निर्णय

© सौ. प्रभा कृष्णा निपाणे





प्रगतीचे लग्न सुहास बरोबर थाटात पार पडले. 

सुहास इंजिनीअर होता. सासू सासऱ्यांचा आधी थोडा विरोधच होता. 

पण मुलाला मुलगी पसंत म्हणून दिला मग होकार. नोकरीच्या गावी दोघेच राहत होते.

सुहासला गावाकडे राहण्यात मुळीच स्वारस्य नव्हतं. त्याला सारखे मुंबई चे वेध लागले होते.

वेगवेगळ्या डीपारमेन्टच्या परीक्षा देत होता.

आणि तो कल्याण डोंबिवली महापालिकेत इंजिनीअर म्हणून रुजू झाला.

मग त्याने बायकोचे पण फॉर्म भरायला सुरवात केली. 

स्पर्धा परीक्षेची तिची तयारी करून घेऊ लागला.

तिचे मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणून सिलेक्शन झाले...पण तेव्हा ती नऊ महिन्याची गरोदर होती...म्हणून त्या नोकरीवर पाणी सोडले.

बाळंत झाली...मुलगा झाला...मुलगा सहा महिन्यांचा झाला ...पुनः अभ्यास सुरू केला...पुन्हा मुंबई महापालिकेच्या जागा निघाल्या...फॉर्म भरला...

पुन्हा सिलेक्स्शन झाले. आता मात्र जॉईन करायचा निर्णय घेतला.

पाळणाघराचा शोध घेतला...पण तेहतीस वर्षांपूर्वी ...पाळणा घर हि संकल्पना इतकी रुजली नव्हती.

जवळपास पाळणाघर नव्हतेच. आता काय करावे ??

सासूबाईंना तार केला. मला अशी अशी नोकरी लागली...तुमच्या नातवाला सांभाळायला मुंबई ला या...पाळणा घरापेक्षा आजी जवळ नातू जास्त सुरक्षित राहील.

लगोलग परतीची तार आली...असे किती रुपये पगार मिळणार...? मी माझी शेतीवाडी सोडून येऊ शकत नाही.

एक रस्ता बंद झाला...मग झपाटयाने पाळणा घर शोध मोहीम सुरू केली...

जॉईन व्हायचा दिवस आला...पण पाळणाघर मिळालेच नाही...

थोड्याच अंतरावर एक जातभाई राहत होते...मामा, मामी म्हणायचो आम्ही त्यांना.

भीत भित मामी, मामांना विचारले. अर्थात मामाचा काही  संबंध नव्हता. कारण मामीला दिवसभर सांभाळायचे होते...मामा जॉब करत होते...

मामी म्हणाल्या इतका चांगला जॉब मिळाला तर कर...पाळणाघर किंवा बाईची व्यवस्था होई पर्यंत सांभाळते मी...

दुसऱ्या दिवशी सकाळी... सहासात महिन्याच्या मुलाला...मामी च्या हवाली करून ट्रेन गाठली.

ट्रेन मध्ये बसली. वय जेमतेम वीस वर्षे. 

गाडीत बायकांना चर्चा करताना ऐकले.

काय बाई आपण एक लेकरू सांभाळू शकत नाही ...पाळणा घरातल्या बायका सातआठ पोरं कसे सांभाळत असतील कोण जाणे.

एक म्हणाली... काही नाही ग ...दुधात अफू उगाळून टाकतात...पोरं मस्त झोपून राहतात...आई यायच्या वेळेला उठतात.

एक म्हणाली मुलांच्या बुद्धीवर पण परिणाम होतो त्या अफूने..मंद बुद्धी वगैरे होतात.

बाई ग मला तर धस्स झालं. कारण फक्त पाळणा घर मिळे परंत मामी सांभाळणार होत्या...

पुढचा त्याचा प्रवास पाळणा घरातूनच होणार होता. 

माझा अजून एक प्रॉब्लेम असा होता की, माझं बाळ अंगावर दुघ पीत होत...तो घरी रडला...आणि मी बाहेर असेल तर.. असेल तिथे दुधाच्या धारा फुटायचा...पान्हा फुटणे हा शब्द फक्त ऐकून होते...आता प्रत्यक्ष अनुभवत होते...

दूध अक्षरशः गळायला लागायचं...त्यावेळी माझाही जीव व्याकुळ व्हायचा.

पैसे का मुलगा अशी द्विधा मनस्थिती होत होती. 

मामी कडे त्याचे खायचे सगळे साहित्य ,दूध द्यायची...पण हा दूध पितच नव्हता.

अनपेक्षित अशीच ऑर्डर आली..त्यामुळे आठ दिवस त्याला खूप सवय लावायचा प्रयत्न केला ...पण हा पठ्ठा बाटली ने दूध पितच नव्हता...इकडे तो रडायला लागला ...की तिकडे मला धारा...तो भुकेने आणि मी ममत्वाने व्याकुळ...

पहिलाच दिवस आणि हा असा अनुभव...जाता बरोबर मामी म्हणाल्या ...याला दूध दे ग आधी...दिवसभर दुधाला तोंड सुद्धा लावले नाही.

खूप वाईट वाटले. एवढासा जीव कोमेजून, भुकेने व्याकुळ झाला होता. 

हातपाय धुतले...आणि त्याला दूध पाजायला बसले...भुकेने व्याकुळ जीव तो...जवळ घेताच अधास्या सारखा दूध प्यायला लागला.

लगेच छान तरतरीत दिसायला लागला...मामी म्हणाल्या ...किती लब्बाड ग...इतकी भूक लागली...पण बाटली तोंडात धरली नाही.

चमच्याने दिले तर फुरक्या वाजवून दूध बाहेर. 

मी काळजीच्या सुरात म्हणाले...मामी पिणार काहो हा दूध बाटलीने.

मामी म्हणाल्या भूक लागली की बरोबर पिणार...किती वेळ उपाशी राहणार.

आता झाली न जॉईन...मग ठेव जरा काळजावर दगड...आणि ये वेडाबाई... मुलाला सोडून नोकरी करणारी काय तू एकटीच आहे का...? 

होईल ग सवय हळूहळू...

घरी आले...स्वयंपाक केला..जेवून उद्याची तयारी केली...रात्री झोपायला गेल्यावर ट्रेन मधिल बायकांचा संवाद यांना सांगितला... हे समजावणीच्या सुरात म्हणाले...असं काही नसतं ग...पुन्हा सारे विसरून ...नव्याने उद्या साठी तयार झाले...

सोमवार ते शनिवार सहा दिवस मोठया हिंमतीने, काळजावर दगड ठेऊन गेले ऑफिसला.

रविवार मस्त मजेत घालवून पुन्हा सोमवारची तयारी सुरु.

सकाळी उठले डबा केला. लेकाला त्याचे सामान भरून मामीकडे सोडले.

ट्रेन पकडली...आज माझी रोजची ट्रेन सुटली.

यात पण बायकांच्या त्याच चर्चा.

एक ठाण्यावरून चढली... ती म्हणाली आमच्या शेजारी एक मुलगा आहे.

आधी तो चांगला होता...आता काहीतरी वेड्यासारखाच करतो...

त्याची आई नोकरी करायची ...पाळणा घरात असायचा तो...अफू द्यायची म्हणे ती पाळणा घर वाली बाई...दुधात घालून...शेवटी नोकरी सोडली बिचारीने...

माझे बरे बाई ...सासुसासरे आहेत...खरतर माझ्याशी त्याचं इतकं पटत नाही...पण मी मुलांसाठी अडजेस्ट करते...

पाळणा घर किंवा बाई त्यापेक्षा आजीआजोबा बेस्ट...खूप माया पण करतात आणि संस्कार पण...

आता माझ्या काळजावर कुणीतरी वार करत आहे असेच वाटले.

ऑफिस ला गेले...दिवसभर डोक्यात तेच विचार ...ऑफिस सुटायची वेळ झाली.

साहेबांना सांगितले,सर उद्यापासून मी येणार नाही...

का..? 

माझे वयक्तिक कारण आहे सर...

सर म्हणाले अहो तुम्ही वेड्या आहत का...? 

का काय झाले सर...? 

BMC सारखा जॉब कोणी सोडत का...?

मी म्हणाले ...सर कोणी सोडो अगर न सोडो... एक आई मात्र हा निर्णय नक्की घेऊ शकते...

काय...? हो सर माझं बाळ खूप लहान आहे...मला वाटलं होईल सगळं म्यानेज...पण माझं बाळ राहत नाही...दिवसभर उपाशी असतो...आठ दिवस झाले दूध पीत नाही...सर माझा निर्णय पक्का आहे...आणि राजीनामा देऊनच निघाले.

लहानसं तोंड करून मामीकडून लेकाला घेऊन घर गाठले.

जरा घाबरलेच होते...कारण इतका मोठा निर्णय नवऱ्याला न विचारता घेतला होता.

रात्री जेवणं करता करता यांना म्हणाले...अहो मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.

अग बोल ना...आणि इतकी का घाबरत बोलतेस...असं काय सांगायचं आहे.

मी एका दमात बोलून गेले...अहो मी BMC च्या नोकरीचा राजीनामा देऊन आलेली.

आणि माझ्या मनातील सगळी घालमेल त्यानां सांगितली.
नवरा खूप समझदार तो म्हणाला...हा तुझा निर्णय पक्का न..

हो ओ मला नाही करायची ती नोकरी.

इतकं लहान बाळ पाळणा घरात सोडून जायचे माझे धाडस खरंच नाही होत...आणि खूप रडले.

ते म्हणाले शांत हो...आणि मुलाच्या संगोपनासाठी तू इतका मोठा निर्णय घेतला...खरच खूप कौतुक वाटतं मला तुझं...

तुझा निर्णय जो आहे त्याला माझा पूर्ण पाठींबा आहे...

फक्त एका पगारात तुला थोडी अडजेसमेंट करावी लागेल.

माझी पूर्ण तयारी आहे. पण आज मला फक्त माझं बाळ हवं आहे. त्याच्यापुढे पैसा गौण वाटतो मला.

नवऱ्याने सुद्धा प्रगतीच्या या निर्णयाचे स्वागतच केले म्हणाला खरंच आज अभिमान वाटतो मला माझ्या बायकोचा...आणि अलगद ओठावर ओठ टेकवून मिठीत घेतले.


समाप्त.

©️ सौ. प्रभा कृष्णा निपाणे

  कल्याण.

सदर कथा लेखिका सौ प्रभा निपाणे यांची आहे. आम्ही त्यांच्या परवानगीने ही कथा आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करीत आहोत. या कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. त्यांच्या पुर्वपरवानगी शिवाय शेअर करु नये. साहित्य चोरी हा दखलपात्र गुन्हा असून आम्ही त्याचा निषेध करतो. शेअर करताना नावासहित शेअर करा.

धन्यवाद.!!!
📝 माझी लेखणी
फोटो गुगल वरुन साभार ...

अशाच नवनवीन कथा आणि लेख वाचण्यासाठी आमच्या 'माझी लेखणी' या फेसबुक पेजला फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने