वादळ

© धनश्री दाबके



"आई, बास ग आता. थोडं इतर कशाविषयी, निदान माझ्याविषयी तरी काही बोलशील की नाही? 

की जगात फक्त तू आणि तुझी सून दोघीच आहात?
 
तुझ्यासाठी लहान असले तरी मीही थकते ग हल्ली. मान्य आहे मला, तुला काही गोष्टी, नव्हे बऱ्याच गोष्टी खटकतात रुपाच्या. 

तुला त्रासही होतो तिच्या वागण्याचा. तुझं मोकळं होण्याचं हक्काचं ठिकाणही मीच आहे. पण मलाही काही लिमिटेशन्स आहेत, स्वतःचे ताणतणाव आहेत. 

माझ्या जुनी पाळंमुळं घट्ट धरून ठेवणाऱ्या साठीतल्या सासूबाई आणि मला नव्याने जग दाखवणारी सोळाव्यातली लेक, दोघी आधीच जीव खातात माझा. 

त्यांच्यापासून जरा मोकळीक म्हणून मी धावपळीतही वेळ काढून इथे तुझ्याकडे येते तर तू नेहमी तुझ्याच कोषात गुंतलेली ! 

हल्ली तुझं रुपा पुराण संपता संपत नाही. तरी कितीदा तुला सांगते मी, की हल्लीच्या मुलींना स्वतःची स्पेस लागते. म्हणजे त्यांची मूलभूत गरजच असते ती. 

त्यांना नाही आवडत सतत त्यांच्या प्रत्येक बाबतीत कोणी नाक खुपसलेलं. रुपाची ती गरज समजून घे. 

नको तिला आणि मला एकाच तराजूत बसवू. 

पण नाही. तू सतत तुझा तक्रारीचाच सूर आळवतेस. अशानेच बाबाही वैतागतात तुझ्यावर. 

तुला निदान बाबा तरी आहेत मन मोकळं करायला. 

पण मी कोणाला सांगू? गेली कित्येक वर्ष मनातलं मनातच ठेवून जगत आलेय मी. पण आता नाही सहन होत. 

खरंतर नेहमीसारखी सोमवारी निघणार होते पण आता आजच जाते. तेही आत्ताच. आणि नाही येणार मी आता सारखी सारखी वीकेंडला इथे. 

तुला काय करायचे ते कर तू. जाते मी... bye.." 

कुंदाताईंना असं सुनावत वीणा रागानेच बाहेर पडली. 

नेहमीप्रमाणे शनिवारी आईकडे जाऊन सोमवारी संध्याकाळी ऑफिस करूनच घरी येणारी वीणा,  ह्यावेळी आल्या पावली  घरी जायला निघाली होती.

वीणाने जातांना रागाने दार बंद केले आणि कुंदाताई भानावर आल्या. त्यांचे डोळे भरून आले. 

नेहमी जाऊ दे ग आई, होईल सगळं ठीक म्हणणारी, मला समजून घेणारी वीणा आज एकदम वसकन ओरडून चक्क निघून गेली तिच्या घरी. 

इतका त्रास देते का मी तिला? ती म्हणाली तशी मी खरंच फक्त माझ्याच कोषात अडकले आहे का? 

ती एवढी धडपडत घरी येते आणि मी? 

तिच्या चार गोष्टी ऐकून घेण्याऐवजी माझंच घोडं दामटवत बसते. 

एकटीने संसार रेटणारी माझी बिचारी पोर. थकून जात असेल पार. 

आजही सकाळी आली तेव्हा थोडी सुकलेलीच वाटली. 

खरंतर तिचं आता शरीराच्या आणि मनाच्याही विविध स्थित्यंतरांतून जाण्याचं वय. पण आई म्हणून ते समजून घ्यायचं तर लांबच साधं तिचं काही ऐकूनही नाही घेत मी हल्ली. 

काठोकाठ भरून आलेले त्यांचे डोळे वाहायला लागले आणि मनाला वीणा नकळत आपल्यापासून लांब गेली याची टोचणी लागली.

वीणा आणि ध्यानीमनीही नसतांना तिच्या पाठीवर थोड्या थोडक्या नाही तर तब्बल अकरा वर्षांनी आलेला राजन.  

दोघांनी माझं आईपण समृद्ध केलं. 

आपल्यापेक्षा खूप लहान असलेल्या भावाला स्विकारतांना वीणा बिचारी वयापेक्षा लवकरच मोठी झाली. 

उशीराने झालेले बाळांतपण, त्यातून उद्भवलेल्या तब्येतीच्या तक्रारी आणि मदतीला कोणीच मोठं घरात नाही. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर माझी प्रचंड चिडचिड व्हायची आणि माझ्याही नकळत ती वीणावर निघायची. 

हे शांत राहून समजून घ्यायचे पण पोर बिचारी कोमेजून जायची अन् घरातले वातावरण ढवळून निघायचे. 

वेळ निघून गेली की नंतर पश्चात्ताप व्हायचा पण दुसरा दिवस परत ये रे माझ्या मागल्या म्हणतच उजाडायचा. 

राजन जस जसा मोठा होत गेला तस तसा माझा त्रागा कमी झाला. घरात शांतता आली. 

एक दिवस वीणा तिच्या कॉलेजमधल्या मित्राला वरुणला घेऊन घरी आली. 

वरुण सगळ्यांनाच आवडला आणि दोन वर्षात त्यांचं लग्नही लागलं. 

लग्नानंतर वीणा खऱ्या अर्थाने मनाने माझ्या जवळ आली. 

तिचे नवे नवलाईचे दिवस, सणवार, तिला लागलेले कडक डोहाळे, बाळांतपण .. सगळं सगळं भरभरून अनुभवलं मी..आई म्हणून.. आजी म्हणून. 

पण तिच्या अवघ्या चार वर्षांच्या संसाराला जणू ग्रहण लागलं. 

वरुण अचानक एका साध्या अपघाताचं निमित्त होऊन गेला आणि होत्याचं नव्हतं झालं. 

त्या आघाताने वीणा कोलमडली. 

मग माझ्या लेकीला तिच्या लेकीसाठी जगवतांना मी तिची बेस्ट फ्रेंड झाले आणि ती हळूहळू सावरली. 

कितीही समजावलं तरी न ऐकता पठ्ठीने एकटीने मनुला वाढवलं. 

काळानुरूप सगळ्यांच्या आयुष्याची गाडी परत रूळावर आली. 

बघता बघता राजनचही लग्न झालं आणि रुपा घरात आली. 

इतकी वर्ष एकटीने सांभाळलेल्या घरात रुपा नविन पीढीचे नविन विचार घेऊन आली खरी पण तरी तिने तिच्यात आणि आमच्यात स्वतःची स्पेस जपण्याच्या नावाखाली सुरवातीपासूनच एक ठराविक अंतर राखलं. 

ह्यांनी ते स्विकारलं पण मला मात्र जमेना. 

रुपाला घरात सामावून घेतांना मी प्रत्येक वेळी तिची तुलना वीणाशी करत गेले. 

वीणाचं मोकळेपणाने वागणं, प्रत्येक गोष्ट माझ्याशी चर्चा केल्यावरच ठरवणं, मला तिच्या आयुष्यात महत्व देणं या सगळ्याची मी रुपाकडूनही अपेक्षा ठेवू लागले आणि त्या अपेक्षा जस जशा भंगत गेल्या तस तशी मी एकटी पडत गेले. 

मग अपेक्षाभंग झालेल्या मनाला मोकळे करण्यासाठी मी वीणाला हाताशी धरलं. 

जरा काही झालं की वीणाकडे रुपाच्या तक्रारी करु लागले. 

कदाचित वीणाला ते पहिल्यापासूनच आवडलं नसावं पण आई म्हणून ती मला सहन करत गेली आणि मी तिच्यावर माझ्या मनातलं ओझं लादत लादत तिच्यासाठी डोकेदुखी ठरत गेले. 

पण आज मात्र ती आल्या आल्याच मी माझी टेप सुरु केली आणि तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. इतका की ती कधी नव्हे ते माझ्याशी रागावून बोलली. 

खरंच मी इतकी कशी स्वतःमधे गुरफटले की वीणा माझ्यापासून लांब जातेय हे मला जाणवलंही नाही. 

ती रागाने परत गेली आणि मी तिला थांबवल सुद्धा नाही. 

कुंदाताई विचार कर करून हवाल दिल झाल्या. 

आता काय करु? 

राजन आणि रुपा बाहेर गेलेत. हेही देवळात गेलेत. 

त्यांना आल्यावर सांगू की आत्ताच फोन करुन वीणाच्या बस स्टॉपवर जायला सांगू? 

अजून असेल का ती तिथे? असेल असेल. आत्ताच तर गेलीये. 

ह्यांना कशाला. मी दुखावलय तिला तर मीच जाते. 

सॉरी म्हणून तिची समजून काढून घेऊन येते तिला परत. 

कुंदाताईंनी पदराने तोंड पुसले. लॅचची चावी घेतली आणि पायात चपला अडकवून त्या घाईघाईने वीणाच्या नेहमीच्या बस स्टॉपकडे निघाल्या. 

आज मनात घोंघावणार्‍या वादळापुढे त्यांचे बाहेर सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याकडे आणि नुकत्याच सुरु झालेल्या टपोऱ्या थेंबांच्या पावसाकडे लक्षच गेले नाही. 

वीणा अजूनही बस स्टॉपवरच असू दे या विचारात त्या भराभर चालत सुटल्या. 

इकडे वीणाचं डोकं आता बरंच शांत झालं होतं. 

वळवाच्या पावसाची जोरदार सर येण्याची लक्षणं होती. वारा सुटला होता आणि वीणाकडे छत्रीही नव्हती. 

काय करावं? जावं का घरी परत? 

आज जरा जास्तच वैतागले का मी आईवर? 

पण काय करू मी तरी?  

शांतपणे किती तरी वेळा सांगून पाहिलं तिला. पण तिची उगीचच बिचारं होऊन जगण्याची सवय सुटतच नाहीये. 

किती शुल्लक गोष्टींसाठी स्वतःला त्रास करून घेतीये ती. म्हणून आज खडसावलं चांगलं. 

असा विचार करत असतांनाच वीणाला तिच्याकडेच येणाऱ्या कुंदाताई दिसल्या. 

तीही घाईघाईने त्यांच्याकडे गेली. 

"अगं आई? काय झालं? डोळे लाल झालेत बघ किती. रडलीस ना? सॉरी ग आई. तुला रडवलं ग मी. जरा जास्तच परखड बोलले ना आज?"

"नाही ग वीणा. मीच सॉरी. 

मी नाही आता तुझ्यावर अजून भार टाकणार माझ्या मनस्थितीचा. 

बरं झालं आज तू खडसावलंस मला. 

आधी खूप वाईट वाटलं. पण तुझंच बरोबर आहे. 

माझीच नजर बदलायची गरज आहे. 

बरं झालं तूच अंजन घातलंस आज माझ्या डोळ्यांत. कधी कधी आईही चुकते ग. 

चल आता घरी. तुझ्या आवडीची भरली वांगी केली आहेत आज." 


"अगं फोन करायचास ना.  मला बस मिळाली असती तर? पावसात धावत आलीस.. वादळ येणारे बहुतेक आज.. "


"तुझ्याशिवाय कोण आहे ग मला? तूच मला सोडून निघालीस या अपराधीपणाच्या वादळापुढे हे बाहेरचे वादळ काहीच नाही ग. 

पण कधी कधी ना हे वादळही गरजेचे असते. सुरवातीला उलथापालथ होते पण ते ओसरल्यावर धुसर झालेली वाट स्पष्ट दिसते. "

"माझ्यासाठी नाही ग पण तू तुझ्यासाठीच तुझी नजर स्वच्छ कर. मग बघ कशी पहिल्यासारखी टवटवीत होशील." असं म्हणून वीणाने आधी आईचे, मग स्वतःचे डोळे पुसले 

आणि मायलेकी हात धरून घराकडे निघाल्या.

समाप्त

©® धनश्री दाबके


📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.








5 टिप्पण्या

  1. खूप छान लिहिलंय धनश्रीताई! बरेचदा मनातलं वादळ शमल्यावरच पुढची निर्णयाची वाट सुकर होते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खरेच आहे, नेहमी मुलगी आणि सून यामध्ये तुलना नकळत होतेच.. वेळीच सावध झाले पाहिजे...

      हटवा
  2. एकदम मस्त आणि अनुरुप प्रतिसाद उमटले शेवटी ज्याने शेवट आनंदी केला. छान भाषा शैली...

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने