योगक्षेम

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)


बापूसाहेब यंदा वारीला निघालेले.. एकटेच..

दरवर्षी ते पत्नीसह वारीला जात. यंदा मात्र त्यांनी लक्ष्मीला नेणं टाळलंच ! 

ह्यावेळची त्यांची वारी वेगळी होती. 

दरवेळी सावळ्या विठूच्या दर्शनाचा केवढा उत्साह त्यांना..!  ह्यावेळी मात्र त्यांचं पाऊल जड पडत होतं. 

सोबतचे वारकरी नाचत-गात, फुगड्या-रिंगण घालत पुढे निघून जात.. बापूसाहेब मात्र मागेच.. एकटेच.. पाय ओढत..!!

बापूसाहेबांचं पंचक्रोशीत मोठ्ठं प्रस्थ. त्यांचा पिढीजात सावकारीचा व्यवसाय.

पण अंगी विठ्ठलभक्ती मुरलेली !  त्यांच्या कित्येक पिढ्यांत वारीची ही परंपरा चालत आलेली ..

बापूसाहेबांचा गावी मोठ्ठा चौसोपी वाडा.. अन् वाड्यातली स्वामिनी.. त्यांची पत्नी लक्ष्मी.. 

लग्न होऊन आली तेव्हा दागिन्यांनी लगडलेली.. अगदी केसातल्या फुलापासून तर कंबरपट्टयापर्यंत..स्वतःचं 'लक्ष्मी' हे नाव सार्थ करणारी...!

बापूसाहेबांचं सुरुवातीपासून संसारात लक्ष असं नव्हतंच. 

ते नेहमीच विठ्ठलभक्तीत रममाण.. अगदी तुकारामांसारखेच !

घरच्या व्यवसायात कधी लक्ष घातलं नाही अन् भाऊबंदकीनं घात केला. सावकारी बुडाली.. वडिलार्जित संपत्तीला ग्रहण लागलं . 

बापूसाहेबांची स्वकष्टार्जित संपत्ती म्हणजे 'विठूरायाचे नाम!' पण त्यावर संसार थोडाच चालतोय ?

बिचार्‍या लक्ष्मीबाई ! त्याही देवभक्त ! त्यांच्या माहेरीही विठ्ठलभक्तीची परंपरा.. पण संसारात दोघांनीही ईश्वरचरणी लीन होऊन कसं चालायचं ? 

संसार मांडलाय तर तो रेटायला तर हवाच ना ?

कधीतरी लक्ष्मीबाई चिडत.. म्हणत, "तुकाराम असावा हो ! पण शेजारच्या घरी.. आपल्या घरात तुकाराम असला तर बायको कर्कशाच होणार!"

सावकारी बुडाली तशी वाड्यालाही अवकळा आली.  

वाड्यातले नोकरचाकर काढून टाकले. लक्ष्मीबाईंच्या दागदागिन्यांना तिजोरीतून बाहेरची वाट फुटली. 

वाड्यातली 'लक्ष्मी' आता 'लंकेची पार्वती' झाली.

तरीही लक्ष्मीबाई शांत राहिल्या. पण हळूहळू घरातल्या भांड्याकुंड्यांवर गदा आली अन् लक्ष्मीबाईंचं धाबं दणाणलं ! 

दोन लहान लेकरं.. त्यांच्या शिक्षणाची अन् खाण्यापिण्याचीही आबाळ होऊ लागली.

"विठ्ठला.., काय ही परीक्षा ? घरातले पैसे संपले.. दागिनेही गेले.. लेकरांना वाढवलं कठीण झालं.. एकुलता वाडा तेवढा उरला.. पण तो विकू शकत नाही ! डोक्यावरचं छत जायचं अन् अब्रूही..!" लक्ष्मीबाई अजिजीनं पांडुरंगाला  विनवत.

बापूसाहेब स्थितप्रज्ञ ! त्यांना 'वाडा' काय नि 'गोठा' काय..? एकसमान !

मागल्या वारीपूर्वीची गोष्ट ..!

एक दिवस पहाटे लक्ष्मीबाईंना एक विलक्षण स्वप्न पडलं. विठूरायानं दृष्टांत दिला.. "तुम्ही दरवर्षी माझ्याकडे येता.. आता मला घेऊन चला ..तुमच्याकडं.. मी तुमच्या वाड्यात राहीन..!"

स्वप्नाचा वृत्तांत ऐकताच बापूसाहेब हरखले.  

"जन्मभर विठूरायाची भक्ती केली मी..!  तो पावला मात्र लक्ष्मीला !! विठ्ठला.. अगाध तुझी लीला.."!!

स्वप्नाची बातमी कर्णोपकर्णी झाली अन् बापूसाहेबांकडे विठ्ठलमंदिर बांधण्याचा आग्रह होऊ लागला. 

हां हां म्हणता देणग्या गोळा झाल्या .. अन् वाड्यातच एक लहानसं मंदिर उभ राहिलं !

त्यावर्षीच्या वारीला जाण्यासाठी बापूसाहेब किती हरखले होते..! 

विठूरायाच्या इच्छेनं ते त्याला स्वतःच्या घरी आणणार होते !  

वारीहून परतताना त्यांनी पंढरपूरहून विठ्ठलाची सावळी मूर्ती आणली अन् वाड्यातल्या मंदिरात विठूरायाची विधिवत् प्रतिष्ठापना केली..

त्यांच्या पलिकडच्या ओळीत रहाणार्‍या कुरुंदकरांच्या लेकीला नवर्‍यानं सोडलं अन् ती दोन मुलांसह माहेरच्या आश्रयाला आलेली.

कुरुंदकरांनी बापूसाहेबांच्या विठूरायाला नवस केला अन् महिन्याभरातच तिचा नवरा तिला स्वेच्छेनं घरी घेऊन गेला. कुरुंदकरांनी मंदिराच्या पेटीत 'गुप्तदान' केलं.

लक्ष्मीबाईंच्या मामेबहिणीला मूलबाळ नव्हतं. ती सहजच म्हणून दर्शनाला आली अन् महिन्याभरातच तिला गोड बातमी मिळाली..!

बापूसाहेबांच्या विठोबाची कीर्ती दाही दिशांना पसरू लागली. 

मंदिरात गर्दीही वाढू लागली.. देणग्या मिळू लागल्या..मंदिरात दर्शनाकरिता लोकांची रीघ लागे. 

लोक फळ, धान्य, दक्षिणा विठूरायाला अर्पण करत‌ अन् विशेष प्रसंगी विठूरायाला धोतराचं पानही.. पूजा-अभिषेक सतत सुरू रहात..

लक्ष्मीबाईंच्या स्वयंपाकघरातली भांडीकुंडी आता वाचली.. अन् दोन वेळच्या जेवणाची भ्रांतही मिटली..!

वर्ष निघून गेलं होतं.. लक्ष्मीबाई मात्र अस्वस्थ होत्या..!

अशातच पुन्हा वारीला जाण्याचा दिवस उजाडला. बापूसाहेबांनी लक्ष्मीबाईंजवळ वारीला जाण्याचा विषय काढला तशा लक्ष्मीबाई ढसढसा रडू लागल्या..

त्यांनी बापूसाहेबांना त्या दृष्टांताबद्दल खोटं सांगितलेलं !

बापूसाहेबांना विठ्ठलभक्ती शिवाय दुसरं काही जमत नव्हतं.  

ती बिचारी माऊली .. घरादाराला किती पुरी पडणार?  

घराण्याची इभ्रत तिला न घराबाहेर पडून काम करू देत होती न भीक मागू देत होती ! 

आत्महत्या हे तर महापाप ! दोन लेकरांच्या काळजीनं लक्ष्मीबाई ते करू धजावत नव्हत्या.

बापूसाहेब अस्वस्थ होते. "लक्ष्मीनं असं करायला नको होतं.. टीचभर पोटासाठी माझ्या विठूरायाचा बाजार मांडला तिनं..! माझं घराणं वारकऱ्यांचं ..! घरातल्या सुनेनंच घराण्याला बट्टा लावला.. स्वत:च्या माहेराला काळीमा फासला !"

विचार करकरून बापूसाहेबांच्या डोक्याचा भुगा झाला.

बापूसाहेब संत माणूस !  पत्नीला घालूनपाडून बोलणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं . 

मग ते एकटेच निघाले वारीला..!   विठूचरणी त्यांच्या पापाचं क्षालन करायला..!!

पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं बापूसाहेबांच्या घशाला कोरड पडली. विठूरायाला तोंड कसं दाखवावं ह्या विचाराने ते हैराण झाले.

एकादशीला वारी पंढरपुरात पोहोचली अन् बापूसाहेबांनी तडक मंदिर गाठलं. 

लाखोंची गर्दी चिरत ते विमनस्कपणे विठूरायाजवळ पोहोचले.

विठूरायाच्या चरणांवर डोकं आदळल्याशिवाय पापाचं परिमार्जन नव्हे !

विठूरायाच्या चेहऱ्याकडं न बघताच त्यांनी त्याच्या पायाला मिठी घातली..!

"विठूराया, माफ कर मला.. वीतभर पोटासाठी तुझा बाजार मांडला मी..! त्या कुळबुडवीवर विश्वास ठेवला ..!! माझ्या पापाला प्रायश्चित्त नाही !!!

ते विठूरायाच्या पायांवर डोकं आदळणार इतक्यात बडव्यांनी त्यांना उचलून बाजूला केलं. त्यांनी बघितलं.

समुद्राच्या लाटांप्रमाणे वारकऱ्यांचे लोंढे अजूनही मंदिरात शिरत होते. 

त्यांचं लक्ष विठूरायाच्या मूर्तीकडे गेलं. मूर्तीच्या चेहऱ्यावर एक अनुपम तेज विलसत होतं..!

बापूसाहेबांना अचानक शांत शांत वाटू लागलं..

"अरे बापू, पत्नीला दोष देऊ नकोस !"  जणू विठूराया त्याच्या मंद सुहास्यातून बापूसाहेबांशी संवाद साधत होता...

"अरे, लक्ष्मीनं जे काही केलं त्यासाठी तिला बुद्धी देणारा मी अन् तुझ्याकडून ते घडवून घेणाराही मीच !"

"तं बुद्धियोगं ददामि येन मां उपयान्ति ते !"

"अरे, मंदिर बांधणं तुझ्या हातात.. पण भक्तांना पावणं माझ्याच हातात ना..! भक्तांसाठी स्वतःला विकूनही घेऊ शकतो मी !"

"तू माझ्या भक्तीत लीन तर तुझ्या भरण-पोषणाची अन् संसाराची जबाबदारी माझी !  अन् मी ती पार पाडली एवढंच !!"

"अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते !
तेषां नित्याभियुक्तानाम्  योगक्षेमं वहाम्यहम् !!"

बापूसाहेबांच्या मनातलं मळभ दूर झालं अन समाधानाने परतीची वाट चालू लागले.. त्यांच्या घरातल्या विठूरायाला कडकडून मिठी मारण्यासाठी !!

© कल्याणी पाठक (वृषाली काटे)

सदर कथा लेखिका कल्याणी पाठक (वृषाली काटे) यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 
साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने