"पंचावन्न पैसे भि बहोत बडी चीज होती है बाबू..."



© सौ. प्रभा निपाणे






साधारण 1979 , 80 सालची गोष्ट आहे. माझ्या आठवीच्या परीक्षेचा शेवटचा दिवस होता.

पेपर संपला आणि सगळ्या मैत्रिणी एकत्र जमल्या. सागळ्यानी ठरवले उद्या picture पाहायला जायचे. त्यांना थोडी माझीच धाकधूक होती येणार की नाही म्हणून.

मी काहीच बोलायला तयार नव्हती कारण सगळ्यांना माहित होत मी खूप गरीब आहे.

पण माझ्या मैत्रिणींनी हा भेदाभेद कधीच केला नाही. उलट खूप सांभाळून घायच्या.

हुशार पण होती मी...पहिला दुसरा नंबर कधीच सोडला नाही...अक्षर पण मोत्यासारखे...सगळ्यांना गैरहजर असल्यावर माझीच वही लागायची.

खूप आपलेपणा होता...सगळ्या मला म्हणाल्या...प्रभा आम्हाला तुझ्या घरची परीस्थिती माहित आहे ...आम्ही वर्गणी काढून तुझं तिकीट काढतो ....पण तू चल... picture ला आमच्या बरोबर...

मी ऐकायलाच तयार नव्हती...असं तिकीट बिकट भरून picture ला जाण माझ्या आईला कधीच रुचल नसतं...आणि मलाही नाही...

आईला विचारून सांगते असे उत्तर देऊन...घराकडे यायला निघाली...

मैत्रिणींना पक्के ठाऊक होतं...हिची परिस्थिती नाही...त्यामुळे ही काही येणार नाही....

मग सगळ्याजणी सरळ माझ्या घरीच आल्या...आई अंगणात भांडीच घासत होती...

आईला म्हणाल्या काकू एक विचारायचं होत...

आई म्हणाली अग विचारानं... इतक्या का संकोचुन बोलतायं...? 

कुणाचीच विचारायला हिम्मत होत नव्हती...शेवटी अनिता म्हणाली...काकू आमची आज परीक्षा संपली...

आई म्हणाली माहित आहे ग... प्रभा कालच बोलली...आई उद्या शेवटचा पेपर म्हणून...

काकू आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून picture पाहायला जाणार आहे...

काकूचा प्रश्न ...कधी...? काकू उद्याच...अग जा न मग...! 

सगळ्या जणी आपापल्या घरी सांगून जा इतकंच..! हो काकू...घरी गेल्यावर सांगणारच आहोत...त्याआधी तुम्हाला विचारावं म्हणून आलो...

अग मला काय विचारायचं त्यात...? 

काकू...

काय ग अनिता. ! अजून काही सांगायचे आहे का ? 

नाही काकू...विचारायचे आहे...

अग मग विचार ना... अशी काय घाबरते ? पहिल्यादा भेटल्यासारखी...बरं झालं बाई...तरी रोज न चुकता पाणी प्यायला येता...मधल्या तासाला...अगदी पहिली पासून...आणि तरीही काकूंशी बोलायला इतका संकोच...! काय ग काकू आताशी खडूस वाटायला लागली की काय....? 

काहीही काय ओ काकू ? आणि काकू तुम्ही किती माया करता सगळ्यांनाच माहित आहे...

मग आता गाडी अडते कुठे तुमची...? 

तस नाही काकू...जरा वेगळं काम होत...

अनिता बाळा लवकर बोल...अग संगीता तू तरी बोल बाई...काय काम आहे...? काय सांगायचे आहे... ?भांडी झाली की...कपड्याचा ढीगारा वाट पाहतो माझी...? पण काय गं ...माझ्या प्रभाने काही केले की काय...? 
सगळ्यांच्या सगळ्या ....अख्खी वरात आज काकूंकडे....

नाही ओ काकू खरच असं काही नाही...

अग बाई बोला गं मग एकदाच्या...उगाच जीव टांगणीला नका लावू...काय गं ...? कुठे डब्बापार्टीला वगरे जायचे आहे का...? 

नाही ओ काकू...आणि अनिता एका दमात बोलून गेली...काकू उद्या picture ला चाललो आम्ही ...प्रभाला पण पाठवा... 

हो...! हो...! नक्की येईल ती..!

जायचे न प्रभा तुला...?

हो आई...!

मी पण खुश झाली ...आई लगेच हो म्हणाली म्हणून , 

सगळ्या मैत्रिणी मागच्या दारात गेल्या..

.तेवढ्यात आई मला म्हणाली...प्रभा picture ला जायचे आहे नं बाळा..!

हो आई...!

पण तू म्हणशील तरच...! बाळा मी नाही कशाला म्हणू...!

नक्की जा...!

आपला तो पैस्याचा डबा घेऊन ये बर...!

मी धावत जाऊन डबा आणला, मला म्हणाली, उघड डबा...!

डबा उघडला ...!

त्यात एकेक रुपयांच्या तीन नोटा होत्या...आणि पंधरा वीस पैसे चिल्लर होते...

मला म्हणाली किती पैसे आहेत...?

मी पैसे मोजले ...सांगितले...

म्हणाली हे बघ ...बाबांनी दोन रुपये भाजीसाठी दिले...एक रुपया चिल्लर खर्चायला ...उद्या रविवार...बाजाराचा दिवस...बाजार आणावा लागेल थोडाफार...तुला तिकीटला पंचावन्न पैसे...

त्यात सगळ्याच श्रीमंत मुली. त्या...काहीबाही घेऊन खातील ...तर तुलाही खायला किमान दहा पंधरा पैसे...म्हणजे जवळ जवळ बाराने...

एकही वर्ग न शिकलेली माझी आई ...संसारातील पैसाच गणित...देश्याच्या अर्थमंत्र्यापेक्षाही भारी वाटलं ...आता तुला इतके पैसे दिले...तर बाजार कसा होईल तूच सांग... मागच्या शुक्रवारी विलास आजारी पडला...त्याच्या औषध पाण्यात...आणि डॉक्टरच्या फी ने सगळं पैस्याचा बजेट गडगडलं ...मग आठवते न ज्वारीच्या पिठात जरास बेसन आणि दही घालून कसं पिठलं बनवून खाल्लं ते... मग घरच्या कळण्याच्या वड्या...पाटोडी...चुनवड्या काय काय खाल्लं आठ दिवस आठवते न...? आता तू जर picture ला गेली तर...आठ दिवस पुंन्हा घरची भाजी करायची...तुम्हीच मग कंटाळत ग..आता निदान कांदे, बटाटे, लसूण अन दोनचार भाज्या आणल्या... की घरच्या वड्या...वालाच्या खुला...बेसन...दोनचार घरच्या भाज्या केल्या का हप्ता निघतो...

आता तूच ठरव... सिनेमा का भाज्या...?

बापरे...!

आईने खूप मोठी अट घातली होती...मैत्रिणी पैसे भरणार हे आईला आणि मला आवडणार नाही...

आता काय सांगू...?

मग मीच विचार केला...सांगावं आई सोबत बाहेर जायचे आहे...आईला बोलली... नाही जाणार मी picture ला...नको काळजी करू...

अग पण मैत्रिनींना काय सांगणार...?

आईला सांगितले ...तू नको काळजी करू...मी बरोबर सांगते...

सगळ्या जणी मागच्या दारात माझी वाटच पाहत होत्या...

मला म्हणाल्या...अग काय ठरले...?

येणार आहेस न...?

मी म्हणाले...उद्या एका ठिकाणी जायचे आहे आई बरोबर...तिकडूनच मी डायरेक्ट सिनेमाला येते...किंवा रोडवरच अनिताच घर आहे...तिच्याकडे येते...पण हो तुम्ही माझी वाट पाहू नका...जर उशीरच झाला तर...डायरेक्ट थेटरलाच भेटू...आणि मंत्रिणीची गोड बोलून बोळवण केली...

मागे वळून पुन्हा पुन्हा म्हणत होत्या प्रभा खरंच येणार न गं..!

टांग नको देऊ..!

आत्ताच सांगून ठेवतो...!

मी पुन्हा पुन्हा नक्की येण्याचं आश्वासन देत होती... दिसेनास्या होई पर्यंत... ! 

त्यांना सोडून घरी आले...आईला कपडे वाळत घालू लागले...

कपडे वाळत घालता घालता आई म्हणाली...पोरी खरंच अभिमान वाटतो ग तुझा... ! किती सहज पांघरून घातलं आपल्या गरिबीवर...!

मायेने कुरवाळत राहिली...म्हणाली बेटा लक्षात ठेव ...'झाकली मूठ सव्वा लाखाची' ...यालाच म्हणतात गं...

आईचे ते अनमोल बोल...मनाच्या एका कोपऱ्यात साठवून ठेवत होती....

त्याकाळी picture सुरु व्हायच्या आधी ...टॉकीज मध्ये "मै तो आरती उतारू रे ...संतोषी माता की"...ही आरती लागायची...मला तर आत्ताच आरती ऐकू येऊ लागली...शाळेतून येतांना पाहिलेलं... picture चं पोस्टर डोळ्यासमोर दिसू लागलं होत...डोक्यात स्टोरी तयार होत होती...picture अभी बाकी था...!

" तुला पाहते रे" ...हि डेलीसोप बघतांना त्यात एक डायलॉग ऐकला ..."दो रुपये भी बहुत बडी चीज है बाबू..." आज नाही...पण त्या घडीला "पंचावन्न पैसे भी , बहोत बडी चीज थी बाबू"....आठवून जसं ज्या तसं डोळ्यासमोर तरळून गेलं...

समाप्त......


 ©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे

  कल्याण.

सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने