी-सावळी मुलगी आणण्याला त्यांचा विरोध होता. 

पण मुलाच्या हट्टापायी त्यांनी काजलच्या घरी जाऊन तीला काहीशा निराश मनानेच मागणी घातली.

इकडे काजलच्या घरी एवढं छान स्थळ समोरून आलं म्हंटल्यावर काजलच्या घरच्यांना आनंदच झाला होता. कारण आजही पोरगी कितीही शिकली तरी रंगावरून तीची लग्नाची गाठ बांधली जाते हे आजच्या काळातलं एक भयानक सत्य आहे.

काजलच्या घरून होकार आला आणि सहा महिन्यानंतरची लग्नाची तारीख आली. 

त्यापूर्वी घरातल्या घरातच त्यांचा छोटासा साखरपुडा झाला आणि काजल अतुलची बायको होणार हे जाहीर झालं.

गोरापान अतुल अगदी राजबिंडा होता अाणि कामातही एका चांगल्या हुद्दयावर होता. 

काजल काळीसावळी जरी असली तरी खुप आकर्षक व्यक्तीमत्वाची होती. तिच्या कामात तीही चांगल्या हुद्दयावर असून सगळ्यांची ती लाडकी होती. 

पण काळ्यासावळ्या मुलींना रंगावरून जे काही फेस करावं लागतं ते हिलाही चुकलं नव्हतंच ......


"अग् कधी करायची पार्टी"? .....अतुलच्या बोलण्याने काजल भानावर आली.


अरे, पुढच्या शनिवारी ठेव ना मला चालेल ...म्हणत काजल उत्तरली.


ठिक  आहे मग डन करतो म्हणत अतुल लाडात येऊन काजलच्या हाताला किस करू लागला तशी काजल अजूनच शहारली.

"बरं शोना ऎक ना ग् , पार्टीसाठी जरा एकदम मस्त तयार होऊन ये बरं का"? आणि पार्लर नक्की कर ! ..... सगळ्यांमधे तू वेगळीच दिसली पाहिजेस..... उगाच कोणी म्हणायला नको की, अतुलची बायको काळी आहे म्हणून त्याने काजलला डोळा मारला आणि हसू लागला.

मगाच पासून प्रेमाने मोहरून गेलेल्या काजलचा चेहरा अतुलच्या बोलण्याने क्षणात पडला.

अतुलचं प्रेम जरी असलं तरी काजलचा काळेपणा सतत मधे यायचा.

दोन दिवसांनी काजलच्या सासूबाईंचा फोन आला आणि घरी कसलीतरी पूजा आहे म्हणून तिला बोलावलं होतं. 

काजलने होकार देत फोन ठेवला पण लगेच तीचा फोन परत खणखणला.

"हॅलो काजल, अग् एक सांगायचंच राहिलं. तुझी मोठी जाऊ पण छान तयार होणार आहे तर मग तू पण छानसं तयार होऊन ये. पार्लरमध्ये जाऊन मेक-अप वगैरे करून ये.... उगाच तुम्हा दोन्ही सुनांमधे लोकांनी फरक करायला नको म्हणून म्हंटलं मी .....बाकी काही नाही". ये तू छानसं आवरून म्हणत त्यांनी फोन ठेवला.

काजलला आता मात्र खुप दु:ख झालं. "चांगलं स्थळ समोरून आलं म्हणून होकार द्यायची घाई तर केली नाही ना आपण" ? हा प्रश्न तीला सारखाच सतावत होता.

ती याविषयी घरच्यांशीही बोलली पण ;

"तुझ्या डोक्यात उगाच कसलंही खुळ घालून घेऊ नकोस, तू कितीही शिकून चांगल्या कामाला लागलीस तरी लग्नासाठी सगळ्यांना गोरीच मुलगी हवी असते हे तू समजून घे " ......अनायासे, समोरून हे स्थळ आलंय,
अतुलला तू आवडली आहेस मग त्याच्यासाठी असंकाही थोडंफार करावं लागलं तर काय बिघडलं? म्हणत काजलचं तोंड तिच्याच घरच्यांनी बंद केलं.

काजल जेंव्हा - जेंव्हा अतुलसोबत फिरायला जायची तेंव्हा कोणी जर तिला रंगावरून बोललं तर अतुल हसत त्यांना सांगायचा की,

"काळीच आवडली तर काय करू"? म्हणत हसायचा ...!

अतुलचं प्रेम होतं पण का कोणास ठाऊक अतुल हा काजलमधे जे नाही ते लोकांना दाखवण्याची धडपड करत होता. 

सतत मेक-अप करून यायला सांगायचा जेंव्हा की काजलला तिचा सावळा रंग खुप आवडायचा.....

तिला वाटायचं की अतुलने असा दिखावा न करता ती आहे तसंच तिच्या रंगालाही स्वीकारावं पण ते होतंच नव्हतं.

इतका छान गो-या मुलाचं स्थळ एका काळ्यासावळ्या मुलीला आलं, पोरीने नशीब काढलं म्हणत सगळे काजलला बोलून दाखवायचे.

लग्नाच्या आधीच काजलला ह्या नात्यात गुदमरायला होत होतं. 

अतुलसाठी तिला तिच्या चेह-यावर सतत एक मुखवटा चढवायला लागायचा आणि त्या मुखवट्याआड काजलची भविष्यातली स्वप्न चेंगरली जात होती.

कितीवेळ ती विचार करत होती, तेवढ्यात तिचा फोन खणखणला , फोन अतुलचा होता ....

" हे स्वीटी, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना? ... आज भन्नाट असं काहीतरी करून ये म्हणजे सगळ्यांना समजेल की, अतुलची होणारी बायकोही काही कमी नाही कोणापेक्षा" !.....

काजलने फोन ठेवला आणी तिला अगदीच मळमळायला झालं. "काळ्या- गो-याच्या नादात आपण एक माणूस आणि स्वतंत्र व्यक्ती आहोत हे सगळेच विसरत होते. सतत हिणवताना आपल्याला काय वाटत असेल? याचा साधा विचारही ज्याला करता येत नाही तो आपला आयुष्याचा जोडीदार कसा असेल"? .....

काजलची मळमळ वाढली आणि तिला उलटी झाली..... आता तिची मळमळ काहीशी कमी झाली होती.

तिने आरशाकडे पाहिलं आणि ती नेहमी जशी तयार व्हायची तशी छान आवरुन तयार झाली. अचानक हातातल्या अंगठीकडे पहात ती कुत्सितपणे हसली आणि पार्टीसाठी निघाली.

ती पार्टीत पोहोचली आणि कोणाचं लक्ष जायच्या आतच अतुलने तिला पाहिलं आणि कोणी पहायच्या आतच तिचा हात ओढतच तो तिला बाहेर घेऊन आला.

"काजल ! अग् काय आहे हे? ....तुला मी छान आवरून यायला सांगीतलं होतं आणि तू तर साधा मेक-अप पण करून आली नाहीयेस ...अग् अशी कशी ओळख करून देऊ मी तुझी सगळ्यांना ?.... सगळे हसतील ना मला "!...

काजलने एक छानसं स्मित केलं आणि म्हणाली "अतुल! मी काळीसावळी जरी असले तरी मला त्याचं न्यूनगंड नाही. आणि मेक-अपचा मुखवटा घालून मला नेहमी वावरणं शक्य नाही. मला माझा एक स्वतंत्र रंग आहे जो मला खुप आवडतो. तू माझ्या प्रेमात पडलास तेंव्हाही माझा हाच रंग होता पण आता दिखाव्यासाठी तू मला तोच रंग विसरायला लावतो आहेस ज्याच्या प्रेमात तू पडला होतास" 

"हो ! आहे मी काळी !... आणी मला त्याचा अभिमान आहे. मला माझं स्वतंत्र तेज आहे जे मला तुझ्या रंगाच्या पुढे झाकोळून टाकायचं नाही" म्हणत, काजलने हातातली साखरपुड्याची अंगठी काढत अतुलच्या हातात ठेवली आणि ती चालू लागली पण लगेच क्षणभर ती थांबली आणि म्हणाली,

"अतुल! आपण जेंव्हा कोणावर खरं प्रेम करतो तेंव्हा , त्याला आहे तसं स्वीकारतो त्याच्या कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड ठेवत नाही आणि हेच नेमकं तुझ्याकडून झालं नाही. तुझ्या अशा वागण्याने मला गुदमरायला झालं हे ही तुझ्या लक्षात आलं नाही".

मी गोरी असो वा काळी , माझा रंग कोणताही असो पण एक गोष्ट तू तुझ्या डोक्यात निट घालून घे की; "मी म्हणजे शोभेची बाहुली नव्हे ज्याला तू बायकोच्या नावाखाली मिरवावंस".

माझ्या गोष्टी तुला जेंव्हा समजतील आणि मी आहे तशी जेंव्हा तू माझा स्वीकार करशील तेंव्हाच तू परत ये म्हणत काजल मागे न बघता चालू लागली.

अतुलच्या हातात काजलची अंगठी चमकत होती पण त्याहीपेक्षा त्याला जाणवलं की, काजलच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्र्वासाचं तेज जास्त लखलखत होतं.


© डॉ सुनिता चौधरी

सदर कथा लेखिका डॉ सुनिता चौधरी यांची असून त्यांच्याकडून रितसर लेखी परवानगी घेऊन आम्ही शेअर करीत आहोत. या लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून आमचा त्यावर काही ही अधिकार नाही..

धन्यवाद.!!! 📝

माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने