पडदा

©अपर्णा देशपांडे




बाहेर सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू झाला होता . 

खिडक्यांच्या तावदानावर सपाटून कोसळणारा पाऊस आत येऊ नये म्हणून संजय ने खडकी बंद करायला हात घातला .
 
थोडंसं बाहेर डोकावला तर खिडकी खाली कुणी बसल्याचं दिसलं .
" कोण ? कोण बसलंय खाली ? "

" लावून घ्या खिडकी , मी जाईन जरा वेळाने . " कुणीतरी उत्तरलं .
 
संजय ने खिडकी लावून घेतली .
 
थोड्याच वेळात काळोख झाला . बाहेर बघतांना भीती वाटावी असे थैमान चालू होते . 

संजयने बाहेर अंगणातील दिवा लावला . त्या उजेडात पावसाचा जोर स्पष्ट दिसत होता . 

अगदी दाट रेषा ... फटकार मारणाऱ्या . फाटकापासून आत भिंतीपर्यंत भरपूर पाणी साठले होते , पार घोट्या पर्यंत !

" अरे ! अजूनही कुणीतरी आपल्या खिडकी खाली बसलंय . किती तास झाले ! "
छत्री घेऊन तो बाहेर गेला .
 
ओट्यावर खिडकीखाली अंग चोरून एक वृद्ध व्यक्ती बसली होती . अंगावर एक मळलेला पायजमा , आणि लालसर कुर्ता होता . 

रापलेला चेहरा , दाढी वाढलेली , पण नजर ? ...भेदक . एखाद्या तपस्वी सारखी . 

अवतार भिकाऱ्यासारखा असला , तरी देहबोली तशी नव्हती .

" कोण तुम्ही बाबाजी ? "

" पाऊस खूप आहे , जवळपास काहीच नाही आडोश्याला , म्हणून तुमच्या इथे आसरा घेतला "
भाषा स्वच्छ होती .

" इथे कुठे जवळ रहाता का ? "

" जवळ आणि दूर ह्या फक्त संकल्पना आहेत . काय आज अन काय काल . काय जवळ आणि काय दूर ..."

ही अशी वरची भाषा ? संजयला हे सगळं फार विक्षिप्त आणि वेगळं वाटलं .


" कोणाशी बोलतोय रे ? " आईने आतून विचारले .

" काही नाही आई , डोन्ट वरी . .....

.......बाबा , बराच वेळ झालाय , मी मोठी प्लास्टिक बॅग देतो , तुम्ही जा घरी . "
" घर ? ........

चार भिंतीतही विवंचना
भोगायाचे ते भोग सरेना
आनंद यात्री मी जगाचा
दिशा कोणती उमजेना ।। "
 
संजय ने लगेच ओळखले , ह्या ओळी ....कुठे ऐकल्या ? ....बरोब्बर !! 

'दिशा भूल' नाटकातील आहेत ह्या ओळी .
 
" तुम्ही कोण आहात बाबाजी ? " भिजणाऱ्या अर्ध्या शरीराला छत्रीत सामावत संजय ने विचारले .

" मी ? आनंद यात्री ! मी आहे औग्युस्त रोंद्या चं शिल्पं .. मी आहे मोझार्ट ची धून .. पिकासोच्या ब्रश मधून निघणारी अगम्य अचल रेषा . .." बाबाजी काही बाही बोलत होते .
 
संजय ने मागे वळून बघितलं .

आई दारात उभी होती . निश्चल ..कान देऊन ऐकत .

" त्यांना आत घेऊन ये संजय . "
आई चा आवाज कापरा झाला का जरा ? .. किंचित शंका वाटली त्याला .

आई ने एक प्लास्टिक ची खुर्ची पुढे केली . 

बाबाजी पूर्णपणे आपल्याच नादात बसले .

" आई , आपल्या जवळच्या भागातील कुणी चुकलेले दिसतात ." संजय हळूच पुटपुटला .

आई निरखून त्यांच्याकडे बघत होती , आणि अचानक म्हणाली ,
" आतून जेवणाचं ताट घेऊन ये . ताक आणशील पेलाभर...."
 
" आई , रिअली? आर यु शुअर ?" आपली साशंकता स्पष्ट करत त्याने विचारले .

" हो , आण. भुकेले दिसतात हे."
 
संजय गेला की तिने वळून बाबाजी कडे नीट बघितलं . 

खूप रापलेला चेहरा , डोक्यावर फारसे केस नाही , पण दाढी वाढलेली .
 
कमलकांत ? .....हा ..हो , तोच ! कपाळावरचा व्रण ही तसाच ! ...त्यांना असं बघून तिला खूप भरून आलं होतं .

बाबाजी खुर्चीत बसून मनात काहीतरी वाचत असल्या सारखे बसले होते .

तिने दोन तीन प्रश्न विचारले , पण त्याची नजर शून्यात . उत्तर न देता .

तिने अचानक आभाळमाया मधील नाट्य संवाद सुरू केला ...

" सांगा आभाळातील चांदण्यांनो , सांगा तुमची व्यथा ... तुम्ही तर स्वयंमप्रकाशी आहात न ? ..."

त्यांची चुळबूळ सुरू झाली ...काहीतरी अस्वस्थ करत असल्या सारखी .

तिने आवाज उंचावून संवादाची धार वाढवली .
" सांगा साऱ्या आसमंताला ओरडून !.."

ह्या वाक्या नंतर त्यांची नजर बदलली . आत काहीतरी हललं होतं .

तिचा आवाज टिपेला पोहोचला , तसे ते आवेशात उभा राहिले .....

आणि संपूर्ण स्वगत अस्खलित अभिनयासहित पूर्ण केलं ,
आणि थकून पुन्हा खाली बसले .

तिची खात्री पटली . भरल्या डोळ्यांनी तिने हाक मारली ,
"कमलकांत!!"

त्यांच्या नजरेत मात्र कुठलीच ओळखीची खूण नव्हती .

पाठीमागे अचंबित होऊन संजय येऊन उभा होता .

" डोन्ट टेल मी आई , हे 'ते ' कमलकांत आहेत ? दिशाभूल , आभाळमाया , संन्यस्थ वाले ?"

तिने नुसती होकारार्थी मान हलवली .

" तू तर ह्यांची मेकअप आर्टिस्ट होतीस न? तुलाही ओळखलं नाही त्यांनी . "


संजय ने दिलेलं जेवण आधाशा सारखं संपवलं होतं त्यांनी . घटाघटा ताक संपवून स्वच्छ ताट त्याच्या हातात दिलं . वर तांब्याभर पाणी ही संपवलं ...

जणू काही पुढील काही दिवसांची पोटाची बेगमी करून घेतली .
 
एकेकाळी नाट्यसृष्टी वर राज्य करणारा हा जातिवंत कलाकार ...त्याची ही अवस्था ? सगळ्या युनिट ला प्रेमाने खाऊ घालणारे कमलकांत आज किती दिवसांनी असं पोटभर जेवले असतील ह्या विचाराने तिला भडभडून आलं .

" कमलजी , मी नयना . ओळखलं ? तुमची आणि आपल्या ग्रुप ची मेकअप आर्टिस्ट .
आपण पूर्ण महाराष्ट्र भर दौरे केले होते... सपना , मधू , मंगेश सर , राजीव ...आठवतात ? ......तुमच्या अनेक वेशभूषा आणि गेटअप ची खूप तारीफ झाली तेव्हा तुम्ही मला खास भेट दिली होती ....माझ्याकडे आहेत त्या कुड्या अजुन .."
 
बाबाजीची नजर कोरडी . भावनाहीन .

संसारातून निरिच्छता आलेल्या माणसाला कशाचच अप्रूप वाटत नाही , तसं त्यांचं झालं असावं .

दहा वर्षे होऊन गेली कमलकांत नाट्य सृष्टीपासून दूर जाऊन . 

त्यानंतर ते कुठे गेले.. फॅमिली कुठे आहे .. जिवंत आहेत तरी का ... ह्या बाबत कुणालाच काहीच माहिती नव्हतं .

" संजू , माझी जुनी डायरी आण ! "
डायरी मध्ये बरेच जुने संपर्क होते .

नयना आणि संजय ने अनेक जणांना फोन केले . 

त्यांच्या काळातील नट , दिग्दर्शक , निर्माते यांना त्यांच्याबद्दल माहिती तर नव्हतीच , पण आत्मीयता पण नव्हती .

उगवत्या सूर्याला सलाम करणाऱ्या जगात ह्या मावळत्या दिनकरासाठी कुणालाच वेळ नव्हता .
तोपर्यंत संजय ने त्यांच्यासाठी अंथरुण घातलं होतं . 

आईला न विचारता ...म्हणजे आपल्या आईचीही हीच इच्छा असेल असं वाटलं त्याला .

बाबाजींची नजर कुठेतरी शून्यात ...काहीतरी शोधत असल्या सारखी ..

नयना मात्र वेड्या सारखी सगळीकडे फोन करत होती . 

कुठून तरी त्यांच्या पत्नीचा संपर्क मिळाला .
 
अधिरपणे तिने फोन लावल्यावर तिकडून कुणीतरी दुसऱ्याच व्यक्तीने फोन उचलला .
" हॅलो , विद्या मॅडम ?"
 
" चार महिन्यांपूर्वी हा बंगला माझ्या नावावर करून त्या गेल्या . तुम्ही त्यांच्या नातेवाईक का ? त्या कमलकांत ला सांगा , अजून खूप कर्ज बाकी आहे . ऐपत नव्हती तर कशाला......."
 
तिच्या हातातून रिसिव्हर गळून पडला .

पलीकडून बोलणारा जोर जोरात बोलतच होता .
 
संजय ने पटकन तिला सांभाळत रिसिव्हर जागेवर ठेवला .
 
बाबाजी लहान मुला सारखे एका बाजूला घातलेल्या अंथरुणावर जाऊन पडले होते .

मध्यरात्री कडाडून वीज चमकली .पावसाने जोर धरला होता . कसला आवाज येतोय म्हणून नयना आणि संजय बाहेर आले .
 
कमलकांत उठून बसले होते .
 
कुणाशी तरी संवाद केल्या सारखे बडबडत होते .

" मंगेश , तिसरा प्रयोग संपल्यानंतर मायबाप प्रेक्षकांसाठी थांबायचं आहे .
नयना , ही दाढी नीट बसली का बघ बरं . .."
 
आणि त्याच तंद्रीत अचानक उठून उभे राहिले .
 
त्या नंतर असे समाधी लागल्या सारखे त्यांनी एका नंतर एक धडाधड स्वगतं म्हणायला सुरुवात केली .
 
संयस्थ मधील महादेव पंत , आभाळमाया मधील प्रो . फिलिप , दिशाभूल मधील राजासाहेब एका नंतर एक संवादातून जिवंत होत होते .
 
इतक्या दुर्दशा झालेल्या अवस्थेतही त्यांच्यातील कलाकाराचा आवेश थक्क करणारा होता .
 
" मी आहे सुर्यातील ओजस ! मी आहे द्रौपदीच्या सुडाचा अग्नी ! माझ्या धमन्यातून वाहणारं रक्त लाव्हा बनून बाहेर पडतंय ! मी असेन , नक्कीच असेन . तुझ्यात ! ...तुझ्यात ! आणि ह्या चराचरात ! " आवेशात हे बोलून
कमलकांत कोसळले . 

त्यांच्या चेहऱ्यावर खूप समाधान होतं ....

शेवटचा प्रयोग यशस्वी झाल्यासारखं .

आता मात्र प्रयोग संपून  पडदा पडला होता , कायमचा .


© अपर्णा देशपांडे

सदर कथा लेखिका अपर्णा देशपांडे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. 

साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ..

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने