आत्मविश्वास

© पल्लवी घोडके-अष्टेकर



आज क्लास वरून निघायला दिप्तीला जरा उशीरच झाला होता. 

दिवस थंडीचे होते, त्यामुळे बर्‍यापैकी अंधार पडला होता. दिप्ती आजूबाजूच्या माणसांचा आढावा घेत घाईघाईतच स्टेशनवर निघाली. 

रात्रीच्या वेळी स्टेशनवर फारशी गर्दी नसते, हे तिला माहीत होते. पण आज तिचा क्लास थोडा जास्तच लांबला होता. 

परीक्षा तोंडावर आल्याने क्लासच्या सरांनी syllabus पूर्ण करण्यावर भर देण्याचे ठरवले आणि नेमकं आजच तिची मैत्रीण पण आली नव्हती.

खरेतर शेवटचे १५-२० मिनिटं दिप्तीचे क्लासमध्ये लक्षच नव्हते. तिला घरी जाण्याचे वेध लागले होते. 

क्लासच्या सरांनी ते हेरले व टॉपिक पूर्ण करून त्यांनी क्लास सोडला.

दिप्ती स्टेशन कडे घाईने वाटचाल करीत होती, तेवढ्यात आईचा फोन आला. क्लास उशिरा सुटल्याने आत्ता निघतेय, ट्रेन वेळेत मिळाली तर १५ ते २० मिनिटात घरी पोहोचेल असे सांगून तिने फोन ठेवला.

स्टेशन वर पोहोचली तर तिथे चक्क कुणीच नव्हते, तिने आजूबाजूला पाहिले, लांब एका ओट्यावर २-३ मुलं बसलेली होती. 

तिला एकटीला पाहून ती मुले उठली व तिच्या दिशेने चालू लागली. 

तिच्या सावध नजरेने ते ओळखले. सावधगिरी म्हणून तिने तिची बॅग छातीशी धरून खांद्यावर अडकवली व फोन काढून हातात धरला.

पोलिसांना फोन करावा का?असा विचारही तिच्या मनात आला. 

पण त्या मुलांनी कुठे काय केले आपल्याला? म्हणून तिने पोलिसांना फोन करण्याचा विचार टाळला. पण तरीही तिने स्क्रीनवर नंबर आणून ठेवला होता.

आता पोलिस व आपल्यात फक्त एका क्लिकचे अंतर आहे असे वाटून तिला थोडेसे समाधान वाटले.

ती मुलं हळूहळू तिच्याकडे पाहत जवळ येत होती. ते दहा पंधरा फुटांच्या अंतरावर येताच तिच्या हृदयाची गती वाढली व मनात नको ते विचार येऊ लागले. 

तेवढ्यात एक ट्रेन पलीकडच्या प्लॅटफॉर्मवर आली.

चढणारे लोक तर नव्हतेच पण २०-२५ लोक स्टेशनवर उतरले व पाहता पाहता निघूनही गेले. ते होते तोवर तिला थोडे हायसे वाटत होते. 

पण आता….., ती पुन्हा एकटीच होती आणि सोबतीला ती नको असलेली तीन मुले.

पुढची ट्रेन यायला अजून १० मिनिट होते. 

आता मात्र त्या मुलांची नजर तिच्या अंगावर सापासारखी रेंगाळू लागली. त्यातील एकाने दुसऱ्यास इशारा केला, तो दिप्तीच्या पलीकडे गेला. 

"आता पुढची ट्रेन येईपर्यंत काम तमाम करूया…. आपण तिघे…..ती एकटी…." असे ते मोठ्याने बोलत होते.

आता मात्र त्यांचा इरादा तिला स्पष्ट कळला होता. 

तिने प्लॅटफॉर्म सोडून पुढे पळावं असं त्या मुलांना वाटत होतं,तिच्याही मनात तसा विचार आला, पण आपण तिकडे पळालो तर ह्या लोकांना अंधाराचा फायदा घेता येईल व आपल्याला मदतही मिळणार नाही हे तिच्या तल्लख बुद्धीने तिला सुचले व तीने पळणे टाळले.

ती पळत नाही हे पाहून ते तिघे आणखीच आक्रमक झाले.

तिने घाबरतच फोन काढला,ती फोन बघत असतांनाच,एकाने हाताने तिच्या फोनला धक्का दिला व फोन बाजूला पडला दुसऱ्याने लगेच फोन उचलला. 

तिने भीतीने जोरात आरोळी ठोकली. 

"हेल्प….हेल्प I need help.." तेवढ्यात एकाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला.

तिच्या कानाचे Bluetooth खाली पडले. 

मोबाईलच्या स्क्रीनवर आधीच पोलिसांचा नंबर असल्याने तिचा फोन पोलिसांना गेला होता. 

मदत कदाचित मिळणार होती. पण…. आता तिला पोलीस किंवा ट्रेन येईपर्यंत खिंड लढवायची होती. ते तिन होते व ती एकटी.

या विचारांनी त्या थंडीतही तिला घाम फुटला. 

ती मागे मागे सरकत होती तेवढ्यात एक माणूस बाकावर बसलेला तिला दिसला. 

ती धावतच त्याच्या जवळ गेली हेल्प…. हेल्प...,ती म्हणाली, तसे ते तिघे हसू लागले.

"मी तुला मदत करु शकत नाही, जो व्यक्ती स्वतःची मदत करू शकत नाही त्याला देवही मदत करत नाही. मग मी तरी कशी करू? ही तुझी लढाई आहे तुलाच लढावी लागेल." असे म्हणून तो तिच्या बाजूला उभा राहिला.

तेवढ्यात एका मुलाने तिची ओढणी ओढली, तिने दोन्ही हाताने ओढणी घट्ट धरली व मदतीसाठी त्या माणसाकडे पाहिले. 

"तेव्हा तू कराटे क्लासला जात होतीस ना?मग त्याचा काहीतरी उपयोग कर." त्याने म्हणताच ह्याला कसे माहित असा विचार क्षणभर तिच्या मनात आला.

पण हा व्यक्ती काही आपली मदत करणार नाही हे समजून ती लढायला सज्ज झाली. 

तिने जोरात ओढणीला हीसका दिला. 

तिच्या अचानक बदललेल्या पवित्र्यामुळे तो बेसावध असलेला मुलगा त्या हिसक्याने खाली पडला. 

बाकी दोघे धावून आले, त्यांनी तिला धरून अंधारात ओढत नेण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यक्ती "साईड किक" असे जोरात ओरडला. 

दिप्तीने प्रसंगावधान साधून उजव्या पायाने डाव्या बाजूस असलेल्या एकास जोरदार साईड किक लगावून दिली. 

तेवढ्यात तो खाली पडलेला तिसरा व्यक्ती तिच्यावर धावून गेला. 

ती अनोळखी व्यक्ती पुन्हा ओरडली "Knee kick" क्षणभरही वेळ न घालवता सर्व शक्ती एकवटून तिने समोरून झेप घेणार्‍या त्या मुलाच्या पायांच्या मध्ये Knee kick चा आघात केला,त्याने तो खाली गुडघ्यावर बसला. 

रिव्हर्स पंच, तिच्या कानावर आवाज पडला तसा तिथे आणखी एकाला जोरदार पंच मारला.

पुढची ५ मिनिटे तो माणूस तिला साईड किक,रिव्हर्स पंच, मिडल पंच, साईड स्नॅप, फ्रंट किक अशा सूचना देत राहिला व तीही या सर्व गोष्टींचा उपयोग करत राहिली. 

शेवटी पोलिसांच्या गाडीचा हॉर्न कानावर येताच ते दोघे पळू लागले. 

"खालच्याला धरून ठेव, जाऊ देऊ नकोस." पुन्हा तो व्यक्ती ओरडला. 

दोन्ही पायांच्या मध्ये जोरदार मार लागल्याने गुडघ्यावर बसून राहिलेला तो पळण्यासाठी उठण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तिने तत्परतेने ओढणीने त्याच्या गळ्याभोवती फास घालून त्याला ओढले. 

तेवढ्यात पोलीस धावत आले व त्या मुलाला पकडले.

पुढच्या मिनिटाला ट्रेन देखील आली. 

काही लोक प्लॅटफॉर्मवर उतरले, पोलिसांनी त्या मुलास ताब्यात घेऊन दिप्ती बरोबर एक लेडी पोलीस दिली.

ट्रेनमध्ये बसतांना तिला बाकावरची व्यक्ती ट्रेनमध्ये दिसली. "तुम्ही कोण आहात?" असे तिने विचारताच, तो हसला व माझ्याकडे नीट पहा म्हणजे तुला कळेल असे तो म्हणाला.

" तिने त्याच्याकडे टक लावून पाहिले. तो हुबेहूब दीप्ती सारखाच दिसत होता. 

तिला आश्चर्य वाटले, तसे तो बोलला,"मी तुझ्यातच राहतो...मी तुझा आत्मविश्वास आहे.

मी प्रत्येकात असतो फक्त संकट काळात घाबरायचं की लढायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं.

लढायचं ठरवलं तर मी मदत करतोच, जशी तुला केली आणि परिस्थितीच्या स्वाधीन व्हायचं ठरवलं तर मी निघून जातो. 

संकटात इतर कुणाच्या मदतीची वाट पाहण्यापेक्षा कान-नाक-डोळे उघडे ठेवून आपणच स्वतःचे संरक्षण करायला हवं. 

जो व्यक्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी लढतो मी त्याच्यासोबत असतो नेहमीच. 

जिथे भय असते तिथे मी नसतो आणि जिथे मी असतो तिथे हिम्मत ही असतेच." एवढे बोलून तो अदृश्य झाला.

दिप्तीला आता खूप हायसे वाटत होते. तिच्यासोबत असलेल्या लेडी पोलीस कर्मचाऱ्याने, "तू एकटी असून त्या तीघांचा विरोध कसा करू शकलीस?" असे विचारताच, "माझ्याबरोबर माझा आत्मविश्वास होता" एवढेच दिप्ती बोलू शकली.

© पल्लवी घोडके-अष्टेकर.

सदर कथा लेखिका पल्लवी घोडके-अष्टेकर यांची आहे. कथेचा कायदेशीर हक्क त्यांच्याकडेच असून त्यांनी स्वेच्छेने सदर कथा ब्लॉगवर पोस्ट करण्यासाठी दिलेली आहे. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

📝 माझी लेखणी

फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने